Wednesday, October 14, 2026

दशक पाचवा : मंत्रांचा : समास सहावा : शुद्धज्ञान निरुपण (३)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासात शुद्धज्ञान निरुपण करताना म्हटले आहे की, पूर्वी होऊन गेलेल्या सर्व थोर ज्ञानी पुरुषांना असे आत्मज्ञान प्राप्त झालेले होते. आत्मज्ञानच सर्व वेदशास्त्रांचे रहस्य आहे. सर्व संतांचे वर्मदेखील तेच आहे. श्रद्धावंत पुरुषांना त्यांच्या भाग्यानुसार आत्मज्ञान प्राप्त होत असते. असो. पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारातून पार पडले ते आता नीट ऐकू. महामुनि, वसिष्ठ आणि व्यास, समाधानी शुक आणि नारद, महाज्ञानी जनकादिक या आत्मज्ञानानेच थोरपदाला पोहोचले.


समर्थ म्हणतात, वामदेवादि योगेश्वर, वाल्मिकी, अत्री ऋषीश्वर, शौनकादि हे सर्व वेदांत तत्त्वज्ञानाचे रहस्य जे आत्मज्ञान त्यानेच परमपदाला पोहोचले. सनकादि थोर ज्ञानी आणि आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ हे नाथपंथी महायोगी आणि आणखी असंख्य महात्मे आत्मज्ञानानेच कृतकृत्य झाले. मोठमोठे सिद्ध, मुनी आणि महान अनुभवी या सर्वांच्या अंतरगाची जी अवस्था म्हणजेच आत्मज्ञान, ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेव निरंतर डोलत असतो, जे आत्मज्ञान वेदशास्त्राचे तात्पर्य आहे, जे योग्य प्रमाणांनी निश्चित केलेला निर्णय आहे, जे साक्षात अनुभवाला येते आणि जे अतिसूक्ष्म विचारांती योग्य ठरते, जे आत्मज्ञान श्रद्धावंताना त्याच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते. पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले व पुढे होणारे सर्व साधु-संत आणि सज्जन यांचे गुह्य असलेले असे जे आत्मज्ञान ते मी आता सांगतो.

समर्थ सांगतात, आत्मज्ञान सर्व ज्ञानाचे शिखर आहे. ते सद्गुरुच्या कृपेने विनासायास प्राप्त होते. सद्गुरुचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतींत परमश्रेष्ठ प्रमाण समजावे. ते वचन काय आहे ते आता सांगतात. समर्थ म्हणतात की, तीर्थ, व्रत, तप, दान, धूम्रपान, पंचाग्नि साधन, गोरांजन या साधनांनी आत्मज्ञान प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हेच सगळ्या परमार्थसाधनाचे खरे फळ आहे. तेच ज्ञानाची परमावधि आहे. आत्मज्ञानानेच संशयवृत्तीचे मूळ संपूर्णपणे नाश पावते. जगात कितीतरी भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेमध्ये कितीतरी ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्यक्ष वेदांतावर कितीतरी ग्रंथ आहेत. या सर्वांचा खोल अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे आत्मज्ञान हाच होय. पुराणांचा अभ्यास करून आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान सांगता सांगता वेद थकले. असे विलक्षण असणारे आत्मज्ञान आता या क्षणी गुरुकृपेने समजावून देईन, असे समर्थ सांगतात.


स्वत:वर गुरुकृपा झाल्याने आत्मज्ञान आपल्या घरी जणू काय पाणी भरते अशी श्रीसमर्थांची अवस्था होती. तिचे वर्णन आता ऐकावे. श्रीसमर्थ सांगतात की, संस्कृत ग्रंथात काय आहे ते आपण पाहिलेले नाही, मराठी ग्रंथात आपला प्रवेश नाही. पण, आपल्या हृदयात सद्गुरुस्वामीची कृपामूर्ति मात्र स्थिरपणे राहिलेली आहे. आता संस्कृत अथवा प्राकृत ग्रंथांची गरज तरी काय आहे? माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीत माझ्या हृदयात बसलेला आहे. वेदांचा अभ्यास न करता किंवा श्रवणाचे सायास न करता मला अगदी प्रयत्नावाचून गोड सद्गुरुकृपा लाभलेली आहे. मराठी भाषेत ग्रंथ आहेत, पण त्याहून संस्कृत भाषेतील ग्रंथ श्रेष्ठ आहेत. संस्कृत ग्रंथांमध्ये देखील वेदांत ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत.

वेदांतापेक्षा दुसरे काहीच श्रेष्ठ नाही. कारण वेदांचे सारे रहस्य वेदांतामध्ये प्रगट झालेले आहे. असो, अशा जो तात्पर्यार्थ आहे आणि जो अत्यंत खोल परमार्थ आहे, तो तू आता ऐक असे समर्थ सांगतात. अतिशय खोल आणि अर्थ गभीर असे जर काही असेल तर ते सद्गुरुचे वचन आहे. त्या वचनाने निश्चितपणे समाधान मिळते. सद्गुरुचे वचन तोच खरा वेदांत व तोच खरा सिद्धांत होय. ते वचन हेच प्रत्यक्ष अनुभविलेले ज्ञान होय. माझ्या सद्गुरुस्वामीचे जे वचन आहे ते अतिशय खोल अर्थाने भरलेले आहे. त्या वचनाने माझे संपूर्ण समाधान झाले. ते वचन खरोखर माझ्या जीवाचे रहस्य आहे, गुपित आहे. ते मी तुला सांगेन म्हणतो. माझ्या सांगण्याकडे तू लक्ष दिलेस तर ते याच क्षणी तुला सांगतो. शरणागत होऊन शिष्याने श्रीसमर्थांचे पाय घट्ट धरले आणि तो दीनमुखाने म्हणाला की, मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. तेव्हा गुरुदेवांनी सांगण्यास प्रारंभ केला.


समर्थ सांगतात की, तू स्वत: परमात्मरूपच आहेस, असे सांगून मग आत्मज्ञानाचे सर्व अंगानी वर्णन केले. सद्गुरुशी अनन्य होऊन ते ज्ञान प्राप्त होते व पूर्ण समाधान मिळते. दृश्य विलीन होऊन आत्मनिवेदन मात्र होणे अवश्य आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ हे महावाक्य आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. ते मर्म ऐक. तू स्वत: ब्रह्मस्वरूप आहेस. याबद्दल यत्किंचित संशय धरू नकोस, त्याविषयी भ्रम बाळगू नकोस.

भक्तीचे नऊ प्रकार मागे सांगितले. त्यांपैकी आत्मनिवेदन हा मुख्य प्रकार आहे. तो आता संपूर्णपणे वर्णन करतो. विश्व निर्माण होते त्या वेळी ही पंच महाभूते क्रमाने निर्माण होतात. पण, विश्व अशाश्वत आहे. कल्पांताच्या वेळी ते नाश पावते, तेव्हा ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्याच क्रमाने लय पावतात. इतकेच नव्हे तर अखेर उरणारी दोघे प्रकृति आणि पुरुष तीदेखील परब्रह्मांत विलीन होतात.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: