Tuesday, October 20, 2026

दशक पाचवा (मंत्राचा) : समास नववा : साधकनिरुपण


श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी ‘श्रीदासबोध’ ग्रंथाच्या मागील समासात ‘मुमुक्षु’ (जिला मोक्षाची किंवा आत्मज्ञानाची तीव्र इच्छा आहे अशी व्यक्ती) याची लक्षणे सांगितली. आता या ‘साधकनिरुपण’ नावाच्या नवव्या समासात, मुमुक्षुतून पुढे साधनेच्या मार्गावर चालणाºया ‘साधक’ पुरुषाची लक्षणे अत्यंत मार्मिकतेने, सविस्तर आणि कृतीशीलतेने स्पष्ट केली आहेत.


समर्थांनी साधकाची प्राथमिक आणि सत्संगाची लक्षणे (ओव्या १ ते ७) मध्ये वर्णन केलेली आहेत. त्यामध्ये अवगुणांचा त्याग व संतसंग याबाबत ऊहापोह केला आहे. समर्थ म्हणतात, जी व्यक्ती आपल्या मनातील व आचरणातील दुर्गुण, विकार यांचा त्याग करते आणि संतांच्या संगतीत राहते, तिला ‘साधक’ म्हणावे. ती संतांना शरण जाते आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली आत्मज्ञानाचा अभ्यास करते. त्यानंतर श्रवण, मनन व संदिहानिवृत्ती याबाबत समर्थ सांगतात. ते म्हणतात, साधक हा नेहमी आध्यात्मिक ग्रंथांचे श्रवण करण्यास आवड धरतो. अद्वैताच्या विचारांमध्ये त्याला गोडी वाटते. तो केवळ ऐकत नाही, तर त्यांवर मनन करून त्याचा खरा व गूढ अर्थ समजून घेतो. संतांच्या सान्निध्यात बसून आपल्या मनातील सर्व शंका व संदेह दूर करतो आणि शास्त्र, गुरू व स्वत:चा अनुभव (प्रचिती) यांची सुसंवादी सांगड घालतो.

या समासातील पुढच्या टप्प्यात समर्थ आत्मज्ञान आणि देहबुद्धीचे निराकरण (ओव्या ८ ते १३) याबाबत बोलतात. ते म्हणतात, विवेक आणि आत्मबुद्धी महत्त्वाची आहे. साधक हा विवेकाच्या बळावर ‘मी केवळ देह आहे’ ही कुबुद्धी सोडून देतो आणि ‘मी चैतन्यस्वरूप आत्मा आहे’ ही दृढ बुद्धी सतत जागृत ठेवतो. यासाठी तो अहोरात्र श्रवण, मनन व निदिध्यास करत राहतो. त्यानंतर ते द्वैत आणि उपाधींचा त्याग याबाबत बोलतात. समर्थ म्हणतात, जगातील दृश्य प्रपंचाचे भान विसरून तो आत्मज्ञानात स्थिर होतो. द्वैताची बंधने तोडून अद्वैत परब्रह्माची प्राप्ती करून घेतो आणि मनाची शांतता टिकवून ठेवतो. त्यानंतर तो सत्कार्यांची वाढ व दुर्गुणांचा संहार करतो. ज्या आत्मज्ञानाचे माणसाला विस्मरण झाले होते, त्या ज्ञानाचा तो पुन्हा उद्धार करतो (ज्ञान ताजे करतो). उत्तम साधूंची लक्षणे स्वत:च्या आचरणात आणतो. वाईट कर्मे (असत्क्रिया) सोडून देतो आणि उत्तम सत्कर्मे व सगुण-निगुर्णाचा अभ्यास वाढवतो.


या समासातील पुढच्या टप्प्यात समर्थ माया, प्रपंच आणि विकारांवर विजय (ओव्या १५ ते २८) याबाबत सांगतात. समर्थ म्हणतात, अदृश्य ईश्वराची प्राप्ती महत्त्वाची आहे. डोळ्यांना दिसणारी मायाभ्रमाची सृष्टी खरी मानत नाही आणि जी वस्तू (परमात्मा) सामान्य लोकांना दिसत नाही, ज्याचे मनाने अनुमान करता येत नाही, त्या अलक्ष आत्मस्वरूपाला तो आपल्या अंत:करणात दृढ करून अनुभवतो. त्यानंतर तो विकारांचे निर्मूलन करतो. म्हणजे, साधक हा काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, कुळाभिमान आणि लोकलाज या सर्वांना बाजूला सारतो. विरक्तीच्या बळावर तो संसाराची आसक्ती, अहंपणा आणि दुराशा यांचा समूळ नाश करतो. त्यासाठी विवेक आणि आत्मबल याला तो जागृत करतो. तो संदेहरूपी शत्रूला पायाखाली तुडवतो, विकल्पांचा वध करतो आणि जन्म-मृत्यूच्या चक्रावर व भवावर आत्मज्ञानाचा घाव घालून विजय मिळवतो.

यानंतरच्या टप्प्यात या समासात समर्थ साधकाची उन्नत अवस्था आणि स्वरूपस्थिती (ओव्या २९ ते ६२) याबाबत बोलतात. यातील विदेही स्थिती व स्वप्नदृष्टांत यावर ते भाष्य करतात. पंचमहाभूतांचा हा सर्व पसारा त्याला केवळ एका स्वप्नासारखा भासतो. जसे माणसाला स्वप्नात भीती वाटते, पण जागे झाल्यावर ती खरी नसते, तशीच ही मायामय सृष्टी मिथ्या आहे, असा ज्याचा दृढनिश्चय झाला आहे, तो खरा साधक होय. यानंतर अखंड स्वरूपस्थिती ते सांगतात. ज्याच्या मनातून मीपण (अहंकार) पूर्णपणे नाहीसा झाला आहे, ज्याने द्वैताचा संबंध तोडला आहे आणि जो देहात असूनही ‘विदेही’ (देहबुद्धीरहित) झाला आहे, त्याची स्वरूपस्थिती अखंड टिकून राहते.


या समासाचा समारोप (शंकेचे बीजारोपण) करून ते करतात. शेवटी समर्थ म्हणतात की, अशा प्रकारे जो सर्व दुर्गुणांचा त्याग करून साधनेच्या मार्गाने चालतो, त्याला ‘साधक’ म्हणावे. हा साधक सर्व संगांचा त्याग करून वाटचाल करतो. येथे श्रोता एक शंका उपस्थित करतो. ‘‘जर नि:स्पृह असलेला आणि सर्वसंगपरित्याग केलेला माणूसच साधक होत असेल, तर मग संसारात राहणाºया सर्वसामान्य माणसाला असा त्याग कसा जमणार? तो साधक होऊ शकत नाही का?’’ यावर समर्थ सांगतात की, श्रोत्यांच्या या सुंदर शंकेचे सविस्तर उत्तर आपण पुढील (दहाव्या) समासात पाहूया. हा समास आपल्याला शिकवतो की, केवळ तोंडी अध्यात्म सांगणे म्हणजे साधक नव्हे. जो प्रत्यक्षात आपल्या मनातील अवगुण, विकार, अहंकार आणि द्वैताची आसक्ती सोडून विवेक, वैराग्य व आत्मज्ञानाच्या मार्गावर अचल निश्चयाने चालतो, तोच खरा ‘साधक’ होय.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: