समर्थ रामदास स्वामींनी श्रीमद्दासबोध या ग्रंथातील दशक ५ (मंत्रांचा दशक)मधील समास ८ वा हा मुमुक्षुलक्षण या विषयावर रचला आहे. या समासाचा विषय: मुमुक्षु लक्षण हा आहे. मुमुक्षु म्हणजे ज्याला संसाराच्या तापातून मुक्त होऊन मोक्ष मिळवण्याची, ईश्वरप्राप्तीची आणि आत्मज्ञानाची तीव्र इच्छा झाली आहे असा साधक. या समासात समर्थांनी संसारात अडकलेला जीव कसा जागे होतो आणि मोक्षाच्या मार्गावर पाऊल ठेवताना त्याची मानसिकता कशी असते, याचे अत्यंत वास्तववादी वर्णन केले आहे.
यामध्ये संसाराच्या तापाची जाणीव (संसारदु:खाने त्रासणे) म्हणजे काय हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. संसाराचे स्वरूप म्हणजे, जोपर्यंत माणसाला संसारातील सुख-दु:खांचे झटके बसत नाहीत, तोपर्यंत त्याला परमार्थाची आठवण येत नाही. मग जागृती होते. जेव्हा माणसाला हे उमजते की हा संसार क्षणभंगुर, अनित्य आणि त्रिविध तापांनी (आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक) भरलेला आहे, तेव्हा त्याच्या मनात संसाराबद्दल उद्वेग (विरक्ती) निर्माण होतो. त्यानंतर मुमुक्षूची अवस्था प्राप्त होते. तो मनातून विचार करू लागतो की, मी कोण आहे? हे जग काय आहे? मला जन्माला येऊन काय करायचे आहे? मला या जन्ममरणाच्या फेºयातून सुटका कशी मिळेल?
त्यानंतर तीव्र मुमुक्षुता (मोक्षाची आस) लागते. त्याला मोक्षाची तळमळ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला चोहोबाजूने आगीने वेढल्यावर तो तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडतो, किंवा पाण्यात बुडणारा माणूस श्वासासाठी तळमळतो; तशीच तळमळ मुमुक्षुच्या मनात मोक्ष आणि आत्मज्ञानासाठी निर्माण होते. त्याला विषयांचा वीट आलेला असतो. त्याला संसारातील विषयसुखे (सत्ता, संपत्ती, मानसन्मान) फिके आणि निरस वाटू लागतात.
मग तो सद्गुरूंचा शोध घेतो. त्याला सद्गुरूंची गरज वाटू लागते. मुमुक्षुला जाणीव होते की, स्वत:च्या अज्ञानामुळे तो या संसारात अडकला आहे. यातून सोडवण्यासाठी मला एका समर्थ मार्गदर्शकाची (सद्गुरूंची) गरज आहे. त्यानंतर शोध आणि शरण गतीची वेळ येते. तो केवळ कर्मकांड किंवा तंत्र-मंत्रांमध्ये न अडकता, जो सत्य ज्ञान दाखवेल अशा खºया सद्गुरूंच्या शोधात निघतो आणि अत्यंत नम्रभावाने त्यांना शरण जातो.
यानंतर समर्थ मुमुक्षुचे वर्तन व मानवी स्वभाव याबाबत सांगतात. समर्थ सांगतात की, मुमुक्षु हा अहंकार सोडून नम्र बनतो. तो उत्तम गुणांचा स्वीकार करतो, सत्संगाची आवड धरतो आणि ज्ञानी पुरुषांचे विचार ऐकण्यासाठी नेहमी तत्पर असतो. त्याच्या मनात मी-माझे हा भाव हळूहळू कमी होऊ लागतो आणि ईश्वरप्राप्ती हेच त्याचे अंतिम ध्येय बनते.
या समासाचे सार किंवा तात्पर्य काय आहे तर बद्ध (अज्ञानी) संसारात आणि विषयसुखात रमणारा, अज्ञानात जीवन जगणारा. मुमुक्षु (जिज्ञासू) संसाराचे असारपण ओळखून मोक्षाची आणि ज्ञानाची तीव्र इच्छा धरणारा. साधक म्हणजे सद्गुरूंना शरण जाऊन प्रत्यक्ष साधना आणि श्रवण-मनन करणारा. आणि सिद्ध (मुक्त) हा आत्मज्ञान प्राप्त करून जीवनमुक्त झालेला.
समर्थ रामदास स्वामी या समासात स्पष्ट करतात की, मुमुक्षुता ही परमार्थातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. जोपर्यंत मनात मुमुक्षुता (मुक्तीची तीव्र इच्छा) निर्माण होत नाही, तोपर्यंत गुरुपदेश किंवा ज्ञानाचा खरा लाभ होऊ शकत नाही.
या समासामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मुमुक्षु (मोक्षाची व आत्मज्ञानाची तीव्र इच्छा असणारा साधक) याचे मनापासून आणि अत्यंत वास्तववादी चित्रण केले आहे. संसाराची असारता आणि पश्चात्ताप त्याला होतो. जोपर्यंत माणूस संसाराच्या सुखात मत्त असतो, तोपर्यंत त्याला परमार्थाची आठवण येत नाही. परंतु त्रिविध तापांनी पोळल्यावर आणि संसाराचे दु:ख सहन झाल्यावर त्याला आपल्या कर्माचा व आयुष्याचा पश्चात्ताप होऊ लागतो. (ओवी १ ते ८).
त्यानंतर आत्मपरीक्षण व स्वत:ची निंदा ही अवस्था येते. खरा मुमुक्षु हा कसलाही बडेजाव न ठेवता स्वत:च्या दोषांची, अहंकाराची, दंभाची आणि केलेल्या चुकीच्या कर्मांची खुली कबुली देतो. तो स्वत:ला अत्यंत नीच, पापी आणि अवगुणांची रास समजून मनातून लज्जित होतो (ओवी ९ ते ३७).
त्यानंतरची प्रक्रिया ही सद्गुरूंना शरण जाणे. तीर्थयात्रा, कर्मकांड, नाना ग्रंथ वाचूनही जेव्हा मनाचे समाधान होत नाही, तेव्हा तो आपला देहाभिमान, कुळाभिमान आणि द्रव्याभिमान पूर्णपणे सोडून अनन्यभावाने संतचरणी शरण जातो आणि मोक्षाची खरी अपेक्षा धरतो (ओवी ३८ ते ४३). हा समास म्हणजे साधकाच्या आध्यात्मिक प्रवासातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे, जी अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग उघडते.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment