एक जनार्दनी समूळ हे जाले। विठ्ठल पाऊले देखियली।। असे संत एकनाथ आपल्या अभंगात म्हणतात. म्हणजे जेव्हा मनातील ‘मी’पणा नष्ट होतो, तेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये केवळ विठ्ठलाचीच पावले दिसू लागतात. हीच समतेची दृष्टी आहे. सर्वांमध्ये विठ्ठल दिसणे किंवा विठ्ठलात सर्वजण दिसणे यातून समतेचा भाव तयार होतो. सर्व जग हे विठ्ठलमय आहे, मग भेदभाव कसला? हाच विचार पंढरीच्या वारीत असतो. हा विचार मांडण्यासाठी हरिपाठाचे माध्यम वारीमध्ये सर्वमान्य असे आहे.
हरिपाठातील नवव्या अभंगात ज्ञानेश्वर म्हणतात की, विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान। रामकृष्णी मन नाही ज्याचे॥ १॥ उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा। रामकृष्णी पैठा कैसा होय॥ २॥ द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान। त्या कैंचे कीर्तन घडे नामी ॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान। नामपाठ मौन प्रपंचाचे॥ ४॥ याठिकाणी संत ज्ञानेश्वरांना म्हणायचे आहे की, विष्णूचे नामस्मरणावाचून इतर जप करणारा आणि रामकृष्णस्वरूपी ज्याचे मन नाही त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्माला येऊन द्वैतभावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यास माहीत नाही तो हतभागी होय. त्याची वस्ती रामकृष्णस्वरूपी कशी होईल? म्हणजे रामकृष्णस्वरूपी ऐक्याला तो कसा पावेल? ज्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानाने अहं (मी) इदं (हे) वृत्तिरूपी द्वैताची उत्पत्ती झाली, त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाच्या ज्ञानानेच होणार आहे. ते ज्ञान देणारे गुरू आहेत. गुरूवाचून ते कधीही मिळणार नाही; व ज्या साधकाला ते मिळाले नाही, त्याला नामी जो परमात्मा, त्याचे अभेदभजन घडत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, मला हरिच्या सगुण साकार स्वरूपाचेच ध्यान आहे आणि त्याच्याच नामाची मी सतत आवृत्ती करीत असून, प्रापंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतले आहे.
प्रापंचिक मौन म्हणजे जे स्वत:पुरते आहे, त्यापासून लांब आहे. सर्वसमावेशक आहे, सर्वांना सारखेपणाचा न्याय देणारे आहे तेच फक्त स्वीकारले जाते आहे. येथे समता आणि समरसतेचा भाव तयार करणारी बैठक तयार होते. म्हणूनच महाराष्ट्रातील विविध संतांना समता आणि समरसतेची मांडणी कशी केली याचे गुणगान गात आपली वारी पुढे सरकत असते. यामध्ये संत एकनाथांच्याही कथा समजून घेणे आवश्यक आहे. एकनाथ महाराजांच्या घरी त्यांच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्याकाळी श्राद्धाचे जेवण आधी केवळ उच्चवर्णीय ब्राह्मणांना देण्याची प्रथा होती. जेवणाची तयारी सुरू असतानाच, महाराजांच्या घराबाहेरून काही भुकेलेले अस्पृश्य लोक चालले होते. अन्नाचा सुवास आल्यामुळे ते आपापसात बोलत होते की, किती छान वास आहे, पण आपल्याला हे अन्न कुठले मिळणार? हे शब्द एकनाथ महाराजांच्या कानावर पडले. त्यांनी विचार केला की, ‘श्राद्धाचा मुख्य उद्देश भुकेल्या तृप्त आत्म्यांना जेवू घालणे हा आहे.’ त्यांनी ब्राह्मणांची वाट न पाहता, त्या सर्व भुकेल्या बांधवांना घरात बोलावले आणि आदराने श्राद्धाचे अन्न वाढले. या क्रांतिकारी पावलामुळे त्यांना तत्कालीन समाजाने वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला, पण एकनाथांनी आपल्या समतेच्या आणि करुणेच्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. हाच विचार आपल्याला वारकरी संप्रदायात दिसून येतो. म्हणून समतेची शिकवण देणाºया संतांची मांदियाळी येथे पाहायला मिळते. त्यात संत एकनाथांचे स्थान वेगळेच आहे.
प्रफुल्ल फडके/संतकृपा
No comments:
Post a Comment