समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील चौथ्या समासात उपदेश लक्षणे सांगितली आहेत. समर्थ येथे म्हणतात की, आता उपदेशाची लक्षणे ऐका. ती नाना तºहेची आहेत. ती कोणकोणती आहेत हे जर सांगू म्हटले तर ती असंख्य आहेत. परंतु कल्पना येण्यासाठी त्यांपैकी थोडी सांगतो. समर्थ म्हणतात की, पुष्कळ गुरू मंत्राचा उपदेश करतात. ते मंत्र कोणते त्यांची यादी येथे दिली आहे. उपदेश देणारे गुरू पुष्कळ प्रकारच्या मंत्राचा उपदेश देतात. उदा. कोणी फक्त नामस्मरणच सांगतात तर कोणी शिष्यांकडून ओंकाराचा जप करवितात. कोणी शिवमंत्र, भवानीमंत्र, विष्णुमंत्र, महालक्ष्मीमंत्र, अवधूतमंत्र, गणेशमंत्र किंवा मार्तंडमंत्र सांगतात. कोणी मच्छकूर्मवराहमंत्र, नृसिंहमंत्र, वामनमंत्र, भार्गवमंत्र, रघुनाथमंत्र किंवा कृष्णमंत्र सांगतात. कोणी भैरवमंत्र, मल्हारीमंत्र, हनुमंतमंत्र, याक्षिणीमंत्र, नारायणमंत्र, पांडुरंगमंत्र किंवा अघोरमंत्र सांगतात. कोणी शेषमंत्र, गरुडमंत्र, पिशाच्चमंत्र, वेताळमंत्र, झोटिंगमंत्र असे नाना प्रकारचे मंत्र सांगतात, त्याचे किती वर्णन करावे! कोणी बाळामंत्र, बगुलामंत्र, कालीमंत्र, कंकालीमंत्र, बटुकमंत्र सांगतात. त्याबरोबरच निरनिराळ्या शक्तींची यंत्रेदेखील शिकवितात. जितके देव आहेत तितके मंत्र आहेत. सगळे वेगवेगळे व स्वतंत्र आहेत. त्यात काही विचित्र असतात. काही भयंकर बीजांचे मंत्र असतात. त्यांचा संबंध भुताखेतांशी असतो. खरोखर पाहिले तर पृथ्वीवरील देवांची गणना कोणी करू शकत नाही आणि जितके देव तितके मंत्र आहेत. म्हणून वाणीने ते सगळे सांगणे अशक्य आहे. मंत्रमला असंख्यात आहेत. शिवाय त्या एकाहून एक सामर्थ्यसंपन्न आहेत. हा सगळा मायेचा खेळ आहे. मायेची विचित्र कला माणसाला कळणे शक्य नाही.
काही मंत्रांनी भुते जातात, कित्येक मंत्रांनी रोग बरे होतात, कित्येक मंत्रांनी थंडीताप बरा होतो, तर कित्येक मंत्रांनी विंचू, साप, यांचे विष उतरते. असे नाना प्रकारचे मंत्र आहेत. गुरू ते मंत्र शिष्याच्या कानात सांगतात. त्याबरोबरच जप, ध्यान, पूजा व यंत्र यांच्याबद्दल शास्त्रोक्त माहिती पण सांगून ठेवतात. अर्थात मंत्राचे सुद्धा एक शास्त्र आहे. मंत्रांचा उपयोग करून व्यवहारातील शुभाशुभ वासना तृप्त करण्यासाठी उपयोगात आणला जातो. आणि शेकडा नव्याण्णव मंत्रवादी स्वार्थापायी मंत्र वापरतात असे आढळते. काही गुरू भगवंताच्या निरनिराळ्या नामांचा जप सांगतात. त्याला सुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी अवश्य असते.
समर्थ म्हणतात की, कोणी शिव शिव म्हणण्यास सांगतात, कोणी हरि हरि म्हणायला लावतात, तर कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणावे असा उपदेश देतात. कोणी कृष्ण कृष्ण, कोणी विष्णु तर कोणी नारायण नारायण म्हणावे असा उपदेश देतात. कोणी अच्युत, कोणी अनंत तर कोणी दत्त दत्त म्हणत जावे असे सांगतात. कोणी राम राम तर कोणी ओम ओम म्हणावे असे सांगतात. कोणी सांगतात की, भगवंताचे अनेक नामानी स्मरण करावे. कोणी गुरू गुरू तर कोणी परमेश्वर म्हणण्यास सांगतात. कोणी सांगतात की, विघ्नहर्त्या गणपतीचे चिंतन करीत जावे. कोणी श्यामराज, कोणी गरुडध्वज तर कोणी अधोक्षज म्हणत जावे असे सांगतात. कोणी विश्वनाथ तर कोणी मल्लारी म्हणायला सांगतात. कोणी तुकाई तुकाई म्हणून जप करवून घेतात. भगवंताची नावे घेण्याचा हा प्रकार किती सांगायचा! शिवशक्तीची नावे अनंत आहेत. ज्याला जे नाव स्वाभाविकपणे आवडते त्याचा उपदेश तो शिष्याला करतो.
समर्थ म्हणतात की, परमार्थसाधना करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये अनेक अनुभव येतात. ज्याला जे साधन साधते किंवा पचनी पडते ते तो आपल्या शिष्याना सांगतो. तसेच साधना करताना मन व देहदेखील सूक्ष्म बनतात. त्यामुळे काही अतिंद्रिय अनुभव येतात. ज्याला असे नाद व प्रकाश यांचे अनुभव येतात तेच तो आपल्या शिष्यांना सांगतो. परमार्थाच्या वाटेवर हे सगळे काही आहे. परंतु त्या सगळ्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवीच हवी. नाहीतर तोच येवढा परमार्थ आहे, अशी शिष्याची भुलावणी होते. म्हणून आत्मज्ञानावाचून इतर सर्व गोष्टी व्यर्थ समजाव्या असे श्री समर्थ निक्षून सांगतात.
समर्थ म्हणतात की, खेचरी, भूचरी, चाचरी व अगोचरी या चार मुद्रा कराव्या असे कोणी सांगतो तर निरनिराळी आसने करावी असे कोणी सांगतो. कोणी तांबडा, पांढरा, काळा किंवा निळा अतिंद्रिय प्रकाश दाखवितात तर कोणी अनाहत नावाचा अतिंद्रिय नाद ऐकवितात. आघाताशिवाय होणारे व आत ऐकू येणारे हे नाद वेणुनाद, पैंजणनाद, घुंगरूनाद, मृदंगनाद, मेघनाद असे अनेक प्रकारचे असतात. एखाद्या गुरूला शरीररचनेचे संपूर्ण ज्ञान असते व तो तेच शिष्यांना सांगतो. कोणी कर्ममार्ग, कोणी उपासनामार्ग, तर कोणी आठ पायºयांचा पातंजल योग सांगतो व शरीरांतील सहा चक्रांचे भेदन उपदेशितो.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment