Tuesday, October 13, 2026

दशक पाचवा : मंत्राचा : समास सहावा : शुद्धज्ञान निरुपण (२)


दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासात शुद्धज्ञानाबाबत सांगताना समर्थ म्हणतात की, उपनिषदांमधील महावाक्यांमध्ये आत्मज्ञानाचे सारे रहस्य साठविले आहे. पण, त्याचा नुसता जप करून चालत नाही. त्यावर मनन करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे, असे समर्थ सांगतात. समर्थ पुढे म्हणतात की, आता शुद्ध ज्ञानाचे लक्षण ऐका. ‘जे शुद्ध परमात्मस्वरूप आहे तेच आपण आहोत’ असा जो साक्षात अनुभव येतो त्याचे नाव शुद्ध स्वरूपज्ञान होय, हे श्रोत्यांनी समजावे. महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे. परंतु त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकाने महावाक्यांच्या अर्थाचा विचारच करणे अवश्य आहे. महावाक्यांमध्ये परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे, यात शंका नाही. परंतु त्याचे मननच केले पाहिजे. महावाक्यांचा नुसता जप केल्याने अज्ञानाचा अंधार नाहीसा होत नाही.


समर्थ म्हणतात की, आत्म ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आहे आणि आपण वास्तविक आत्मस्वरूप आहोत. म्हणून आपण ब्रह्मस्वरूप किंवा परमात्मस्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा उपदेश हा असा आहे. मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे समजावे. या ज्ञानाला शुद्ध व निर्मळ स्वरूपज्ञान असे वेदांतामध्ये म्हणतात. हे ज्ञान अतिसूक्ष्म विचाराने आपल्यामध्येच उदय पावते, त्याच्यामध्ये सर्व विरोध मावळतात. उपनिषदांमध्ये तीन-चार ठिकाणी याचे फार सुंदर वर्णन आढळते. उदा. ‘असौ य: पुरुष: स: अहं अस्मि।’ याचा अर्थ असा की, तो जो पुरुष तोच मी आहे. (ईशावास्य) ‘यद आत्मतत्वेन तु ब्रह्मतत्वं दीपोपमनेह युक्त: प्रपश्येत। अजं ध्रुवं सर्वतत्वैविशुध्दं ज्ञात्वा देवं मुच्यते सर्वपाशै:। याचा अर्थ असा की, ज्याप्रमाणे दिव्याच्या सहाय्याने मनुष्य वस्तू पाहतो, त्याचप्रमाणे योगी आत्मतत्त्वाच्या सहाय्याने अज, ध्रुव, परमश्रेष्ठ व कांतिमान ब्रह्मतत्त्व पाहतो. (श्वेताश्वतर २.१५) ‘यत्परं ब्रह्म सर्वात्मा विश्वस्यायतनं महत। सूक्ष्मात सूक्ष्मतरं नित्यं स त्वमेव त्वमेव तत ॥ [१६]। मयि एव सकलं जातं मयि सर्व प्रतिष्ठितं। मयि सर्व लयं याति तद ब्रह्म अद्वयम अस्मि अहम ॥ [१९] याचा अर्थ असा की, सर्वोत्तम ब्रह्म सर्वांचा आत्मा आहे. विश्वाचे मूळ आहे. अतिशय सूक्ष्म आहे आणि नित्य आहे. ते तू आहेस. [१६] माझ्यातून सर्व व्यक्तदशेस येते, माझ्यामध्ये जगते. आणि माझ्यातच लय पावते ते अद्वय ब्रह्म मीच आहे. [कैवल्य १६.१९]. महावाक्याचा अर्थ पाहिला तर तो असा आहे की, आपण परमात्मस्वरूपच आहोत. पण अर्थ न पाहता त्याचा नुसता जप केला तर व्यर्थ श्रम मात्र होतात.

समर्थ म्हणतात की, महावाक्यांचे मनन करून त्यामधील अर्थाचा स्वत: अनुभव घेणे हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. ‘आपण (म्हणजे मी) ब्रह्मच आहोत.’ हा महावाक्याचा खरा, शुद्ध व सूक्ष्म अर्थ आहे. आपले हरवलेले स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त होणे, आपला खरा मी आपण जाणणे हे ज्ञान फारच दुर्लभ आहे. कारण ते ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत स्वयंभू आत्मस्वरूपच असते. स्वयंभू म्हणजे स्वत: सिद्ध. आत्म्याला जाणणारा आत्म्याशी तादात्म्य पावून आत्मज्ञान मिळवितो. त्यामुळे त्याच्या ज्ञानाचे प्रमाण त्या ज्ञानामध्येच अंतर्भूत असते म्हणून आत्मज्ञान स्वत:सिद्ध असते.


एका मूळ स्वरूपांतून हे सारे विश्व व्यक्तदशेला येते व पुन्हा त्याच स्वरूपात ते लय पावते. त्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की, अज्ञान नाहीसे होते. मग आपण बांधले गेलो आहोत. असा अज्ञानातून निर्माण होणारा भ्रम नाहीसा होतो. आपण विश्वापेक्षा देखील विशाल असताना स्थळकाळानी वेढल्यामुळे जणू काय बद्ध आहोत. ते विश्वच मूळ स्वरूपात लीन झाल्याने आत्मज्ञानी पुरुषाला बद्धपणाची भावना उरत नाही. स्वस्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत अनेक मते आणि मतांतरे यामध्ये विरोध आढळतो. परंतु आत्मज्ञान झाल्यावर हा सारा विरोध मावळतो. अतिसूक्ष्म विचार करून पाहिल्यास सर्वांमध्ये ऐक्य सापडते. आत्मस्वरूप अनंत असल्याने ज्याला ज्या अंगाचे दर्शन होते त्याला अनुसरून तो आपले मत मांडतो. आत्मज्ञानी पुरुषाच्या अनुभवामध्ये सर्व अंगे एकत्वाने गोळा होतात. अतिशय सूक्ष्म म्हणजे खोल व व्यापक विचार मात्र केला पाहिजे.

अज्ञानाचा मल नसलेले अगदी शुद्ध आत्मस्वरूप या दृश्य चराचराचे मूळ आहे, असा प्रत्यक्ष अनुभव येऊन जे ज्ञान होते त्यास वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान असे म्हणतात. आपण आपल्या मूळ स्थानाचा म्हणजे स्वरूपाचा शोध केला तर आपण आत्मस्वरूपात जातो. ते स्वरूप ज्ञानमय असल्याने तेथे अज्ञान आपोआप नाहीसे होते. म्हणून आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रह्मज्ञान असे नाव आहे. आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा शोध करू जाता आत्मज्ञान होते. आत्मा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानामुळे सर्वज्ञ बनतो. आपल्याला सर्व ज्ञान हस्तगत होते. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही आकंचित वृत्ती शिल्लकच उरत नाही. ‘मी कोण आहे?’ हे जाणण्याचा हेतू बाळगून जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असणा‍ºया मीला पाहता पाहता आपण अगदीम निश्चितपणे आत्मस्वरूपच होतो.


प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा


No comments: