Sunday, October 11, 2026

दशक पाचवा : मंत्रांचा : समास चौथा : उपदेशलक्षण (२)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील चौथ्या समासात उपदेश लक्षणे सांगताना पुढे म्हटले आहे की, आठ पाय‍ºया यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आहेत. सहा चक्रे - मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि सहस्रदल ही आहेत. प्राण व अपान यांचे मीलन करून सुषुम्ना नावाच्या कण्यातील सूक्ष्म नाडीच्या मार्गाने प्रत्येक चक्राचे भेदन करून प्राण मूर्ध्नि आकाशात न्यावयाचा असतो. कोणी वेगवेगळी तपे करायला सांगतात तर कोणी अजपाजप सांगतात. योग्याचे म्हणणे असे की आपला श्वासोच्छवास चोवीस तास चालतो. तो आपोआप होणारा जपच आहे. श्वास आत घेताना ‘सो’ व श्वास बाहेर सोडतांना ‘हम’ असा सूक्ष्म नाद होतो. त्या नादावर मन एकाग्र केले तर चोवीस तास विनासायास जप चालतो. त्यास अजपाजप म्हणतात. इतर जे कोणी तत्त्वचिंतक असतात ते विश्वाच्या मूलतत्त्वांची विस्ताराने चिकित्सा करतात. कोणी सगुणाचा उपदेश करतात, कोणी निर्गुणाचे निरुपण करतात, तर कोणी तीर्थाटन करावे असा उपदेश करतात. चार वेदांतील चार महावाक्ये आहेत, त्यांचा जप करावा असे कोणी सांगतात, तर सगळे जे काही आहे ते ब्रह्मच आहे, सर्वं खलु इदं ब्रह्म - असा कोणी उपदेश करतात.


समर्थ म्हणतात, कोणी शाक्तमार्ग सांगतात. या मार्गामध्यें शक्तीची किंवा देवीची उपासना करावी लागते. त्यात मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा व मैथुन हे पंचमप्रकार सेवन करतात. कोणी मुक्तमार्ग म्हणजे सर्व बंधने तोडून स्वैराचाराने वागण्याचा मार्ग स्थापन करतात, तर कोणी अगदी मनापासून इंद्रिये पूजन करण्याचा प्रकार करवून घेतात. या मार्गात अखेर स्त्रीपुरुषांच्या गुह्य इंद्रियांची पूजा चालते व अर्थात अनाचार बोकाळतो. कोणी गुरू वशीकरण, स्तंभन, मोहन, उच्चाटन अशा प्रकारची अनेक चेटके स्वत: करतात आणि इतरांना करायला सांगतात. वशीकरण म्हणजे माणसाला संपूर्णपणे आपल्या आधीन करून घेणे. स्तंभन म्हणजे माणसाच्या शरीरावर व मनावर परिणाम करून त्याला स्तब्ध करणे किंवा तटस्थ करणे. मोहन म्हणजे माणसाला भ्रमिष्ट करणे किंवा बेहोष करणे. उच्चाटन म्हणजे माणसाला स्थानभ्रष्ट करणे, त्याला उचलून नेणे किंवा त्याचा नाश करणे. या सगळ्या अघोरी क्रिया आहेत. उपदेशांची अवस्था ही अशी आहे. किती सांगावे! सांगणे आता पुरे असे समर्थ इथे म्हणतात. ते म्हणतात उपदेशांचे हे असे असंख्य प्रकार आहेत. पण आत्मज्ञानावाचून हे उपदेशाचे सगळे प्रकार व्यर्थ असतात. आत्मज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही. उपदेशाचे असे पुष्कळ प्रकार असले तरी आत्मज्ञानावाचून त्यांना काही अर्थ नाही. याबद्दल भगवंतांचे एक वचन आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा की, नाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व नाना देवतांचे पूजन करतात. पण अर्जुना, आत्मज्ञानावाचून सगळी कर्मे वाया जातात. शैवमत, शाक्तात, आगमशास्त्र व आणखी बरीच मते आहेत. भ्रमात वावरणा‍ºया जीवांना झालेला तो बुद्धिभ्रंशच समजावा. या जगात आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम असे दुसरे काही नाही, हे समर्थ या समासात स्पष्टपणे सांगतात.

या कारणांसाठी आत्मज्ञानासारखे पवित्र व उत्तम दुसरे काही नाही. म्हणून आधी आत्मज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश श्रेष्ठ आहे. याविषयी भगवंताने पुष्कळ ठिकाणी सांगून ठेवले आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे, माणूस कोणत्याही वर्णाचा असो, त्याच्या अंगी जर आत्मज्ञान स्थिरावले असेल तर या जगात मी जन्मोजन्मी त्याचा दास होतो. चार तोंडाच्या ब्रह्मदेवालासुद्धा आत्मज्ञानाचा मोठेपणा कळत नाही, तर मग गरीब बिचाºया जीवात्म्याला तो कळत नाही यात नवल नाही. तीर्थयात्रा, स्नान, दान, इत्यादी सगळ्या साधनांनी मिळविलेले पुण्य पुष्कळच असते. पण आत्मज्ञानाची पुण्याई या सर्वांहून कोटीपटीने अधिक असते. पृथ्वीवर जी तीर्थे आहेत त्यांच्या यात्रेचे फळ आणि स्नानदानाचे फळ यांची बेरीज कोटीपटीने वाढविली तर ती कदाचित ब्रह्मज्ञानाच्या बरोबरीने होईल. म्हणून गहनाहून गहन किंवा अत्यंत गूढ असे जे आत्मज्ञान त्याचे लक्षण आता सांगतो. ते श्रोत्यांनी ऐकावे असे समर्थ म्हणतात.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: