Saturday, October 31, 2026

दासबोध : दशक ७ : चौदा ब्रह्मांचा : समास १ : मंगलाचरण


श्री समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ ग्रंथातील दशक सातवा हा चौदा ब्रह्मांचा म्हणून ओळखला जातो. यातील समास पहिला हा ‘मंगलाचरण’ म्हणून आहे. या समासामध्ये समर्थांनी ग्रंथाच्या व पुढील ज्ञानाच्या आरंभी केलेले मंगलाचरण अतिशय मार्मिक आणि आध्यात्मिक अंगाने मांडले आहे.


या समासात प्रारंभ गणपती व सद्गुरू स्तवन (ओव्या १ ते १९) केले आहे. गणेश वंदना करताना समर्थ म्हणतात, मंगलाचरण करताना श्रीगणेशाला सर्व विद्यांचा ‘पूर्वज’ (मूळ पुरुष) असे म्हणतात. गणेशाची रूपवैशिष्ट्ये (मदोन्मत्त हत्तीचे मस्तक, एकदंत, त्रिनयन, चतुर्भुज, परशुपाणी) सांगून त्यांच्या कृपेनेच कवींच्या वाङ्‌मयात गद्य-पद्य रचनांचे लाघव फुलते असा भाव व्यक्त केला आहे.

त्यानंतर मूळमाया आणि शारदा यांचे स्तवन आहे. कुबेरापासून अर्थ, वेदांपासून परमार्थ आणि लक्ष्मीपासून भाग्य मिळते. मूळ पुरुषापासून इच्छाकूपरूपिणी शारदा (मूळमाया) उत्पन्न झाली आहे, जी द्वैत-अद्वैताची जननी आहे आणि अनंत ब्रह्मांडांना आच्छादून आहे.


त्यानंतर सद्गुरू महिम्या सांगताना समर्थ म्हणतात, वेदमातेला वंदन केल्यावर समर्थ सद्गुरूंचे अत्यंत सुंदर वर्णन करतात. सद्गुरू हे आनंदाचे जनक, भवसागराचे तारक, काळाचे नियंते आणि भाविकांची परम स्नेहाळ माता आहेत. त्यांच्या कृपेनेच संसारातील भेदाची कडसणी तुटते आणि आत्मबोध होतो.

या समासाच्या पुढच्या टप्प्यात समर्थ रामदास स्वामी हे संसारातील अज्ञान आणि मोहमयी जीवन (ओव्या २० ते २५) याबाबत सांगतात. समर्थ म्हणतात, संसार हे दीर्घ स्वप्न आहे. समर्थ म्हणतात की हा संसार म्हणजे एक दीर्घकाळ चालणारे स्वप्नच आहे. यात माणसाला मोह आणि अहंता इतकी जडलेली असते की तो सतत ‘माझी बायको, माझे धन, माझी मुले-बाळे’ असेच बरळत राहतो. याचे कारण सांगताना समर्थ म्हणतात, आत्मज्ञानाचा अभाव असल्याने असे घडते. आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्यामुळे अवघ्या ब्रह्मांडगोलावर अज्ञानाचा अंधकार पसरतो. सत्त्वगुणरूपी चांदणे नसल्यामुळे माणसाला जीवनाचा मार्ग दिसत नाही आणि विपरीत ज्ञानामुळे (भ्रमंतीमुळे) तो स्वत:लाही ओळखू शकत नाही.


अज्ञानातील भटकंतीबाबत समर्थ इथे ऊहापोह करतात. देहबुद्धी आणि अहंकारामुळे लोक अज्ञानरूपी घोर निद्रेत झोपलेले असतात आणि मोठमोठ्याने घोरत विषयसुखासाठी आक्रोश करत असतात. असे अनेक लोक जन्माला आले आणि अज्ञानातच मरण पावले. परमेश्वराला न ओळखल्यामुळे त्यांना जन्म-मृत्यूच्या येरझारांचे प्रचंड कष्ट सोसावे लागतात.

या समासात समर्थ पुढे अध्यात्मविद्येचे श्रेष्ठत्व आणि श्रवणाचे महत्त्व (ओव्या २६ ते ३१) सांगतात. इथे समर्थ कष्टांचे निरुपण व अध्यात्मविद्या हा भेद स्पष्ट करतात. हे आयुष्यभराचे कष्ट थांबावेत यासाठी माणसाला आत्मज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच अध्यात्मग्रंथांची आवश्यकता असते. श्रीमद्भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी स्वत: म्हटले आहे की, अध्यात्मविद्या विद्यानां वाद: प्रवदतामहम््। म्हणजे सर्व विद्यांमध्ये ‘अध्यात्मविद्या’ ही सर्वोत्तम विद्या मीच आहे. त्यासाठी एकाग्र श्रवणाची गरज असते. असे अद्वैत तत्त्वज्ञान सांगणाºया ग्रंथश्रोत्याने आपले कान आणि मन पूर्णपणे एकाग्र करून ऐकले पाहिजेत. ज्यांचे मन चंचल आहे, त्यांनीही ग्रंथ एकदा वाचून सोडून देऊ नये; तर वारंवार वाचन करून त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.


परमार्थाची आवड असावी. ज्याला परमार्थाची तळमळ आहे, त्यालाच या ग्रंथाचा खरा अर्थ समजतो. जसे आंधळ्या माणसाला डोळ्यांशिवाय नयनरम्य निधी दिसत नाही, तसेच परमार्थाची आवड नसलेल्या माणसाला या आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ होत नाही. इथे समर्थ मराठी भाषेचा आणि प्राकृत ग्रंथांचा गौरव (ओव्या ३२ ते ४४) करतात. पण समर्थ म्हणतात, भाषा कोणतीही असो, सार महत्त्वाचे असते. काही मंदबुद्धी लोक असा मूर्खपणाचा दावा करतात की, मराठी भाषेत काय आहे? चांगल्या माणसांनी प्राकृत (मराठी) ग्रंथांतील अध्यात्म ऐकू नये. यावर समर्थ अत्यंत मार्मिक दृष्टांत देतात. लोहाची मांदूस केली । नाना रत्नेंच सांठविली । ती अभाग्याने त्यागिली । लोखंड म्हणोनि ॥ म्हणजे लोखंडाची पेटी करून त्यात जर अमूल्य रत्ने ठेवली, तर ती पेटी फक्तलोखंडाची आहे म्हणून कोणी मूर्ख माणूस तिचा त्याग करेल काय? नाही! प्राकृतामुळे संस्कृताची महती स्पष्ट होते. प्राकृत भाषेत अगदी सोप्या शब्दांत वेदांताचे व सिद्धांताचे सार मांडलेले असते. ते मंदबुद्धी लोक न समजता सोडून देतात. मराठीसारख्या लोकभाषेतून अद्वैताचा सोपा अनुभव मिळत असेल, तर तो अवश्य घेतला पाहिजे.

व्युत्पत्तीपेक्षा सत्संगगमनाचे श्रेष्ठत्व जाणावे. व्याकरण किंवा शब्दरचनेचे मोठे श्रम न करता केवळ सत्संगगमनामुळे सर्व शास्त्रार्थ आणि जीवनाचे मूळ वर्म सहज समजू शकते. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भांड्यांत खाद्यपदार्थ ठेवले तरी अन्नाची चव बदलत नाही, त्याचप्रमाणे भाषा बदलली तरी ग्रंथाचा मूळ अर्थ बदलत नाही. त्यामुळे बाह्य भाषाभिमान किंवा अहंकाराचा त्याग करून ग्रंथातील ‘सार’ (अर्थ) ग्रहण करावे.


पुढच्या टप्प्यात या समासात समर्थ माया व ब्रह्मस्वरूप (ओव्या ४४ ते ६१) याबाबत बोलतात. वाच्यांश आणि लक्ष्यांश याबाबत इथे समर्थ ऊहापोह करतात. शब्द (वाच्यांश) मागे पडून जेव्हा अर्थावर (लक्ष्यांश) लक्ष केंद्रित होते, तेव्हाच भगवंतांचा अगाध महिमा कळू शकतो. ही स्वानुभवाची खूण आहे. पुढे ते मायेचे स्वरूप सांगतात. समर्थ म्हणतात, पुढील निरुपणासाठी मायेचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. माया ही सगुण-साकार आहे, पंचमहाभूतांचा विस्तार आहे, मनाला भास करणारी आणि विवेकज्ञानाशिवाय न तुटणारी आहे. या पहिल्या समासाच्या शेवटी समर्थ श्रोत्यांना सावध करून पुढील समासात ब्रह्मज्ञानाचे (परब्रह्माचे) निरुपण करणार असल्याचे सांगतात, ज्याने मायेचे भान पूर्णपणे नष्ट होते.

प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा



No comments: