Friday, October 16, 2026

दशक पाचवा : मंत्रांचा : समास सहावा : शुद्धज्ञान निरुपण (५)


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील शुद्धज्ञान निरुपण या सहाव्या समासात एक कथा सांगितली आहे. ते सांगातात की, त्याचे असे झाले की, एक राजा होता. त्याच्याकडे एकाने एक शिगाचा मणी आणला. तो फारच प्रकाशमान आणि मोहक होता. त्याने तो राजाला दाखविला आणि सांगितले की, ‘पौर्णिमेच्या दिवशी हा मणी स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांतील आपल्याला हवी ती वस्तू देऊ शकतो.’ राजाला मणी फारच आवडला व त्याने त्याची किंमत विचारली. मणी आणणारा माणूस म्हणाला, ‘तुझे सबंध राज्य मला देशील तर हा मणी मी तुला देईन.’ राजाने विचार न करता मूर्खपणे राज्य त्याला दिले आणि तो मणी घेतला. पुढे पौर्णिमेस राजाने त्या मण्याची प्रार्थना केली. पण तिचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने तो मणी परत केला आणि आपले राज्य हस्तगत केले. तात्पर्य, इंद्रियाचे भोग दिसायला सुंदर दिसतात, पण त्याच्या पायी आपण आपले स्वराज्य, स्वानंद, साम्राज्य किंवा आत्मज्ञान गमावून बसतो. त्यांचा नाद सोडला की गमावलेले स्वस्वरूप परत मिळते.


या समासात समर्थ पुढे सांगतात, अविद्येमुळे आपल्याला भ्रम होतो. जे मिथ्या आहे ते सत्य वाटते. अविद्या नाहीशी होण्यास ज्ञान हाच उपाय आहे. समर्थ पुढे म्हणतात, मी तुम्हाला एक निश्चित भविष्य सांगतो. ते लक्ष देऊन ऐकावे. माणसाला ज्या गोष्टीचा सारखा ध्यास लागतो तीच त्याला मिळते. म्हणून आपण अविद्या सोडावी आणि सद्विद्या धरावी. भगवंतांच्या किंवा आत्मस्वरूपाच्या नादी लागावे. आत्मज्ञान झाल्यावर जगाला वंद्य होण्याची योग्यता येण्यास उशीर लागत नाही.

संन्निपातज्वर मोठा दोषी असतो. त्यामध्ये रोग्याला भ्रम होतो आणि मग काहीतरी भयंकर दृश्ये त्याला दिसू लागतात. पण योग्य औषधोपचार होऊन त्याचा ताप उतरला की भ्रम नाहीसा होतो आणि तो खरा आनंद भोगतो. त्याचप्रमाणे अज्ञानरूप सन्निपाताने जीवाला भ्रम होतो आणि मग काहीतरी भलतेच व खोटे दृश्य दिसू लागते. त्यावर आत्मज्ञानाचे औषध घेतले की अज्ञान नाहीसे होते. मग आपल्याला जे दृश्य दिसत होते ते मुळातच नव्हते असा प्रत्यक्ष अनुभव येतो.


अविद्या एक प्रकारची झोप आहे. झोपेमध्ये काहीतरी भयानक स्वप्न पडते व मनुष्य घाबरतो. तसे अविद्येमुळे मिथ्या असलेले दृश्य दिसते व मनुष्य घाबरतो. तसे अविद्येमुळे मिथ्या असलेले दृश्य दिसते व मनुष्य घाबरतो. त्यावर एक उपाय म्हणजे माणसाला जागे करणे. दृश्य मिथ्या आहे हे पटवून त्याबद्दल विरक्तीउत्पन्न होणे याला जागेपण म्हणतात.

एका झोपी गेलेल्या माणसाला एक भयंकर स्वप्न पडले. त्या खोट्या असणाºया स्वप्नाने घाबरून तो ओरडू लागला. तेव्हा त्याला जागे केले. त्यामुळे तो आपोआप झोपेआधीच्या निर्भय स्थितीला आला. त्याला पडलेले स्वप्न खोटे होते पण त्याला ते खरे वाटले. त्यामुळे त्याला दु:ख झाले. जे खोटे असते त्याचे संपूर्ण निरसन कधीच होत नसते. त्याचा काहीतरी परिणाम उरतोच.


जो जागा असतो त्याला स्वप्न खोटे असते. जो झोपलेला असतो त्याला ते सर्व बाजूने वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीती उरतच नाही. ज्यावेळी अविद्यारूप झोप जीवाला अगदी झापड घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने पडतात. त्यामुळे तो घाबरतो व त्याचे सगळे शरीर भयाने कापू लागते. या अविद्यारूप झोपेतून संपूर्ण जाग येण्यास सारखे श्रवण आणि मनन करावे. जागेपण कसे ओळखावे त्याची खूण सांगतो ती ऐकावी. जो अगदी मनापासून इंद्रियभोगाविषयी पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असे ओळखावे.

यानंतर समर्थ पुढील चार समासांची प्रस्तावना करतात. ते म्हणतात, ज्याला संपूर्ण विरक्ती साधली नाही त्याला साधक असे म्हणतात. जगामधील आपले मोठेपण सोडून त्याने साधना करीत राहावे. ज्याला साधना करावेसे वाटत नाही तो सिद्धपणाच्या अभिमानाने बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षा मुमुक्ष केव्हाही चांगला, कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्याने तो ज्ञानाचा अधिकारी असतो. हे ऐकून शिष्याने प्रश्न केला की, बद्ध व मुमुक्ष यांचे लक्षण काय? साधक आणि सिद्ध कसे ओळखावे? सद्गुरू म्हणाले की, या प्रश्नाचे उत्तर पुढील समासात दिले आहे. ते वर्णन साधक श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे.


प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा


No comments: