Saturday, October 3, 2026

दशक पाचवा : मंत्रांचा : समास दुसरा : गुरुलक्षण (४)


प्रत्येकाच्या आयुष्यात सद्गुरू हा अत्यंत महत्त्वाचा असतो. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील पाचव्या दशकातील दुसºया समासात गुरुलक्षण सांगताना सद्गुरूचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा उहापोह म्हणूनच आपण सविस्तर करत आहोत. श्री समर्थ आता सद्गुरूची लक्षणे वर्णन करतात. आत्मसाक्षात्कार होऊन स्वच्छ, स्थिर ब्रह्मज्ञान होणे हे सद्गुरूचे खरे प्रधान लक्षण आहे. बाकीची सारी लक्षणे या लक्षणावरच आधारलेली आहेत.


सद्गुरूचे मुख्य लक्षण असे की, सर्वप्रथम त्याला शुद्ध ब्रह्मज्ञान असले पाहिजे. त्या ज्ञानामुळे त्याच्या ठिकाणी अगदी निश्चल समाधान पाहिजे. आत्मस्वरूपामध्ये तो अखंड स्थिरपणे राहिला पाहिजे. आत्मज्ञानाने त्याचे सर्व संशय नाश पावतात. तो समाधानकारक बनतो. तो स्वस्वरूपापासून कधीही ढळत नाही. याबरोबरच तो अतिशय वैराग्य संपन्न असतो. त्याचे मन कशातही गुंतलेले नसते. याशिवाय स्वधर्माच्या बाबतीत त्याचा आचार अत्यंत निर्मळ असतो. ज्ञान अंत:करणात वास करते. पण त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष आचरणात दिसले पाहिजे. सद्गुरूच्या जीवनात ज्ञान आणि व्यवहार यांची सुसंगती असते.

हे असून शिवाय सद्गुरूपाशी अध्यात्म विषयाचे नेहमी श्रवणीय ज्ञान असते. त्याच्यापाशी नित्य हरिकथा आणि निरुपणे चालतात. जेथे निरंतर परमार्थाचे विवरण चालते, जेथे नित्य सारासार विचार किंवा आत्मानात्मविवेक चालतो, तेथे जगाचा उद्धार होत असतो. पुष्कळ लोकांना नवविधा भक्ती कशी करावी हे त्याच्यापाशी समजते. कोणतेही ज्ञान जिवंत असते आणि त्याचा व्यवहार झाला म्हणजे त्यापासून पुष्कळ लोकांना फायदा होतो. सद्गुरूपाशी आत्मज्ञान असते. श्रवण, निरुपण आणि विवरण या मार्गांनी त्याचा व्यवहार होतो. म्हणून जेथे श्रवण, निरुपण आणि विवरण सतत चालते तेथे अनेकांचे संदेह निवारण होतात व अनेकांचा बुद्धीचा निश्चय होऊन ते भगवंताच्या मार्गाला लागतात. म्हणून ज्या ठिकाणी नऊ प्रकारची भक्ती आचरली जाते आणि जेथे साधनमार्गास अत्यंत महत्त्व असते ते सद्गुरूचे लक्षण आहे असे श्रोत्यांनी ओळखावे. अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान आणि बाहेर अत्यंत मनापासून केलेली उपासना अशी जोड जेथे असते तेथे अनेक साधकांना व उपासकांना समाधान मिळते, ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाला शोभेल असे बाह्य आचरण असणे फार अवश्य आहे ही गोष्ट श्री समर्थ पुन: पुन्हा सांगत आहेत.


रामदास स्वामी सांगतात की, ज्या परमार्थाला उपासनेचा, प्रत्यक्ष आचरणात असणा‍ºया भक्तीचा आधार नाही, तो परमार्थ कामाला येत नाही. कर्माची जी शिस्त आहे ती सुटली तर अनाचार स्वैराचार वाढून माणसे भ्रष्ट होतात. या कारणासाठी आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्मकर्माचे आचरण, भगवंताचे साधन, हरिकथा, निरुपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा या गोष्टींपैकी एक जरी कमी असली तरी परमार्थदृष्टीने ते विपरित दिसते. म्हणून जेथे सद्गुरू असतो तेथे या सर्व गोष्टी प्रकर्षाने आढळतात. सद्गुरूभोवती गोळा होणारी माणसे सामान्य योग्यतेची असतात. त्यांचे वैराग्य काय, उपासना काय आणि भगवंताचे प्रेम काय सगळेच सामान्य असते. अशा लोकांना पचेल व जमेल असाच साधनमार्ग सांगावा लागतो, नव्हे स्वत: आचरून दाखवावा लागतो. म्हणून सद्गुरूपाशी वरील सर्व गोष्टी हव्या.

समर्थ म्हणतात की, ज्ञानाला व्यवहाराची जोड फार अवश्य असते हीच गोष्ट ते पुन्हा सांगतात. सद्गुरू अनेकांना जवळ ठेवून घेतो व त्यांचे पालनपोषण करतो. त्याला पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते. अशा सामर्थ्यवान सद्गुरूपाशी परमार्थाची अनेक साधने असतात. साधनाशिवाय परमार्थ पोसण्याचा प्रयत्न केला तर काही काळ तो चालतो, परंतु लगेच तो विलयास जातो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टी ठेवून साधनेची प्रतिष्ठा वाढवितात. जे परमार्थपुढारी सदाचार सोडतात, उपासना टाकतात ते भ्रष्ट दिसतात, अभक्त दिसतात. अशा लोकांच्या गुरूपणाला आग लागो, असे स्वामी म्हणतात. त्यांना कोण विचारतो! परमार्थामध्ये ज्याने गुरुत्व आपल्याकडे घेतले त्याने आपल्या आचरणाची किती काळजी घ्यावयास हवी हे यावरून ध्यानात येईल.


स्वामी सांगतात की, ज्या परमार्थामध्ये कर्म आणि उपासना दोन्हींना जागा नाही तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सापडतो. अशा लोकांचा परमार्थ मिंधा असतो. प्रापंचिक लोक त्यांना हसतात. वास्तविक जे जे काही उत्तम आहे, भगवंताला पोषक आहे, तेथे सद्गुरूचे अधिष्ठान असते. तरी पण समाजामध्ये अनेक प्रकारचे गुरू प्रचलित असतात. ते काही सद्गुरू होऊ शकत नाहीत. मोक्ष देणारा तोच फक्त सद्गुरू होऊ शकतो. सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरूचे लक्षण म्हणून मानायला हरकत नाही. हे जरी खरे तरी सद्गुरूची बरोबर ओळख होण्यास इतर गुरूंबद्दल माहिती सांगणे जरूर आहे. एक नुसता गुरू तर एक मंत्रगुरू असतो. एक यंत्रगुरू तर एक तंत्रगुरू असतो, एक व्यायामाचा गुरू तर एखाद्याला लोक राजगुरू म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात. एक कुलगुरू तर एक मानलेला गुरू असतो, एक विद्यागुरू तर एक अविद्यागुरू म्हणजे भलतीच विद्या शिकविणारा गुरू असतो. एक खोटा गुरू तर एक जातीला शिक्षा करणारा गुरू असतो. एक माता गुरू तर पिता गुरू असतो, एक राजाचा गुरू तर एक देवगुरू असतो. ज्याच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला जगद्गुरू म्हणतात. अशा प्रकारचे हे सतरा गुरू सांगितले. याहून आणखी जे निराळे गुरू आहेत, त्यांचेही वर्णन ऐका. एक स्वप्नगुरू तर एक दीक्षागुरू असतो, कोणी देवाच्या प्रतिमेलाच गुरू मानतात. कोणी म्हणतात की, आम्ही स्वत:च आमचे गुरू आहोत. ज्या जातीचा जो धंदा आहे तो धंदा शिकविणारा गुरूच बनतो. असा विचार केला तर गुरूंच्या संख्येला शेवटच नाही. या रीतीने गुरूंची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये प्रत्येक गुरूचे मत निराळे असते. परंतु या सर्वांहून मोक्ष देणारा सद्गुरू मात्र वेगळाच असतो. आत्मज्ञानातून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण आणि त्याहीपेक्षा अज्ञानी जीवाबद्दल अत्यंत दया अंगी असणे हे सद्गुरूचे लक्षण श्रोत्यांनी ध्यानांत ठेवावे.

- प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



No comments: