समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील तिसºया समासात शिष्याची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यावर आपण सविस्तर चर्चा करत आहोत. कारण हा समास अत्यंत महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात की, राजहंसांच्या समुदायामध्ये एक डोमकावळा शिरला. त्याचे लक्ष सगळे विष्ठेच्या गोळ्यावर आणि तो स्वत:ला हंस म्हणवू लागला. त्याचप्रमाणे संतांच्या संगतीत राहून इंद्रियदास स्वत:ला संत म्हणवून घेतात. परंतु त्याचे सगळे लक्ष इंद्रियभोगरूपी घाणीमध्ये गुंतलेले असते. बायकोला बगलेत घेऊन ‘मला संन्यास द्या’ असे जर कोणी म्हणाला तर ते जसे अर्थहीन असते, तसे इंद्रियासक्त माणूस अव्हाच्या सवा ज्ञान बडबडतो.
असो, अशा पढतमूर्खांना भगवंताशी एकरूप होण्याचे सुख कळणे शक्य नसते. घाणीतील किड्यांना घाणीमध्येच मोठा आनंद वाटतो. ते अगदी स्वेच्छेने घाणीत रमतात. वेश्येची सेवा करणारा माणूस राज्यशकट हाकणाºया राजाचा प्रधान होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जो इंद्रियांचा गुलाम आहे तो उत्तम भगवदभक्त कसा होऊ शकेल?
त्याचप्रमाणे जे लोक इंद्रियसुखांपुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे कसे शक्य आहे? ते नुसता वाचाळपणा करतात, नुसते शाब्दिक ज्ञान बदबून जगात मिरवतात. असे जे शिष्य असतात ते अतिशय वाया गेलेले, हलक्यांतील हलके, हीन, अविवेकी, दुष्ट, दुर्जन, खळ आणि खोटे असतात.
येथे प्रश्न असा येतो की, या अशा शिष्यांची वाट काय? यांना सतशिष्य बनण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही? अशा शिष्यांना तरण्याचा उपाय आहे. पश्चाताप होऊन जर ते सद्गुरूला पुन्हा शरण गेले तर सद्गुरूच्या कृपबळाने त्यांच्यामध्ये पालट होतो असे समर्थ म्हणतात. स्वामी सांगतात की, असे जे पापमय शिष्य असतात, फार दिवस दोषरूप जीवन जगल्याने ज्याचे दोष अतिशय घट्टपणे मनात बसलेले असतात, त्यांना जर खरा पश्चाताप झाला तर तेच प्रायश्चित्त होते. अनुतापाच्या आगीने त्यांचे दोषरूपी मळ जळून जातात आणि अंत:करण निर्मल होऊन जाते. त्यांनी सद्गुरूंना पुन्हा शरण जावे, त्यांना प्रसन्न करावे, त्यांची कृपा संपादन करावी आणि शुद्ध होऊन जावे. ज्याच्याकडून गुरूद्रोह घडतो म्हणजे गुरूचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो, तो कायमचा नरकात पडतो. सद्गुरूंना प्रसन्न करण्याखेरीज द्रोहाचा परिणाम टाळण्यास दुसरा उपाय नाही.
पूर्वी हातून घडलेल्या चुकांचा पश्चाताप झाला, सद्गुरूला पुन: शरण गेला आणि त्यांना प्रसन्न करून कृपा करून घेतली की, सतशिष्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. येथेपर्यंत बरेच शिष्य मजल मारतात. पण पुढे सद्गुरूंना चिकटून राहून त्यांनी सांगितलेली साधना करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्याच शिष्यांच्या ठिकाणी आढळते. त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती स्मशानवैराग्याप्रमाणे तात्पुरती ठरतात. शिष्य वाया जातो, त्याला परमार्थ साधत नाही.
समर्थ म्हणतात की, एखाद्या शिष्याला खरा पश्चाताप होतो आणि तो सद्गुरूपुढे लोटांगण घालतो. पण त्याची ती मनाची स्थिती स्मशानवैराग्याप्रमाणे फार वेळ टिकत नाही. अर्थात अशा तात्पुरत्या शरणागतीने त्याला आत्मज्ञान होत नाही. अगदी थोडा वेळ टिकणारी भावना आणून सद्गुरूकडून मंत्र घेतला. त्या मंत्रापुरते तात्पुरते शिष्यत्व पत्करलेले अशा रितीने पुष्कळ गुरू केले तरी परमार्थ साधणार नाही. अशा शिष्याला लोकात थाट करायला शब्दज्ञान पुष्कळ येते, तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्टतर्कवादी बनतो. परमार्थाचे सोंग करण्यापायी घटकेत तो देवाचे प्रेम आल्याचे दाखवून रडतो, घटकेत अंगी वैराग्य संचरलेले दाखवितो, तर घटकेत आपण मोठे ज्ञानी आहोत असा अहंकारीपणा व्यक्त करतो. घटकेत अत्यंत श्रद्धावान दिसतो तर लगेच दुसºया घटकेला अविश्वासाने उलटून तंटा करायला तयार होतो. अशी वेड लागलेल्या माणसासारखी अनेक सोंगे तो करतो.
काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटवृत्ती, तिरस्कार असे अनेक दुष्ट विकार त्याच्या हृदयात भरपूर प्रमाणात आढळतात. अहंकार, देहसुखाची आवड, अनाचार, इंद्रियभोगाची लालसा, संसाराचे प्रेम आणि प्रपंचाचा कंटाळा या सगळ्या गोष्टी त्याच्या अंत:करणात वास करतात. तो काम करण्यात दिरंगाई करतो, तो कृतघ्न, पापी, कुकर्मी म्हणजे भ्रष्ट कर्मे करणारा, भलतेच तर्क करणारा आणि प्रत्येक गोष्टीत संशय काढणारा असतो. तसाच तो अभक्त म्हणजे भक्तिहीन, भावहीन, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातकी, हृदयशून्य म्हणजे दुसºयाच्या सुखदु:खाची जाणीव नसणारा, आळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीर, अविचारी आणि संशयाला घट्ट चिकटून राहणारा असा असतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वाईट वृत्ती, वाईट वासना, कोती किंवा हलकी बुद्धी आणि इंद्रियसुखाची इच्छा, या सगळ्या परमार्थाला घातक असणाºया गोष्टी त्याच्या मनामध्ये वास करतात. त्याला भारी हाव असते. तो मस्तराने भरलेला असतो. तिरस्कारापायी तो दुसºयाची निंदा अगदी मनापासून करतो. ज्ञानाच्या व देहाच्या अभिमानाने तो उर्मटपणे वागतो. हे वर्णन केलेले देहबुद्धीचे सगळे दुर्गुण नालायक शिष्याच्या ठिकाणी आढळतात, असे समर्थ या समासात सांगतात.
परमार्थ साधण्यास अयोग्य असणाºया प्रापंचिकाचे वर्णन यापुढे दिले आहे. हे सगळे सुटल्यावाचून परमार्थ हाती लागत नाही असे स्पष्टपणे दाखविण्याचा हेतू आहे. समर्थ म्हणतात की, ज्याला आपली तहान व भूक आवरत नाही, झोप आलेली आवरत नाही, ज्याच्या मनातील मुलाबाळांची व बायकोची चिंता कमीच होत नाही आणि जो भ्रमाने व्यापलेला आहे अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही. जो भरमसाठ शब्दज्ञान बोलतो पण ज्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो, ज्याच्या अंगी अनुताप नाही व धारिष्ट नाही आणि जो साधनाचा मार्ग धरीत नाही त्याला भगवंत जोडत नाही.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment