दासबोधातील पाचवा दशक हा मंत्रांचा दशक म्हणून ओळखला जातो. यातील तिसºया समासात शिष्यलक्षणांचे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेले आहे. समासाच्या आरंभी श्री समर्थांनी परमार्थ जीवनामधील एक अति महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य दोघे एकाच संबंधाची दोन टोके आहेत. सत् म्हणजे चांगले, खरे, योग्य किंवा सुंदर. ज्याप्रमाणे गुरू सत्गुरू पाहिजे त्याप्रमाणे शिष्यसुद्धा सत्शिष्य पाहिजे. अशी जोडी खरोखर भाग्याने जमते. ती जमली की मग परमार्थाला पूर येतो. श्री एकनाथांना जनार्दनस्वामींना पाहिल्यावर आपण धन्य झालो असे वाटले. तर श्री समर्थांना कल्याणस्वामींना पाहिल्यावर आपल्या परमार्थाचे सार्थक झाले असे वाटले. बहुधा सद्गुरूपेक्षा सत्शिष्य मिळणेच दुर्लभ होऊन बसते ही अध्यात्मजीवनातील शोकांतिका आहे.
मागील समासात सद्गुरूचे लक्षण समर्थांनी स्पष्टपणे वर्णन केले. आता सत्शिष्याची ओळख सांगतो असे समर्थ इथे म्हणतात. ती लक्ष देऊन ऐकावी असे समर्थ म्हणतात. सत्शिष्याला सद्गुरू भेटला नाही तर तो संपूर्ण वाया जातो. सद्गुरूला सत्शिष्य भेटला नाही तर सद्गुरूला मोठे श्रम होतात. शिष्याला सत्शिष्य बनविण्याचे फार कष्ट सद्गुरूला करावे लागतात.
या ठिकाणी समर्थ भूमीचा अति सार्थ दृष्टांत देऊन हे समजावतात. समजा उत्तम जमीन आहे. तिच्यातील खडे-गोटे-तण काढून ती छान साफ केली. पण तिच्यात किडके बी पेरले किंवा बी अगदी उत्तम आहे. पण ते खडकाळ जमिनीत पेरले. या दोन्ही ठिकाणी बरे पीक येत नाही. त्याप्रमाणे सत्शिष्य ही उत्तम शुद्ध भूमी आहे. त्याला हलके मंत्रतंत्र सांगणारा गुरू भेटला तर प्रपंच न परमार्थ अशी अवस्था होऊन हाती काहीच लागत नाही.
किंवा सद्गुरू हा उत्तम बीजासारखा आहे. सद्गुरू पूर्ण कृपा करणारा आहे. खरा ब्रह्मज्ञानी आहे व अत्यंत कृपाळू आहे. परंतु त्याला शिष्य जर अनधिकारी, अपात्र, परमार्थाला नालायक भेटला तर सद्गुरूला फुकट श्रम होतात. एखाद्या भाग्यवान बापाचा दरिद्री मुलगा असावा तशी अवस्था होते. या कारणाने सद्गुरू, सत्शिष्य यापैकी एक असून दुसरा नसेल तर सगळे फुकट जाते. परमार्थ साधल्याने होणारे सार्थक दूर राहते. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी जेथे जमते तेथे सद्गुरूला सायास न पडता शिष्य तयार होतो. दोघांची हौस एकदमच पुरली जाते. आपले ज्ञान घेणारा भेटला म्हणून सद्गुरूंना समाधान तर आपल्याला ज्ञान देणारा भेटला म्हणून सत्शिष्याला समाधान लाभते.
यानंतर या समासात समर्थ रामदास स्वामी शेताचा दृष्टांत आणखी वाढवून परमार्थ जीवनाची अंगे स्पष्ट करतात. समर्थ म्हणतात, जमीन उत्तम आहे. बीही उत्तम आहे. पण पाऊस पडला नाही तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे सद्गुरू आहे. त्याला कोणी सत्शिष्य भेटला आहे. पण दोघांमध्ये आत्मज्ञानाबद्दल सुखसंवाद नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही. शेतामध्ये बी पेरले. ते चांगले उगवले. पण त्याची निगा राखली नाही. त्याच्यावर देखरेख ठेवली नाही तर ते फुकट जाते. त्याप्रमाणे सद्गुरूने सतशिष्याला उत्तम बोध केला, शिष्याच्या अंत:करणात तो ठसला व शिष्याची थोडी प्रगती झाली. पण साधक जर मनापासून साधनेला चिकटून राहिला नाही तर झालेली प्रगती खुंटते. जोपर्यंत शेतातील पीक आपल्या घरी येऊन पडत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इतकेच नव्हे तर पीक घरी येऊनसुद्धा स्वस्थ राहू नये.
समर्थ इथे म्हणतात, एक वेळा अगदी पोटभर जेवण झाले तरी पुन्हा भूक लागली की, जेवण्याकरिता जवळ सामग्री ठेवावीच लागते. त्याप्रमाणे सद्गुरूने सांगितलेली साधना करून आत्मज्ञान प्राप्त झाले तरी साधकाने स्वस्थ राहू नये. अविद्येचा अंमल चालून ज्ञान मंद होण्याचा संभव असतो. म्हणून साधकाने ज्ञानप्राप्तीनंतरही आपले साधन तसेच चालू ठेवावे. परमार्थसाधना एक समग्र जीवनपद्धती आहे. सत्संग, सत्कर्म व स्वधर्म हे तिचे बहिरंग तर साधना, सद्वासना व सदुपासना हे तिचे अंतरंग आहेत. ही दोन्ही अंगे जेथे विकास पावतात. तेथे आत्मज्ञान विलास करते. म्हणून साधना, अभ्यास, सद्गुरू, सत्शिष्य, सत्शास्त्रविचार, सत्कर्मचरण, सद्वासना, सद्उपासना, सत्क्रिया, स्वधर्मचरण, सत्संग आणि नित्य नेम या सगळ्या गोष्टी सातत्याने एकत्र राहिल्या तरच निर्मळ आत्मज्ञान उदय पावते आणि सत्शिष्य संसारातून पार पडतो. नाहीतर जनसमूहात पाखंडीपणाचा जोराने प्रसार होतो.
समर्थ म्हणतात, सद्गुरूवर मोठी जबाबदारी असते. याबाबतीत शिष्याला दोष देता येत नाही. कारण शिष्याला तयार करण्याची सगळी जबाबदारी सद्गुरूवर असते. अनेक प्रकारचे प्रयत्न करून सद्गुरू शिष्याचे अवगुण पालटू शकतो. एखादा शिष्य चांगला नसेल तर त्याचे अवगुण सद्गुरू पालटू शकतो. परंतु चांगला शिष्य किंवा सत्शिष्य वाईट गुरूचे अवगुण पालटून त्याला चांगला करू शकत नाही. याचे कारण असे की, गुरूला मोठेपणाचा अभिमान असतो. मोठेपणा जाईल म्हणून तो शिष्याकडून मार्गदर्शन करून घेत नाही. यासाठी सद्गुरू असला पाहिजे तरच शिष्याला उत्तम मार्गदर्शन लाभते. सद्गुरू नसेल तर शिष्य पाखंड मताच्या अधीन होतो. तात्पर्य येथे म्हणजे गुरूशिष्य संबंधांमध्ये सद्गुरूच मुख्य कारण आहे, तोच शिष्याला पुढे नेतो किंवा मागे खेचतो. बाकी गोष्टींना इतके महत्त्व नाही हे जरी खरे तरी सत्शिष्याची लक्षणे सांगतो, असे म्हणून समर्थ पुढे सत्शिष्याची लक्षणे सांगतात.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment