Saturday, August 22, 2026

सख्य भक्ती (दशक ४ समास ८)


दासबोधातील चौथ्या दशकातील आठव्या समासात समर्थ रामदास स्वामींनी सख्य भक्ती म्हणजे काय? याचे विवेचन केलेले आहे. ‘सख्य’ म्हणजे ईश्वराला आपला परम मित्र, सखा किंवा सख्खा सोबती मानणे. ईश्वराशी भयाचे किंवा अंतराचे नाते न ठेवता अत्यंत आपुलकीचे, प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते जोडणे म्हणजेच सख्य भक्ती. अर्जुन आणि श्रीकृष्ण, तसेच सुदामा आणि श्रीकृष्ण यांची मैत्री हे सख्य भक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.


सख्य भक्तीचे मुख्य पैलू आणि महत्त्व म्हणजे हे भयमुक्त नाते असते. इतर भक्तींमध्ये ईश्वराबद्दल एक प्रकारचा आदरयुक्तधाक असतो, पण सख्य भक्तीत भीती पूर्णपणे गळून पडते. भक्त ईश्वराशी मनमोकळेपणे बोलू शकतो. सगळी नाती आपल्याला जन्माने मिळतात. पण मैत्रीचे नाते हे आपण निवडलेले असते. या मैत्रीत आपण मित्राशी कोणत्याही विषयावर, कोणत्याही प्रकारे बोलू शकतो. एकमेकांचा एकमेकांवर हक्क असतो. आपल्या मित्राशी आपण प्रेमाने बोलूही शकतो आणि भांडूही शकतो. संत जनाबाईनेही विठ्ठलाशी जोडलेले नाते हे सख्य भक्तीचेच होते. म्हणून तर तो मित्रत्वाच्या नात्याने तिला मदतीला यायचा. दळण दळून द्यायचा. तिच्या खोड्या काढायचा आणि जनाबाई त्याला शिव्याही द्यायची. मैत्रीचे हे नाते अत्यंत विलक्षण असे असते. म्हणूनच ते अतूट असते.

या भक्तीत सुख-दु:खाची देवाणघेवाण होते. मित्र जसे एकमेकांशी सर्व काही शेअर करतात, तसेच भक्त आपल्या मनातील सर्व आनंद, वेदना, चुका आणि भावना ईश्वरासमोर उघड्या करतो. कारण या ठिकाणी त्याचा देवावर अढळ विश्वास असतो. ‘माझा मित्र ईश्वर नेहमी माझ्यासोबत आहे आणि तो माझे रक्षण करेल’ हा अढळ विश्वास या भक्तीचा पाया आहे.


या भक्ती प्रकाराकडे समर्थ रामदास स्वामींचा दृष्टिकोन आणि व्यावहारिक निरुपण फार महत्त्वाचे आहे. समर्थ रामदास स्वामींनी सख्य भक्तीचे स्वरूप स्पष्ट करताना अनन्यता हा दृष्टिकोन दाखवला आहे. जसे खरा मित्र कधीही साथ सोडत नाही, तसेच भक्ताने ईश्वराला सोडून इतर कशाचाही आश्रय घेऊ नये. त्याचप्रमाणे समान भाव हा एक यातील गुण दाखवला आहे. मैत्रीत लहान-मोठा असा भेद नसतो. ईश्वर भक्ताच्या प्रेमापोटी त्याच्या पातळीवर येऊन त्याला मदत करतो. त्याचप्रमाणे या भक्तीप्रकारात सत्य मार्गदर्शन होत असते. जसा चांगला मित्र वाईट मार्गापासून वाचवतो, तसेच ईश्वर सख्याच्या रूपाने भक्ताला संकटात मार्गदर्शन करतो, जसे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला. त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून, भरकटण्यापासून कृष्णाने वाचवले.

या सख्य भक्तीचे फलित काय आहे हे सांगताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सख्य भक्तीमुळे जीवनातील एकटेपणा पूर्णपणे नष्ट होतो. माणसाला प्रत्येक क्षणी एका समर्थ आणि प्रेमळ मित्राची सोबत जाणवते. थोडक्यात, ईश्वराला आपला खरा आणि एकमेव मित्र मानून त्याच्यावर पूर्ण निष्ठा ठेवणे म्हणजे सख्य भक्ती. सख्य भक्ती ही नवविधा भक्तीपैकी एक अत्यंत गोड आणि जिव्हाळ्याची पायरी आहे. यामध्ये भक्त देवाकडे एक परमेश्वर किंवा मालक म्हणून न बघता, त्याला आपला सखा, मित्र किंवा सोबती मानतो. या भक्तीमध्ये भीती, संकोच किंवा आदरयुक्त अंतर नसते; तर प्रेम, हक्क, मोकळेपणा आणि निस्सीम विश्वास असतो. ही एक अनन्यसाधारण अशी भक्ती म्हणावी लागेल. या भक्तीत पूर्ण मोकळेपणा आणि समानता असते. भक्त देवासमोर आपले कोणतेही रहस्य, आनंद किंवा दु:ख अजिबात न घाबरता व्यक्त करतो. हे भक्ती हक्क आणि भांडण हे दोन्ही अधिकार भक्ताला प्राप्त होतात. देवाला प्रेमाने रागावणे, त्याच्याशी हक्काने भांडणे किंवा त्याला आळवणे हे या भक्तीचे खास वैशिष्ट्य आहे.


मैत्रीचा धर्म निभावणे हे केव्हाही कठीण असते. म्हणूनच ही भक्ती दुर्मीळ आहे. कारण यात सहजता व समर्पण असते. कडक नियम किंवा कर्मकांडांपेक्षा मनातील प्रेम आणि भाव महत्त्वाचा असतो. दु:खात आणि सुखात सोबत असल्याचा विश्वास असतो. देवावर विश्वास इतका घट्ट असतो की, प्रत्येक प्रसंगात देव आपल्या सोबतच आहे, ही भावना असते.

अर्जुन आणि श्रीकृष्ण हे केवळ नातेवाईक नव्हते, तर जिवलग मित्र होते. महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला आपला रथ चालवण्याची (सारथी बनण्याची) विनंती केली. युद्धभूमीवर अर्जुन जेव्हा खचला, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला मित्राच्या नात्यानेच मार्ग दाखवला आणि भगवद्गीता सांगितली.


त्याचप्रमाणे सुदामा आणि श्रीकृष्ण हे बालपणीच्या मैत्रीचे सर्वात सुंदर उदाहरण आहे. सुदामा अत्यंत गरिबीत श्रीकृष्णाला भेटायला द्वारकेला गेला, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या राजवैभवाचा विचार न करता सुदामाचे अश्रूंनी पाय धुतले आणि त्याच्या पोह्यांचा प्रेमाने स्वीकार केला.

गोप आणि गोपींची बाललीला ही पण सख्य भक्ती होती. गोकुळात श्रीकृष्ण आणि त्याचे गवळी मित्र (गोप) सोबत खेळायचे, एकाच पात्रात जेवायचे, एकमेकांचे उष्टे खायचे आणि खोड्या करायचे. तिथे कोणालाही कृष्ण हा जगचालक देव आहे याचे दडपण नव्हते, तो फक्त त्यांचा लाडका मित्र ‘कान्हा’ होता. द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचेही सख्य होते. द्रौपदी श्रीकृष्णाला आपला सखा आणि भाऊ मानत असे. वस्त्रहरणाच्या प्रसंगी जेव्हा सर्वांनी साथ सोडली, तेव्हा द्रौपदीने पूर्ण हक्काने आपल्या सख्याला हाक मारली आणि श्रीकृष्णाने तिच्या हाकेला धावून येत तिची लाज राखली.


वारकरी संतांनी विठ्ठलाशी सख्य भक्तीकेली. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांमधून विठ्ठलाशी अगदी हक्काने बोलायचे, प्रसंगी त्याला बोल लावायचे नि प्रेमाने भांडायचे. तू माझा सखा, तू माझा सोबती, हीच भावना त्यांच्या प्रत्येक अभंगात दिसते. सख्य भक्तीमध्ये देव आणि भक्तातले अंतर पूर्णपणे मिटून जाते आणि फक्त नि:स्वार्थ प्रेम व विश्वास उरतो.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: