समर्थ रामदास स्वामींनी मंत्रांचा असलेल्या दशक पाचव्यातील दुसºया समासात गुरुलक्षणाचे वर्णन करताना पुढे सांगितले आहे की, वेदांच्या अंतरंगात म्हणजे अर्थात उपनिषदांमध्ये जे ब्रह्मज्ञान गुप्तपणे वास करते ते ज्ञान सद्गुरू बाहेर काढतात. लहान मुलाला लहान लहान घास जसे भरवावे तसे ते ज्ञान सद्गुरू आपल्या बोलण्याने हळूहळू शिष्याच्या कानामध्ये घालतात, त्याला श्रवण करवितात. शिष्याचा अधिकार व धारणाशक्ती पाहून सद्गुरू त्याला आत्मज्ञानाची गूढ रहस्ये सोपी करून सांगतात. वेद असोत, शास्त्रे असोत किंवा थोर सत्पुरुष असोत, या सर्वांचा आत्मस्वरूपाचा अनुभव एकच असतो. ज्ञान या दृष्टीने सर्वांचे आत्मज्ञानसारखेच असते. साक्षात्कार या दृष्टीने सर्वांचा आत्मसाक्षात्कार समान असतो. अगदी तोच अनुभव, अगदी तेच ज्ञान आणि तोच साक्षात्कार सद्गुरूला झालेला असतो. त्याच्या ठिकाणी वेद, शास्त्र व सत्पुरुष ज्ञानानुभवाने एकरूप झालेले असतात. म्हणून वेदांचे रहस्य, शास्त्रांचे विवेचन, सत्पुरुषांचा अनुभव आणि सद्गुरूचा उपदेश सर्व अगदी एकरूप असले पाहिजेत. सद्गुरू सर्व प्रकारचे संशय अगदी मुळासकट नष्ट करून टाकतो. तो मोठ्या आदराने स्वधर्माचे आचरण करतो. वेदाला विरुद्ध असणारे म्हणजेच आत्मज्ञानाला सोडून असणारे मिथ्या भाषण करणे त्याला माहीतच नसते.
आत्मज्ञान फारच सुक्ष्म असल्याने सद्गुरूच्या देहावर अथवा त्याच्या दैनंदिन व्यवहारात त्याचे अमूक चिन्ह दाखविता येत नाही. याचा फायदा घेऊन खोटे गुरू जगात बोकाळतात. म्हणून सद्गुरू नाही कोण हे श्री समर्थ पुनश्च सांगतात. समर्थ म्हणतात की, मनात जे जे येते ते ते कोणाची लाज भीड न बाळगता जो उघडपणे करतो तो काही सद्गुरू नव्हे. तो भिकारी आपल्या मागे लागण्यासाठी आला असे समजावे. सद्गुरू मुक्त असतो म्हणजे बंधनरहित असतो याचा अर्थ तो आपल्या मनाला गुरासारखे मोकाट सोडतो असे नव्हे. सत्पुरुषाची मुक्तावस्था ही आत्मज्ञानातून प्रगट होणारी अतिमानवी अवस्था असते, वासनेच्या अधीन होऊन बेशरमपणे इंद्रियभोग भोगण्याची हीनमानव पशुवृत्ती नसत. जो आपल्या शिष्याला साधनात कसे राहावे हे शिकवीत नाही, इंद्रिये आवरून ताब्यात कशी ठेवावी ते दाखवीत नाही, असले गुरू दमडीला तीन मिळाले, इतके स्वस्त मिळाले तरी त्याच्या नादी लागू नये. त्यांना सोडून दूर राहावे.
समर्थ म्हणतात की, इंद्रियदमन करून साधनेत कसे राहावे ही अनुभवाची विद्या सद्गुरूपाशी असावयास पाहिजे. जो आत्मज्ञान समजावून देतो, सगळीच्या सगळी अविद्या नाहीशी करतो, इंद्रिये ताब्यात ठेवण्याचा अभ्यास सांगतो तोच खरा सद्गुरू समजावा. अविद्येचा अंमल चालत असल्यामुळे दृश्य जग सर्वस्वी सत्य वाटते. त्यामुळे इंद्रियांना आवर घालण्याची शक्ती व युक्ती शिष्याला शिकविणे हे सद्गुरूचे प्रधान कार्य आहे. काय सांगावे! काही गुरू सद्गुरू म्हणवून घेतात आणि पैशांसाठी लाचार होतात, शिष्याच्या अधीन होतात, वासनेच्या नादी लागून दीनवाणे बनतात.
या समासात स्वामी म्हणतात की, असे गुरू शिष्याच्या अधीन होतात. शिष्याच्या मनाला जे जे आवडेल ते ते करून शिष्याला प्रसन्न ठेवण्यासाठी धडपडतात. याचे कारण पापिणी वासना त्यांच्या मानगुटीस बसलेली असते, येथे सगळा उलटा प्रकार आढळतो. वास्तविक शिष्याने सद्गुरूच्या अधीन राहून त्याची मनधरणी करावयास हवी. शिष्य वासनेच्या नादी असायला हवा. पण गुरूच जेव्हा वासनेने झपाटतो तेव्हा तेथे परमार्थ कसला! सगळा स्वार्थाचाच बाजार असतो! शिष्याच्या भिडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरू अधमांत अति अधम असतो. असा गुरू चोरटा, द्रव्याचा लोभी, दुष्ट आणि फसवा आणि नीच असतो. गुरुबाजीला यापेक्षा आणखी कोणत्या शिव्या द्यावयाच्या शिल्लक आहेत! वैद्यकीचे ज्ञान नसणारा एखादा दुष्ट वैद्य रोग्याला सर्वस्वी नागवितो आणि त्यात पुन: भीड घालून शेवटी रोग्याचा सर्वस्वी घात करतो. तसे हे नामधारी गुरू असतात. ज्याच्यामुळे आपण आणि देव यांच्यामधील अंतर वाढते, आपण देवापासून दुरावतो व जो भीड घालून आपल्याला देहबुद्धीच्या बंधनांत अधिकच गुंतवतो, असा गुरू नसावा. अलीकडेच चार, पाच महिन्यांपूर्वी आपल्याकडे घडलेले अशोक खरात प्रकरणातील गुरू आणि शिष्य याच्या भोंदुगिरीचे दर्शन समर्थांनी चारशे वर्षांपूर्वी दाखवून दिले आहे. असे भोंदुगिरी करणारे आपण अनेक गुरू नियमित पाहत असतो.
म्हणून समर्थ म्हणतात की, ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान आहे आणि प्रत्यक्ष व्यवहारात साधनेचे आचरण आहे, असा सद्गुरूच आपल्याला आपले गुप्त आत्मस्वरूप दाखवितो. अंतर्यामी खरे खरे ब्रह्मज्ञान आणि नित्याच्या बाह्य किंवा दृश्य व्यवहारात साधकाला शोभेल असे आचरण, या दोन गोष्टींनी संपन्न पुरुषच शिष्याला उपयोगी पडतो. त्यापैकी एक उणे असेल तर निदान सामान्य प्रापंचिक शिष्याला तरी परमार्थ प्राप्त होणे कठीण जाते. काही गुरू आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश, नाद व सुगंध यांचे अतींद्रिय अनुभव दाखवितात. काही शिष्यांच्या कानात मात्र मंत्र सांगतात. एवढेच ज्ञान ज्याच्यापाशी असते ते बिचारे स्वत:च भगवंतापासून दूर असतात.
समर्थ पुढे सांगतात की, शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती यांचा मनोहर संगम ज्या पुरुषाच्या ठिकाणी आढळेल तीच उत्तम लक्षणांनी संपन्न अशा सद्गुरूची खूण आहे. जो मुमुक्षु आहे म्हणजे खरोखर हवा अशा जिज्ञासूने त्याला अगदी मनापासून व आदराने शरण जावे, त्याच्या चरणी लीन व्हावे. तीन प्रचितीचा भावार्थ असा, उदा. शरद ऋतूमधील पौर्णिमेचा मनोहर चंद्रमा घ्या. वेदांच्या काळापासून अनेक स्त्री-पुरुष त्याचे दर्शन घेत आले. आपण सुद्धा त्याचे दर्शन घेतो. प्रत्येकाचे मन त्याच्या सौंदर्याने भारून जाते. त्याचप्रमाणे वेदांच्या काळापासून मोठमोठे आत्मज्ञानी होऊन गेले, आजही मोठे आत्मज्ञानी आहेत. आणि साधना करून आपणही आत्मज्ञानी होऊ . सर्व आत्मज्ञानी पुरुषांना सच्चिदानंदाचे होणारे दर्शन सारखेच असले पाहिजे. पौर्णिमेचा चंद्रमा दृश्य विश्वाचा भाग असल्याने त्यात कदाचित फरक पडेल. परंतु शाश्वत सच्चिदानंदस्वरूपामध्ये यत्किंचितही फरक होणार नाही. म्हणून श्रुतीमध्ये आणि संतांच्या ग्रंथामध्ये वर्णिलेला स्वरूपानुभव, आपल्या सद्गुरूचा स्वानुभव आणि आपला स्वत:चा अनुभव मूलत: एकरूपच असले पाहिजेत.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment