समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील दुसºया समासात गुरुलक्षणे सांगितलेली आहेत. ती आपण सविस्तर पाहात आहोत. समर्थ इथे म्हणतात, काही वेळा असे दिसते की, एखादा माणूस अद्वैत वेदांत सांगण्यामध्ये अचंबा वाटण्यासारखे वक्तेपण गाजवितो. पण त्याचे मन इंद्रियसुखाला लालचावलेले असते. अशा माणसाला गुरू केल्याने आपले सार्थक होणार नाही. वेदांत उत्तम रीतीने सांगणे ही बुद्धीची करामत आहे. वेदांत उत्तम रीतीने जगणे ही परमार्थाची गुरुकिल्ली आहे. दोन्ही एके ठिकाणी असले तर उत्तमच, पण परमार्थाला पहिले नसले तरी चालते. दुसरे मात्र हवेच हवे.
समर्थ पुढे म्हणतात, उत्तम वक्त्याची कला अशी की, जसा प्रसंग तसा रंग त्याच्या निरुपणाला चढतो. प्रसंगाला अनुरूप अशा कल्पना त्याच्या मनात आपोआप येतात. परंतु देहबुद्धीचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मबुद्धीचा जय झालेला नसतो. स्वस्वरूपाबद्दल त्याला निश्चयात्मक ज्ञान नसते. आत्मसाक्षात्कार होऊन स्वस्वरूपाबद्दल जे संपूर्ण संशयरहित ज्ञान होते त्यास श्री समर्थ निश्वय असा शब्द वापरतात. पुष्कळ वेळा असे होते की, निरुपणामध्ये वक्ता आत्मज्ञानाचे सामर्थ्य सांगतो, त्याने प्राप्त होणाºया सिद्धीचे वर्णन करतो. ते निरुपण ऐकून श्रोत्यांच्या मनात भलत्याच कल्पना येऊ लागतात. चमत्कारांचे वर्णन ऐकून त्यांची बुद्धी आत्मज्ञानापासून ढळू लागते. ती हेलकावे खाऊ लागते. आत्मज्ञानी पुरुषाच्या हातून चमत्कार घडतात हे खरे. परंतु तो त्याच्या ज्ञानाचा एक गौण परिणाम असतो. निरुपणामध्ये त्यांच्यावर भर दिला तर श्रोते चमत्कारानेच आकर्षिले जातात. मग जो चमत्कार करतो तो साधू असे चुकीचे समीकरण धरून बसतात. आत्मज्ञानाबद्दल लागणारी बुद्धीची स्थिरता त्यांच्यापाशी राहात नाही.
इथे समर्थ सांगतात की, साधकाच्या मनात असा विचार येतो की, पूर्वी मोठे ज्ञाते, विरक्त आणि भक्त होऊन गेले. त्यांची योग्यता भगवंतांच्या बरोबरीने होती. सिद्धिवश झाल्याने त्यांच्या अंगी मोठे अद्भुत सामर्थ्य होते. त्यांच्या अंगी असे विलक्षण सामर्थ्य होते ते आपल्यापाशी नाही. म्हणून आपले हे नुसते ज्ञान व्यर्थ आहे. अशा प्रकारचा सामर्थ्यप्राप्तीचा स्वार्थी विचार साधकाच्या मनात दृढ होऊन राहतो. हा आत्मज्ञानाला मारक असतो. कारण त्याने देहबुद्धीचे पोषण होते. ज्ञानाची निष्ठा कमी होऊन दुराशाच बळावते. दृश्यामधून सुख घेण्याची वासना जेव्हा समूळ नाहीशी होते तेव्हाच भगवंतांची भेट होते. अशी वासना बाळगणारे शब्दज्ञानी लोक कामनेच्या अधीन असतात, एकंदर चांगले नसतात. त्यांच्या सांगण्याने लोकांमध्ये परमार्थाबद्दल खोट्या कल्पना प्रसार पावतात. म्हणून श्री समर्थ त्यांना वोखटे असे नरम निंदायुक्त विशेषण लावतात.
या समासात स्वामी पुढे सांगतात, कोणत्या तरी वासनेने वेडी झालेली अनेक शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधता फुकट गेली. आपली इच्छा तृप्त व्हावी म्हणून धडपडणारे ते मूर्ख बिचारे काही न कमविता मरुन गेले. ज्याला कशाचीही यत्किंचित वासना नाही असा संत विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचे मत वेगळेच असते. तो नेहमी अक्षय भगवंतांबद्दलच बोलतो. संताची ही एक मोठी खूण आहे. त्याला केव्हाही पाहा, कोठेही पाहा, कशाही परिस्थितीत पाहा, कोणत्याही अवस्थेत पाहा, एका भगवंतावाचून, शाश्वत ईश्वरावाचून तो काही बोलणार नाही, सांगणार नाही, मनात आणणार नाही. मला अमुक हवे असे त्याच्या तोंडून कधी निघणार नाही. अर्थात, असा पुरुष क्वचितच भेटतो.
समर्थ म्हणतात, खरोखर पाहिले तर भगवंत हा सर्वांचा कधी नाहीसा न होणारा असा कायमचा ठेवा आहे. परंतु देहातून सुख घेण्याची लालसा काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे भगवंतांचा मार्ग बरोबर सापडत नाही. दृश्यामध्ये माझे सुख मला सापडेल ही कल्पना जोपर्यंत घट्ट आहे तोपर्यंत अदृश्य भगवंतापाशी सुखाचा शोध माणूस करीत नाही. आणि हे उमजण्यास सद्गुरूखेरीज अन्य उपाय नाही. समजा एखाद्याने काही साधना केली व त्याला सिद्धी प्राप्त झाल्या. त्यामुळे त्याचे सामर्थ्य वाढेल यात शंका नाही. परंतु त्या सामर्थ्याने त्याच्या देहास महत्त्व येते. देहाला महत्त्व आल्याकारणाने त्याच्या देहबुद्धीचे झुंबाड वाढते. मी देहच आहे हा भ्रम भगवंतांच्या आड येतो. तो नाहीसा करण्यासाठी सारी साधने असतात. पण साधनाने तो भ्रम जर अधिक घट्ट झाला तर मग परमार्थदृष्टा मिळविले काय? चांगल्यापैकी साधकांचा असा अध:पात होतो असे श्री समर्थ सुचवितात. वासना भगवंतांपासून दूर करते. ती संपूर्ण नाहीशी करून जो भगवंतांवर सुदृढ निष्ठा ठेवून राहतो तोच सद्गुरू होण्यास लायक असतो. भगवंतांचे सुख अक्षय आहे, कायम टिकणारे आहे. त्याला कधीही विनाश नाही. ते बाजूस सारून जे सामर्थ्य संपादन करण्याच्या मागे लागतात ते मूर्ख असतात. वासनेसारखे दुसरे कोणतेच दु:ख नाही. मला भगवंत हवा ही एकच वासना तापदायक नाही. त्या वासनेखेरीज इतर सर्व वासना अनेक प्रकारची दु:खे निर्माण करतात. त्यांच्या मागे लागल्याने माणसाचा अखेर अध:पात होतो. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण सामान्य माणसे वासनेवाचून राहू शकत नाही. हे जर खरे तर श्री समर्थ असे सांगतात की, वासना ठेवायचीच झाली तर ती भगवंतांच्या दर्शनाची ठेवावी. त्या वासनेपासून दु:ख निर्माण होणार नाही आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
आता समर्थ म्हणतात, मृत्यूमुळे देहाचा शेवट झाला की त्या देहाबरोबर त्यांत राहणारे सामर्थ्य देखील नाहीसे होते. वासनेच्या नादी लागल्याने अखेर भगवंतच मात्र अंतरतो. वासना जीवाला अशाश्वत वस्तूंमध्ये गुंतविते. अशाश्वत देहाचा शेवट झाला की वासनेचा, सगळा पसारा विलयास जातो. भगवंतांकडे मन कधीच वळविले नसल्याने तो दूरच राहतो. अशा प्रकारे जीव दोन्ही बाजूंनी नागवला जातो. यावरून असे दिसते की, जो अत्यंत निष्काम आहे, वासनारहित आहे, आणि ज्याच्या बुद्धीमध्ये आत्मस्वरूपाविषयी अत्यंत दृढ निश्चय आहे, असा स्वानुभवी सद्गुरू माणसाला या अशाश्वत दृश्यसागरांतून पलीकडे नेऊन सोडतो.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment