x
Saturday, July 11, 2026
दहशतवाद्यांचे उदात्तीकरण चुकीचेच
x
संत एकनाथांची समता
एक जनार्दनी समूळ हे जाले। विठ्ठल पाऊले देखियली।। असे संत एकनाथ आपल्या अभंगात म्हणतात. म्हणजे जेव्हा मनातील ‘मी’पणा नष्ट होतो, तेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये केवळ विठ्ठलाचीच पावले दिसू लागतात. हीच समतेची दृष्टी आहे. सर्वांमध्ये विठ्ठल दिसणे किंवा विठ्ठलात सर्वजण दिसणे यातून समतेचा भाव तयार होतो. सर्व जग हे विठ्ठलमय आहे, मग भेदभाव कसला? हाच विचार पंढरीच्या वारीत असतो. हा विचार मांडण्यासाठी हरिपाठाचे माध्यम वारीमध्ये सर्वमान्य असे आहे.
हरिपाठातील नवव्या अभंगात ज्ञानेश्वर म्हणतात की, विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान। रामकृष्णी मन नाही ज्याचे॥ १॥ उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा। रामकृष्णी पैठा कैसा होय॥ २॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान। त्या कैंचे कीर्तन घडे नामी ॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान। नामपाठ मौन प्रपंचाचे॥ ४॥ याठिकाणी संत ज्ञानेश्वरांना म्हणायचे आहे की, विष्णूचे नामस्मरणावाचून इतर जप करणारा आणि रामकृष्णस्वरूपी ज्याचे मन नाही त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्णस्वरूपी कशी होईल? म्हणजे रामकृष्णस्वरूपी ऐक्याला तो कसा पावेल? ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने अहं (मी) इदं (हे) वृत्तिरूपी द्वैताची उत्पत्ती झाली, त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे. ते ज्ञान देणारे गुरू आहेत. गुरूवाचून ते कधीही मिळणार नाही; व ज्या साधकाला ते मिळाले नाही, त्याला नामी जो परमात्मा, त्याचे अभेदभजन घडत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मला हरिच्या सगुण साकार स्वरूपाचेच ध्यान आहे आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ती करीत असून, प्रापंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतले आहे.
प्रापंचिक मौन म्हणजे जे स्वत:पुरते आहे, त्यापासून लांब आहे. सर्वसमावेशक आहे, सर्वांना सारखेपणाचा न्याय देणारे आहे तेच फक्त स्वीकारले जाते आहे. येथे समता आणि समरसतेचा भाव तयार करणारी बैठक तयार होते. म्हणूनच महाराष्ट्रातील विविध संतांना समता आणि समरसतेची मांडणी कशी केली याचे गुणगान गात आपली वारी पुढे सरकत असते. यामध्ये संत एकनाथांच्याही कथा समजून घेणे आवश्यक आहे. एकनाथ महाराजांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्याकाळी श्राद्धाचे जेवण आधी केवळ उच्चवर्णीय ब्राह्मणांना देण्याची प्रथा होती. जेवणाची तयारी सुरू असतानाच, महाराजांच्या घराबाहेरून काही भुकेलेले अस्पृश्य लोक चालले होते. अन्नाचा सुवास आल्यामुळे ते आपापसात बोलत होते की, किती छान वास आहे, पण आपल्याला हे अन्न कुठले मिळणार? हे शब्द एकनाथ महाराजांच्या कानावर पडले. त्यांनी विचार केला की, ‘श्राद्धाचा मुख्य उद्देश भुकेल्या तृप्त आत्म्यांना जेवू घालणे हा आहे.’ त्यांनी ब्राह्मणांची वाट न पाहता, त्या सर्व भुकेल्या बांधवांना घरात बोलावले आणि आदराने श्राद्धाचे अन्न वाढले. या क्रांतिकारी पावलामुळे त्यांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथांनी आपल्या समतेच्या आणि करुणेच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. हाच विचार आपल्याला वारकरी संप्रदायात दिसून येतो. म्हणून समतेची शिकवण देणाºया संतांची मांदियाळी येथे पाहायला मिळते. त्यात संत एकनाथांचे स्थान वेगळेच आहे.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
Friday, July 10, 2026
अमेरिकेला युद्ध तोट्याचे ठरले
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला असतानाच अमेरिकेने दोन दिवसांत पुन्हा हल्ले केले. हे ट्रम्प कशासाठी करत आहेत हे अनाकलनीय आहे. कराराच्या अंमलबजावणीत काही अडथळे असूनही, परिस्थिती नियंत्रणात आहे. करार होऊन काही काळ लोटल्यामुळे या युद्धातून आणि त्याच्या परिणामातून कोणाला काय मिळाले याचे मूल्यांकन करण्याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. जर आपण याचे परीक्षण केले, तर अमेरिकेला सर्व प्रकारे नुकसान झाले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र म्हणून असलेल्या त्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्याचा राग अमेरिका आता पुन्हा हल्ले करून व्यक्त करत आहे का?
कराराच्या अटी पाहताही अमेरिका बॅकफूटवर असल्याचे दिसते. उदाहरणार्थ, करारातील एका अटीनुसार दोन्ही पक्ष एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतील. इराणसाठी अमेरिकेवर हल्ला करणे भौगोलिकदृष्ट्या अशक्य असल्याने या तरतुदीचा इराणला फायदा होतो, कारण अमेरिका आता त्यावर हल्ला करू शकत नाही. अमेरिका आपले व्यापक हितसंबंध पूर्ण करण्यासही असमर्थ ठरली. इराणमध्ये सत्तापालट घडवून आणण्याची अमेरिकेची योजना अपूर्ण राहिली.
इराणमध्ये केवळ कट्टरतावादी सरकार सत्तेवर आहे असे नाही, तर दिवंगत सर्वोच्च नेते खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या प्रचंड गर्दीने हे देखील दाखवून दिले की, इराणला असलेला पाठिंबा कमी झालेला नाही. इतके दिवस गंभीर हल्ल्यांना तोंड देऊनही इराणने अजूनही आपला निम्मा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा साठा टिकवून ठेवला आहे. अमेरिका इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे विस्कळीत करण्यासही असमर्थ ठरली आहे.
दुसरीकडे, अमेरिकेवरील भाराचा विचार करता, अमेरिकेने या युद्धात १,००० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १,५०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे खर्च केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या संरक्षण उत्पादनाची भरपाई करण्यासाठी सहा वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. पेंटागॉनने अलीकडेच शस्त्रास्त्र उत्पादन आणि पुरवठ्यासाठी २९ अब्ज डॉलर्सच्या अर्थसंकल्पाची मागणी केली आहे, जो मूडीजच्या विश्लेषणानुसार १३२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकतो. यामध्ये आखातातील २० नुकसानग्रस्त अमेरिकी लष्करी तळ आणि ४२ लढाऊ जहाजांच्या दुरुस्तीच्या खर्चाचा समावेश नाही. या युद्धामुळे १ ट्रिलियन डॉलर्सचा आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे, ज्यापैकी ३०० अब्ज डॉलर्स इराणच्या पुनर्बांधणीच्या वचनबद्धतेतील गुंतवणुकीशी संबंधित आहेत. या युद्धात १३ अमेरिकी सैनिकांचा बळी गेला आणि अमेरिकेत महागाईही वाढली.
इराण युद्धामुळे झालेल्या जागतिक नामुष्कीमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा देशांतर्गत राजकीय मार्ग निसरडा झाला आहे. केवळ विरोधी डेमोक्रॅट्सच नव्हे, तर रिपब्लिकन पक्षाचे गटही त्यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. ट्रम्प यांचे निष्ठावान असलेले रिपब्लिकन सिनेटर बिल कॅसिडी यांनी या कराराला गेल्या अनेक दशकांतील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील सर्वात मोठी चूक, असे म्हटले आहे. इराणविरुद्धची इस्रायली मोहीम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवण्यात आल्याने ज्यू समुदायदेखील संतप्त झाला आहे. अमेरिकेच्या सत्ता आणि व्यावसायिक वर्तुळात ज्यूंचे वर्चस्व आहे, हे काही गुपित नाही. या करारामुळे ट्रम्प यांची प्रतिमा काही प्रमाणात कमकुवत झाली असली, तरी त्याच्या अपयशामुळे अपरिहार्यपणे आणखी मोठे राजकीय नुकसान होईल. नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांची स्वाभाविकपणे कसोटी लागेल.
युद्धात मोठे नुकसान सोसूनही इराण काहीशा फायद्याच्या स्थितीत असल्याचे दिसते. अमेरिकेने इराणी उत्पादनांवरील निर्बंध उठवण्याचा प्रस्तावित निर्णय इराणच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल. इराणवर अणुऊर्जा संवर्धन आणि शस्त्रनिर्मितीवर बंदी कायम असली तरी, वीज निर्मितीसारख्या नागरी कामांसाठी अणुऊर्जेचा वापर करण्याची परवानगी दिली जाईल. होर्मुझच्या सामुद्रधुनीने उपलब्ध करून दिलेल्या सामरिक पर्यायाचाही इराणला लक्षणीय फायदा झाला आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवर सीमा शुल्क लावण्याबद्दल बोलत असताना, ओमानने हा विषय टाळला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी वारंवार पुनरुच्चार केला आहे की, इराणला कोणतेही शुल्क आकारण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर इराणला असा अधिकार मिळाला, तर त्याचे विनाशकारी परिणाम होतील, कारण मलाक्का सामुद्रधुनी, पाल्क सामुद्रधुनी आणि बाब अल-अंदाब यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांच्या आसपासचे किनारपट्टीवरील देशही अशा शुल्कांची मागणी करू लागतील.
जर हा करार त्याच्या सध्याच्या स्वरूपात लागू झाला, तर अमेरिकेनंतर इस्रायलला सर्वाधिक नुकसान सोसावे लागेल. जवळपास चार महिन्यांच्या युद्धात मोठे नुकसान सोसल्यानंतर देशाने काय साध्य केले आहे, असा प्रश्न इस्रायली जनता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना विचारेल. त्यांच्यासाठी हा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासूनचे राजनैतिक अंतर आणि जनतेचा रोष त्यांच्या समस्या आणखी वाढवेल. अमेरिकेच्या सुरक्षा कवचावरील आखाती देशांचा विश्वासही डळमळीत झाला आहे. आता करारानुसार आपला शत्रू असलेल्या इराणच्या पुनर्बांधणीसाठी हे देश सहकार्य करतील की नाही, हे पाहणे बाकी आहे.
इतर देशांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, युद्ध थांबल्यास चीनला सर्वाधिक फायदा होईल. इराणमधील ४०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या बदल्यात चीनने स्वाक्षरी केलेला २०२१चा तेल पुरवठा करार युद्ध संपल्यास सुरू राहील. युद्धविरामाचा भारतालाही फायदा होतो. यामुळे विस्कळीत झालेला कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्ववत होईल. भारताचा चाबहार प्रकल्पाचा मार्गही सुकर होऊ शकतो. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये चिरडले जाणे टाळण्यातच पाकिस्तानला एकमेव दिलासा आहे.
तथापि, या कराराचे श्रेय घेण्याची रशियाची योजना अयशस्वी ठरली, कारण मध्यस्थीचे श्रेय कतारला देण्यात आले. हा करार इस्लामाबादमध्ये नव्हे, तर जिनिव्हामध्ये झाला. रशियालाही याचा फायदा होणार आहे, कारण त्यांच्यावरील निर्बंध शिथिल होतील आणि इराणसोबतच्या संबंधांना एक नवीन दिशा मिळेल. तथापि, याचा रशियाच्या तेल आणि वायू निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. युरोपला ऊर्जा क्षेत्रातही स्थिरता मिळेल. रशियाबद्दल युरोपीय देशांचा दृष्टिकोनही नरम होऊ शकतो. हे सगळे पाहता अमेरिकेला या युद्धाचा काहीही फायदा झाला नाही.
हरिपाठ सोहळा आणि वारी
पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तांसी।। असे संत ज्ञानेश्वर हरिपाठातील सातव्या अभंगात म्हणतात. हरिपाठात २७ अभंग आहेत. त्याचे तीन गट तयार केले आहेत. या हरिपाठालाच वारकºयांची संध्या असेही म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आपण जाणतोच. पण ज्ञानेश्वरांप्रमाणेच निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई आणि नामदेव महाराज यांनीही हरिपाठांची रचना केलेली आहे. नामदेव, निवृत्ती, एकनाथ, तुकाराम आणि ज्ञानदेव यांचा पंचरत्नी हरिपाठही प्रसिद्ध आहे. या सगळ्यांचा उच्चार आणि गजर हा वारीत होत असतो. हाच तो हरिपाठ सोहळा.
हरिपाठातील सातव्या अभंगात ज्ञानदेव म्हणतात की, जे लोक देवाचे नाव घेत नाहीत, त्यांच्या हातून डोंगराएवढी पापे घडतात. पण हरि नामाचा आश्रय घेताच ही पापे नष्ट होतात. अत्यंत साधा सिद्धांत आहे, सोप्या भाषेत मांडलेला विचार आहे हा. पर्वताप्रमाणे पातक करणे। वज्रलेप होणे अभक्तांसी ॥ १॥ नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त। हरिसी न भजत दैवहत ॥ २॥ अनंत वाचाळ बरळती बरळ। त्या कैसेनि गोपाळ पावे हरि॥ ३॥ ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान। सर्वांघटी पूर्ण एक नांदे ॥ ४॥ या चार कडव्यांमधून ज्ञानदेव स्पष्ट करतात की, ज्यांनी पर्वतासारखी मोठमोठी पातके केली असून, जे हरिविषयींच्या आत्यंतिक प्रेमरूपी भक्तिविषयी विन्मुख आहेत, म्हणजे जे अभक्त आहेत, त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहीसे होत नाही. ज्याला हरिची प्रेमलक्षणा भक्ती नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरिचे भजन कसे करील? जे वायफळ बडबड करणारे, झोपेत बरळण्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात, असल्यांना दीनदयाळ हरि कसा प्राप्त होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, सर्व देहामध्ये एक परिपूर्ण असणारा आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. असे सांगून ज्ञानदेव हरिपाठातून आत्मज्ञानाकडे घेऊन जातात.
हरिनाम संकीर्तन हा सर्वजन सुलभ असा भक्तिमार्ग आहे, असे हरिपाठाच्या माध्यमातून ज्ञानदेव सांगतात, दाखवून देतात. हरिपाठातूनच मुक्ती प्राप्त होते हे हरिपाठाचे मुख्य सांगणे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मुक्तीची आस असली पाहिजे. योगसाधना, व्रतवैकल्ये, यज्ञकर्म, तीर्थ यात्रा, घोर तप याच्या मागे न लागता केवळ हरिनामातून सगळे साध्य होते ते सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे हरिपाठ.
हरिपाठातील पाचव्या अभंगातच ज्ञानेश्वर स्पष्टपणे सांगतात की, योग याग विधी येणे नोहे सिद्धि। वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १॥ भावेवीण देव न कळे नि:संदेह। गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त। गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३॥ ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात। साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४॥ म्हणजे अष्टांगयोग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरिची प्राप्ती होणार नाही. कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगे, दूरची साधने आहेत. याचे अनुष्ठान करणाºयांमध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. भावावाचून साधकास देव केव्हाही नि:संशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास असल्यावाचून देवाचे नि:संशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो, तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरूद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावाचून देवाचा अनुभव कसा कळेल? यासाठी हरिनाम आणि हरिपाठ हे एक फार मोठे साधन आहे, परमेश्वरापर्यंत पोहोचवणारी ती शिडी आहे, सोपान आहे हे वारीच्या मार्गावर गेल्यावर समजते.
Thursday, July 9, 2026
भारताची पॅसिफिक राजनैतिकता अधिक मजबूत होत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशियासोबतच आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा इंडो-पॅसिफिक प्रदेश जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. जागतिक पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना होत आहे, तांत्रिक स्पर्धा तीव्र होत आहे, ऊर्जा प्रणालीमध्ये मोठे परिवर्तन होत आहे आणि सागरी सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची झाली आहे. आज भारत अशा विश्वासार्ह भागीदारांच्या शोधात आहे, जे त्याच्या सामरिक स्वायत्ततेशी तडजोड न करता भारताच्या आर्थिक प्रगती, तांत्रिक क्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षेला पाठिंबा देऊ शकतील. या संदर्भात आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे भारतासाठी नैसर्गिक भागीदार आहेत. दोन्ही लोकशाही राष्ट्रे आहेत, त्यांच्याकडे सागरी सामर्थ्य आहे आणि ते इंडो-पॅसिफिकमध्ये एका स्थिर, खुल्या आणि नियमांवर आधारित व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत.
गेल्या दशकात आॅस्ट्रेलिया भारताच्या सर्वात महत्त्वाच्या सामरिक भागीदारांपैकी एक बनला आहे. ‘क्वाड’च्या माध्यमातून दोन्ही देशांमधील सहकार्य सातत्याने अधिक दृढ झाले असून, संरक्षण, सागरी सुरक्षा, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी यांसारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. प्रादेशिक सुरक्षेबाबतही दोन्ही देशांच्या विचारांमध्ये व्यापक एकमत आहे. पंतप्रधान मोदींच्या आॅस्ट्रेलिया दौºयात दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची शक्यता आहे. सागरी निगराणी क्षमता वाढवणे, नौदल समन्वय मजबूत करणे, संयुक्त गस्त, संरक्षण उद्योगांमधील सहकार्य आणि लष्करी क्षमता बांधणी यांसारखे विषयदेखील चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.
आॅस्ट्रेलियाकडे लिथियम, कोबाल्ट आणि दुर्मीळ मृदा खनिजांचे प्रचंड साठे आहेत, जे इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी उत्पादन, सेमीकंडक्टर उद्योग आणि नवीकरणीय ऊर्जा यांच्या विस्तारासाठी आवश्यक आहेत. हरित ऊर्जा, प्रगत उत्पादन आणि तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यासाठी भारताला या संसाधनांपर्यंत दीर्घकालीन आणि विश्वसनीय पोहोच सुनिश्चित करणे ही एक धोरणात्मक गरज आहे. नागरी अणुऊर्जा कार्यक्रमांसाठी युरेनियमचा पुरवठा, हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्यदेखील दोन्ही देशांमधील संबंधांना एक नवीन दिशा देऊ शकते. दोन्ही देशांमधील वार्षिक व्यापार २५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारत-आॅस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारामुळे व्यापाराला नवीन चालना मिळाली आहे, तर पायाभूत सुविधा, खाणकाम, शिक्षण, वित्तीय सेवा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रांमध्ये आॅस्ट्रेलियन गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. आता गरज आहे ती एका व्यापक आर्थिक भागीदारीद्वारे गुंतवणूक आणि व्यापारासाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करण्याची.
जर आॅस्ट्रेलिया भारताच्या इंडो-पॅसिफिक धोरणाचा सुरक्षेचा आधारस्तंभ असेल, तर न्यूझीलंड आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले करू शकते. नुकत्याच संपन्न झालेल्या भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना एक नवी दिशा मिळाली आहे. सध्या, द्विपक्षीय व्यापार अंदाजे २.४ अब्ज अमेरिकी डॉलर आहे, जो दोन्ही अर्थव्यवस्थांच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. भारत ही एक मोठी ग्राहक बाजारपेठ आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, तर न्यूझीलंडकडे कृषी, अन्न प्रक्रिया, वनीकरण, जैवतंत्रज्ञान, शिक्षण आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य आहे.
हवामान बदल आणि अन्नसुरक्षा यांसारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या कृषी क्षेत्राला अधिक उत्पादक, शाश्वत आणि आधुनिक बनवण्यासाठी न्यूझीलंडचा अनुभव महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य भविष्यातील भागीदारी अधिक मजबूत करेल. द्विपक्षीय मुक्त व्यापार करारांतर्गत न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत २० अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करण्याचे वचनही दिले आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबतच्या भारताच्या संबंधांची एक ताकद म्हणजे दोन्ही देशांमधील भारतीय वंशाची लोकसंख्या. आॅस्ट्रेलियामध्ये अंदाजे दहा लाख भारतीय वंशाचे लोक राहतात, तर न्यूझीलंडमधील भारतीय समुदायही अधिकाधिक प्रभावशाली होत आहे.
व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, विज्ञान आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानामुळे दोन्ही देशांमध्ये एक मजबूत मानवी पूल तयार झाला आहे. पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या प्रचंड शक्यता आहेत. नेत्यांमधील वैयक्तिक विश्वासामुळे द्विपक्षीय संबंधांना नवीन चालना मिळत आहे. पंतप्रधान मोदी आणि आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात विकसित झालेल्या सामंजस्याने दोन्ही देशांची भागीदारी नव्या उंचीवर नेली आहे. दरम्यान, न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्यासोबतच्या चर्चेमुळे त्यांच्या संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. येत्या दशकांमध्ये इंडो-पॅसिफिक प्रदेश जागतिक सत्ता संतुलनाच्या केंद्रस्थानी असेल. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसोबतचे संबंध दृढ केल्याने भारताला या प्रदेशात केवळ एक प्रभावशाली स्थानच मिळणार नाही, तर भारताला अधिक सुरक्षित, समृद्ध आणि आत्मविश्वासू जागतिक शक्ती म्हणून स्थापित करण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
संत जनाबार्इंचे प्रेम
धरीला पंढरीचा चोर। गळा बांधोनिया दोर।। असा संत जनाबार्इंचा अभंग आहे. जनाबाई या वेगळी अनुभूती देणाºया संत होत्या. आपल्या या अभंगात जनाबार्इंना म्हणायचे आहे की, मी माझ्या भक्तीच्या दोराने त्या पंढरीच्या विठ्ठलाला (चोराला) थेट माझ्या मनाच्या गाभाºयात बांधून ठेवले आहे. आता तो तिथून कुठेही जाऊ शकत नाही. विठ्ठलमय होण्याची ही प्रक्रिया म्हणजे जनाबार्इंची अनुभूती.
ज्ञानेश्वरांनी हरिपाठात म्हटले आहे की, भावेवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति। बळेवीण शक्ति बोलू नये॥ १॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित। उगा राहे निवांत शिणसी वाया॥ २॥ सायासे करिसी प्रपंच दिननिशी। हरिसी न भजसी कोण्या गुणे॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे। तुटेल धरणे प्रपंचाचे॥ ४॥
जन्म-मृत्यूरूप संसार दु:खापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावाचून हरीवर आत्यंतिक म्हणजे नि:सीम प्रेम बसणार नाही व अशा नि:सीम भक्तीवाचून संसारांतून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे. यास्तव हरीच्या ठिकाणी भाव असल्यावाचून भक्ती होईल व भक्तीवाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणतात त्यांचे ते म्हणणे आपल्या अंगात काही एक बळ नसताना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय, म्हणून तसे बोलू नये॥ १॥ अत्यंत सहजपणे आणि निर्मळपणे ज्ञानदेवांनी येथे सांगितले आहे. हे जनाबाईच्या कृतीतून दिसून येते. मी माझ्या भक्तीच्या जोराने आणि दोराने त्याला बांधून ठेवला आहे, म्हणून तो माझ्याजवळ आहे.
म्हणून ज्ञानदेव म्हणतात की, देव लवकर कशाने प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर काहीएक व्यर्थ शीण न करता आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थिर कर आणि निजबोधाने शांत राहा॥ २॥ देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रापंचिक खटाटोप तू रात्रंदिवस करीत आहेस व हरीचे भजन मात्र मुळीच करीत नाहीस ते का बरे? ॥ ३॥ हरीचे भजन कर म्हणजे तू या संसारसागरातून तत्काळ तरून जाशील, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥ ४॥ ही हरिपाठातील महत्त्वाची शिकवण आहे. अत्यंतिक विश्वास, श्रद्धा आणि भक्ती करणारा मी नाही तर कर्ता करवता तो आहे. त्या तो ला जाणायचे आहे. ती भक्ती. तो शोधायला जातो तेव्हा मी नाहीसा होतो. मी पण जाते तिथे देवपण येते. तिथेच आत्मज्ञानाची प्राप्ती होते.
जनाबार्इंनी विठ्ठलाला सर्वस्व मानले होते. जे काही करणार ना ते तोच करेल. मग वाटोळे केले तरी तोच करणार आणि कल्याण करायचे तरी तोच करणार. म्हणून चोरीचा आळ आल्यावरही हा पण त्याचाच खोडसाळपणा आहे हे मानून सगळे त्याला अर्पण करून त्याला शिव्या देण्यासही ती मागे पुढे पाहत नाही. कारण तोच कर्ता आहे, हा तिचा भक्तिभाव फार मोठा आहे. आपल्या श्वासात, कणाकणात तोच आहे आणि आपण त्याच्या परमात्मास्वरूपात विलीन आहोत ही तिची भावना फार मोठी आहे.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
Wednesday, July 8, 2026
निर्यात वाढवण्याचे आव्हान
जागतिक निर्यातीची वाढ मंदावत असताना, भारत निर्यात वाढवून यावर्षी आपली मोठी निर्यात उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. नुकतेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बोर्ड आॅफ ट्रेडच्या बैठकीत सर्व राज्यांतील औद्योगिक संघटनांना सांगितले की, सरकार निर्यातीला चालना देत आहे आणि भारत विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करारांच्या (एफटीए) दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारताने चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी एकूण निर्यातीचे १ ट्रिलियन डॉलर्सचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षात वस्तूंच्या निर्यातीचे लक्ष्य अंदाजे ५३० अब्ज डॉलर्स (१६-१७ टक्के वाढ) आणि सेवा निर्यातीचे लक्ष्य अंदाजे ४७० अब्ज डॉलर्स (११-१२ टक्के वाढ) असण्याचा अंदाज आहे.
मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची एकूण निर्यात ८६३ अब्ज डॉलर्स होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्के आणि सेवांच्या निर्यातीत ११ टक्के वाढ झाली. सध्या सरकार आपल्या निर्यात प्रोत्साहन धोरणाचा भाग म्हणून निर्यातदारांना विविध लाभ देत आहे. निर्यात प्रोत्साहन अभियान अंतर्गत लघु उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राचा खर्च सरकार उचलेल. यामध्ये शाश्वत वस्त्रोद्योग, तांत्रिक वस्त्रोद्योग, कार्यक्षम वस्त्रोद्योग आणि वैद्यकीय वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रांमधील उदयोन्मुख संधी देखील ओळखण्यात आल्या आहेत. सरकारची नवीन रणनीती अशा क्षेत्रांमध्ये निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते, जिथे भारत आधीच लक्षणीय निर्यात करतो; तसेच पसंतीच्या क्षेत्रांमध्ये निर्यातीचे विविधीकरण करणे, गैर-शुल्क अडथळे कमी करणे आणि पुरवठा-बाजूच्या मर्यादा दूर करणे यावरही लक्ष केंद्रित करते.
युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, ओमान, मॉरिशस, संयुक्त अरब अमिराती आणि आॅस्ट्रेलिया यांसारख्या देशांसोबत भारताचे वेगाने वाढणारे द्विपक्षीय व्यापार करार आणि मुक्त व्यापार करार, अलीकडेच देशभरात लागू केलेल्या चार नवीन कामगार कायद्यांमुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवीन कामगार कायद्यांमुळे सेवा निर्यातीतही वाढ होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नवीनतम सेवा निर्यात अभ्यासातही यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दशकांमध्ये भारताची सेवांची निर्यात वस्तूंपेक्षा खूप वेगाने वाढली आहे. या सेवा प्रत्यक्ष सान्निध्याशिवाय सीमापार पोहोचवणे सोपे आहे. याव्यतिरिक्त, डिजिटल प्लॅटफॉर्म, क्लाऊड कम्प्युटिंग आणि रिमोट वर्कमुळे अनेक सेवा व्यापारयोग्य झाल्या आहेत. जसजसे अंतर कमी होत आहे आणि डिजिटल व्यापार विस्तारत आहे, तसतशी भारतातून होणारी सेवांची निर्यात वाढत आहे. जागतिक सेवा निर्यातीमधील भारताचा वाटा २००४-०५ मधील १.९ टक्क्यांवरून २०२५-२६ पर्यंत अंदाजे ४.३ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
विकसित आणि विकसनशील देश सध्या भारतासोबत आपला व्यापार वाढवत आहेत. निर्यात वाढवण्यासाठी भारताने नवीन बाजारपेठांचा विस्तार आणि निर्यात विविधीकरणाचे धोरण अवलंबले पाहिजे. विशेषत: ओळखल्या गेलेल्या नवीन देशांच्या बाजारपेठांमध्ये निर्यातीचा विस्तार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. सध्या भारताची बहुतांश एकूण निर्यात अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, युनायटेड किंगडम, सौदी अरेबिया आणि चीन यांसारख्या काही प्रमुख देशांवर अवलंबून आहे. या देशांची संख्या वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून एक किंवा काही देशांमधील आर्थिक मंदीचा भारतावर थेट परिणाम होणार नाही. पारंपरिक बाजारपेठांव्यतिरिक्त ईशान्य आशिया आणि पूर्व आफ्रिका यांसारख्या उदयोन्मुख प्रदेशांमध्ये निर्यातीची व्याप्ती वाढवली पाहिजे.
निर्यात विविधीकरणाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. निर्यातीला चालना देण्यासाठी आपल्याला बहुआयामी दृष्टिकोनासह अनेक घटकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अल्पकालीन विकासाचा पाठपुरावा करण्याऐवजी भारताने मध्यम-मुदतीची वित्तीय आणि बाह्य स्थिरता सुरक्षित केली पाहिजे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सुधारणांना गती दिली पाहिजे. एआयसारख्या उच्च-स्तरीय क्षेत्रांमधील गुंतवणूक एक मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा आणि बहुपक्षीय प्रयत्नांद्वारे नियामक अडथळे कमी करणे, सीमापार सेवा निर्यातीला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निर्यातदारांची आव्हाने कमी केली पाहिजेत. ही आव्हाने केवळ शुल्कवाढीपुरती मर्यादित नाहीत, तर निर्यातीवर लादलेल्या अँटि-डम्पिंग शुल्कांशी देखील संबंधित आहेत. विविध देशांसोबतच्या मुक्त व्यापार करारांचे फायदे जास्तीत जास्त मिळवण्यासाठी भारताने देशांतर्गत उद्योगांची स्पर्धात्मकता वाढवणे, मुक्त व्यापार करारांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि गैरशुल्क अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
आम्हाला अपेक्षा आहे की, भारताचे विविध देशांसोबतचे मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय व्यापार करार लवकरच आकार घेतील. भारत नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करून आणि निर्यातीत विविधता आणून यावर्षी निश्चित केलेले निर्यातीचे लक्ष्य साध्य करताना दिसेल आणि २०३० पर्यंत वस्तूंच्या निर्यातीत १ ट्रिलियन डॉलर्स आणि सेवांच्या निर्यातीत १ ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वाटचाल करेल.
हरिपाठ सोहळा
योग याग विधी येणें नव्हे सिद्धी। वायाचि उपाधी दंभ धर्म।। असे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या हरिपाठातील पाचव्या अभंगात म्हटले आहे. केवळ मोठे यज्ञ, योग किंवा कर्मकांड करून देव मिळत नाही. ती केवळ एक उपाधी किंवा मनाचा मोठेपणा ठरतो. देवासाठी केवळ निखळ भक्ती हवी. हा भक्तिमार्ग स्थापन करणारा तो वारकरी संप्रदाय. येथे कर्मकांडाला स्थान नाही तर येथे भक्तीला महत्त्व आहे. मनुष्यातील आत्मा, परमात्मा आणि देव जाणण्याची ही प्रक्रिया आहे.
या हरिपाठातील चार अभंगांत ज्ञानदेव म्हणतात की, योग याग विधी येणें नव्हे सिद्धी। वायाचि उपाधी दंभ धर्म॥ १॥ भावेंवीण देव न कळे नि:संदेह। गुरुवीण अनुभव कैसा कळे॥ २॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त। गुजेवीण हित कोण सांगे॥ ३॥ ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात। साधूचे संगती तरुणोपाय॥ ४॥
म्हणजे अष्टांगयोग व यज्ञ याचे यथाविधी आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही. कारण ही सर्व हरी प्राप्तीविषयी बहिरंगे आहेत. दूरची साधने आहेत. याचे अनुष्ठान करणाºयांमध्ये मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याती व्हावी, अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेने तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. असे ज्ञानदेव पहिल्या अभंगात म्हणतात.
भावावाचून साधकास देव केव्हाही नि:संशय कळायचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन याच्यावर दृढ विश्वास असल्यावाचून देवाचे नि:संशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळालेला आहे, म्हणून त्यावाचून देवाचा अनुभव कसा कळेल? हे दुसºया कडव्यात ज्ञानदेव सांगतात.
ज्ञानदेव याच अभंगातील तिसºया कडव्यात म्हणतात की, तपावाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्यावाचून काही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावे तसे फळ मिळते. हित सांगणाºयांमध्ये जर गूढ आत्मज्ञान (गुज) नसेल, तर तो काय सांगेल? कारण आत्मज्ञान होणे हेच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणाºयांमध्ये जर प्रेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडेच असेल.
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय, साधूची संगत करणे हाच होय असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. ज्ञानेश्वर कधीही आपल्या सत्कर्माचे श्रेय स्वत:कडे घेत नाहीत. ते आपल्या गुरुला, परमेश्वराला देतात. म्हणून याच विचाराने जाणारी पंढरीची वारी आणि त्यातील वारकरी हा देव शोधायला, देवाच्या दर्शनाला नाही तर देवस्वरुप होण्यासाठी आणि त्याचे दिव्यत्व दाखवण्यासाठी चालतो आहे. या वारीमध्ये हरिपाठाला फार महत्त्व आहे. प्रत्येक वारकरी यातील हरिपाठ समजून घेतो आणि हरिमय होतो. पंढरपूरच्या वारीचा आनंद सोहळा हा हरिपाठाने होत असतो. हरिमुखे म्हणा हरिमुखे, पुण्याची गणना कोण करी असा विचार करत वारकरी रममाण होतात.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
Tuesday, July 7, 2026
मंदीरातील देणगीचा वापर
अयोध्या राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीमुळे हिंदू समाजाला दु:ख झाले आहे आणि मंदिराच्या ट्रस्टवरील लोकांच्या विश्वासालाही तडा गेला आहे. सध्या किती पैशांची चोरी झाली आणि हे किती काळापासून सुरू होते, हे सांगणे कठीण आहे, परंतु ही लाजिरवाणी गोष्ट आहे की, मंदिराच्या देखभालीसाठी जबाबदार असलेल्या लोकांनीच देणग्यांचा अपहार केला. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांची चौकशी करत आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, एसआयटीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ते निर्धारित वेळेत आपला तपास पूर्ण करू शकतील की नाही, हे पाहणे बाकी आहे.
शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आणि संघर्षानंतर राम मंदिर बांधले गेल्यापासून त्याच्या उद्घाटनापासून भारत आणि परदेशातून लोक अयोध्येला भेट देत आहेत आणि दर महिन्याला कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येत आहेत. या देणगीचा वापर करण्याचा अधिकार ट्रस्टला आहे. सरकार देणग्यांच्या वापरात हस्तक्षेप करत नाही आणि करूही नये, परंतु ट्रस्ट त्याचा योग्य वापर करेल याची खात्री सरकारने केली पाहिजे.
ज्याप्रमाणे राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे इतर प्रमुख मंदिरांसाठीही ट्रस्टची स्थापना झाली आहे. भक्त काही मंदिरांना कोट्यवधी रुपयांची देणगी देतात. काही मंदिर विश्वस्त मंडळांमध्ये सरकारी अधिकाºयांचा समावेश असतो, तर काही पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असतात. अशा मंदिरांना मिळालेल्या देणग्यांचा वापर सरकार आपल्या सोयीनुसार करते.
मंदिरांना मिळणाºया देणग्या केवळ हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि हिंदू समाजाच्या कल्याणासाठीच आहेत का, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला आहे. असे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, कारण अनेक मंदिरांमधील देणग्या हिंदू धर्माच्या कल्याणाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरल्या जात असल्याच्या बातम्या आल्या आहेत. सर्वसाधारणपणे, लहान मंदिरांमधील देणग्या केवळ पुजारी आणि सेवकांच्या देखभालीवर, तसेच मंदिराची देखभाल आणि उत्सव आयोजित करण्यावर खर्च केल्या जातात. यामुळे हिंदू धर्माच्या प्रसाराचा उद्देश साध्य होतो का? काही मोठ्या मंदिरांची विश्वस्त मंडळे शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि धर्मशाळा चालवतात, परंतु देशातील प्रमुख मंदिरांना दरवर्षी किती देणग्या मिळतात आणि त्या कोणत्या कारणांसाठी वापरल्या जातात, याबद्दल फार कमी लोकांकडे अचूक माहिती आहे.
याचे कारण असे आहे की, कोणत्या देणग्या वापरल्या जातील आणि कोणत्या नाही हे ठरवण्यासाठी कोणतीही निश्चित प्रणाली नाही. नि:संशयपणे, मंदिरांना मिळणाºया देणग्या हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि कल्याणासाठी खर्च केल्या पाहिजेत, परंतु हिंदू धर्माचा प्रभावीपणे प्रसार कसा करायचा हे देखील स्पष्ट असले पाहिजे. केवळ संस्कृत शाळा किंवा गुरुकुल चालवून हिंदू धर्माच्या प्रसाराचा उद्देश साध्य होतो का?
हिंदू धर्माची भव्यता प्रदर्शित करून हिंदू धर्माच्या प्रसाराचा उद्देश साध्य होतो का? हिंदू धर्माचा प्रसार केवळ हिंदूंमध्येच व्हायला हवा का, हा देखील एक प्रश्न आहे. विरोधाभास म्हणजे, हिंदू धर्मगुरू आणि मंदिर विश्वस्त मंडळांचे व्यवस्थापन करणाºयांमध्ये या मुद्द्यावर एकमत नाही.
हिंदू धर्माचे वैशिष्ट्य हे आहे की, तो कोणत्याही एका धर्मग्रंथावर किंवा देवतेच्या तत्त्वज्ञानावर आधारित नाही. हिंदूंना आपल्या आवडीच्या कोणत्याही देवतेची पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. हिंदू अनुयायांच्या चालीरीती आणि परंपरांमध्येही विविधता आहे आणि ते आपल्या श्रद्धेनुसार त्यांचे पालन करण्यास स्वतंत्र आहेत. काही जण विधींवर भर देतात, तर काही जण ते आवश्यक मानत नाहीत. हिंदू धर्माची हीच वैशिष्ट्ये त्याला इतर धर्म आणि पंथांपेक्षा वेगळे ठरवतात, परंतु कदाचित यामुळेच हिंदू धर्माचा व्यापक प्रसार कसा करावा यासाठी कोणतीही चौकट विकसित झालेली नाही. याउलट, सनातन धर्माची एक शाखा मानल्या जाणाºया बौद्ध धर्माचा प्रसार पद्धतशीरपणे करण्यात आला. परिणामी, आज अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, परंतु कालांतराने बौद्ध धर्माला हिंदू धर्मापेक्षा वेगळा मानले जाऊ लागले आहे. जैन धर्म आणि शीख धर्म हे देखील सनातन धर्माच्या शाखा आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पद्धतीने आपल्या श्रद्धेचा प्रसार करतो, परंतु ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचा प्रसार करणारे अधिक संघटित आणि सुनियोजित आहेत हे काही गुपित नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित संघटनांवर अनेकदा धर्मांतराचा आरोप केला जातो.
मंदिरांसंबंधीची समस्या अशी आहे की, अनेक मोठ्या मंदिरांच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप असला तरी, इतर पंथांचे अनुयायी कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वत:च्या धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करतात. ही एक विसंगती आहे. हिंदू संघटनांनी मंदिरांचे व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावे अशी सातत्याने मागणी केली आहे. तथापि, या मागणीवर जोर देतानाच, मंदिरांच्या प्रशासनासाठी एक ठोस आचारसंहिता स्थापित करणे देखील आवश्यक आहे.
मंदिरांना मिळालेल्या देणग्यांचा वापर कसा केला जाईल, हेदेखील निश्चित केले पाहिजे. देशातील अनेक मंदिरांना भरीव देणग्या मिळतात, पण त्या देणग्यांचा वापर कशासाठी केला जातो हे माहीत नसते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी ट्रस्टद्वारे चालवली जाणारी मंदिरेसुद्धा आपल्या सोयीनुसार देणग्यांचा वापर करतात. जेव्हा एखादा भक्त मंदिरात जातो, तेव्हा तो देणग्यांच्या मूळ हेतूचा विचार करत नाही.त्याचा वापर होईल का?
मंदिराचे पुजारी किंवा विश्वस्त देणग्यांचा वापर केवळ हिंदू धर्माच्या योग्य प्रसारासाठी आणि हिंदू समाजाच्या कल्याणासाठीच करतील, हे सुनिश्चित करण्यासाठी एक ठोस चौकट स्थापित करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत हे घडत नाही, तोपर्यंत देणग्यांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित होत राहतील. राम मंदिरातील देणग्यांच्या चोरीची सखोल चौकशी करणे जितके आवश्यक आहे, तितकेच मंदिराच्या देणग्यांचा कोणत्याही प्रकारचा गैरवापर रोखणारी एक प्रणाली स्थापित करणेही आवश्यक आहे. ही प्रणाली स्थापित करण्यासाठी धार्मिक नेते आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांनी पुढे आले पाहिजे.
संत चोखोमेळा यांची भक्ती
ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा। काय भुललासी वरलीया रंगा।। असे संत चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात. ऊस वाकडा असला तरी त्याचा रस वाकडा नसतो, तो गोडच असतो. माणसाचे शरीर किंवा जात कशीही असली, तरी आत्म्याचे विठ्ठलावरील प्रेम श्रेष्ठ असते. बाह्य रूपाला भुलू नका. तर अंतरात्मा जाणा. ही आहे वारकरी संतांची शिकवण. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेला मानवता धर्म येथे दिसून येतो.
परेहुनि परते घर। तेथे राहू निरंतर॥
सर्वांचे जे अधिष्ठान। तेचि माझे रूप पूर्ण॥
संत नामदेवांचा हा अभंग लक्षात घेतला आणि संत ज्ञानदेवांचे (नामजपाद्वारे वाणीचा हात धरून) संजीवन समाधीसुखाचे अनुभवकथन पाहिले तर देवाचिये द्वारी म्हणजे काय ते नक्की लक्षात येईल. नामसाधनेला वैखरीपासून सुरुवात होते आणि हळूहळू या नामाला सूक्ष्मता येते आणि ते आतल्या आत सहज चालते. या वाणीला मध्यमा म्हणतात. मध्यमेत स्थिर झालेले नाम अंत:करणाला व्यापणास सुरुवात होते. तेथे नामाचा पश्यंती वाणीमध्ये प्रवेश होतो. साधक स्वप्रयत्नाने येथेपर्यंत पोचतो. पण पुढे परा वाणीत जप होण्यासाठी एकतर ईश्वरीकृपा तरी हवी किंवा सद्गुरूंनी अनुग्रह केला पाहिजे. सद्गुरू काही काळ याचा अनुभव देतात.
ज्ञानेश्वरांनी प्रत्येक गोष्ट आपले सद्गुरू आणि थोरले बंधू निवृत्तीनाथ यांना स्मरून आणि साक्षीने केलेली आहे. जे संत असा अनुभव साधकाला/शिष्याला देऊ शकतात तेच खरे सद्गुरू! तो अनुभव खरेच दिव्य असतो. सद्गुरू सत्शिष्याला परा वाणीची एक झलक दाखवून साधकाला साधनेची दिशा देतात. देवाच्या दारात नेऊन उभे करण्याचे काम सद्गुरू करतात. पण त्यासाठी आपल्या मनाची कवाडे उघडता आली पाहिजेत. त्यासाठी हवी श्रद्धा! श्रद्धेने जर देवाच्या दारात जीवनातील प्रत्येक क्षण नामाने भरत राहिलो तर चारी मुक्ती साधता येणे सोपे आहे. काही ठिकाणी क्षणभरी म्हणजे क्षणभर असा अर्थ घेतात. पण ज्ञानदेवांनीच हरिपाठाच्या २७व्या अभंगात सांगितले आहे, सर्वसुख गोडी साही शास्त्री निवडी। रिकामा अर्धघडी राहू नको॥ यावरून असे समजायला हरकत नसावी की, प्रत्येक क्षण नामाने भरता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाच्याठायी ‘उभा’ राहा म्हणजे सावध राहा. हे सांगून ज्ञानदेव खºया ज्ञानाचा मार्ग दाखवतात.
प्रत्येक जण कुठे ना कुठे तरी उभा असतो. पण नेमके कुठे उभे असले पाहिजे हे ज्ञान ज्ञानदेव देतात. अगदी ट्रॅफिक हवालदारही नोकरीवर ‘उभा’ असतो. पण त्याचे अधिक लक्ष असते ते कोणता वाहनचालक नियमभंग करतो याकडे. देशाच्या सीमांचे रक्षण करणारा जवानही ‘उभा’ असतो. पण तो सावध असतो ते शत्रूंकडून काही हल्ला होणार नाही याची काळजी घेत सीमांचे रक्षण करण्याबाबतीत. पण ज्ञानदेव देवाचीये द्वारी उभे राहण्यास सांगतात. कारण आपल्याकडे भक्तांचे ४ प्रकार श्रीमद्भगवत गीतेत सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी! ज्ञानदेव ‘हरिपाठ’ हा जिज्ञासू/मुमुक्षू साधकासाठीच लिहीत आहेत. त्याची तुलना फक्त देशरक्षणासाठी सावध असणाºया जवानाशीच व्हावी असे वाटते. मुमुक्षू साधक जर सावधपणे देवाच्या दारात उभा राहिला तर चारी मुक्ती साधता येतात.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
मुलांवरील सायबर धोक्याचे सावट
आजच्या इंटरनेट मीडियाच्या जगात मुलांचे बालपण लाईक्स आणि व्ह्यूजच्या गर्दीत वाढण्यास भाग पाडले जात आहे. मुलांच्या मोबाइलवर स्क्रोलिंग करणे, चॅटिंग करणे, रील्स पाहणे आणि रील्स तयार करणे यामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग ही देखील चिंतेची बाब बनत आहे. याचा परिणाम म्हणून मुलांचे ८० टक्क्यांहून अधिक फोटो किंवा व्हिडीओ आॅनलाइन उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की, ज्या वयात त्यांनी खेळायला, खायला, अभ्यास करायला आणि सर्जनशील कामात गुंतले पाहिजे, त्याच वयात आपण स्वत: त्यांना सायबरबुलिंग, आॅनलाइन शोषण, डिजिटल व्यसन, गोपनीयतेचे उल्लंघन आणि नको असलेल्या मानसिक तणावाच्या संपर्कात आणत आहोत.
आज जगभरात अंदाजे ४० कोटी मुले इंटरनेट वापरतात. भारतात नऊ ते तेरा वयोगटातील अंदाजे ७६ टक्के मुले फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्युबसारख्या इंटरनेट माध्यमांचा वापर केवळ वेळ घालवण्यासाठीच करत नाहीत, तर ‘चाइल्ड इन्फ्लुएन्सर’ बनण्याच्या दिशेनेही वाटचाल करत आहेत. आज केवळ इन्स्टाग्रामवर ८३,००० हून अधिक ‘चाइल्ड इन्फ्लुएन्सर’ सक्रिय आहेत, जी गेल्या काही वर्षांत ४१ टक्क्यांहून अधिक वाढ आहे.
इंटरनेट माध्यमांमध्ये गुंतलेली मुले आता केवळ रील्स किंवा व्हिडीओ पाहणारी राहिलेली नाहीत, तर ती कंटेंट क्रिएटर आणि प्रसिद्धीसाठी ब्रँड बनत आहेत. ते कंटेंट निर्मितीमधून लाखो रुपयेही कमावत आहेत. सर्वेक्षणांनुसार २०१० नंतर जन्मलेल्या ३७ टक्के मुलांना इंटरनेट मीडियाच्या क्षेत्रात प्रभावशाली व्यक्ती (इन्फ्लुएन्सर) बनण्याची आकांक्षा आहे. पालक या मुलांची खाती सांभाळतात, व्हिडीओ शूट करतात, व्हिडीओ संपादित करतात आणि ते इंटरनेट मीडियावर अपलोड करतात. ही मुलांची डिजिटल अर्थव्यवस्था केवळ एक आर्थिक संकल्पना नाही; तर हा मुलांचे हक्क, सुरक्षितता, गोपनीयता आणि नैतिकता यांच्याशी संबंधित एक मुद्दा देखील आहे.
जेव्हा मुले इंटरनेट मीडियावर सक्रिय असतात, व्हिडीओ पाहतात किंवा गेम्स खेळतात, तेव्हा ते केवळ मनोरंजनच नाही, तर डेटा देखील निर्माण करतात. त्यांचे वर्तन, सवयी, आवडीनिवडी आणि रुची यांना डिजिटल कंपन्यांसाठी आर्थिक मूल्य असते. जेव्हा एखादे मूल व्हिडीओ पाहते, अॅप डाऊनलोड करते, गेम खेळते किंवा आॅनलाइन वर्गात भाग घेते, तेव्हा त्यांच्या ठिकाणाबद्दल, वर्तनाबद्दल आणि आवडीनिवडींबद्दलचा डेटा गोळा केला जातो. डिजिटल कंपन्या या डेटाचा वापर बाजारपेठ संशोधन, जाहिरात, व्यवसाय धोरण विकास आणि अल्गोरिदमवर आधारित शिफारसींसाठी करतात. यामुळेच आज मुलांच्या डेटाची सुरक्षितता ही एक गंभीर चिंतेची बाब बनत आहे.
ही डिजिटल अर्थव्यवस्था मुलांना शिक्षण, नवोपक्रम, उद्योजकता आणि नवीन जागतिक संधींशी जोडू शकते. मात्र, या लोभापायी जर आपण त्यांच्या डिजिटल सुरक्षेची, गोपनीयतेची आणि मानसिक आरोग्याची उपेक्षा केली, तर ते एक गंभीर आव्हान ठरू शकते. याची चिन्हे आधीच दिसू लागली आहेत. डिजिटल क्रांतीचा वेग वाढत असताना, आपण मुलांना डिजिटल बालकामगार बनवत आहोत का, यावर जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या डिजिटल युगात कारखान्यांची जागा स्मार्टफोन्सनी आणि यंत्रांची जागा अल्गोरिदम्सनी घेतली आहे.
भारतासह अनेक देशांमध्ये मुलांवर इंटरनेट माध्यमांच्या वाढत्या नकारात्मक परिणामांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने अलीकडेच आॅनलाइन प्लॅटफॉर्मवर मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आॅस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी इंटरनेट माध्यमांवर बंदी घातली आहे. फ्रान्स, स्पेन, डेन्मार्क, इंडोनेशिया आणि मलेशिया यांनीही किशोरवयीन मुलांची आॅनलाइन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. ब्रिटनदेखील अशाच प्रकारच्या उपक्रमाची योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातही १६ वर्षांखालील किशोरवयीन मुलांच्या इंटरनेट माध्यमांच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत चर्चा तीव्र होत आहे. मुलांचा इंटरनेट माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर ५-६ तासांचा वावर केवळ भावनिक दुर्बलतेकडेच नेत नाही, तर त्यांची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि एकाग्र होण्याची क्षमताही सातत्याने कमी करत आहे.
आॅनलाइन सुरक्षेशी संबंधित कायदे मुलांवर घोंघावणाºया सायबर धोक्यांवर नियंत्रण ठेवू शकतात, परंतु ते समाजात जागरूकता निर्माण करण्यास पुरेसे नाहीत. यासाठी समाजात व्यापक चर्चेची आवश्यकता आहे. पालकांनी आणि पालकत्व स्वीकारणाºयांनी हे समजून घेतले पाहिजे की, डिजिटल जगातील मुलांचे खरे यश लाईक्स, व्ह्यूज आणि कंटेंट निर्मितीवरून मोजता येत नाही. खरे यश हे शिक्षण आणि सामाजिक सहभागातून त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या विकासात आहे.
म्हणून शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना डिजिटल साक्षरता कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले पाहिजे. बालहक्कांना डिजिटल हक्कांशी जोडण्यासाठी डिजिटल कंपन्यांना जबाबदार धरणे आवश्यक आहे. सरकार, तंत्रज्ञान कंपन्या, शाळा, पालक आणि समाजातील सर्व हितधारकांनी एकत्र येऊन एक अशी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे, जिथे मुले केवळ डिजिटल ग्राहक किंवा मजूर नसून, सुरक्षित, सन्मानित आणि सक्षम डिजिटल नागरिक असतील.
वारीचे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!
वारी हे केवळ धार्मिक सहल किंवा प्रवास नाही, तर ते जगातील सर्वात मोठे ‘मॅनेजमेंट’ (व्यवस्थापन) आणि सामाजिक समतेचे प्रतीक आहे. वारीमध्ये श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, जाती-पातीचे सगळे भेद गळून पडतात. सगळे एकत्र चालतात, एकाच पंक्तीला जेवतात आणि एकाच माऊलीचे नाम घेतात. मैलोन्मैल चालताना पायाला फोड आले तरी वारकºयाच्या चेहºयावरचे हसू मावळत नाही. सुख आणि दु:ख या दोन्ही परिस्थितींमध्ये ‘आनंदात’ कसे राहायचे, ही जीवन जगण्याची मोठी कला वारी आपल्याला शिकवते. म्हणूनच प्रत्यक्ष वारीत जाता आले नाही तरी आपल्या मनाला पंढरी बनवूया आणि मुखाने म्हणूया. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा!
हरिउच्चारण हेचि पैं सुकृत। न पाहे रे पंथ सोपा सुगम।। असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. म्हणजे मुखाने हरीचे नाव घेणे हेच सर्वात मोठे पुण्य (सुकृत) आहे. भगवंताकडे जाण्याचा यापेक्षा सोपा आणि सुगम मार्ग दुसरा कोणताही नाही. श्री. ज्ञानदेवांना ज्ञानियांचा राजा का म्हणतात याची झलक हरिपाठातील पहिल्याच अभंगातून नजरेत भरते. हरिपाठ हा ज्ञानियांच्या राजांचा अद्वैताची बैठक न मोडता लिहिलेला अध्यात्मशास्त्रातील नामस्मरणसाधनेवरील एक संशोधन आहे. त्यांचे हे कवित्व किंवा रचना ललितलेखन नसून अध्यात्मविषयातील शास्त्रीय लेखनच आहे. अध्यात्मशास्त्रातील वेद, शास्त्रे, पुराणे या ग्रंथांचे त्यांनी दिलेले संदर्भ आणि नामस्मरणासंबंधी केलेले स्वत:चे अनुभवकथन येथे दिसून येतात.
‘ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी। धरोनी श्रीहरी जपे सदा॥ हे त्यांचे अनुभव लक्षात घेऊन शेवटी त्यांनी काढलेले अनुमान आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार। वाया येरझार हरीवीण॥ हेही ज्ञानोत्तर भक्तीची फलश्रुतीच आहे. देवही संकल्पना मानवी जीवनात कशी अस्तित्वात आली असावी? सर्वसामान्य माणूस म्हणतो की, ‘मी’ देव मानतो किंवा देव मानत नाही. पण हे दोन्हीही त्याच्या कल्पनेचेच खेळ असतात. वास्तव फार दूर असते. मी हा प्रत्येकाच्या ठायी आहेच. परंतु मी जीव ऐसा करिता संकल्प। प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेली भीती, वासना ही याचीच फलनिष्पत्ती आहे. पंढरीची वारी याचीच अनुभूती देते. सर्वांना बरोबर घेऊन जाणारी ही वारी सामाजिक आणि आध्यात्मिक शिकवण देताना समरसतेला महत्त्व देते, मानवता धर्माची शिकवण देते हे सर्वात महत्त्वाचे आहे.
वारकरी संप्रदाय हा वैचारिकतेने अत्यंत संपन्न आहे. त्यामुळे कानाकोपºयातील संतांचे विचार यात दिसून येतात. आपला हा महाराष्ट्रधर्म आहे तो भक्कम करण्याचे काम या वारकरी संप्रदायाने केलेले आहे. लाखोंच्या संख्येने अत्यंत एकोप्याने वारकरी आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर जातात आणि एकमेकांत मिसळतात. आपल्या ज्ञानाची, अनुभवाची वाटणी करतात. विचारांचे आदान प्रदान करतात. म्हणून हा आनंद कधीच न संपणारा असतो. तो एकदा नवे तर वारंवार घ्यावा यासाठी ही वारी असते. वारंवार केली जाते ती वारी मनुष्याला देवत्वाकडे नेते. विठ्ठलमय बनवते.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
Sunday, July 5, 2026
विचारधारेचा बळी देउन पक्षांतर
गेल्या लोकसभा निवडणुकीत २४० जागांवर अडकलेले आणि आता आवश्यक बहुमतासाठी तेलगू देसम पार्टी व जेडीयूसारख्या मित्रपक्षांवर अवलंबून असलेले मोदी सरकार, पक्षांतरांमुळे संसदेत दोन तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचत असल्याचे दिसत आहे. अर्थात, नरसिंह राव सरकारनेही १९९३ मध्ये अल्पमतातून बहुमत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, परंतु दोन तृतीयांश बहुमतासाठी इतर पक्षांचे असे खच्चीकरण धक्कादायक आहे. पंतप्रधान मोदींची ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ साध्य करण्याची महत्त्वाकांक्षा आणि सीमांकन विधेयक मंजूर होणे, हे यामागील मूळ कारण म्हणून सांगितले जात आहे. परंतु पक्षांतर करणाºयांची मूळ पक्षाप्रति आणि त्याच्या विचारधारेप्रति असलेल्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नि:संशयपणे, बंगालमध्ये १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर तृणमूल काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्यात आले. कठीण काळातही, ममता बॅनर्जी यांच्या नावाने ८० आमदार निवडून आले होते, त्यापैकी ५८ जणांनी पक्ष भरकटला असल्याचा दावा करत एक वेगळा गट स्थापन केला. इथे एक प्रश्न अनुत्तरित राहतो. सत्तेतून बाहेर काढल्यानंतरच पक्षांतर करणाºयांना आपली दिशाहीनता का जाणवली? खासदारांचे प्रकरण तर त्याहूनही अधिक रंजक आहे. ममता बॅनर्जी यांच्या दीर्घकाळच्या निष्ठावंत, काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली २८ पैकी २० लोकसभा सदस्यांनी बंड केले, तर १३ पैकी चार राज्यसभा सदस्यांनी राजीनामा देऊन आपली नैतिक भूमिका आधीच दाखवून दिली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नावाने राजकारणात वर चढलेल्या या खासदारांना, सत्ता गमावल्यानंतरच नेत्या आणि पक्षातील त्रुटी लक्षात आल्या.
तृणमूलच्या शासनशैलीपासून ते अभिषेक बॅनर्जी यांच्या वर्चस्वापर्यंत काहीही अचानक घडले नाही! या खासदारांनी ज्या प्रकारे फारशा परिचित नसलेल्या नॅशनल सिटिझन्स पार्टी आॅफ इंडियामध्ये प्रवेश केला, त्यातूनही हा डाव उघड झाला. ज्या पक्षाच्या उमेदवाराने आपले डिपॉझिटसुद्धा कधी जमा केले नव्हते, त्या पक्षाने पक्षांतराद्वारे अचानक २० खासदार मिळवले आणि संख्याबळात चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांच्यासारख्या सत्ताधारी नेत्यांनाही मागे टाकले. बंगालमध्ये सत्तेसाठी काँग्रेसपासून फुटून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांशी निवडणूक आघाड्या करणाºया तृणमूल काँग्रेसची जर काही विचारधारा होती, तर या आमदारांनी आणि खासदारांनी तिला सत्तेच्या प्रवाहात, म्हणजेच आजच्या भाजपमध्ये, विलीन करून टाकले.
जर घटनादुरुस्तीसाठी संसदेत आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत मिळवणे हे उद्दिष्ट होते, तर हा खेळ केवळ बंगाल आणि तृणमूल काँग्रेसपुरता मर्यादित राहणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर शिवसेनेच्या खासदारांची सद्सद्विवेकबुद्धी अचानक जागी झाली. भाजपविरोधात आक्रमक प्रचार केल्यामुळे, विरोधी आघाडीचा भाग म्हणून उबाठा गटाचे उमेदवार म्हणून २०२४ मध्ये विजयी झालेल्या नऊ खासदारांपैकी सहा जणांनी बंड केले आणि ते या बंडाचे पूर्वीचे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. तृणमूल काँग्रेसप्रमाणेच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही मार्गभ्रष्ट झाल्याचा आणि अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचा आरोप झाला. प्रश्न असा आहे की, ही जाणीव आताच का झाली? स्पष्टपणे, खासदारांनंतर आमदारांची सद्सद्विवेकबुद्धीही जागी होईल. शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रभाव वाढवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचे राजकीय सिद्धांतही चर्चिले जात आहेत, पण सध्या तरी निष्कर्ष हाच निघतो की, उद्धव ठाकरे हे आपले वडील शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सांभाळण्यात अपयशी ठरले. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा जरी डावपेचात पटाईत असलेल्या लढाऊ राजकारण्याची नसली, तरी हे नाकारता येणार नाही की, मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी आपला सर्वात जुना आणि समविचारी मित्रपक्ष असलेल्या भाजपशी संबंध तोडून, कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती केली. जर उद्धव यांना असे वाटत असेल की, शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांचे बंड म्हणजे सत्तेच्या समीकरणात विचारधारेला दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे, तर शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती यापेक्षा अधिक काही नव्हती.
अयोध्या येथील बाबरीचा ढाचा पाडल्याचा अभिमान बाळगणाºया शिवसेनेची काँग्रेससोबतची युती, सत्तेच्या समीकरणांशिवाय इतर कोणत्याही तर्काने समर्थनीय ठरू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या राजकारणाचे विश्लेषण करून हे ओळखले पाहिजे. शरद पवारांच्या विखंडित राष्ट्रवादी काँग्रेसवर आणखी एका फुटीचे सावट आहे. विरोधी आघाडीचा एक घटक म्हणून, गेल्या निवडणुकीत त्यांच्या तिकिटावर आठ खासदार निवडून आले होते. एकदा अपयशी ठरल्यानंतर, पुतणे अजित पवार गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात यशस्वी झाले. सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून १९९९ मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे शरद पवारही सातत्याने काँग्रेससोबतच राहिले आहेत, ज्यामुळे त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एका फुटीच्या अटकळींदरम्यान, काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. संसदेत घातपाताने दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचा हा खेळ केवळ बंगाल आणि महाराष्ट्रातच साधला जाणार नाही.
उत्तर प्रदेशातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सुभाष्पाचे (सुभाष्प) प्रमुख आणि मंत्री ओम प्रकाश राजभर यांनीच नव्हे, तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या (एसपी) खासदारांमध्ये मोठी फूट पडण्याची भीती व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीत, एसपीने ३७ जागा जिंकल्या आणि काँग्रेसने सहा जागा जिंकल्या, ज्यामुळे ८० लोकसभा जागा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपला ३३ जागांवर रोखून बहुमतापासून वंचित ठेवण्यात मोठी भूमिका बजावली. एसपीमध्ये फूट पडण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश खासदार मिळवणे सोपे नसले तरी, तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची उदाहरणे पाहता ते अशक्य नाही. पक्षांतराच्या खेळामुळे प्रभावित झालेले सर्व पक्ष घराणेशाहीवर आधारित आहेत. राज्यसभेत सात सदस्य असलेल्या आम आदमी पक्षानेही बंड केले. ही एक वेगळीच गोष्ट आहे.
मात्र, पुढील वर्षी होणाºया विधानसभा निवडणुकांमुळे उत्तर प्रदेशदेखील अजेंड्यावर अग्रस्थानी आहे. पंतप्रधान म्हणून मोदींच्या हॅटट्रिकनंतर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही सत्तेची हॅटट्रिक साधण्याचे लक्ष्य असेल. २०२९च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, भाजपसाठी उत्तर प्रदेशात सत्तेसाठी प्रत्येक शक्य व्यासपीठ तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
देवाचिये द्वारी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधिलेल्या।। संत ज्ञानेश्वरांच्या या अभंगाची महती इथे फार मोठी आहे. हरिपाठाच्या या पहिल्याच ओळीत माऊली सांगतात की, देवाच्या चरणाशी जो क्षणभर जरी भक्तिभावाने उभा राहतो, त्याला चारही मुक्ती (सालोक्य, सामीप्य, सारूप्य, सायुज्यता) सहज मिळतात. मनुष्याचा जन्म हा मुक्तीसाठी असला पाहिजे. जन्म इथे घेता, मरण अटळ, नको हळहळ जीवालागी/ असे आपण अंत्ययात्रेला जाताना म्हणतो. पण, ती अंत्ययात्रा नसतेच. तो असतो प्रवास. नवा सुरू झालेला प्रवास. पण, एकदा प्रवासाला निघाल्यावर आपला मुक्काम आणि अंतिम स्थान कुठले असले पाहिजे हे ठरवण्यासाठी हा माणसाचा जन्म आहे.
असे म्हणतात की, ८४ लक्ष योनींतून जन्म घेतल्यानंतर माणसाचा जन्म येतो. पुन्हा जन्म मरणाच्या या चक्रात अडकायला नको म्हणून मुक्ती मिळवायची असते. ही मुक्ती म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात मिलन होणे. त्यासाठी देवाचिये द्वारी जाणे आवश्यक आहे. मुक्ती मिळवण्यासाठी ही वारी आहे. वारी केली म्हणजे जन्म मरणाची ही ८४ लक्ष योनींच्या फेºयांची वारी करावी लागणार नाही आणि आपला शुद्ध आत्मा परमात्म्यात जाईल, विठ्ठलमय होईल. आपल्या जन्माचा अर्थ प्रत्येकाला समजला पाहिजे. कशासाठी मी जन्म घेतला आहे. मला काय साध्य करायचे आहे. या मोहमायाजालात अडकून पापकर्म करायचे आणि पुन्हा ८४ ची वारी करायची की, मुक्ती हवी हे ठरवण्यासाठी माणसाचा जन्म आहे.
हे शिकवतात ते संत. तुका म्हणे तोचि संत। सोशी जगाचे आघात।। संत तुकाराम महाराजांनी हे अत्यंत सोपेपणाने सांगितले आहे. हे जे आघात, दु:ख, अडचणी आपण सोसतो आहे, ते पूर्वीच्या कुठेतरी झालेल्या सुकृताचे फल असेल. ते सोसले पाहिजे. हे घाव सोसल्याशिवाय आपण देव होणार नाही. देव होणे म्हणजेच मुक्ती आहे. तेव्हा अवस्था प्राप्त होते ती म्हणजे, देव शोधायाला गेलो, देव होऊनी आलो, अशी ती अनुभूती.
त्यासाठी हरिपाठ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हरिपाठात २८ अभंग आहेत. यातून संत ज्ञानेश्वरांनी जीवनाचे फार मोठे सार सांगितले आहे. त्याची अनुभूती प्रत्येकाने घेतली पाहिजे. देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचे तादात्म्य सोडणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजेच मोक्ष. पण, अशा सिद्धांताने हरिचे नाम हेच देवाचे द्वार सुचविले त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्या वाचून चित्तशुद्धी होणार नाही, व चित्तशुद्धी झाल्या वाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटते, परंतु द्वारीं उभे असणे म्हणजे ‘सेवकाच्या नात्याने तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावे नाम। भेदाभेद काम सांडोनिया॥) परमप्रितीने भगवन्नामोच्चार करणे हीच हरीची सेवा आहे, असे सांगितले आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’ असे द्विरुक्तीने सांगण्यात हरिचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
Saturday, July 4, 2026
ईतिहासातील खºया नायकांना ओळखण्याची गरज
अलीकडेच कोलकाता महानगरपालिकेने ‘सुहरावर्दी अॅव्हेन्यू रोड’चे नाव बदलून ‘गोपाल मुखर्जी रोड’ असे ठेवले आहे. काँग्रेस, टीएमसी आणि डाव्या विचारवंतांचा असा युक्तिवाद आहे की, या रस्त्याला हुसेन शहीद सुहरावर्दी यांचे नाव न देता, त्यांचे काका सर हसन सुहरावर्दी यांचे नाव देण्यात आले होते. सर हसन सुहरावर्दी हे ब्रिटिश काळात एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि वैद्य होते, तसेच १९३० ते १९३४ दरम्यान कोलकाता विद्यापीठाचे कुलगुरू होते. बंगालमधील बहुसंख्य जनतेच्या मते, जाणीवपूर्वक विसरल्या गेलेल्या महान नायक गोपाळ पाठा (प्रचलित नाव) यांना योग्य तो सन्मान परत मिळवून देण्यासाठी हे नावबदल एक आवश्यक पाऊल आहे.
वास्तविक पाहता, नावबदलाला विरोध करणारे पक्ष आणि विचारवंत हा मुद्दा त्यांच्या सोयीनुसार मांडत आहेत आणि या चित्रातील गडद बाजू जाणीवपूर्वक लपवत आहेत. ज्या हसन सुहरावर्दींची ते एक महान शिक्षणतज्ज्ञ, वैद्य आणि समाजसेवक म्हणून सतत प्रशंसा करतात, ते खरेतर त्यांचे पुतणे हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या वारसा आणि राजकीय पार्श्वभूमीशी अतूटपणे जोडलेले आहेत. दोघेही केवळ एकाच कुटुंबाचे वंशज नव्हते, तर मुस्लीम लीगचे नेतेही होते. त्या दोघांनीही विभाजनवादी राजकारणाला खतपाणी घातले आणि ते जिनांच्या द्विराष्ट्र सिद्धांताचे कट्टर समर्थक होते. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी कोलकाता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात तत्कालीन गव्हर्नर स्टॅनले जॅक्सन यांच्यावर गोळीबार करण्यापासून महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिक बिनादास यांना त्यांनी बळजबरीने रोखले होते, म्हणून तत्कालीन ब्रिटिश सरकारने हसन सुहरावर्दी यांना ‘नाइट’ ही पदवी दिली.
या कृतीबद्दल बिनादास यांना ज्या दिवशी तुरुंगात टाकण्यात आले, त्याच दिवशी वसाहतवादी सत्तेप्रती त्यांची निष्ठा दाखवण्यासाठी हसन सुहरावर्दी यांना ‘नाइट’ ही पदवी देण्यात आली. त्यानंतर एप्रिल १९३३ मध्ये ब्रिटिश सरकारने कोलकातामधील एका रस्त्याला त्यांचे नाव दिले, ‘सुहरावर्दी अॅव्हेन्यू’. असेही म्हटले जाते की, हसन सुहरावर्दी यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध म्हणून १९४६ मध्ये आपली ‘नाइट’ पदवी परत केली. हे देखील अर्धसत्य आहे. सत्य हे आहे की, भारताच्या फाळणीसाठी मुस्लीम लीगच्या मागणीला व्यापक स्वीकृती मिळवण्यासाठी त्यांनी आपली ‘नाइट’ पदवी परत केली. हसन सुहरावर्दी यांची मुलगी पुढे पाकिस्तानची पहिली महिला नागरी सेविका बनली, तिने संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या शिष्टमंडळात काम केले आणि तिला मरणोत्तर पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ प्रदान करण्यात आला. जो ब्रिटिशांचा कट्टर भक्त होता, एका महान क्रांतिकारकाला तुरुंगात टाकण्यास दोषी होता आणि मुस्लीम लीगचा नेता म्हणून स्वत:साठी व आपल्या वारसांसाठी एका वेगळ्या अस्मितेवर आधारित स्वतंत्र देशात भविष्याची कल्पना करत होता, अशा माणसाच्या नावाने भारतातील कोणत्याही शहराला, रस्त्याला किंवा इमारतीला नाव का द्यावे? भारताच्या फाळणीसाठी जबाबदार असलेल्यांचा गौरव का करावा?
त्यांचा पुतण्या, हुसेन शहीद सुहरावर्दी यांच्या नावावर इतिहासात दोन हिंदू हत्याकांडांची नोंद आहे. त्यावेळी बंगालमध्ये मुस्लीम लीगचे अंतरिम सरकार होते आणि हुसेन शहीद सुहरावर्दी त्याचे पंतप्रधान होते. जिनांनी पुकारलेल्या बंगालमधील ‘प्रत्यक्ष कृती दिना’चे (Direct Action Day) नेतृत्व त्यांनी केले. त्यांनी हिंदूंच्या हत्याकांडाचे नियोजन केले आणि ते घडवून आणले. १६ आॅगस्ट १९४६ रोजीच्या प्रत्यक्ष कृती दिनापूर्वी त्यांनी कोलकात्याच्या २४ पैकी २२ पोलीस ठाण्यांमध्ये मुस्लीम प्रमुख आणि दोन ठाण्यांमध्ये अँग्लो-इंडियन प्रमुखांची नियुक्ती केली. त्यांनी पोलीस आणि सरकारी कर्मचाºयांना विनाकारण तीन दिवसांची रजा मंजूर केली. प्रत्यक्ष कृती दिनी, ते स्वत: पोलीस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बसले आणि दंगलखोरांविरुद्ध कारवाई करण्यापासून पोलिसांना रोखले.
याचा परिणाम असा झाला की, केवळ कोलकात्यातच ७२ तासांत ६,००० हून अधिक हिंदूंची कत्तल झाली, १७,००० हून अधिक जखमी झाले आणि १,००,००० हून अधिक हिंदू बेघर झाले. या दंगलीनंतर झालेल्या नोआखली दंगलीत हजारो हिंदूंची कत्तल झाली, बहुसंख्य लोकांची प्रचंड जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले, तसेच माता-भगिनींचा अमानुष छळ झाला. हेच हुसेन शहीद सुहरावर्दी पुढे १९५६-५७ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. देशाच्या आयकर विभागाने १९४५-४६ आणि १९४६-४७ या वर्षांसाठी त्यांच्यावर ५० लाख रुपयांचा कर लावला. तथापि, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी उदारता दाखवत, तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई आणि बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बिधान चंद्र रॉय यांना पत्र लिहून त्यांना या कारवाईतून सूट दिली. अखेरीस ते १९४८ मध्ये कायमचे पाकिस्तानात निघून गेले. याउलट, गोपाळ पाठा यांनी केवळ दंगलखोरांपासून हिंदूंचे रक्षण केले नाही, तर जिना, सुहरावर्दी आणि मुस्लीम लीग यांचा कोलकाता पाकिस्तानात जोडण्याचा कटही उधळून लावला. त्यामुळे ‘सुहरावर्दी अॅव्हेन्यू रोड’चे ‘गोपाळ मुखर्जी रोड’मध्ये रूपांतर करणे, हे इतिहासातील नायक आणि खलनायकांची खरी ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे.
वारकरी संप्रदाय आणि विठ्ठलभक्ती
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीने।।
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मुख्य कणा आहे. हा संप्रदाय अतिशय सोपा आणि सर्वांना सामावून घेणारा आहे. विठ्ठल म्हणजेच माऊली : विठ्ठलाला आपण देव मानण्यापेक्षा ‘माऊली’(आई) मानतो. आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराची वाट पाहते, तसाच पंढरीचा विठुराया विटेवर उभा राहून आपल्या या वारकरी लेकरांची वाट पाहत असतो.
वारकरी संप्रदायातील भक्तीचे स्वरूप वेगळे आहे. इथे कर्मकांडाला स्थान नाही. निष्पाप, निस्सीम प्रेम आणि एकमेकांमध्ये विठ्ठल पाहणे हीच खरी वारकरी भक्ती आहे. वारीत चालणारा प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, कारण इथे प्रत्येकात विठ्ठल वसलेला आहे अशी भावना असते. यालाच आपल्याकडे आत्मज्ञान म्हणतात. विठ्ठलभक्तीत फार मोठी ताकद आहे. प्रत्येक संताला विठ्ठलापर्यंत पोहोचायचे होते. विठ्ठलापर्यंत पोहोचणे म्हणजे चालत वारी करत पोहोचणे असे नाही. तर विठ्ठल म्हणजे परमात्मा आहे. त्या परमात्म्यात आपला आत्मा पोहोचवणे ही आत्मीक वारी. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात विठ्ठल होता. विठ्ठलाच्या हृदयात प्रत्येक संत होता. प्रत्येक वारकरी असाच संतमय होण्याची तयारी करत असतो. संतांची आणि विठ्ठलाची कृपा आपल्यावर व्हावी हीच माफक अपेक्षा असते. वारकरी कधी धनधान्य, पैसाअडका, सोनेचांदी, संपत्ती मिळावी म्हणून वारी करत नाही. काही मिळावे म्हणून विठ्ठलाची भक्ती करत नाही. तर समाधान, आनंद, आत्मीक शांती मिळावी म्हणून विठ्ठलाची भक्ती केली जाते. साध्या वेशात तो राहात असतो. वारकरी हा कर्माला महत्त्व देतो, कर्मकांडाला नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपले कर्म करून पुढचा मार्ग पत्करायचा आहे हे सांगते ती वारी. शेतीची कामे पूर्ण झाली, बीजरोपण झाले की तो शेतीची वाढ होईपर्यंत भगवंतांच्या भरवशावर शेती सोडतो आणि वारीला जातो. परत येईपर्यंत शेत चांगले डौलदार झालेले असते. हे त्याचे अचूक गणित असते. जमिनीत बीजरोपण करून मनात भक्तीचा भाव रुजवण्याचे काम करणारी ही कर्मप्रधान वारी असते. म्हणूनच भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोग हा खºया अर्थाने वारकºयांमध्ये पाहायला मिळतो.
चोखा मेळा हे शेतात काम करून शेतातच विठोबाला शोधतात. त्यांना पंढरपूरला जाण्याची गरज भासत नाही. कारण जमिनीची, शेतीची कामे करताना नामस्मरण घेणे यातच त्यांची वारी झालेली असते. म्हणून साक्षात विठुराया आपल्या या भक्ताला भेटण्यासाठी शेतात येतो. भेदाभेद इथेच संपलेले असतात. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ असे जेव्हा हे संतश्रेष्ठ म्हणतात तेव्हा विठोबाचा साक्षात्कार तिथेच घडतो. हे आत्मा आणि परमात्म्याचे झालेले मिलन आहे. याचा स्थायीभाव कर्मयोग आहे.
प्रफुल्ल फडके/ संतकृपा
Friday, July 3, 2026
सुधारणांच्या दिशेने अर्थपूर्ण उपक्रम
सर्वसामान्य नागरिकांसाठी फौजदारी न्यायव्यवस्था म्हणजे केवळ कायदे, नियम किंवा संस्थांचा संग्रह नाही. ते काही सोप्या आणि सरळ प्रश्नांमधून तिचा अनुभव घेतात. तक्रार वेळेवर दाखल केली होती का? तपासादरम्यान पीडिताला प्रत्येक गोष्टीची माहिती दिली होती का? पुरावे काळजीपूर्वक गोळा केले होते का? साक्षीदाराला वेळेवर समन्स मिळाले होते का? आणि खटला विनाकारण विलंब न लावता संपला होता का? जर आपण या प्रश्नांची उत्तरे शोधली, तर आपल्या लक्षात येईल की, भारताची फौजदारी न्यायव्यवस्था दीर्घकाळापासून दुहेरी ओझ्याशी झुंजत आहे.
पहिले म्हणजे, संपूर्ण प्रक्रिया विलंबाने ग्रासलेली आहे आणि दुसरे म्हणजे, ती इतकी विखंडित आहे की, प्रकरणे अपूर्ण राहतात. अनेक प्रकरणे एकमेकांशी जोडलेल्या संस्था, प्रचंड कागदपत्रे आणि विविध अधिकारक्षेत्रांमधील भिन्न कार्यपद्धतींमुळे गुंतागुंतीची झालेली आहेत. यामुळेच संपूर्ण व्यवस्था पीडित-केंद्रित न राहता प्रक्रिया-केंद्रित बनते. या संदर्भात भारतीय न्याय संहिता, २०२३ (बीएनएस), भारतीय नागरी संरक्षण संहिता, २०२३ (बीएनएसएस) आणि भारतीय पुरावा कायदा, २०२३ (बीएसए) हे मोठे क्रांतिकारक उपक्रम आहेत. १ जुलै २०२४ पासून प्रभावी असलेल्या या प्रणाली, जुनी पद्धत बदलण्याचा एक प्रयत्न आहेत. त्यांचे उद्दिष्ट केवळ जुने कायदे बदलणे नाही, तर एक आधुनिक, तंत्रज्ञान-सक्षम आणि पीडित-केंद्रित फौजदारी न्यायव्यवस्था स्थापित करणे आहे.
न्यायसंहितेंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण सुधारणांपैकी एक म्हणजे तपास आणि न्यायालयीन सुनावणीदरम्यान ४५ अतिरिक्त पद्धतशीर मुदतींची स्थापना करणे, ज्यामुळे एकूण मुदतींची संख्या १४५ झाली आहे. सुरुवातीपासून ते अंतिम निकालापर्यंतची संपूर्ण फौजदारी न्याय प्रक्रिया तीन वर्षांच्या आत पूर्ण करणे, हा यामागील उद्देश आहे. महत्त्वाचे म्हणजे, या मुदती केवळ कागदी घोषणा नाहीत; फौजदारी न्याय डिजिटल परिसंस्थेद्वारे तंत्रज्ञान-आधारित देखरेख प्रणालीद्वारे त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला जातो. आरोपपत्र वेळेवर दाखल केले जाईल याची खात्री करण्यासाठी आता तपास अधिकाºयांकरिता स्वयंचलित सूचना (अलर्ट) तयार केल्या जातात.
न्यायिक अधिकाºयांना विविध टप्प्यांवरील मुदतींवर देखरेख ठेवण्यास मदत करण्यासाठी, न्यायालयाच्या खटला-व्यवस्थापन प्लॅटफॉर्म, म्हणजेच खटला माहिती प्रणालीमध्ये ( Case Information System)), अशाच प्रकारच्या मुदती जोडल्या जात आहेत. यामागील मूळ तत्त्व सोपे आहे. मुदत आणि तंत्रज्ञान एकत्र मिळून विश्वास निर्माण करतात. तपासाच्या कालमर्यादेवर अशा प्रकारे देखरेख ठेवल्यामुळे आरोपपत्र दाखल करण्याच्या अनुपालनात लक्षणीय सुधारणा झाली आहे. ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचा दर २०२४ मध्ये ५१ टक्क्यांवरून २०२६ मध्ये ६७ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर याच कालावधीत ९० दिवसांच्या आत अनुपालनाचा दर ४० टक्क्यांवरून ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या सुधारणांचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे तंत्रज्ञानाचा केवळ डिजिटायझेशनसाठीच नव्हे, तर एक कार्यप्रणाली म्हणून वापर करणे.
यामुळे अनेक सुधारणांचा मार्ग मोकळा झाला आहे, जसे की ई-एफआयआर (इलेक्ट्रॉनिक प्रथम माहिती अहवाल), झिरो-एफआयआर (जे अधिकारक्षेत्र आणि भाषेचे अडथळे ओलांडतात), ई-पुरावा (इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे संकलन आणि व्यवस्थापन), ई-समन्स (समन्स जारी करणे आणि पोहोचवणे), वैद्यकीय-कायदेशीर आणि शवविच्छेदन अहवाल, ई-फॉरेन्सिक्स, ई-कारागृह, ई-अभियोजन आणि न्यायालयीन कार्यवाहीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग. हे सर्व एका कागदविरहित आणि एकात्मिक परिसंस्थेचा भाग आहे, जिथे डिजिटल पद्धतीने प्रमाणित केलेल्या नोंदी आणि इलेक्ट्रॉनिक डेटाची देवाणघेवाण प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक बनवते. आंतरकार्यक्षम फौजदारी न्याय प्रणालीचा विस्तार हा एक महत्त्वाचा पैलू आहे. ही प्रणाली फौजदारी न्यायाचे पाच आधारस्तंभ-पोलीस, न्यायालये, तुरुंग, न्यायवैद्यकशास्त्र आणि अभियोजन यांना ‘एक डेटा, एक नोंद’ या दृष्टिकोनांतर्गत एका सामान्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकीकृत करते. पोलीस आणि न्यायालयांमध्ये प्रथम माहिती अहवाल (FIR) आणि आरोपपत्रांची जवळपास रिअल-टाइममध्ये होणाºया इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाणीमुळे कामाची पुनरावृत्ती कमी झाली आहे. शिवाय, डेटाच्या अचूकतेमुळे लक्षणीय सुधारणा शक्य झाल्या आहेत, ज्यामुळे वेळेवर न्यायालयीन कारवाई सुनिश्चित होते.
फौजदारी खटल्यांमध्ये समन्स बजावणे हा एक मोठा अडथळा राहिला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवणे शक्य झाले आहे. कोणत्याही न्याय प्रणालीला पुराव्याच्या गुणवत्तेमुळे बळकटी मिळते. भारतीय नागरी संरक्षण संहितेनुसार, सात वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक तज्ज्ञाचा पूर्ण सहभाग अनिवार्य आहे. देशभरात ७०० हून अधिक मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन तैनात करण्यात आल्या असून, ही संख्या सातत्याने वाढवली जाईल. वैज्ञानिक तपासाला प्रमाण मानणे आणि वेळेवर खटले चालवण्यासाठी पुराव्यांची गुणवत्ता सुधारणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील फॉरेन्सिक प्रकरणांच्या निपटाराचा दर जवळपास दुप्पट झाला आहे.
योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे मोठ्या सुधारणा अनेकदा अयशस्वी ठरतात. त्यामुळे हा उपक्रम केंद्र सरकार, राज्ये आणि न्यायव्यवस्थेच्या पाचही स्तंभांमधील समन्वयावर भर देतो. स्पष्टपणे, एक मजबूत कायदेशीर चौकट आता अस्तित्वात आहे, तांत्रिक साधने उपलब्ध आहेत आणि संस्थात्मक इच्छाशक्ती दिसून येत आहे. आता सातत्यपूर्ण वचनबद्धता, समन्वय आणि कृतीची नितांत गरज आहे. मूलभूत कृती आणि सामायिक उद्दिष्टाची भावना अत्यावश्यक असेल. जर या सुधारणा लागू केल्या गेल्या, तर नागरिकांसाठी त्याचे परिणाम केवळ कागदपत्रांची प्रक्रिया जलद करण्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर एक अशी न्यायव्यवस्था निर्माण होईल जी अधिक अंदाज करण्यायोग्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह असेल. स्थापित कार्यपद्धतींचे अनुकरणीय पालन, कायद्याची सातत्यपूर्ण आणि न्याय्य अंमलबजावणी आणि वेळेवर न्यायदान ही अशी मानके आहेत, जी नागरिकांच्या अपेक्षा आहेत आणि ती पूर्ण झालीच पाहिजेत.
वारीची पूर्वतयारी
२५ जुलैला आषाढी एकादशी आहे. अजून चार दिवसांनी देहू-आळंदी आणि महाराष्ट्रातून वारीला सुरुवात होईल. त्यानिमित्ताने आजपासून आपण संतकृपा या मालिकेतून वारी आणि वारकरी संतांच्या शिकवणुकीचा आस्वाद घेणार आहोत. ‘काय विठोबाचे नाम घेता कळे। पाप ते पळे पूर्वजन्मीचे।। असे संत नामदेवांनी म्हटले आहे. म्हणजे विठ्ठलाचे नाव घेताच पूर्वजन्मीची पापे आणि मनातील वाईट विचार पळून जातात. आजपासून आपल्या मनाची पंढरी करून या नामस्मरणाच्या प्रवासाला सुरुवात करूया. वारीचा प्रवास हा नामसंकीर्तनातून होत असतो. नाम घेता घेता आपणच विठ्ठलमय होऊन जातो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम असा हा वारीचा आणि वारकºयांचा प्रवास असतो. हा जो क्रम आहे तो फार महत्त्वाचा आहे. सगळ्यातून निवृत्त होण्याची जाणीव निवृत्तीनाथ देतात. निवृत्तीनंतर ज्ञान प्राप्ती होते. सगळ्या लोभ, माया, पाशांपासून निवृत्त झालो तरच ज्ञान प्राप्ती होते. त्यानंतर पुढच्या प्रवासाचा सोपान म्हणजे जीना. हा सोपान पार केल्यावर मुक्तीचे द्वार उघडते. मग उरतो तो एकनाथ. त्या नाथाला शरण गेल्यावर सगळे काही साध्य होते. ते साध्य करण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. नामस्मरणातून देवत्व प्राप्त होते हे सांगतो तो नामदेव. मग सगळे भेदाभेद गळून पडतात. तुझे माझे काही शिल्लक उरत नाही. तू का राम? मी का राम? असे काही शिल्लक राहात नाही. सगळे काही विठ्ठलमय आहे हे सांगतात ते तुकाराम. अशी ही परंपरा आहे. या परंपरेतून मनाची अवस्था अशी तयार करायची की, आत्मा-परमात्मा याची ओळख होईल. त्यातून आत्मज्ञान प्राप्त होईल. या आत्मज्ञानाचा सोहळा म्हणजे ही वारी. त्या वारीसाठी विविध संतांचे अभंग, कीर्तन, नामस्मरण, भारुडे, हरिपाठातील अभंग यांचा आधार घेत हा प्रवास सुरू होतो. त्याचे शाब्दिक दर्शन करणारी ही संतकृपा नावाची वारी आहे.
‘वारी’ म्हणजे केवळ चालणे नव्हे, तर ती आहे विठ्ठलभेटीची अनावर ओढ! दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाºया आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होणाºया भक्तांना ‘वारकरी’ म्हणतात. त्यामागे फार मोठा अर्थ आहे. वारीची परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत पंढरीची वारी करत असत, असा उल्लेख आढळतो. पुढे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर सर्व संतांनी या परंपरेला भक्तीचे आणि समतेचे मोठे स्वरूप दिले. वारीमध्ये कुठलाही उच्च-नीच भेदभाव नसतो. सगळे सारखे असतात. म्हणूनच एकमेकांच्या पाया पडतात. लहानमोठा असा विचार न करता एकमेकांच्या पाया पडण्याची प्रथा फक्त वारकरी संप्रदायात आहे. खांद्यावर पताका, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखात ‘ज्ञानबा-तुकाराम’चा गजर, हाच वारकºयाचा खरा दागिना! नवनाथी संप्रदायातून, दत्त संप्रदायातून जो भक्तिमार्ग दाखवला आहे, त्या भक्तीची पताका घेऊन जाणारा हा मार्ग आहे. त्या मार्गावरून जाणाºयाला आत्मज्ञान आणि आत्मभान साधता येते. रामकृष्ण हरि!
संतकृपा/प्रफुल्ल फडके
Thursday, July 2, 2026
मंत्रिमंडळ निवडीचे निकष कडक असावेत
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. असे मानले जाते की, येत्या काही दिवसांत मोदी सरकार आपल्या तिसºया कार्यकाळात पहिल्यांदाच फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्तार करू शकते. याचे एक कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन सदस्य, पंकज चौधरी आणि हर्ष मल्होत्रा हे अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. दुसरे कारण म्हणजे दोन मंत्री, रवनीत सिंग बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभा कार्यकाळ संपणे. यांपैकी कुरियन यांनी आपला राजीनामा सादर केला असून, तो स्वीकारण्यात आला आहे. रवनीत सिंग बिट्टू यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, परंतु आता ते आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करतील असे म्हटले आहे.
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आणि फेरबदलाचा एक संभाव्य आधार म्हणजे आम आदमी पक्षाचे (आप) सात राज्यसभा सदस्य भाजपमध्ये आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) सहा लोकसभा सदस्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे वजन वाढले आहे. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) २० लोकसभा सदस्यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंड करून नॅशनल सिटिझन्स पार्टी आॅफ इंडिया (एनसीपीआय) या अज्ञात पक्षात प्रवेश केल्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) वजनही वाढले आहे. हा पक्ष संख्याबळाच्या बाबतीत तेलगू देसम पार्टी (टीडीपी), शिवसेना (शिंदे) आणि जनता दल-यू (जेडीयू) यांना मागे टाकून एनडीएचा सर्वात मोठा घटक पक्ष बनला आहे.
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारामागे आणि फेरबदलामागे दिले जाणारे आणखी एक कारण म्हणजे, पुढील वर्षी सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळात या राज्यांचे प्रतिनिधित्व वाढवले जाऊ शकते. याशिवाय, गेल्या दोन वर्षांतील मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा अपेक्षित असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्ताराची चर्चाही होत आहे. या आढाव्याचा भाग म्हणून मंत्र्यांना पदोन्नती किंवा पदावनती दिली जाऊ शकते. असे होईल की नाही हे सांगणे कठीण आहे, परंतु शक्यता जास्त आहे कारण भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नबीन यांच्यावर त्यांची टीम तयार करण्याची जबाबदारीही आहे आणि याचाच एक भाग म्हणून, काही नेते संघटनेतून सरकारमध्ये आणि काही सरकारमधून संघटनेत जाऊ शकतात. मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसºया कार्यकाळात केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार झाले असल्याने, यावेळीही असे होण्याची शक्यता मानली जात आहे. भूतकाळात जेव्हा जेव्हा असे घडले आहे, तेव्हा काही केंद्रीय मंत्र्यांना अनपेक्षितपणे पदावरून दूर करण्यात आले आहे आणि काही अनपेक्षित चेहरे मोदी सरकारमध्ये सामील झाले आहेत, ज्यांची फार कमी लोकांनी अपेक्षा केली असेल.
आपल्या निर्णयांनी आश्चर्यचकित करणे हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे आणि असे निर्णय केवळ मंत्र्यांच्या निवडीपुरते मर्यादित नाहीत. हे मुख्यमंत्र्यांच्या निवडीमध्येही दिसून आले आहे. राजस्थानमधील पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा मुख्यमंत्री होतील, असे कोणाला वाटले नव्हते. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या बाबतीतही असेच घडले. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांसारखी अनेक पदे अशा लोकांकडून भरली गेली आहेत, जे कोणालाही फारसे माहिती आणि अपेक्षित नव्हते. जनतेच्या आणि अगदी राजकीय पंडितांच्याही अपेक्षांच्या पलीकडे जाऊन अनपेक्षित निर्णय घेणे, हे निश्चितच मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आश्चर्यकारक निर्णय हा एक परिपूर्ण मास्टरस्ट्रोक असतो.
हे खरे आहे की, कोणत्याही सरकारच्या प्रमुखाने आपल्या मंत्र्यांची निवड करताना सामाजिक आणि प्रादेशिक घटकांचा विचार केला पाहिजे. तथापि, गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, कारण सरकार केवळ आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावरच जनतेच्या अपेक्षा खºया अर्थाने पूर्ण करू शकते. जवळपास प्रत्येक सरकारच्या मंत्रिमंडळात काही व्यक्ती अशा असतात, ज्या केवळ सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणे संतुलित करण्याचे काम करतात. तथापि, जेव्हा योग्यता आणि कार्यक्षमतेला प्राधान्य दिले जात नाही, तेव्हा त्याचे परिणाम सरकार आणि जनता या दोघांनाही भोगावे लागतात. मोदी सरकारमधील सर्व मंत्र्यांनी ही कसोटी पार पाडली आहे, असा दावा करणे कोणालाही कठीण जाईल.
एका सक्षम सरकारने केवळ दर एक-दोन वर्षांनी नव्हे, तर आपल्या मंत्र्यांच्या आणि त्यांच्या मंत्रालयांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे मंत्र्यांवर विधानसभा निवडणुकांची जबाबदारी सोपवण्याचे कोणतेही समर्थन नाही. जर ते संस्थेसाठी योग्य असतील, तर त्यांना मंत्रिमंडळात नव्हे, तर संस्थेतच ठेवले पाहिजे. अलीकडे असा एक ट्रेंड झाला आहे की, जेव्हा जेव्हा विधानसभा निवडणुका होतात, तेव्हा महत्त्वाच्या केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक प्रभारी किंवा सह-प्रभारी म्हणूनही नियुक्त केले जाते. हे अलीकडील विधानसभा निवडणुकांमध्येही दिसून आले. केंद्रीय मंत्र्यांकडे इतके कमी काम आहे का की त्यांनी आपली मंत्रालये सोडून पक्षाला विधानसभा निवडणुका जिंकण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करावे? त्यामुळे मंत्रिमंडळ निवडतानाचे निकष हे थोडे कठीण असले पाहिजेत.
विजयाबाई : आधुनिक मराठी रंगभूमीच्या शिल्पकार
मराठी रंगभूमी आणि समांतर चित्रपटांच्या इतिहासात ज्या मोजक्या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाने एक सुवर्णकाळ निर्माण केला, त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे विजया मेहता. नाट्यवर्तुळात आदराने ‘बाई’ म्हणून ओळखल्या जाणाºया विजया मेहता या केवळ एक अभिनेत्री किंवा दिग्दर्शिका नव्हत्या, तर त्या आधुनिक मराठी प्रायोगिक रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाºया एक खºया मार्गदर्शक आणि चळवळ होत्या. बाई असे अनेकांना म्हटले जाते, पण आपल्याकडे शाळेत शिकवणाºया शिक्षिकेला आदराने बाई म्हणून संबोधले जाते. तशा त्या रंगभूमीवरच्या शिक्षिकाच असल्याने त्यांना बाई असे म्हटले जायचे.
विजया मेहता म्हणजे पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी बडोदा (गुजरात) येथे एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला होता. त्यांनी मुंबई विद्यापीठातून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध नाट्यगुरू इब्राहिम अल्काजी आणि मुंबईत आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर प्रशिक्षण घेतले.
१९६०चे दशक हे मराठी नाट्यसृष्टीला कलाटणी देणारे ठरले. विजया मेहता यांनी थोर नाटककार विजय तेंडुलकर, अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत मिळून ‘रंगायन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने मराठी नाट्यविश्वात एका नव्या विचारसरणीला जन्म दिला. संगीत रंगभूमीत अडकलेला आणि त्यानंतर सामाजिक, कौटुंबिक नाटकात अडकलेला प्रेक्षक त्यांनी वास्तवात आणला.
विजया बार्इंनी ‘बर्टोल्ट ब्रेख्त’ यांच्या ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’ या नाटकाचे चि. त्र्यं. खानोलकर यांनी अनुवादीत केलेले ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नावाने केलेले नाटक प्रचंड गाजले. तसेच आयनेस्कोचे ‘चेअर्स’ हे नाटक ‘खुर्च्या’ या नावाने मराठीत आणले. चिं. त्र्यं. खानोलकर लिखित ‘एक शून्य बाजीराव’, जयवंत दळवी यांचे ‘बॅरिस्टर’, अनिल बर्वे यांचे ‘हमिदाबाईची कोठी’, महेश एलकुंचवार यांचे ‘वाडा चिरेबंदी’ आणि विजय तेंडुलकर यांचे ‘श्रीमंत’ यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन करून त्यांनी मराठी प्रेक्षकांची अभिरुचीच बदलली. हमिदाबाईची कोठी या नाटकाने मराठी रंगभूमीला इतके महान कलाकार दिले की, त्यांनी या कर्तृत्वावर आपली कारकीर्द गाजवली. यामध्ये अशोक सराफ, नाना पाटेकर, भारती आचरेकर, नीना कुलकर्णी या दिग्गजांची नावे घ्यावी लागतील. वाडा चिरेबंदीचे चंद्रकांत कुलकर्णी यांनी अलीकडेच पुनरुज्जीवन केले होते. पण त्यावरही विजयाबार्इंची छाप होतीच. अभिनयातील सहजता आणि नैसर्गिक अभिनय कसा करायचा याचे त्या विद्यापीठ होत्या. प्रचंड निरीक्षणशक्ती आणि वास्तवात दिसणाºया घटकांचा चपखल वापर करून घेणे हे त्यांचे दिग्दर्शनातील वैशिष्ट्य होते. जयवंत दळवी यांच्याच संध्या छाया या नाटकातील माधव वाटवे आणि विजयाबार्इंची नाना नानी पाहणे हा एक सुखद अनुभव असायचा. त्यातील लोभस राग, मेथीची भाजी निवडता निवडता खोचक बोलणे इतके छान होते की, आपल्या जवळपासच हे नाटक घडते आहे असा भास निर्माण व्हायचा. हे नाटक अनेकांनी केले. वेगवेगळ्या संचात आले. पण विजयाबार्इंची नानी ही अफलातून होती.
विजया मेहता यांनी केवळ भारतापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवरही काम केले. त्यांनी प्रसिद्ध जर्मन दिग्दर्शक फ्रिट्झ बेनेव्हिट्झ यांच्यासोबत इंडो-जर्मन थिएटर प्रोजेक्ट अंतर्गत काम केले. ‘मुद्राराक्षस’ आणि ‘शाकुंतल’ यांसारख्या भारतीय अभिजात कलाकृतींचा जर्मन रंगभूमीवर आणि जर्मन कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी अप्रतिम आविष्कार घडवला.
श्याम बेनेगल यांच्या ‘कलियुग’ (१९८१) आणि गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ (१९८४) चित्रपटातील त्यांची ‘दमयंती राणे’ ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट मानली जाते. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘बॅरिस्टर’ (१९८६) आणि ‘पेस्तनजी’ (१९८८) हे चित्रपट भारतीय सिनेमातील मैलाचे दगड ठरले. ९०च्या दशकात त्यांनी दिग्दर्शित केलेली ‘लाइफलाइन’ ही मालिका वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर प्रकाश टाकणारी आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेली मालिका होती. प्रेक्षकांना नवी दृष्टी देणाºया या विजयाबार्इंचे निधन ही नाट्यसृष्टीची फार मोठी हानी आहे. त्यांच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या समृद्ध कारकिर्दीसाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. १९८७ला पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला होता. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवातील सहभाग आणि सांगलीचा मानाचा विष्णुदास भावे सुवर्ण पदक हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. संगीत नाटक अकादमीचा टागोर रत्न, महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता.
मराठी रंगभूमीला जागतिक ओळख करून देणाºया आणि कित्येक पिढ्यांमधील कलाकारांना अभिनयाचे धडे देणाºया या महान रंगकर्मीचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने आधुनिक मराठी रंगभूमीवरील एका सुवर्ण युगाचा अंत झाला, परंतु त्यांनी निर्माण केलेला वारसा आणि प्रायोगिकतेचा विचार येणाºया अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
- प्रफुल्ल फडके/श्रद्धांजली
Wednesday, July 1, 2026
भारत आणि फ्रान्स सहकार्याच्या नव्या युगात
फ्रान्सच्या अध्यक्षतेखालील या वर्षीची जी-७ शिखर परिषद अयशस्वी होण्याची अनेक कारणे होती. असंख्य संघर्ष, सागरी व्यापारी मार्गांमधील अडथळे, ऊर्जा संकट, महामारीचा प्रसार, जागतिक स्थूल आर्थिक असंतुलन, मदत वितरणातील अडथळे आणि विभागलेले जग यामुळे बरेच काही पणाला लागले होते. तरीही १५ ते १७ जून दरम्यान फ्रान्समधील एव्हियन येथे जे घडले, ती एकतेची एक दुर्मीळ संधी होती. नेत्यांमधील सहकार्यामुळे प्रमुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ठोस वचनबद्धता शक्य झाली.
हे यश केवळ जी- ७ सदस्य देशांमध्येच (कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स) नव्हे, तर प्रमुख जी- ७ प्लस भागीदार देशांसोबत विशेषत: भारत, तसेच ब्राझील, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबत झालेल्या घनिष्ठ समन्वयाचा परिणाम होता. युक्रेन, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांनाही नेत्यांच्या शिखर परिषदेत त्यांची मते मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या अद्वितीय जी-७ प्लस स्वरूपाद्वारे, फ्रान्सच्या अध्यक्षीय मंडळाने केवळ शिखर परिषदेतच नव्हे, तर शिखर परिषदेपूर्वीच्या तयारीच्या प्रक्रियेदरम्यानही भारत आणि त्याच्या भागीदार देशांचा अनुभव आणि दूरदृष्टी प्रथमच वापरण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि फ्रान्स यांचे जी- ७ सोबत दीर्घकाळचे संबंध आहेत. भारताचा जी-७ सोबतचा सहभाग २००३ मध्ये फ्रान्सच्या निमंत्रणावरून एव्हियन येथे सुरू झाला. यावर्षी शिखर परिषदेतील भारताचा १३ वा सहभाग होता आणि फ्रान्सने त्यांच्या मागील अध्यक्षपदाच्या काळात दिलेल्या निमंत्रणानंतर पंतप्रधान मोदींचा हा सलग सातवा सहभाग होता. यावर्षी जी-७ प्लसमध्ये भारताचे योगदान सर्वच आघाड्यांवर, विशेषत: आरोग्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाशी संबंधित जागतिक आव्हानांवर महत्त्वपूर्ण होते. जी-७ नेत्यांनी नऊ घोषणा एकमताने स्वीकारल्या आणि त्यापैकी बºयाच घोषणांना भागीदार देशांनी पाठिंबा दिला. हे मोठे सामायिक यश होते. युक्रेनची प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व, संरक्षण आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी जी-७ने दृढ एकता आणि दृढनिश्चय दर्शवला. आम्ही अलीकडच्या महिन्यांत रणांगणावर युक्रेनने दाखवलेल्या धैर्याची प्रशंसा केली आणि या आक्रमक युद्धावर न्याय्य व अंतिम तोडगा काढू शकणाºया नव्या गतीवर भर दिला.
फ्रान्स आणि भारताने अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचे स्वागत केले आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय किंवा टोलशिवाय होर्मुझमधून वाहतुकीच्या अधिकाराची पुष्टी केली. भारत आणि फ्रान्सने लेबनॉनमध्ये तत्काळ आणि भक्कम युद्धविरामासाठी जोरदार आवाहन केले, कारण ते अत्यंत महत्त्वाचे आहे. नेत्यांनी स्थूल आर्थिक असंतुलन दूर करण्यासाठी संतुलित, शाश्वत आणि भक्कम विकासाला पाठिंबा दिला. त्यांनी हे मान्य केले की, आर्थिक धोरणांमध्ये सहकार्य आणि समन्वय हे सर्वांच्या हिताचे आहे, ज्यामुळे निष्पक्ष स्पर्धा सुनिश्चित होते, उद्योग आणि नोकºयांचे संरक्षण होते, तसेच भविष्यातील व्यापार युद्धे आणि आर्थिक संकटे टाळता येतात. या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सर्वांच्या सहभागाची आवश्यकता असल्याने फ्रान्सच्या अध्यक्षीय प्रशासनाने चीनसोबतच्या रचनात्मक संबंधांना प्राधान्य दिले. जी-७ एव्हियन शिखर परिषदेपूर्वी चीनने विकासासाठी आयोजित केलेल्या एका अभूतपूर्व आभासी परिषदेत भाग घेतला, जी गेल्या २० वर्षांतील पहिलीच परिषद होती.
डिजिटल तंत्रज्ञान आणि एआयच्या बाबतीत इंडिया एआय इम्पॅक्ट समिटनंतर, जी-७ प्लस नेत्यांनी मुलांची आॅनलाइन सुरक्षा सुधारण्यासाठी एकमताने सहमती दर्शवली. एआय सुरक्षेच्या धोक्यांचा सामना करणाºया लोकशाही देशांमध्ये सामायिक मानके स्थापित करण्यासाठी सहकार्याकरिता एक समान व्यासपीठ तयार करण्याची उभय देशांची योजना आहे. जी-७ प्लस सदस्य भारताच्या सर्वम एआयसह सुरक्षित आणि फायदेशीर एआयच्या वापराला गती देण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांसोबत काम करतील. दोन्ही देशांचे आरोग्यविषयक मुद्द्यांवर व्यापक एकमत झाले. जी-७ नेते आणि भागीदार देशांनी इबोला विषाणूमुळे बाधित झालेल्यांना पाठिंब्याचा संदेश दिला आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांनुसार १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी देण्याचे वचन दिले. कर्करोगाचा सामना करण्यासंदर्भात जी-७ चे पहिले निवेदनही जारी करण्यात आले.
नेत्यांनी आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या गरजेवर, विशेषत: मानवी विकास आणि सर्वात असुरक्षित घटकांच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा जोर दिला. फ्रेंच विकास संस्थेद्वारे राबविण्यात येणारा ‘फायनान्स इन कॉमन’ हा उपक्रम या संदर्भात उपयुक्त भूमिका बजावेल. सर्व नेत्यांनी महत्त्वपूर्ण खनिजांसाठीच्या त्यांच्या मूल्य साखळ्या मजबूत करण्यास सहमती दर्शवली. या उद्देशासाठी एकूण १९५ ठोस सहकार्य प्रकल्प सुरू करण्यात आले, ज्यामध्ये ६४ अब्ज युरोची संयुक्त गुंतवणूक आहे. सुरक्षाविषयक मुद्द्यांवर आम्ही अनुक्रमे अमली पदार्थांची तस्करी आणि स्थलांतरितांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी एकत्र काम करण्याची आमची वचनबद्धता व्यक्त केली.
जी-७ चे अध्यक्षपद अद्याप संपलेले नाही. या विविध उपक्रमांना पुढे नेण्यासाठी २०२६ मध्ये अनेक मंत्रीस्तरीय आणि कार्यगट बैठका आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावेल. ब्रिक्सचे अध्यक्ष म्हणून भारत आणि जी-२०चे अध्यक्ष म्हणून अमेरिका, हे दोन्ही देश या आव्हानांवरील ठोस उपक्रमांना पुढे नेण्यात आणि जागतिक दरी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. हे अशा वेळी घडत आहे, जेव्हा सर्व बाजूंनी समन्वय आणि रचनात्मक सहभाग पूर्वीपेक्षा अधिक आवश्यक आहे.
मुलांशी संवाद साधण्याचे महत्त्व वाढले आहे
ब्रिटिश संसदेतील ग्रुमिंग गँग्सवरील अलीकडील चर्चेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. गेल्या दोन दशकांत ग्रुमिंग गँग्सशी संबंधित प्रकरणांमध्ये ब्रिटनमधील हजारो मुली आणि किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. गृहसचिवांनी संसदेत सांगितले की, गुन्हेगारांमध्ये पाकिस्तानी वंशाचे टॅक्सीचालक आणि व्यावसायिक यांचा समावेश होता. ब्रिटनमध्ये ग्रुमिंग गँग्सबद्दल सुरू असलेली चर्चा, त्याच वेळी संपूर्ण देशाला हादरवून टाकणाºया भारतातील एका काळ्या अध्यायाची आठवण करून द्यावी लागेल. ती म्हणजे १९९२ मध्ये, राजस्थानमधील अजमेर येथे ११ ते २० वयोगटातील १०० हून अधिक शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलचे प्रकरण उघडकीस आले होते. २०२४ मध्ये जयपूरमधील एका विशेष पॉक्सो न्यायालयाने नफीस चिश्ती, इक्बाल भाटी, सलीम चिश्ती, सय्यद जमीर हुसेन, नसीम उर्फ तर्जन आणि सुहेल घानी यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तथापि, २०२५ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांच्या काही शिक्षांना स्थगिती दिली आणि त्यांना जामीन मंजूर केला.
अशा घटना अनेकदा एका हळूहळू चालणाºया प्रक्रियेचा परिणाम असतात, ज्यात आधी विश्वास संपादन करणे, नंतर भावनिक जवळीक निर्माण करणे आणि अखेरीस केवळ व्यक्तीचे विचार आणि निर्णयच नव्हे, तर त्यांचे शरीर आणि स्वातंत्र्य यावरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पौगंडावस्था हा आयुष्यातील असा टप्पा आहे, जेव्हा व्यक्ती स्वत:ची ओळख शोधत असते. मानसशास्त्रज्ञ एरिक एरिकसन यांनी या टप्प्याला ओळख विरुद्ध भूमिका गोंधळ असे म्हटले आहे. या टप्प्यात किशोरवयीन मुले आपण कोण आहोत आणि इतरांच्या नजरेत आपली ओळख काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
या वयात स्वीकृती, मैत्री, आपलेपणा आणि भावनिक जवळीक यांची गरज स्वाभाविकपणे जास्त असते. त्यामुळे जर कोणी पद्धतशीरपणे एखाद्या किशोरवयीन मुलाचा विश्वास संपादन केला आणि त्याला विशेष असल्याची जाणीव करून दिली, तर त्याचा परिणाम अपेक्षेपेक्षा खूप जास्त खोलवर होऊ शकतो. अनेकदा किशोरवयीन मुलांना हे समजत नाही की, ज्याला ते प्रेम आणि आपुलकी समजतात, तो प्रत्यक्षात एक सुनियोजित सापळा असतो, ज्यात भावनिक जवळीकीचा वापर नियंत्रण आणि शोषणाचे साधन म्हणून केला जातो. जॉन बोल्बीच्या ‘अटॅचमेंट थिअरी’नुसार, प्रत्येक व्यक्तीला भावनिक सुरक्षितता आणि जवळीकीची गरज असते. जेव्हा ही गरज कुटुंब, मित्र-मैत्रिणींचा गट किंवा सामाजिक वातावरणात पुरेशा प्रमाणात पूर्ण होत नाही, तेव्हा ती व्यक्ती इतरत्र शोधू लागते.
जर प्रत्येक किशोरवयीन मुलाला भावनिक सुरक्षितता आणि जवळीकीची गरज असेल, तर प्रश्न असा आहे की, ती सर्वप्रथम कुठे पूर्ण केली पाहिजे? सामान्यत: याचे उत्तर कुटुंब हे आहे. कुटुंब ही केवळ आर्थिक किंवा भौतिक गरजा पूर्ण करणारी संस्था नाही; तर ते भावनिक सुरक्षितता, संवाद, विश्वास आणि जवळीक यांचा एक प्राथमिक स्रोत देखील आहे. जेव्हा कुटुंब आणि किशोरवयीन मुलांमधील संवाद कमकुवत होतो आणि किशोरवयीन मुले त्यांच्या भावना, भीती आणि अनुभव मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाहीत, तेव्हा भावनिक दुरावा निर्माण होऊ लागतो. अशा परिस्थितीत किशोरवयीन मुले अनेकदा त्यांच्या कुटुंबाबाहेर नातेसंबंध शोधतात, जिथे त्यांचे ऐकले जाते, त्यांना समजून घेतले जाते आणि त्यांना महत्त्व दिले जाते. म्हणूनच किशोरवयात कुटुंबाची भूमिका केवळ संरक्षणापुरती मर्यादित नसते; तर ती भावनिक संतुलन आणि आत्मविश्वासाचा पायादेखील बनते. प्रेम आणि आपुलकीची गरज ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. किशोरवयात, जेव्हा व्यक्ती स्वत:ची ओळख आणि सामाजिक स्वीकृती शोधत असतात, तेव्हा आपलेपणाची आणि आत्मसन्मानाची भावना अत्यंत महत्त्वाची ठरते.
समाज कितीही बदलला तरी आणि पालक त्यांच्या कामात कितीही व्यस्त असले तरी, त्यांच्या मुलांप्रति असलेली त्यांची जबाबदारी सर्वोच्च राहते. आज संयुक्त कुटुंबांपासून लहान कुटुंबांपर्यंत झालेली वाढ, वाढती स्पर्धा आणि संवादाच्या कमी झालेल्या संधींमुळे अनेक किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक एकटेपणाची भावना वाढली आहे. मुलांना केवळ संसाधनांचीच नव्हे, तर वेळ, संवाद, विश्वास आणि उपस्थितीचीही गरज असते. जेव्हा कुटुंबे आपल्या मुलांच्या भावनिक जगाशी जोडलेली असतात, तेव्हा अनेक संभाव्य धोके लवकर ओळखले आणि टाळले जाऊ शकतात.
ज्या समाजात कुटुंब, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये तुलनेने मजबूत असतात, तिथे अशा घटनांचा धोका तुलनेने कमी असतो. एक दक्ष देखरेख प्रणाली देखील आवश्यक आहे. याचा अर्थ तथाकथित ‘हेलिकॉप्टर पॅरेंटिंग’ किंवा मुलांच्या गोपनीयतेवर सतत अतिक्रमण करणे असा नाही. याचा साधा अर्थ असा आहे की, कुटुंबे, शाळा आणि समाजाने किशोरवयीन मुलामुलींच्या जीवनातील महत्त्वपूर्ण बदलांबाबत संवेदनशील आणि सतर्क असले पाहिजे. वर्तणूक, मित्र-मैत्रिणींचे गट, दैनंदिन दिनचर्या, भावनिक स्थिती किंवा डिजिटल क्रियाकलापांमध्ये कोणतेही असामान्य बदल लक्षात आल्यास, ते समजून घेण्यासाठी आणि त्वरित संवाद साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. किशोरवयीन मुलामुलींची सुरक्षितता ही कोणत्याही एका व्यक्तीची, संस्थेची किंवा कुटुंबाची जबाबदारी नाही; ही संपूर्ण समाजाची सामायिक जबाबदारी आहे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स