दासबोधातील पाचव्या दशकातील सहाव्या समासात शुद्धज्ञान निरुपण करताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, अशा रीतीने सर्व दृश्य वस्तू नाश पावल्या म्हणजे वास्तविक मीपणाने वावरणारा मीदेखील उरत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूप असल्याने एकस्वरूप होण्यास निराळे काही करावे लागत नाही. सर्व सृष्टी मूळ स्वरूपात विलिन झाल्यावर मग फक्त एक स्वरूप ब्रह्म तेवढे उरते. त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांना पाहायचे म्हटले तरी ते आढळणार नाहीत. ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून भस्म होतो. ज्ञाता ज्ञानाशी तदाकार झाल्याने, ज्ञाता स्वत: ज्ञानरूपच झाल्याने वेगळेपणाचे मूळच जळून जाते. लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेयाला जाणत असता त्याच्याहून वेगळा राहतो. त्यामुळे त्या ज्ञानामध्ये वेगळेपणाचे मूळ कायम राहते. अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता ज्ञेयाशी तदाकार होऊन त्याला जाणतो. त्यामुळे तेथे वेगळेपण उरतच नाही. शिवाय दोघे गेल्यावर केवळ ज्ञान तेवढे शिल्लक राहते. हे ज्ञान आत्मस्वरूपच असल्याने त्यामध्ये दृश्याला दृश्यपणाने राहणे नसते. दृश्य भासणे हा अज्ञानाचा परिणाम असल्याने अज्ञान नाहीसे झाले की दृश्य आपोआप अंतर्धान पावते. आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व हे मिथ्या आहे असे पटले, म्हणजे ते जसे दिसते तसे ते नाही अशी खात्री पटली की दृश्याकडे धाव घेणारी वृत्ती आपोआप मागे फिरते. अशा रीतीने वृत्ती उलटून हृदयामधील आत्मस्वरूपाकडे धाव घेऊ लागली की, मग दृश्य असून सुद्धा नसल्यासारखे होते. ते असून अनुभवास येत नाही. अशा रीतीने वृत्ती अंतर्मुख होऊन स्वस्वरूपापर्यंत पोहोचली की सहजच आत्मनिवेदन घडते.
समर्थ रामदास स्वामी सांगतात की, शिष्याने सद्गुरूशी अनन्य व्हावे, आपण देहाहून वेगळे आहोत अशी जाणिव ठेवावी, एकांतात बसून स्वस्वरूपात लीन होण्याचा अभ्यास करावा. जो शिष्य आपल्या गुरूशी अनन्य असतो, त्याला आत्मनिवेदनाची काळजी करण्याचे कारण नसते. अभक्त जसा भगवंताहून वेगळा राहतो तसा शिष्य सद्गुरूहून वेगळा राहता कामा नये. शिष्याचे आणि सद्गुरूचे मनोमीलन झाले पाहिजे. शिष्याचे जीवन सद्गुरूने भरून गेल्यावर आत्मनिवेदनासाठी आणखी निराळे काही करावे लागत नाही. असे आत्मनिवेदन एकदम साधत नाही. ते दृढ होऊन अनुभवास येण्यासाठी सद्गुरूचे चरित्र, गुण, महिमा, रूप, इत्यादींचे वारंवार चिंतन करावयास हवे. त्यांच्या वचनांची आठवण करून त्यांचा अर्थ पुन: पुन्हा मनात घोळवायला हवा. अशा प्रकारचे सद्गुरू भजन केले तर निश्चितपणे समाधान मिळते.
रामदास स्वामी सांगतात की, यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. आत्मज्ञानाने समाधान मिळते. संसारामधील भीती आणि चिंता याचे बंधन सर्वस्वी नाहीसे होते. मी देहच आहे असे ज्या माणसाला वाटते तो आत्मघातकी असतो. मी देहच आहे या अभिमानाचा परिणाम म्हणून त्याला जन्ममरणाच्या येरझारा सतत, वारंवार भोगाव्या लागतात. वास्तविक खरा मी आत्मस्वरूप आहे. म्हणून मी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहाहून वेगळा आहे. ‘मी’ला जन्ममरण नाही, कर्माचा स्पर्श होत नाही. या सगळ्या दृश्यरूप खिचडीला, अठरा धान्याच्या कडबोळ्याला मी आतबाहेर व्यापून आहे. तो मी म्हणजे आत्मा तूच आहेस. खºया ज्ञानदृष्टीने पाहिले तर कोणाही जीवाला बंधन नाही. मी बांधलेला आहे असे अज्ञानामुळे वाटते. तो भ्रम आहे व त्याने लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरून ठेवल्याने मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो व जीवाला भुलवून टाकतो. या भ्रमांतून सुटण्यासाठी एक उपाय करावा. आपण एकांतामध्ये बसावे, स्वस्वरूपात लीन व्हावे, तेथे विसावा घ्यावा. हा अभ्यास करीत गेल्याने परमार्थ स्थिर होतो, आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो. परमार्थाचे अखंड श्रवण आणि मनन करीत राहिले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचले की, अंगात वैराग्य भरून जाते. दृश्याबद्दलची यत्किंचित वासना अंत:करणात उरत नाही. म्हणून समर्थ सांगतात की, आत्मज्ञान होण्यास इंद्रियांना आवर घालून वासना निर्मूल केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे बंधन न घालता इंद्रियाना मनसोक्त भोग भोगू दिले तर मनाची तळमळ शांत होणार नाही. इंद्रिये जे भोग मागतात ते त्यांना दिले तर त्यांची वखवख अधिक वाढते, म्हणून मोकाटपणे भोगून मनाची तळमळ शांत होत नाही. इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत हे उमजून ज्याचे मन त्यांच्याबद्दल विरक्त बनते त्यालाच पूर्ण आत्मज्ञान होते. उदा. एका माणसाने मणी टाकला तेव्हा गेलेले राज्य त्याला परत मिळाले. हा कथाभाग आपण उद्याच्या भागात समजून घेऊ.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment