Saturday, October 10, 2026

औषधांच्या मनमानी किमती


अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगाच्या औषधांच्या एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) आणि सरकारी खरेदी किमतीमधील मोठा फरक आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे. हा फरक १० पटींपेक्षा जास्त आहे. जेव्हा २,७०० किरकोळ किंमत असलेल्या कर्करोगाच्या औषधावर २७,०००ची एमआरपी लावण्यात आली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने प्रथम याला ‘उघडउघड लूट’ म्हटले आणि नंतर पुढच्या सुनावणीत या प्रचंड दरातील फरकाचे ‘सामूहिक हत्या’ असे स्पष्टपणे वर्णन केले. औषध विक्रेते, खासगी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालयांसाठी औषध खरेदी करणाºयांवर यापेक्षा अधिक कठोर टीका होऊ शकत नाही.


न्यायालयाने हा प्रश्नही उपस्थित केला की, हा सगळा पैसा कुठे जातोय आणि कोणाला फायदा होतोय? ही टिप्पणी औषध कंपन्या, खासगी रुग्णालयांचे मालक व डॉक्टर आणि सरकारी खरेदीमध्ये सहभागी असलेल्यांची असंवेदनशीलता थेट उघड करते. ही विसंगती तेव्हा स्पष्ट होते, जेव्हा केंद्र सरकारने फेब्रुवारी २०२५ मध्ये देशभरात ‘एक औषध, एक किंमत आणि एक गुणवत्ता’ हा धोरण कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार, औषध विक्रेते आणि ई-फार्मसींना औषधांच्या किमती सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णांना ठरलेल्या किमतीत दर्जेदार, मानक औषधे मिळू शकतील. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या तीव्र प्रतिक्रियेवरून हे स्पष्टपणे दिसून येते की, औषध विक्रेते आणि सरकारी औषध खरेदी अधिकाºयांनी या कायद्याकडे दुर्लक्ष केले आहे.

बहुतेक कॉर्पोरेट रुग्णालये सेवा न राहता उद्योग बनली आहेत. ते रुग्णांना केवळ त्यांच्याच रुग्णालयातील मेडिकल स्टोअर्समधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडतात. जर रुग्णांनी बाहेरून औषधे घेण्याची विनंती केली, तर ते उपचारांची जबाबदारी झटकतात. तथापि, यापैकी बहुतेक रुग्णालये आयुष्मान भारत आणि इतर सरकारी-अनुदानित आरोग्य योजनांतर्गत उपचारदेखील देतात. याचा अर्थ असा की, कायदा लागू झाल्यानंतरही औषध उत्पादक आणि रुग्णालयांच्या मनमानी कृती कायम आहेत. जेव्हा औषधे अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत येतात, तेव्हा ही छद्म-एमआरपी किंमत प्रणाली का टिकून आहे?


कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या एका सर्वेक्षण अहवालाने अलीकडेच सरकारला इशारा दिला आहे की, औषधे जाणूनबुजून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठेवली जात आहेत. या अहवालात म्हटले आहे की, औषधांच्या वाढलेल्या किमतींचे कारण औषधांमध्ये वापरल्या जाणाºया घटकांची जास्त किंमत नसून, औषध कंपन्यांचा नफ्याचा लोभ आहे. या लोभामुळे कंपन्या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाच्या (NPPA) नियमांकडे दुर्लक्ष करतात आणि औषधांच्या किमती अनेक पटींनी वाढवतात. अगदी नामांकित औषध कंपन्यासुद्धा आपल्या उत्पादनांच्या किमती दोनशे ते पाचशे पटींनी वाढवत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महागड्या औषधांचा वापर केला जातो. यापूर्वी, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांनी देशांतर्गत आणि परदेशी औषध कंपन्यांना प्रश्न विचारला होता की, या कंपन्या सरकारच्या उत्पादन शुल्क सवलतींचा फायदा घेऊनही आपल्या किमती कमी का करू शकल्या नाहीत.

या फसवणुकीचा केवळ ग्राहकांवरच थेट परिणाम होत नाही, तर महसुलाच्या नुकसानीच्या स्वरूपात सरकारचेही अप्रत्यक्ष नुकसान होत आहे. या संदर्भात, CAG ने सरकारला औषध किंमत नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याची सूचना केली होती. अशा सूचनांनंतर, सरकारने देशभरातील १,२०० CGHS (केंद्रीय आरोग्य योजना) रुग्णालये, २०० निदान केंद्रे, ५०० वेलनेस केंद्रे आणि ८,००० हून अधिक जन औषधी केंद्रांमध्ये ‘एक औषध, एक किंमत’ धोरण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तथापि, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने एक मजबूत आणि पारदर्शक जाळे स्थापित करणे आवश्यक आहे, ज्यासाठी प्रभावी माहितीची गरज आहे. औषध वितरणात सहभागी होणाºया विक्रेत्यांकडून केवळ तांत्रिक क्षमतेचीच नव्हे, तर सचोटीच्या मानकांचीही अपेक्षा केली जाते. औषध खरेदी समितीला अशी औषधे खरेदी करणे आवश्यक आहे जी उपचारांमध्ये प्रभावी आणि परवडणारी दोन्ही असतील, कारण सर्वसामान्य माणसाला परवडणारी, प्रभावी आणि दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे हे सरकारचे अंतिम ध्येय आहे.


सार्वजनिक आरोग्य हे राज्यांच्या अखत्यारीत येत असल्याने, त्यांना या योजनेत समाविष्ट केल्याने केवळ औषध वितरणाद्वारेच नव्हे, तर लाभार्थी रुग्णांची व्याप्तीही वाढेल. वैद्यकीय व्यवसाय हा जीव वाचवण्याचा व्यवसाय आहे. हा एक नैतिक व्यवसाय आहे, जो मानवतेच्या करुणेचे रक्षण करतो. एक असहाय्य रुग्ण बरा होण्याच्या आशेने डॉक्टरांकडे जातो, औषध उद्योगाचा लोभ पूर्ण करण्यासाठी नाही. परंतु संपत्तीच्या अनैतिक हव्यासामुळे रुग्ण डॉक्टरांना देव मानण्यास कचरतात. या अविश्वासाने रुग्णालयांमध्ये जास्त शुल्क आकारण्यावरून डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये वारंवार भांडणे आणि वाद होतात. या संदर्भात, दरोडा आणि सामूहिक हत्याकांडाबद्दल सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी अवाजवी प्रतिक्रिया मानली जाऊ शकत नाही.

आपल्याकडे भोंदुगिरी करणारे बाबा आणि अंधश्रद्धेचे प्रकार वाढण्याचे हे एक फार मोठे कारण आहे. औषधे परवडत नाहीत, उपचाराचा खर्च परवडत नाही म्हणून अंगारे, धुपारे आणि भोंदुगिरी करणाºया बाबांकडे जाण्याचे प्रमाण वाढते. याकडेही लक्ष दिले पाहिजे. डॉक्टरांनी औषधांची शिफारस करताना ती कोणत्याही मेडिकल दुकानात उपलब्ध होतील तीच दिली पाहिजेत. केवळ आपल्या हॉस्पिटलशेजारच्या मेडिकलमध्ये उपलब्ध होतील अशी औषधे शिफारस केल्याने मनमानी किमती लादल्या जातात. याबाबत कायदेशिर कारवाई होणे गरजेचे आहे.

दशक पाचवा : मंत्रांचा : समास चौथा : उपदेशलक्षण (१)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील चौथ्या समासात उपदेश लक्षणे सांगितली आहेत. समर्थ येथे म्हणतात की, आता उपदेशाची लक्षणे ऐका. ती नाना तºहेची आहेत. ती कोणकोणती आहेत हे जर सांगू म्हटले तर ती असंख्य आहेत. परंतु कल्पना येण्यासाठी त्यांपैकी थोडी सांगतो. समर्थ म्हणतात की, पुष्कळ गुरू मंत्राचा उपदेश करतात. ते मंत्र कोणते त्यांची यादी येथे दिली आहे. उपदेश देणारे गुरू पुष्कळ प्रकारच्या मंत्राचा उपदेश देतात. उदा. कोणी फक्त नामस्मरणच सांगतात तर कोणी शिष्यांकडून ओंकाराचा जप करवितात. कोणी शिवमंत्र, भवानीमंत्र, विष्णुमंत्र, महालक्ष्मीमंत्र, अवधूतमंत्र, गणेशमंत्र किंवा मार्तंडमंत्र सांगतात. कोणी मच्छकूर्मवराहमंत्र, नृसिंहमंत्र, वामनमंत्र, भार्गवमंत्र, रघुनाथमंत्र किंवा कृष्णमंत्र सांगतात. कोणी भैरवमंत्र, मल्हारीमंत्र, हनुमंतमंत्र, याक्षिणीमंत्र, नारायणमंत्र, पांडुरंगमंत्र किंवा अघोरमंत्र सांगतात. कोणी शेषमंत्र, गरुडमंत्र, पिशाच्चमंत्र, वेताळमंत्र, झोटिंगमंत्र असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात, त्याचे किती वर्णन करावे! कोणी बाळामंत्र, बगुलामंत्र, कालीमंत्र, कंकालीमंत्र, बटुकमंत्र सांगतात. त्याबरोबरच निरनिराळ्या शक्तींची यंत्रेदेखील शिकवितात. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. सगळे वेगवेगळे व स्वतंत्र आहेत. त्यात काही विचित्र असतात. काही भयंकर बीजांचे मंत्र असतात. त्यांचा संबंध भुताखेतांशी असतो. खरोखर पाहिले तर पृथ्वीवरील देवांची गणना कोणी करू शकत नाही आणि जितके देव तितके मंत्र आहेत. म्हणून वाणीने ते सगळे सांगणे अशक्य आहे. मंत्रमला असंख्यात आहेत. शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्यसंपन्न आहेत. हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेची विचित्र कला माणसाला कळणे शक्य नाही.


काही मंत्रांनी भुते जातात, कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात, कित्येक मंत्रांनी थंडीताप बरा होतो, तर कित्येक मंत्रांनी विंचू, साप, यांचे विष उतरते. असे नाना प्रकारचे मंत्र आहेत. गुरू ते मंत्र शिष्याच्या कानात सांगतात. त्याबरोबरच जप, ध्यान, पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती पण सांगून ठेवतात. अर्थात मंत्राचे सुद्धा एक शास्त्र आहे. मंत्रांचा उपयोग करून व्यवहारातील शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठी उपयोगात आणला जातो. आणि शेकडा नव्याण्णव मंत्रवादी स्वार्थापायी मंत्र वापरतात असे आढळते. काही गुरू भगवंताच्या निरनिराळ्या नामांचा जप सांगतात. त्याला सुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी अवश्य असते.

समर्थ म्हणतात की, कोणी शिव शिव म्हणण्यास सांगतात, कोणी हरि हरि म्हणायला लावतात, तर कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणावे असा उपदेश देतात. कोणी कृष्ण कृष्ण, कोणी विष्णु तर कोणी नारायण नारायण म्हणावे असा उपदेश देतात. कोणी अच्युत, कोणी अनंत तर कोणी दत्त दत्त म्हणत जावे असे सांगतात. कोणी राम राम तर कोणी ओम ओम म्हणावे असे सांगतात. कोणी सांगतात की, भगवंताचे अनेक नामानी स्मरण करावे. कोणी गुरू गुरू तर कोणी परमेश्वर म्हणण्यास सांगतात. कोणी सांगतात की, विघ्नहर्त्या गणपतीचे चिंतन करीत जावे. कोणी श्यामराज, कोणी गरुडध्वज तर कोणी अधोक्षज म्हणत जावे असे सांगतात. कोणी विश्वनाथ तर कोणी मल्लारी म्हणायला सांगतात. कोणी तुकाई तुकाई म्हणून जप करवून घेतात. भगवंताची नावे घेण्याचा हा प्रकार किती सांगायचा! शिवशक्तीची नावे अनंत आहेत. ज्याला जे नाव स्वाभाविकपणे आवडते त्याचा उपदेश तो शिष्याला करतो.


समर्थ म्हणतात की, परमार्थसाधना करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये अनेक अनुभव येतात. ज्याला जे साधन साधते किंवा पचनी पडते ते तो आपल्या शिष्याना सांगतो. तसेच साधना करताना मन व देहदेखील सूक्ष्म बनतात. त्यामुळे काही अतिंद्रिय अनुभव येतात. ज्याला असे नाद व प्रकाश यांचे अनुभव येतात तेच तो आपल्या शिष्यांना सांगतो. परमार्थाच्या वाटेवर हे सगळे काही आहे. परंतु त्या सगळ्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवीच हवी. नाहीतर तोच येवढा परमार्थ आहे, अशी शिष्याची भुलावणी होते. म्हणून आत्मज्ञानावाचून इतर सर्व गोष्टी व्यर्थ समजाव्या असे श्री समर्थ निक्षून सांगतात.

समर्थ म्हणतात की, खेचरी, भूचरी, चाचरी व अगोचरी या चार मुद्रा कराव्या असे कोणी सांगतो तर निरनिराळी आसने करावी असे कोणी सांगतो. कोणी तांबडा, पांढरा, काळा किंवा निळा अतिंद्रिय प्रकाश दाखवितात तर कोणी अनाहत नावाचा अतिंद्रिय नाद ऐकवितात. आघाताशिवाय होणारे व आत ऐकू येणारे हे नाद वेणुनाद, पैंजणनाद, घुंगरूनाद, मृदंगनाद, मेघनाद असे अनेक प्रकारचे असतात. एखाद्या गुरूला शरीररचनेचे संपूर्ण ज्ञान असते व तो तेच शिष्यांना सांगतो. कोणी कर्ममार्ग, कोणी उपासनामार्ग, तर कोणी आठ पाय‍ºयांचा पातंजल योग सांगतो व शरीरांतील सहा चक्रांचे भेदन उपदेशितो.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


Friday, October 9, 2026

रंगभूमीवरचा नाना


नाना पाटेकर हे कायम प्रेक्षक आणि कलाकारांचे, सहकलाकारांसाठी नानाच असतात. त्याला वय नसते. जसे आपण आपल्या लाडक्या देवाला, आईला अरे तुरे संबोधून जवळ जातो, तसेच काहीसे समीकरण नानाबाबत आहे. त्यामुळे नाट्यसृष्टीत वयाने लहान मोठा कोणीही असला तरी त्यांच्यासाठी तो नाना असतो. नानासाहेब, नाना सर म्हणून कोणी त्याला संबोधत नाही. नानालाही ते कधी आवडले नाही. कलाकाराला वयच नसतं असं त्याचं म्हणणं होतं. आपल्याकडे हिंदी, मराठी किंवा कोणत्याही चित्रपटसृष्टीत मराठी रंगभूमीवरून आलेल्या कलाकारांचा नेहमीच दबदबा राहिलेला आहे. रंगभूमीवरचा कलाकार आहे आणि त्यातून मराठी रंगभूमीवरचा आहे म्हटल्यावर त्याचा दराराच असतो, आदर असतो. त्यामुळे चित्रपटसृष्टी कितीही गाजवली तरी त्याचा पाया असलेल्या रंगभूमीवरचा नाना मला अधिक आवडतो. अनेक जण रंगभूमीचा वापर रूपेरी पदार्पणासाठी करतात, पण मराठी कलाकारांचे पाय कायम रंगभूमीशी प्रामाणिक राहतात. रंगभूमी हे त्यांचे प्रेम असते.


नाना पाटेकरांनी कधी नाटकाच्या भूमिकेची लांबी रुंदी मोजली नाही. त्या भूमिकेत आपण कसे परफेक्ट आहोत हे सिद्ध करून दाखवले. म्हणून अनिल बर्वे लिखित आणि विजयाबार्इंनी दिग्दर्शित केलेल्या हमिदाबाईची कोठी या नाटकात नाना लक्षात राहतो. स्वत: अभिनयाचे विद्यापीठ असलेल्या विजयाबाई, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी आणि अशोक सराफ असे दिग्गज असताना नानाचे वेगळेपणही आणि या नाटकातील त्याची समरसता उठून दिसते. अशोक सराफ आणि नाना पाटेकर हे दोन गुंडे, दलाल अगदी अस्सल वाटतात. सत्तारच्या तुलनेत छोटी भूमिका असली तरी लुक्काची नानानी साकारलेली भूमिका अत्यंत चोख आणि लक्षवेधी ठरते. रंगभूमीवरचा सहज वावर आणि संवादफेक ही अत्यंत चपखल राहते ती यासाठीच.

नानाची आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे महासागर या नाटकातील. जयवंत दळवी यांचे हे गाजलेले नाटक. या नाटकातही विक्रम गोखले, भारती आचरेकर, मंगेश कुलकर्णी, मोहन भंडारी, मच्छिंद्र कांबळी आणि उषा नाडकर्णी हे दिग्गज कलाकार होते. प्रत्येकाची शैली ही वैशिष्ट्यपूर्ण. पण यातील दिगू किंवा दिगंबर ही भूमिका ज्या सहजतेने नानानी केलेली आहे त्याला तोड नाही. मध्यमवर्गीय चाळ संस्कृतीत राहणारा, इन्श्युरन्सचे काम करणारा सामान्य माणूस. घरकामाने गांजलेली दोन, तीन मुलांची आई असलेली बायको, घरात सोळी विधवा आई आणि एक वेडसर विक्षिप्त भाऊ याचे कुटुंब सांभाळत असताना श्रीमंत मित्र असलेल्या विक्रम गोखलेच्या अलिशान कुटुंबाची श्रीमंती. यातील संघर्ष, मानसिकता, मोहमयी जीवन याचे असंख्य कंगोरे या नाटकात दिसतात. ते नानानी प्रचंड मेहनतीने पण सहजपणे दाखवले आहेत. ती भूमिका बघताना अरे हे मी माझ्या जवळच कुठेतरी पाहिले आहे. अशी विक्षिप्त माणसं असतात याची जाणिव या अभिनयातून होते. माणसाचं मन अथांग असते, महासागरासारखे. त्याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही. त्याचा वेध घेणारे आणि आपल्याकडे नाही ते हवे म्हणून धावणाºया मनाचा वेध घेणारे नाटक नानानी अचूक केले आहे. किंबहुना या नाटकात या सगळ्या कलाकारांची अभिनयाची जुगलबंदीच पाहायला मिळते. पार्टीतील विक्रम गोखलेचे अंदाधुंद वागणे, भारती आचरेकरचे नटणे-मुरडणे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन, या वातावरणात गुदमरणारा सामान्य माणूस नानानी दाखवला आहे. तर दीर्घकाळ पॉज घेऊन संशयाने विक्रम गोखलेनी पाहणे यातूनही प्रेक्षक सुन्न होतात. जयवंत दळवींची लेखणी महान की यात दिग्दर्शकाची कमाल जास्त आहे की, कलाकारांनी ओतलेली जान हा न सुटणारा प्रश्न नाटक पाहताना पडतो. कथानक आणि नाना बाहेर पडताना हुरहुर लावत लक्षात राहतात, हीच त्या अभिनयाची ताकद आहे.


जयवंत दळवी यांच्याच आणखी एका नाटकात नानानी केलेली भूमिका चांगलीच गाजली. त्या नाटकाचे नाव पुरुष : या नाटकात चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी, रिमा लागू आदी कलाकार होते. लेखक जयवंत दळवी यांनी लिहिलेले हे नाटक रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले. ‘पुरुष’ या मराठी नाटकात नाना पाटेकर यांनी अत्यंत गाजलेली आणि भयावह अशी ‘गुलाबराव’ या भ्रष्ट व अहंकारी नेत्याची भूमिका साकारली होती. एक अत्यंत सत्तांध, क्रूर, शोषक आणि पुरुषी अहंकाराने भरलेला राजकीय नेता नानानी रंगवलेला होता. जो नाना महासागर या नाटकात पापभिरु सामान्य माणसाची भूमिका करतो तोच इथे या नाटकात गुलाबराव हा मुख्य खलनायक आहे. तो नायिका ‘अंबिका’ नाटकात ही भूमिका रीमा लागू यांनी केली होती. हिच्यावर अत्याचार करतो आणि तिला स्वत:च्या सत्तेच्या व पुरुषी वर्चस्वाच्या बळावर दाबण्याचा प्रयत्न करतो. नाना पाटेकर यांनी आपल्या आक्रमक संवादफेकीने आणि कसदार अभिनयाने ‘गुलाबराव’ हा रंगमंचावर जिवंत केला होता. त्यांचे हे काम मराठी रंगभूमीच्या इतिहासातील सर्वात प्रभावी खलनायकी भूमिकांपैकी एक मानले जाते. या नाटकाचे दिग्दर्शनही विजया मेहता यांनीच केले होते आणि नाना पाटेकर यांनी या नाटकाचे १८०० पेक्षा जास्त प्रयोग केले होते.

रंगभूमीवर विविध भूमिका साकारायचे काम नानानी केले. एका पठडीतील भूमिकेत तो कधी अडकून पडला नाही. त्यामुळे त्याला विविध व्यक्तिरेखांचे कंगोरे समजत गेले. विजय तेंडुलकर यांचे पाहिजे जातीचे १९७६ साली आलेले नाटक हे तितकेच ताकदवान होते. या नाटकात महिपतीची भूमिका नानानी केलेली होती. नाना पाटेकर यांच्या बरोबरच विहंग नायक विजय तेंडुलकरांची कन्या सुषमा तेंडुलकर हिनेही लक्षवेधी अशी भूमिका इथे केलेली होती. जातीव्यवस्थेविरोधात लढणाºया स्वाभीमानी नायकाची ही भूमिका अत्यंत सहजपणे साकारताना नानामधला अंगार दिसून येत होता.


कलाकार असला तरी त्याच्या सगळ्याच भूमिका यशस्वी होतात असे नाही. १९८६च्या सुमारास अंकुश, प्रतिघात या एन चंद्राच्या चित्रपटांमुळे नाना चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात होता. त्यावेळी आलेले आई शपथ हे नाटक मात्र नानाच्या कारकिर्दीतील सगळ्यात अपयशी नाटक म्हणून नोंदवले गेले. नानाच्या नावावर हाऊसफुल तिकीटविक्री झालेल्या नाटकातील कथानक आणि संवाद प्रेक्षकांना न आवडल्यामुळे आणि अत्यंत कंटाळवाणे असलेले हे नाटक प्रेक्षकांनी साफ नाकारले. नाना समोर असताना प्रेक्षक नाटक न आवडल्याने उठून गेले. ही कोणत्याही नटसम्राटासाठी शोकांतिका असते. म्हणूनच नानानी कदाचित त्यानंतर आपले पूर्ण लक्ष चित्रपटांकडे वळवले. पण अभिनयाचा हा बुलंद आवाज रंगभूमी गाजवणारा ठरला होता. आज मराठी रंगभूमी त्याला मुकली आहे.

Thursday, October 8, 2026

दहशतवादाकडे दुर्लक्ष करणारे मौन


दहशतवादाशी लढणे केवळ यासाठी कठीण नाही की, कोणाच्या मनात अतिरेकी-जिहादी विचार येऊ शकतात याचा अंदाज लावणे अशक्य आहे. अशा व्यक्ती कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित असतीलच असे नाही. ते कट्टर विचारांनी प्रेरित होऊन एकटेच दहशतवादी कृत्ये करू शकतात. अशा घटना अनेक देशांमध्ये तथाकथित ‘लोन वुल्फ’ (एकटे लांडगे)द्वारे घडवल्या जातात. ते कधीकधी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवतात, गर्दीत ट्रक घुसवतात किंवा लोकांवर अंदाधुंद गोळीबार करतात. अलीकडेच आॅस्ट्रेलियामध्ये अशीच एक घटना घडली.


डॉक्टर, इंजिनिअर आणि अगदी वैमानिकांचीही गणना ‘लोन वुल्फ’ (एकटे दहशतवादी) किंवा एखाद्या संघटनेशी संलग्न असलेल्यांमध्ये केली जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावरील बॉम्बस्फोट हा डॉक्टरांच्या एका दहशतवादी गटाचे कृत्य होते. हा कार बॉम्बस्फोट एका आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणला होता. फ्लायदुबईचा ओमानमध्ये जन्मलेला सहवैमानिक, हमाम अल-हमामी हा देखील एक दहशतवादी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अमेरिकेत ९/११चे हल्ले करणाºया अल-कायदाच्या दहशतवाद्यांकडून तो प्रेरित झाल्याचे दिसते.

आतापर्यंतच्या तपासानुसार, अल-हमामी हा एक ‘लोन वुल्फ’ दहशतवादी होता असे मानले जाते. कॉकपिटमध्ये भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना ठार मारणे आणि तेल अवीव विमानतळावर १७४ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान नष्ट करणे हा त्याचा उद्देश होता. हा ९/११च्या हल्ल्यासारखाच एक भयानक दहशतवादी हल्ला ठरला असता, ज्यात हजारो लोकांचा बळी गेला असता. यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती कशी असती याची कल्पना करा? स्मित मच्छारने आपल्या विलक्षण धैर्याने अल-हमामीचे दुष्ट हेतू हाणून पाडले. तो जगासाठी एक नायक बनला आहे.


मात्र सर्वत्र त्याचे कौतुक होत असले तरी, काही षड्यंत्र सिद्धांतवादी असा दावा करत आहेत की, ही घटना एक ‘फॉल्स फ्लॅग आॅपरेशन’ होती, जी निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी इस्रायली पंतप्रधानांच्या सांगण्यावरून करण्यात आली होती. अखेर, एका भारतीय वैमानिकाने हाणून पाडलेल्या दहशतवादी हल्ल्यातून इस्रायली पंतप्रधानांना निवडणुकीत फायदा कसा मिळू शकतो? समस्या ही आहे की, जे लोक असा युक्तिवाद रचतात ते तर्क आणि बुद्धीला अजिबात महत्त्व देत नाहीत. ही काही नवीन सवय नाही. ९/११ आणि २६/११च्या बाबतीतही असेच म्हटले गेले होते.

आठवा, या दहशतवादी हल्ल्यावर ‘आरएसएस की साजिश’ नावाचे एक पुस्तक लिहिले गेले होते आणि चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही ते प्रकाशित केले होते. पहलगाम हल्ल्याच्या बाबतीतही पाकिस्तानींनी असा प्रचार केला होता की, त्यांना बदनाम करण्यासाठी भारताने हे ‘फॉल्स फ्लॅग आॅपरेशन’ केले होते. असे घटक केवळ दहशतवादाचे समर्थनच करत नाहीत, तर त्याविरुद्धच्या लढ्यात अडथळाही आणत आहेत. ते अनेकदा दहशतवाद्यांना शोषितांचे नेते संबोधून त्यांची प्रशंसा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.


दहशतवादाविरुद्ध लढणे कठीण झाले आहे, कारण काही लोक दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्याशी लढणाºयांच्या कृतींवर मौन बाळगणे पसंत करतात. अशा प्रकारे, ते त्यांच्याशी सहानुभूती बाळगणाºयांना बळ देतात. असे लोक जगात सर्वत्र आहेत आणि दुर्दैवाने भारतातही आहेत. हे काही गुपित नाही की, अनेक तथाकथित धर्मनिरपेक्ष विरोधी नेत्यांना स्मित मच्छारच्या शौर्याबद्दल एक शब्दही बोलण्याची गरज वाटली नाही. त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, तरीही ते गप्प राहिले. विरोधी पक्षनेता म्हणवणाºया राहुल गांधींपासून त्यांच्या इंडि आघाडीतील एकाही नेत्याला स्मितचे कौतुक करावेसे वाटले नाही यातून त्यांची दहशतवादाला खतपाणी घालण्याची प्रवृत्ती लपून राहत नाही.

अर्थात याची कारणे समजायला अवघड नाहीत. याचे कारण मुस्लीम मतपेढीच्या संकुचित राजकारणात दडलेले आहे. मुस्लीम समाजाचा एक गट इस्रायलला केवळ शत्रूच मानत नाही, तर त्याचा विनाशही इच्छितो. यासाठी ते हमाससारख्या संघटनांची प्रशंसा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. भारतात अल-कायदा आणि आयसिसच्या दहशतवादाला पाठिंबा देणारे लोकही उघडकीस आल्याने, हमासच्या सहानुभूतीदारांची उपस्थिती आश्चर्यकारक नाही; हे सिद्ध झाले आहे.


तीन वर्षांपूर्वी, हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला केला, ज्यात सुमारे १,२०० लोक मारले गेले आणि काहींना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आले. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझामध्ये एक कठोर लष्करी कारवाई सुरू केली, ज्यात हजारो लोक मारले गेले. यामुळे मुस्लीम जगात इस्रायलविरोधातील संताप आणखी वाढला. दरम्यान, हमासचा नेता खालिद मशालने केरळमधील एका रॅलीत व्हर्च्युअल भाषण दिले. ही रॅली जमात-ए-इस्लामी हिंदच्या युवा शाखेने आयोजित केली होती. ही रॅली पॅलेस्टिनी लोकांच्या समर्थनार्थ बोलावण्यात आली होती, परंतु हमास नेत्याचे भाषण आवश्यक मानले गेले.

रॅलीत ‘बुलडोझर हिंदुत्व आणि वर्णद्वेषी झिओनिझम उखडून टाका’ अशा घोषणाही देण्यात आल्या. अशा लोकांच्या भावना दुखावण्याच्या भीतीमुळेच अनेक विरोधी नेते स्मित मच्छारच्या शौर्याबद्दल मौन बाळगत आहेत का? अशा प्रकरणांमध्ये मौन बाळगल्याने संपूर्ण मुस्लीम समाजाची प्रतिमा डागाळते आणि जे सत्य आहे ते स्पष्टपणे मांडणाºयांचा आवाज दाबला जातो. जर असदुद्दीन ओवैसी स्मित मच्छार यांची प्रशंसा करू शकतात, तर इतर विरोधी नेते का संकोच करत आहेत?

दशक पाचवा : मंत्रांचा (२) समास तिसरा : शिष्यलक्षण (५)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील तिसºया समासात शिष्याची लक्षणे सांगितलेली आहेत. सतगुरू तसाच सतशिष्य महत्त्वाचा असतो हे सांगताना समर्थ म्हणतात की, ज्याच्यापाशी भक्ती, विरक्ती, शांती, चांगली वृत्ती, लीनता, इंद्रियदमन, कृपा, दया आणि तृप्ती यापैकी काहीच नाही, तसेच ज्याच्यापाशी भगवंताकडे वळणारी बुद्धी नाही, त्याला भगवंत भेटत नाही. शरीराचे कष्ट करण्यास ज्याची प्रकृती योग्य नाही. धर्माच्या बाबतीत जो अतिकंजूष असतो, ज्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही आणि ज्याचे अंत:करण अतिकठोर आहे, अशा माणसाला परमार्थ साधत नाही. जो लोकाशी सरळ वागत नाही. जो सज्जनांना आवडत नाही, जो रात्रंदिवस दुस‍ºयाचे उणे पाहत राहतो, जो सदा सर्वकाळ खोटेपणाने वागतो, थापा मारतो, ज्याचे बोलणे मायावी व लपवाछपवीचे असते, ज्याच्या आचारात व विचारात मेळ नाही आणि ज्याचे कोणतेच बोलणे खरे नाही अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही.


याठिकाणी समर्थ म्हणतात की, विंचू व इतर विषारी प्राणी कोणालाही दंश करण्यास सतत तयार असतात. त्याप्रमाणे वाईट शब्द बोलून जो सगळ्यांच्या अंत:करणास जखमा करतो, दुस‍ºयाला दु:ख द्यायला जो केव्हाही मनापासून तयार असतो, जो स्वत:चे अवगुण झाकून ठेवतो, पण दुस‍ºयांना त्यांच्या दोषाबद्दल कठीण शब्द बोलतो, ज्याच्या अंगी जे गुणदोष नसतात ते जो खोटेपणाने त्याच्यावर लादतो, असा कधी शिष्य म्हणवून घेण्यास पात्र नसतो. त्याला कधी सद्गुरू भगवंत भेटू शकत नाही.

समर्थ म्हणतात की, ज्याप्रमाणे एखादा दुराचारी क्रूर माणूस दुस‍ºयाच्या दु:खाने विरघळत नाही त्याप्रमाणे जो स्वत: अंत:करणात पापमय असतो, परंतु दुस‍ºयाच्या हातून काही पाप घडले तर ज्याला त्याची कीव येत नाही अशा माणसाला भगवंत भेटत नाही. दुष्ट माणसाला दुस‍ºयाचे दु:ख कळत नाही. दु:खी असलेल्या माणसाला तो अधिक दु:ख देतो. इतकेच नव्हे तर दुस‍ºयाचे कष्ट पाहून दुर्जनाच्या मनाला उलट आनंद वाटतो. अशा माणसाला भगवंत मिळत नाही. दुर्जन माणूस स्वत:च्या दु:खाने मनात कष्टी असतोच पण दुस‍ºयाचे दु:ख पाहून तो हसतो, त्याला बरे वाटते. अशा माणसाला अखेर यमपुरीस जावे लागते व तेथे यमराजाचे दूत त्याला मार देतात. असो, असे जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही. पूर्वी केलेल्या पापांमुळे त्यांची बुद्धी भगवंताकडे वळत नाही. देहाचा अंतकाळ आला म्हणजे त्यांची गात्रे अगदी क्षीण होतात आणि अगदी जवळचे नातेवाईक दूर होतात. त्यावेळी त्यांना आपल्या वाईट कर्माची जाणीव होते.


या समासात अखेरीस समर्थ म्हणतात की, जे सतशिष्य असतात ते वरील अवगुण कटाक्षाने टाळतात. संसारामध्ये सुख नाही असा अनुभव येऊन सुद्धा पढतमूर्ख प्रपंचाच्या नादी लागतात, भगवंताला सर्वस्वी विसरतात. समर्थ म्हणतात की, हे याठिकाणी सांगितलेले अवगुण ज्यांच्यामध्ये नाहीत असे सतशिष्य निराळेच असतात. त्यांची श्रद्धा घट्ट असते, त्यांच्या मनात संशयवृत्ती जागी असते, कुळाचा अभिमान ज्याच्या मागे जडलेला असतो, अशी माणसे प्रपंचालाच मनाने पुन्हा घट्ट धरून ठेविले तर तो पुन्हा दु:खच देणार हे निश्चित होय.

संसारात आपलेपणा ठेवल्याने सुख मिळाले असे आजपर्यंत कधी पाहिले नाही व ऐकलेही नाही. पण हे माहीत असून जे प्रपंचात गुंततात ते स्वत:चे नुकसान करून घेतात, स्वत:च आपले दु:ख निर्माण करतात. संसारामध्ये सुख मानणारी माणसे मंदबुद्धीची किंवा मूर्ख असतात. पढतमूर्ख जाणुनबुजून संसारातील दु:खाकडे डोळेझाक करतात. प्रपंच करायला काहीच हरकत नाही. तो खुशाल करावा. परंतु त्याबरोबरच थोडा परमार्थदेखील वाढवावा. परमार्थ अगदीच बुडवावा हे काही योग्य नाही. मागील दोन समासांमध्ये गुरुशिष्यांच्या लक्षणाचे विवेचन व वर्णन केले. आता पुढील समासात उपदेशाचे लक्षण समर्थांनी सांगितले आहे.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


Wednesday, October 7, 2026

विरोधीपक्ष चांगला पर्याय देण्यास अक्षम


विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना समजत नाही की, लोक मोदी-शाह सरकारवर नाराज का नाहीत. त्यांचा विश्वास आहे की, सत्ताविरोधी लाट ही भारतीय लोकशाहीतील एक मूलभूत शक्ती आहे, ज्यापासून कोणीही सुटू शकत नाही. त्यांची आजी इंदिरा गांधी या पाकिस्तानचे दोन तुकडे करूनही आपली लोकप्रियता टिकवू शकल्या नाहीत आणि दोन-तीन वर्षांतच त्यांना नाराजीचा फटका बसला. पण काही कारणास्तव मोदींच्या बाबतीत असे का घडत नाहीये?


राहुल गांधींना कदाचित असे म्हणायचे असावे की, एकतर निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी केली जात आहे किंवा मतदान यंत्रांमध्ये फेरफार केला जात आहे, ज्याला ते मतचोरी म्हणतात. ते अद्याप त्यांच्या आरोपांसाठी निर्णायक पुरावे देऊ शकलेले नाहीत, पण त्यात काही तथ्य असण्याची शक्यता आहे. तथापि, त्यांच्या आरोपांची धार या वस्तुस्थितीमुळे बोथट होते की, भाजपने आपल्या १२ वर्षांच्या राजवटीत २० राज्यांच्या निवडणुका गमावल्या आहेत, ज्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांसारख्या बालेकिल्ल्यांचा समावेश आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला उत्तर प्रदेशात अपेक्षित यश मिळवता आले नाही, ज्यामुळे त्यांना २४० जागांवर समाधान मानावे लागले.

तथापि, त्यांचे हे म्हणणे बरोबर आहे की, भारतात दीर्घकाळ टिकलेल्या सरकारांचा लोकांना कंटाळा येऊ लागतो. पंडित नेहरू, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांची सरकारे याला अपवाद ठरली आहेत. जरी मनमोहन सिंग सरकारने आपल्या दुसºया कार्यकाळात कथित कमकुवतपणा आणि भ्रष्टाचारामुळे जनतेचा पाठिंबा गमावला असला तरी, मोदी सरकारने आपला दुसरा कार्यकाळ सुरळीतपणे पूर्ण केला, परंतु तिसºया कार्यकाळात त्यांना काही प्रमाणात जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी, मोदींची लोकप्रियता अबाधित आहे आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार सुरू आहे.


राहुल म्हणतात की, एखाद्या विशिष्ट नेत्याची लोकप्रियता समजण्यासारखी आहे आणि सरकारची कामगिरीही समजण्यासारखी आहे, परंतु लोकांचा भ्रमनिरास का नाहीसा झाला हे अस्पष्ट आहे. प्रश्न हा आहे की, ते हे समजून घेण्याचा प्रयत्न तरी करत आहेत का. कारण, जरी लोकांचा भ्रमनिरास झाला असला तरी, तो व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते पर्याय आहेत? राहुल आणि त्यांचा राजकीय गट, इंडिया, सध्याच्या सरकारपेक्षा चांगले असे काय नवीन देऊ शकतात? भ्रमनिरास म्हणजे आपली भूमिका सोडून आंधळ्या विहिरीत उडी मारणे आहे का?

आव्हानांबद्दल बोलायचे झाल्यास घराच्या भाड्यानंतर मुलांचे शिक्षण हा एका सामान्य भारतीय कुटुंबासाठी दुसरा सर्वात मोठा खर्च बनला आहे. याचे कारण म्हणजे सरकारी शाळांचा निकृष्ट दर्जा मुलांना खासगी शाळांमध्ये जाण्यास भाग पाडतो आणि त्यासोबतच त्यांना शिकवणीचीही गरज भासते. लाखो रुपये खर्च करूनही मुले बेरोजगार आहेत, कारण माहिती तंत्रज्ञान आणि एआय क्रांतीमुळे रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांची मागणी सतत बदलत आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था या बदलांशी जुळवून घेण्यात अपयशी ठरत आहे.


मोदी सरकारने गांधीजींच्या ‘नई तालीम’वर आधारित एक नवीन, रोजगार-केंद्रित शिक्षण धोरण लागू केले आहे, परंतु पुरेशा मूलभूत सुधारणा आणि शिक्षक प्रशिक्षणाशिवाय यातून अपेक्षित सुधारणा होईल की नाही याबद्दल शंका आहे. परीक्षा पद्धतदेखील कॉपी आणि पेपरफुटी माफियांच्या जाळ्यात अडकली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या आघाडीतील भागीदारांकडे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही योजना आहेत का? जेव्हा कॉपीला प्रोत्साहन देणे हेच आरजेडी आणि एनडीए यांसारख्या पक्षांचे धोरण राहिले आहे, तेव्हा बंदुकीच्या धाकाने विद्यार्थ्यांना भडकवून काय साध्य होणार आहे?

मोदी सरकार मोठ्या संख्येने औद्योगिक नोकºया निर्माण करण्याच्या आशेने सत्तेवर आले, परंतु जवळपास अडीच कार्यकाळ उलटूनही या अपेक्षा अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालेल्या नाहीत. एनडीएकडे उद्योग उभारण्यासाठी काही ठोस योजना आहेत का? बिहार, बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये सिंडिकेट, खंडणीखोर, माफिया आणि गुंडांच्या दहशतीमुळे कायदा आणि सुव्यवस्था इतकी खालावली आहे की, तिथे गुंतवणूक करण्याची जोखीम कोणीही घेऊ इच्छित नाही. जरी त्यांची इच्छा असली तरी, ‘इंडिया’मधील काही पक्षांचा केवळ उल्लेखही त्यांना दूर पळवून लावण्यासाठी पुरेसा आहे. राहुल गांधी स्वत: म्हणतात की, कोणती संपत्ती कोणाच्या मालकीची आहे हे ठरवण्यासाठी एक्स-रे सर्वेक्षण केले जाईल. ते काही मोठ्या उद्योगपतींना खलनायक ठरवण्याच्या कामातही गुंतले आहेत. अशा राजकीय वातावरणात उद्योग आणि त्यांच्यावर अवलंबून असलेला रोजगार कसा भरभराटीला येऊ शकतो?


एआय-चालित यंत्रक्रांतीमध्ये कसे टिकून राहायचे यावर जग विचारमंथन करत आहे. संशोधन, आविष्कार आणि नवोपक्रमाच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी नवीन प्रतिभेचा शोध घेतला जात आहे आणि तिला विकसित केले जात आहे. दरम्यान, ‘जेवढी लोकसंख्या, तेवढा हक्क’ या घोषणेसह राहुल भूतकाळातील अन्यायांचा हिशोब करण्यात व्यस्त आहेत. कधी ते सचिवालयातील, कधी शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांमधील, तर कधी लष्करी अधिकाºयांमधील मागासलेल्या वर्गांची गणना करतात. ज्या संविधानाचे संरक्षण करण्याचा ते दावा करतात, त्याच संविधानाच्या कलम ४५ नुसार दहा वर्षांच्या आत संपूर्ण साक्षरता अनिवार्य आहे; हे एक असे कार्य आहे जे पूर्ण करण्यात त्यांच्या पक्षाची सरकारे अपयशी ठरली.

जर हे वेळेवर पूर्ण झाले असते आणि प्रत्येक सरकारी शाळेत सर्वांना चांगल्या खासगी शाळेप्रमाणेच समान शिक्षण दिले गेले असते, तर कदाचित आज त्यांना मोजणी करावी लागली नसती. सरकारबद्दल काही प्रमाणात भ्रमनिरास वाढत असण्याची शक्यता आहे, पण त्याचा फायदा घेण्यासाठी कोणते पर्याय आहेत? काँग्रेसने शेतकरी चळवळीला पाठिंबा दिला. कृषी सुधारणांना ‘काळे कायदे’ ठरवून रद्द करण्यात आले. आता कोणीतरी विचारायला हवे की, प्रत्येक गावात आणि शहरात पिकांची साठवणूक आणि प्रक्रिया करण्याची योजना कोणाकडे आहे, जेणेकरून कांदे आणि टोमॅटोचे भाव कमी करता येतील. हवामान झपाट्याने वाढत आहे, कापणीच्या वेळी ते फेकून द्यायला नको का?


म्हणून, सुधारणांना होणारा विरोध हा त्या थांबवण्याऐवजी, त्या सुधारण्याच्या उद्देशाने असायला हवा. जवळजवळ प्रत्येक लोकशाही देशात विरोधी पक्ष अवैध स्थलांतरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे, पण भारतात याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. जवळजवळ प्रत्येक देशात, मृत आणि विस्थापित लोकांची नावे वगळून मतदार याद्या स्वच्छ ठेवल्या जातात. भारतात यालाही विरोध होत आहे आणि लोक फक्त बघत आहेत, कदाचित कारण त्यांना हे समजले आहे की, चांगला पर्याय नसताना केवळ भ्रमनिरासातून सरकारे पाडल्याने काहीही साध्य होत नाही.

दशक पाचवा : मंत्रांचा (२) समास तिसरा : शिष्यलक्षण (४)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील तिसºया समासात शिष्याची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत. कारण हा समास अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात की, राजहंसांच्या समुदायामध्ये एक डोमकावळा शिरला. त्याचे लक्ष सगळे विष्ठेच्या गोळ्यावर आणि तो स्वत:ला हंस म्हणवू लागला. त्याचप्रमाणे संतांच्या संगतीत राहून इंद्रियदास स्वत:ला संत म्हणवून घेतात. परंतु त्याचे सगळे लक्ष इंद्रियभोगरूपी घाणीमध्ये गुंतलेले असते. बायकोला बगलेत घेऊन ‘मला संन्यास द्या’ असे जर कोणी म्हणाला तर ते जसे अर्थहीन असते, तसे इंद्रियासक्त माणूस अव्हाच्या सवा ज्ञान बडबडतो.


असो, अशा पढतमूर्खांना भगवंताशी एकरूप होण्याचे सुख कळणे शक्य नसते. घाणीतील किड्यांना घाणीमध्येच मोठा आनंद वाटतो. ते अगदी स्वेच्छेने घाणीत रमतात. वेश्येची सेवा करणारा माणूस राज्यशकट हाकणाºया राजाचा प्रधान होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जो इंद्रियांचा गुलाम आहे तो उत्तम भगवदभक्त कसा होऊ शकेल?

त्याचप्रमाणे जे लोक इंद्रियसुखांपुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे कसे शक्य आहे? ते नुसता वाचाळपणा करतात, नुसते शाब्दिक ज्ञान बदबून जगात मिरवतात. असे जे शिष्य असतात ते अतिशय वाया गेलेले, हलक्यांतील हलके, हीन, अविवेकी, दुष्ट, दुर्जन, खळ आणि खोटे असतात.


येथे प्रश्न असा येतो की, या अशा शिष्यांची वाट काय? यांना सतशिष्य बनण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही? अशा शिष्यांना तरण्याचा उपाय आहे. पश्चाताप होऊन जर ते सद्गुरूला पुन्हा शरण गेले तर सद्गुरूच्या कृपबळाने त्यांच्यामध्ये पालट होतो असे समर्थ म्हणतात. स्वामी सांगतात की, असे जे पापमय शिष्य असतात, फार दिवस दोषरूप जीवन जगल्याने ज्याचे दोष अतिशय घट्टपणे मनात बसलेले असतात, त्यांना जर खरा पश्चाताप झाला तर तेच प्रायश्चित्त होते. अनुतापाच्या आगीने त्यांचे दोषरूपी मळ जळून जातात आणि अंत:करण निर्मल होऊन जाते. त्यांनी सद्गुरूंना पुन्हा शरण जावे, त्यांना प्रसन्न करावे, त्यांची कृपा संपादन करावी आणि शुद्ध होऊन जावे. ज्याच्याकडून गुरूद्रोह घडतो म्हणजे गुरूचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो, तो कायमचा नरकात पडतो. सद्गुरूंना प्रसन्न करण्याखेरीज द्रोहाचा परिणाम टाळण्यास दुसरा उपाय नाही.

पूर्वी हातून घडलेल्या चुकांचा पश्चाताप झाला, सद्गुरूला पुन: शरण गेला आणि त्यांना प्रसन्न करून कृपा करून घेतली की, सतशिष्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. येथेपर्यंत बरेच शिष्य मजल मारतात. पण पुढे सद्गुरूंना चिकटून राहून त्यांनी सांगितलेली साधना करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्याच शिष्यांच्या ठिकाणी आढळते. त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती स्मशानवैराग्याप्रमाणे तात्पुरती ठरतात. शिष्य वाया जातो, त्याला परमार्थ साधत नाही.


समर्थ म्हणतात की, एखाद्या शिष्याला खरा पश्चाताप होतो आणि तो सद्गुरूपुढे लोटांगण घालतो. पण त्याची ती मनाची स्थिती स्मशानवैराग्याप्रमाणे फार वेळ टिकत नाही. अर्थात अशा तात्पुरत्या शरणागतीने त्याला आत्मज्ञान होत नाही. अगदी थोडा वेळ टिकणारी भावना आणून सद्गुरूकडून मंत्र घेतला. त्या मंत्रापुरते तात्पुरते शिष्यत्व पत्करलेले अशा रितीने पुष्कळ गुरू केले तरी परमार्थ साधणार नाही. अशा शिष्याला लोकात थाट करायला शब्दज्ञान पुष्कळ येते, तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्टतर्कवादी बनतो. परमार्थाचे सोंग करण्यापायी घटकेत तो देवाचे प्रेम आल्याचे दाखवून रडतो, घटकेत अंगी वैराग्य संचरलेले दाखवितो, तर घटकेत आपण मोठे ज्ञानी आहोत असा अहंकारीपणा व्यक्त करतो. घटकेत अत्यंत श्रद्धावान दिसतो तर लगेच दुसºया घटकेला अविश्वासाने उलटून तंटा करायला तयार होतो. अशी वेड लागलेल्या माणसासारखी अनेक सोंगे तो करतो.


काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटवृत्ती, तिरस्कार असे अनेक दुष्ट विकार त्याच्या हृदयात भरपूर प्रमाणात आढळतात. अहंकार, देहसुखाची आवड, अनाचार, इंद्रियभोगाची लालसा, संसाराचे प्रेम आणि प्रपंचाचा कंटाळा या सगळ्या गोष्टी त्याच्या अंत:करणात वास करतात. तो काम करण्यात दिरंगाई करतो, तो कृतघ्न, पापी, कुकर्मी म्हणजे भ्रष्ट कर्मे करणारा, भलतेच तर्क करणारा आणि प्रत्येक गोष्टीत संशय काढणारा असतो. तसाच तो अभक्त म्हणजे भक्तिहीन, भावहीन, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातकी, हृदयशून्य म्हणजे दुसºयाच्या सुखदु:खाची जाणीव नसणारा, आळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीर, अविचारी आणि संशयाला घट्ट चिकटून राहणारा असा असतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वाईट वृत्ती, वाईट वासना, कोती किंवा हलकी बुद्धी आणि इंद्रियसुखाची इच्छा, या सगळ्या परमार्थाला घातक असणा‍ºया गोष्टी त्याच्या मनामध्ये वास करतात. त्याला भारी हाव असते. तो मस्तराने भरलेला असतो. तिरस्कारापायी तो दुस‍ºयाची निंदा अगदी मनापासून करतो. ज्ञानाच्या व देहाच्या अभिमानाने तो उर्मटपणे वागतो. हे वर्णन केलेले देहबुद्धीचे सगळे दुर्गुण नालायक शिष्याच्या ठिकाणी आढळतात, असे समर्थ या समासात सांगतात.

परमार्थ साधण्यास अयोग्य असणा‍ºया प्रापंचिकाचे वर्णन यापुढे दिले आहे. हे सगळे सुटल्यावाचून परमार्थ हाती लागत नाही असे स्पष्टपणे दाखविण्याचा हेतू आहे. समर्थ म्हणतात की, ज्याला आपली तहान व भूक आवरत नाही, झोप आलेली आवरत नाही, ज्याच्या मनातील मुलाबाळांची व बायकोची चिंता कमीच होत नाही आणि जो भ्रमाने व्यापलेला आहे अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही. जो भरमसाठ शब्दज्ञान बोलतो पण ज्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो, ज्याच्या अंगी अनुताप नाही व धारिष्ट नाही आणि जो साधनाचा मार्ग धरीत नाही त्याला भगवंत जोडत नाही.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



Tuesday, October 6, 2026

दशक पाचवा : मंत्राचा (२) : समास तिसरा: शिष्य लक्षण (३)


दासबोधातील पाचव्या दशकातील तिसºया समासात शिष्यलक्षण सांगताना समर्थ म्हणतात की, सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ असतो. सद्गुरू सतशिष्याला जे देतो ते देव देऊ शकत नाही. सद्गुरूच्या कृपेने सतशिष्य स्वत: देवपदाला पोहोचतो. सद्गुरूहून देव मोठा आहे असे ज्या शिष्याला वाटते तो खरोखर कमनशिबी असतो. हा समज म्हणजे एक भ्रमच आहे. वैभवाच्या अभिमानातून बाहेर पडणारा तो विकल्प असतो किंवा सामर्थ्य मिळविण्याच्या नादाचा तो परिणाम असतो. शरीराच्या दृष्टीने म्हणजे स्थूलदृष्टीने सद्गुरू माणूस दिसतो व असतो हे काही खोटे नाही. परंतु मनाच्या व आत्म्याच्या दृष्टीने किंवा सुक्ष्मदृष्टीने तो प्रत्यक्ष परमात्मस्वरूपच असतो. जो शिष्य सद्गुरूला नुसत्याच स्थूलदृष्टीने किंवा देहबुद्धीच्या दृष्टीने पाहतो त्याला आपल्या श्रीमंतीचा व सत्तेचा अभिमान वाटणारच. मग तो सद्गुरूला गरीब समजून देवाला फार मोठा मानतो. सद्गुरू भेटून त्याला पाहताना देहबुद्धीचा भ्रमात्मक दृष्टिकोन न सुटणे हेच करंटेपण होय. सद्गुरूचे खरे स्वरूप कायम टिकणारे आहे, अविशानी आहे. देवाचे स्वरूप अशाश्वत आहे, कारण कल्पांताच्या वेळी देव नाश पावतात. त्या समयी हरिहरांचे सामर्थ्यसुद्धा उरत नाही. ब्रह्मादी देव नाहीसे झाले तरी सद्गुरू जसेच्या तसेच टिकतात. म्हणून सर्व देवांहून सद्गुरूचे सामर्थ्य अधिक असते. क्षुद्रबुद्धीच्या मानवाला ही गोष्ट कळत नाही. गुरू आणि देव यांची बरोबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा. त्याच्या मनात खोट्या ब भ्रमात्मक कल्पना घट्ट बसवलेल्या असतात. त्यामुळे खरे तत्त्व काय आहे ते त्याला कळत नाही. वास्तविक माणूस आपल्या कल्पनेने देव तयार करतो, मंत्राने त्याला देवपणा येतो. परंतु ईश्वराला सुद्धा सद्गुरूची कल्पना करता येत नाही. म्हणून सद्गुरू हा देवापेक्षा कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहे. सद्गुरूचे स्वरूप असे कल्पनातीत असल्याने त्याचे वर्णन करण्यामध्ये वेदशास्त्रांत कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहे. सद्गुरूचे स्वरूप असे कल्पनातीत असल्याने त्याचे वर्णन करण्यामध्ये वेदशास्त्रात फारच मतभिन्नता आढळते. आपापसात त्यांची भांडणापर्यंत पाळी येते.


या समासात समर्थ म्हणतात की, देव काय आणि हे सगळे विश्व काय दृश्याचा सारा पसारा मायेच्या कक्षेत येतो. सद्गुरूच्या स्वरूपाला मायेला स्पर्श नाही. सद्गुरूचे स्थान परमश्रेष्ठ असल्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही. सगळे देव मायेतून निर्माण होतात म्हणून त्यांचे सामर्थ्य सद्गुरूपुढे लटके पडते. असो, ज्याच्यावर सद्गुरूची कृपा असते, त्याच्यावर इतर कोणाची सत्ता चालत नाही. त्या कृपेने शिष्याला ब्रह्मज्ञान होते. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्याने तो सा‍ºया वैभवाला क:पदार्थ मानतो.

स्वामी म्हणतात की, सद्गुरूकृपेच्या जोरावर सतशिष्याला आत्मसाक्षात्कार होतो, आत्माचे प्रत्यक्ष ज्ञान त्याच्या अंतकरणात जिवंतपणे उसळत राहिल्याने मायेसकट सारे प्रचंड विश्व खरेपणाने त्याला दिसत नाही. आत्मज्ञानाने तो इतका भरून जातो की आत आणि बाहेर जिकडे तिकडे आत्मस्वरूपावाचून इतर काही त्याला दिसतच नाही. त्यामुळे तो सतशिष्य स्वत:च ईश्वरस्वरूप बनून जातो. तात्पर्य, ‘मी ब्रह्म आहे’ या दिव्य अवस्थेला सतशिष्य पोहोचतो.


समर्थ रामदास स्वामींनी शिष्यसमुदायामध्ये सतशिष्य कसे वेगळे पडतात याचे वर्णन पुढे केले आहे. ज्याचे अंत:करण पश्चातापाच्या आगीने पोळते ते निर्मल होते, शुद्ध बनते. पण ते तापलेले अंत:करण सद्गुरूच्या बोधवचनांनी शांत होते. सतशिष्याची अवस्था ही अशी असते. समर्थ म्हणतात की, सद्गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असता सारे ब्रह्माड पालथे पडण्याचा प्रसंग आला तरी सद्गुरूच्या वचनावर असलेला सतशिष्याचा शुद्ध अढळ विश्वास यत्किंचितही मागे पुढे होत नाही. अशा रीतीने जे खरे खुरे सद्गुरूला शरण सतशिष्य मानवतेकडून देवत्वाकडे झपाट्याने वाटचाल करतो. अर्थात त्यामुळे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. तो सर्व दृष्टीने मोठा निर्मल व पवित्र बनून जातो.

समर्थ म्हणतात की, सतशिष्याच्या चित्तामध्ये अशी अढळ श्रद्धा असते, त्यामुळे तो मोक्षाचा हक्कदार होतो. बाकीचे शिष्य नुसते शिष्याचा वेष पांघरणारे लबाड वाईट शिष्य समजावे. त्यानंतर यापुढील सोळा, सतरा ओव्यांमध्ये श्री समर्थांनी नामधारी शिष्याचे वर्णन केले आहे. त्यांच्या मनामधून प्रपंचाचे प्रेम कमी झालेले नसते. किंबहुना प्रापंचिक वासना फलित व्हाव्या यासाठीच ते शिष्य बनतात. असे हे पढतमूर्ख विनोदासाठीच परमार्थ करतात. समर्थ म्हणतात की, जे पढतमूर्ख असतात त्यांना मनातून इंद्रियभोगांमध्ये सुख वाटत असते. केवळ लौकिकासाठी ते परमार्थ करतात. आपण परमार्थी आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी ते सद्गुरूला शरण जातात. वासना तृप्त करण्यासाठी इंद्रियभोगांमध्ये ते यथेच्छ रमतात, त्यांना प्रपंचाचे घट्ट प्रेम असते. त्यामुळे परमार्थामधील सूक्ष्म विचार त्यांना आकलन होत नाही. सारखी बहिर्मुख वृत्ती राहिल्याने त्यांना भगवंताबद्दलचे विचार करता येत नाहीत. पढतमूर्ख माणूस परमार्थाकडे वळतो खरा परंतु त्याचे मन प्रपंचात अडकलेले असते, प्रापंचिक वासनांनी भरून गेलेले असते. त्यामुळे कुटुंबाचे ओझे वाहता वाहता हमालाप्रमाणे त्याची अवस्था होते. त्याचे खरे सुख प्रपंचात गुंतलेले असते, केवळ करमणुकीसाठी तो परमार्थ करतो. भ्रमात राहणारा, मूर्ख व मंद बुद्धीचा तो माणूस वासनेमध्ये अडकलेला असतो. एखाद्या डुकराला सुगंधी लेप लाविला किंवा एखाद्या रेड्याला चंदनाचा लेप चोळला तर त्यांना त्याची किंमत कळत नाही. त्याचप्रमाणे वासनेत गुरफटलेल्या माणसाला ब्रह्मज्ञान सांगितले आणि आत्मानात्माविवेक शिकविला तर त्याची किंमत कळत नाही. उकिरड्यामध्ये म्हणजे अत्यंत दुर्गंधीमध्ये लोळणाºया गाढवाला सुगंधाचा आनंद आकलन होत नाही किंवा अंधारामध्ये जीवन जगणा‍ºया घुबडाला सूर्यप्रकाशात विहार करणा‍ºया हंसाच्या मुक्त जीवनाची कल्पना येऊ शकत नाही. तो सतत इंद्रियभोगाच्या घाणीत उडी घेतो, खाली घसरतो. थोबाड वर करून एखादे कुत्रे ज्याप्रमाणे हाडे चघळण्यात आनंद मानते, त्याचप्रमाणे इंद्रियाधीन माणसाला इंद्रियभोगात आनंद वाटतो. इंद्रियसुखासाठी तो बेचैन असतो. त्या त्याला सोसत नाही त्याचप्रमाणे इंद्रियासक्त माणसाला आत्मज्ञान पचत नाही. गाढवे राखता राखता त्यांच्या संगतीत ज्या कुंभाराचा जन्म जातो त्याला विद्वानांच्या सभेत बसविले तर ते त्याला मानवत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियभोगामध्ये गुंतलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


अनिश्चित हवामान हा धोक्याचा इशारा आहे


या वर्षाच्या सुरुवातीला हवामानशास्त्रज्ञांनी इशारा दिला होता की, जगाच्या मोठ्या भागावर एल-निनोचा परिणाम होईल. एल-निनो ही पॅसिफिक महासागरात घडणारी एक नैसर्गिक हवामान घटना आहे. याचा परिणाम जवळजवळ संपूर्ण जगातील हवामानावर होतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, एल-निनोचे परिणाम पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत टिकू शकतात.


पृथ्वीचे तापमान वाढत असल्यामुळे एल-निनोचा प्रभावही अधिक गंभीर होत आहे. त्याच्या परिणामांमुळे काही भागांमध्ये तीव्र उष्णता तर इतर भागांमध्ये तीव्र थंडी निर्माण होते. त्याचप्रमाणे, काही भागांमध्ये कमी पाऊस आणि दुष्काळ असतो, तर इतर भागांमध्ये अतिवृष्टी होते. अपेक्षेप्रमाणे एल-निनोचा परिणाम भारतावरही झाला आहे. देशातील अनेक भाग दुष्काळाने त्रस्त आहेत, तर इतर भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.

भारताची शेती हवामान चक्रावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जरी शेती आणि संबंधित क्षेत्रांचा भारताच्या जीडीपीमध्ये १५-१८ टक्के वाटा असला तरी, देशाची अंदाजे ५० टक्के लोकसंख्या त्यावर अवलंबून आहे. अतिवृष्टी किंवा अपुºया पावसामुळे पिकांचे नुकसान होते. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. यावर्षी पाऊस १२ टक्क्यांनी कमी झाला आहे.


गेल्या २५ वर्षांत इतकी कमी पर्जन्यवृष्टी होण्याची ही चौथी वेळ आहे, परंतु त्याच वेळी देशाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अलीकडेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अल्पावधीत अतिवृष्टी झाली. यामुळे पूर, पिकांचे नुकसान आणि जीवितहानी झाली. अतिवृष्टीमुळे डोंगराळ राज्यांमध्येही समस्या निर्माण झाल्या. यापूर्वी तिबेटमधील एक हिमनदी फुटल्याने नेपाळमध्ये महापूर आला होता, ज्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.

वेगाने बदलणारे हवामानाचे चक्र जागतिक पर्यावरणावर परिणाम करत आहे. भारतासह अनेक देशांतील सामान्य लोकांना या अनपेक्षित हवामान बदलांमागील कारणे समजत नाहीत. समस्या ही आहे की, ज्यांना कारणे समजतात तेसुद्धा पर्यावरणाचे प्रदूषण करत आहेत आणि निसर्गाचे अविचारीपणे शोषण करत आहेत. नैसर्गिक संसाधनांचे हे अनियंत्रित शोषण सुमारे ४०-५० वर्षांपूर्वी सुरू झाले, जेव्हा औद्योगिकीकरण शिखरावर होते आणि प्रदूषणविरोधी तंत्रज्ञान अजून विकसित झाले नव्हते.


पूर्वी हवामानशास्त्रज्ञांनी नैसर्गिक संसाधनांच्या या अनियंत्रित शोषणाच्या पर्यावरणावरील दीर्घकालीन परिणामांचा अंदाज लावला नव्हता. परिणामी, विकसित देशांनी नैसर्गिक संसाधनांचे शोषण सुरूच ठेवले आणि त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही आजही ते तसे करत आहेत. त्यांच्याच हवामानशास्त्रज्ञांनी त्यांना खूप पूर्वीच सावध राहण्याचा इशारा दिला होता, अन्यथा एक गंभीर संकट ओढवले असते, असे असूनही ते हे करत आहेत.

त्यांनी असेही स्पष्ट केले की, नैसर्गिक संसाधनांच्या अनिर्बंध शोषणामुळे जागतिक तापमान वाढत आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून हवामान परिषदा आयोजित केल्या जात आहेत आणि पर्यावरणाच्या संरक्षणाच्या उपायांवर एकमत होत असले तरी, या उपायांची अंमलबजावणी होत नाहीये. जर त्यांची अंमलबजावणी होत असेलच, तर ती अर्धवट मनाने केली जात आहे. विशेषत: अमेरिका आपली जबाबदारी पार पाडण्यास तयार नाही.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हवामान बदल नाकारतात. त्यांच्यामुळेच अमेरिकेने फेब्रुवारी २०२७ मध्ये ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन आॅन क्लायमेट चेंज’मधून पूर्णपणे माघार घेण्याची घोषणा केली आहे. अलीकडच्या वर्षांत चीनने आपल्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचे मनमानीपणे शोषण केले आहे आणि ते आजही सुरू आहे. विकसित देशांना वाटते की, विकसनशील देशांनी स्वत:च्या विकासाकडे दुर्लक्ष करून हवामान बदल रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, परंतु जागतिक तापमानवाढीच्या कारणांवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान या देशांना देण्यास ते तयार नाहीत. परिणामी, हवामानातील अनपेक्षित बदल दिसून येत आहेत.

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. एक विकसनशील देश म्हणून वेगाने बदलणाºया हवामान चक्राचा अधिक मोठा परिणाम भारत अनुभवत आहे. शेतकरी आणि गरीब लोक सर्वाधिक प्रभावित होत आहेत. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात वेगाने बदलणाºया हवामान चक्रांची कदाचित जाणीव होत नसेल, परंतु सरकारने निसर्ग संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची हीच वेळ आहे.


नैसर्गिक संसाधनांचे अनिर्बंध शोषण आणि वापर प्रदूषणाला हातभार लावत आहे, हे देखील सरकारने लोकांना समजावून सांगितले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारांनी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस योजना आखल्या पाहिजेत, त्याचबरोबर जनतेनेही आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने आता ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या अंमलबजावणीला आधीच विलंब झाला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की, काही अभ्यासांनुसार, हिवाळ्यातील प्रदूषण कमी न केल्यास पिकांचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.

याचे कारण असे की, वाढत्या प्रदूषणामुळे उत्तर भारतातील सूर्यप्रकाश कमी होतो, ज्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. पावसाळ्यानंतर होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आता अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, तरीही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे त्यांचा योग्य वापर केला जात नाही. यामागे सामान्य नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबद्दल असलेल्या चिंतेचा अभाव हे देखील एक कारण आहे. यामुळेच काही ठिकाणी पिकांचे अवशेष जाळले जातात, तर इतर ठिकाणी कचरा जाळला जातो.


त्याचप्रमाणे, जुनी वाहने कितीही प्रदूषण करत असली तरी ती चालवली जातच राहतात. असंख्य औद्योगिक समूह जाणीवपूर्वक हवा, पाणी आणि माती प्रदूषित करत आहेत. प्रदूषणविरोधी तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा स्वस्त झाले असले तरी, ते त्याचा अवलंब करण्यास नकार देतात. जर सरकार आणि समाज पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत दक्ष राहिले नाहीत, तर हवामान बदल रोखणे आणि त्याचे दुष्परिणाम टाळणे कठीण होईल.

अटकेची कारणे जाणून घेणे हा मूलभूत हक्क


समाजात अटकेकडे एक कलंक म्हणून पाहिले जाते. याचा व्यक्तीच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. संविधान आपल्याला सन्मानाने जगण्याचा हक्क देते आणि योग्य प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय त्या हक्कात कोणताही हस्तक्षेप होऊ दिला जाऊ शकत नाही.


संविधानाच्या कलम २२(१)मध्ये अशी तरतूद आहे की, अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवली पाहिजेत. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने या तरतुदीच्या उल्लंघनाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. अनुच्छेद २२(२)मध्ये अशीही तरतूद आहे की, एखाद्या व्यक्तीला त्याच्या अटकेनंतर आणि ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांच्या आत जवळच्या दंडाधिकाºयासमोर हजर केले पाहिजे आणि दंडाधिकाºयाच्या परवानगीशिवाय त्याला २४ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत ठेवू नये.

अटकेची कारणे उघड करण्यासाठी अशाच प्रकारच्या तरतुदी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम ५०(भारतीय नागरी संरक्षण संहितेचे कलम ४७) आणि CrPC च्या कलम ५७ (भारतीय नागरी संरक्षण संहितेचे कलम ५८)मध्ये दिलेल्या आहेत, परंतु ही माहिती तोंडी द्यावी की लेखी, याबाबत कोणतीही स्पष्ट तरतूद नाही.


सर्वोच्च न्यायालयाने आरोपीला तोंडी की लेखी, कोणत्या पद्धतीने माहिती द्यावी याबाबतच्या संविधानाच्या आणि कायद्याच्या तरतुदींचा अर्थ लावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपीला अटकेची कारणे कळवण्याचा उद्देश त्याला स्वत:चा बचाव तयार करण्यासाठी पुरेशी संधी देणे हा आहे, जेणेकरून तो पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीला विरोध करून जामिनासाठी अर्ज करू शकेल. ही तरतूद केवळ एक प्रक्रियात्मक औपचारिकता नसून, संविधानाने हमी दिलेल्या अधिकारांचे पुरेसे संरक्षण करण्यासाठी आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, लेखी सूचना दोन कारणांसाठी आवश्यक आहे. पहिले, तोंडी सूचनेमुळे वस्तुस्थितीच्या माहितीच्या देवाणघेवाणीत वाद निर्माण होऊ शकतात. दुसरे, लेखी सूचना दिल्याने आरोपीला आपला बचाव योग्यरीत्या मांडण्याची संधी मिळते. त्यामुळे अटकेची कारणे लेखी स्वरूपात दिली तरच घटनात्मक तरतुदींचा खरा उद्देश साध्य होतो.


प्रबीर पुरकायस्थ (२०२४) प्रकरणात बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायद्याचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, आणि स्पष्ट केले होते की, असे न केल्यास अटक बेकायदा ठरेल आणि आरोपीची बिनशर्त सुटका होईल.

‘विहान कुमार’ (२०२५) प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, संविधान विशेष कायद्यांतर्गत किंवा भारतीय दंड संहितेअंतर्गत केलेल्या गुन्ह्यांमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. याचा अर्थ असा की, सर्व गुन्ह्यांमध्ये, आरोपीला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर लेखी स्वरूपात कळवली पाहिजेत.


‘मिहिर राजेश शाह’ (२०२५) प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने वरील अर्थाला अधिक बळकटी दिली आणि चार मुद्द्यांवर स्पष्ट निर्देश दिले. पहिले, कायदा कोणताही असो, सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपीला अटकेची कारणे कळवणे अनिवार्य आहे. दुसरे, अटकेची कारणे लेखी स्वरूपात आणि अटक केलेल्या व्यक्तीच्या भाषेत दिली पाहिजेत. तिसरे, अटकेची कारणे अटकेनंतर शक्य तितक्या लवकर दिली पाहिजेत, आणि जिथे ती त्वरित लेखी स्वरूपात देणे शक्य नसेल, तिथे ती तोंडी दिली पाहिजेत, परंतु आरोपीला न्यायाधीशासमोर हजर करण्याच्या दोन तासांपूर्वी ती लेखी स्वरूपात दिलीच पाहिजेत.

चौथे, जर वरील सूचनांचे पालन केले नाही, म्हणजेच, आरोपीला दंडाधिकाºयासमोर हजर करण्याच्या दोन तास आधी अटकेची कारणे कळवली नाहीत, तर अटक बेकायदा घोषित केली जाईल आणि आरोपीला सोडण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले आहे की, जेव्हा प्रकरण कागदोपत्री पुराव्यावर आधारित असेल किंवा अटकेपूर्वी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस दिली असेल, तेव्हा आरोपीला अटकेची कारणे अटकेपूर्वी किंवा अटकेच्या वेळी लेखी स्वरूपात कळवली पाहिजेत.


सुटका झाल्यानंतर आरोपीला पुन्हा अटक करण्याची गरज भासल्यास, पोलीस दंडाधिकाºयांना त्याच्या अटकेची कारणे आणि आवश्यकता कळवतील, अटकेची कारणे पूर्वी का दिली नाहीत याचे स्पष्टीकरण देतील आणि अटक व कोठडीची मागणी करतील, ज्यावर दंडाधिकारी शक्य तितक्या लवकर, सात दिवसांच्या आत निर्णय देतील. वरील सूचना असूनही, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच जसकरणजीत सिंग देओल (२०२६) प्रकरणात आरोपीला अटकेची कारणे लेखी स्वरूपात कळवली नसल्याचे आढळले, तेव्हा त्यांनी या प्रकरणातील निष्काळजी पोलीस अधिकाºयाविरुद्ध विभागीय चौकशीचे कठोर आदेश दिले.

न्यायालयाने असेही नमूद केले की, फौजदारी खटल्यांमधील पुढील कार्यवाही दुसºया तपास अधिकाºयाकडे हस्तांतरित केली पाहिजे. अटकेची कारणे उघड न करणे हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याने, उच्च न्यायालय आरोपीला योग्य नुकसानभरपाईही देईल.


यावरून हे स्पष्ट होते की, पोलीस अधिकाºयांनी आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली पाहिजे. त्यांनी विहित मुदतीत अटकेच्या कारणांविषयी लेखी माहिती न चुकता दिली पाहिजे. ही माहिती आरोपीला लेखी स्वरूपात दिली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होत आहे की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांना बारकाईने लक्ष ठेवावे लागेल.

पोलीस अधिकाºयांना या विषयावर पुरेसे प्रशिक्षण दिले पाहिजे. आता अटकेसाठी लेखी कारणे देण्याचे तत्त्व प्रस्थापित झाले असल्याने, केंद्र सरकार इच्छित असल्यास त्यानुसार भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि विशेष कायद्यांमध्ये सुधारणा करू शकते.

दशक पाचवा : मंत्रांचा (२) समास तिसरा : शिष्यलक्षण (२)


दासबोधातील पाचव्या दशकातील तिसरा समास हा शिष्यलक्षणाचा आहे. त्याबाबत सविस्तर सांगताना समर्थांनी फार महत्त्वाची लक्षणे सांगितली आहेत. येथून पुढे चौदा-पंधरा ओव्यांमध्ये श्री समर्थांनी ख‍ºया व लायक शिष्याची खूप लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी दोन मुख्य म्हणजे, एक सद्गुरूच्या वचनावर संपूर्ण विश्वास आणि दुसरे सद्गुरूला मनापासून शरण जाणे. लहान मूल जसे आई सांगेल ते सर्वस्वी खरे मानते व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहते, तसेच सत्शिष्याने सद्गुरूच्या बाबतीत केले पाहिजे. मोठेपणी अशी बालवृत्ती साधणे यासारखी परमार्थात भाग्याची दुसरी गोष्ट नाही. कल्याणस्वामी आणि श्रीरामकृष्ण परमहंस या दोघांची अगदी लहान मुलाप्रमाणे मनोवृत्ती होती. दोघांनी परमार्थ हाताबोटावर खेळवला. अभ्यासाने व साधनेने ही दोन्ही लक्षणे अंगी आणणे खात्रीने शक्य आहे. दृढ निश्चयाने व चिकाटीने सद्गुरूच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालले मात्र पाहिजे.


सद्गुरूच्या वचनावर संपूर्ण विश्वास हे सत्शिष्याचे मुख्य लक्षण आहे. सद्गुरूला जो अगदी अनन्यपणे शरण असतो तोच खरा उत्तम शिष्य होय. सत्शिष्याचे व्यक्तिमत्त्व (म्हणजे पर्सनॅलिटी) एका विशिष्ट प्रकारचे असले पाहिजे. तो शांत व विनित असावा. त्याचे सर्वभाव सद्गुरूच्या ठिकाणी स्थिर झालेले असावेत. त्याचे मन सद्गुरूच्या शब्दांना अत्यंत सूचनक्षम असावे. त्याचे सर्व अवधान सद्गुरूभोवती केंद्रित व्हावे. आणि सद्गुरूबद्दल त्याच्या अंतर्यामी अत्यंत आत्मीयता असावी. अशा शिष्याचे मन मेणासारखे मऊ संस्कारक्षम बनते. मग आत्मज्ञान प्रकट होण्यास जरूर असलेली अंतरीची अवस्था सद्गुरू त्या मनामध्ये विनासायास संचारित करू शकतो.

या ठिकाणी समर्थ असे आत्मज्ञानाच्या सूचना सहज ग्रहण करणारे अविरोधी मन तयार होण्यासाठी पुढील गुण सांगतात. ते म्हणतात, शिष्य निर्मळ, आचारशील, अगदी विरक्त आणि चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा. शिष्य निष्ठावंत, शुचिष्मंत आणि सर्व बाबतीत नियमाने वागणारा असावा, शुचिष्मंत म्हणजे पवित्र आचरणाचा. त्याच्या हातून शक्यतो पाप घडू नये. शिष्य अति उद्योगी, मोठा तत्पर आणि अतिंद्रिय वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा असावा. अमूर्तामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य अंगी आणल्याखेरीज आत्म्याचे अनुसंधान साधत नाही. शिष्य अति धीराचा, अति उदार, परमार्थाविषयी अति तत्पर असावा. परमार्थ साधण्यासाठीच त्याने जगावे. शिष्य परोपकारी, निर्मत्सरी असावा, ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरंगात शिकणारा असावा, ग्रंथकर्त्याचा खरा आशय बरोबर आकलन होणारा असावा. शिष्य अति शुद्ध, अति सावध आणि खूप उत्तम गुणांनी संपन्न असावा. शिष्य स्वतंत्र विचार- शक्ती असलेला, प्रेमळ भक्त आणि नीतीमर्यादा पाळणारा असावा. शिष्य युक्तिबाज, बुद्धिमान आणि चांगल्या वाईटाचा बरोबर विचार करणारा असावा. युक्तिबाज म्हणजे हिकमती किंवा अडचणीतून माग काढणारा. शिष्य धाडसी, निश्चयाने व्रत सांभाळणारा आणि उत्तम कुळातील पुण्यशील असावा. शिष्य सात्त्विक, भगवंतांना भजणारा आणि मनापासून साधना करणारा साधक असावा. शिष्य खरा विश्वास ठेवणारा, शरीराचे कष्ट सोसणारा आणि परमार्थ कसा वाढवावा याचे बरोबर ज्ञान असणारा असावा. शिष्य स्वतंत्र, जगाचा मित्र आणि सर्व गुणांनी संपन्न सत्पात्र असावा.


समर्थ म्हणतात, शिष्य ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारा, भगवंतांचे खरे खरे अस्तित्व मानणारा आणि अति शुद्ध अंत:करणाचा असावा. शिष्य अविवेकी नसावा, गर्भश्रीमंत नसावा. तो संसार दु:खाने दु:खी झालेला व त्या दु:खाने जीवनात पोळलेला असावा. गर्भश्रीमंत माणूस वरवरचे जीवन जगतो. जीवनातील सुखाची बाजू तेवढी त्याने पाहिलेली असते. जीवनाचे उघडेनागडे स्वरूप प्रकट करणारी दु:खाची बाजू त्याने अनुभविली नसल्याने या दृश्य जीवनाच्या पलीकडे असणा‍ºया दिव्य जीवनाकडे त्याची प्रवृत्ती होत नाही. शिवाय सत्शिष्य कायाक्लेशी असावा असे नुकतेच सांगितले आहे. गर्भश्रीमंताला देहाचे कष्ट करण्याची व सोसण्याची सवय नसते, शक्ती नसते. त्याला सद्गुरूची सेवा साधणे कठीण असते.

म्हणून जो संसाराच्या दु:खानी गांजलेला आहे. शारीरिक व मानसिक तापांनी किंवा आधीव्याधींनी पोळलेला आहे तोच परमार्थ करण्यासाठी खरा योग्य बनतो. दृश्याचे प्रेम सुटल्य़ाखेरीज भगवंतांकडे लक्ष लागत नाही. विवेकाने दृश्याचे अशाश्वतपण ओळखून आपली वृत्ती भगवंतांकडे वळविणारी माणसे फारच क्वचित आढळतात. सामान्य परमार्थ करण्यास लायक होतो असे श्री समर्थ सांगतात.


समर्थ या समासात सांगतात, संसारदु:खाने वैराग्य निपजते, त्यानंतर सद्गुरूला घट्ट धरले व साधना केली की परमार्थ साधतो. ज्याने संसारात पुष्कळ दु:ख भोगलेले असते त्याच्याच अंगी परमार्थ बाणतो. संसारातील दु:ख भोगल्याने अंत:करणात वैराग्याचा उदय होतो. ज्याला संसाराचा त्रास वाटू लागतो, संसार ही कटकट आहे असे मनापासून वाटते, त्याच्या अंत:करणात परमार्थाबद्दल विश्वास उत्पन्न होतो. मग त्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूची कास घट्ट धरतो. संसारात राम नाही हे पटल्यावर राम ज्याच्यापाशी आहे त्या सद्गुरूवर त्याची श्रद्धा बसते.

काही कारणाने श्रद्धा बिघडून जे लोक सद्गुरूचा आधार सोडतात ते बहुधा संसारात बुडतात. संसाराच्या मध्येच सुखदु:खरूपी मासे त्यांना खाऊन टाकतात. जीवनात नाना प्रकारच्या सुखदु:खांचे हेलकावे खात ते अश्रद्ध लोक अखेर मरून जातात. म्हणूनच जो दृढ विश्वास ठेवतो तोच सत्शिष्य समजावा. मोक्षाला लायक असणा‍ºयाला साधकामध्ये त्याचा पहिला क्रमांक असतो. श्रद्धा ठेवणे ही एक मनाची मोठी शक्ती आहे. दृढ, घट्ट, पक्की व निश्चल श्रद्धा ठेवणे ही मानवी सर्वांत मोठी शक्ती आहे. जगात अतिबुद्धिमान माणसे भेटणे विशेष कठीण नाही. पण निश्चल श्रद्धेची माणसे भेटणे फार कठीण आहे. अशी श्रद्धा उपजली की आत्मज्ञानाची उषा उजळली असे निश्चितपणे ओळखावे. अशा दृढ श्रद्धेच्या सत्शिष्याचे मन सद्गुरूच्या बोधाने शांत होते. तो सायुज्यमुक्तीला लायक होतो. मग संसाराच्या आसक्तीने किंवा आवडीने तो कधी खेचला जात नाही.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा