Tuesday, September 8, 2026

दशक दुसरा : समास चौथा : भक्ती निरूपण


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातील मूर्खलक्षणनाम दुसºया दशकातील चौथ्या समासात भक्ती निरूपण केलेले आहे. यात त्यांनी भाग्याच्या चढत्या पाय‍ºया सांगितल्या आहेत. समर्थ म्हणतात की, अनेक जन्मी जी सत्कर्मे केली त्यांचे फळ म्हणून हा नरदेह आपल्याला मिळतो. त्यामध्ये भाग्य फळले तरच माणूस सन्मार्गास लागतो. आधी नरदेह हे भाग्य, त्यात ब्राह्मण, त्यावर स्नानसंध्या, त्यावर उत्तम वासना, त्यावर भगवंताचे भजन, या गोष्टी पूर्वपुण्याईने घडतात. भगवंताची भक्ती ही उत्तमच पण त्यात संतांचा समागम मिळणे हे त्याहून उत्तम होय. अशा रीतीने आयुष्याचा काळ सार्थकी लागतो. हाच सर्वश्रेष्ठ लाभ समजावा. अंतर्यामी भगवंताबद्दल खरे प्रेम आणि बाहेर संगतीला भक्तांचा समूह असावा. मग कुठे उत्सव होऊन जेव्हा अखंड हरिकथा चालते त्याने भगवंताचे प्रेम दुप्पट वाढते.


समर्थ सांगतात की, या जन्मात आत्महित साधण्यासाठी काय काय उपयोगी पडते त्याचे वर्णन आता करतो. आपल्याला नरदेह मिळाला आहे. काही तरी त्याचे सार्थक करून घ्यावे. तसे केले तर अति दुर्लभ असणारा परलोक प्राप्त होतो. यथासांग ब्रह्मकर्म करावे किंवा दया, दान, धर्म करावा किंवा सोपे असे भगवंताचे भजन करावे. पश्चात्तापाने संसाराचा त्याग करावा किंवा भक्तीच्या मार्गास लागावे किंवा संतांचा समागम करावा.

अनेक शास्त्रांचा खोल अभ्यास करावा किंवा तीर्थयात्रा तरी कराव्यात किंवा पापक्षय होण्यासाठी चांगली पुरश्चरणे करावी. अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानमार्गाचा विचार करावा किंवा संत आणि सद्गुरू यांच्याकडून ऐकलेल्या प्रवचनांतील सारासार शोधून पाहावे. वेदांची आज्ञा पालवी, कर्मकांड पाळावे, उपासना करावी, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा अधिकार येतो, पात्रता येते. कायेने, वाचेने आणि मनाने, तसेच पान, फूल, फळ किंवा पाणी यापैकी कशाने तरी भगवंताची पूजा करावी आणि सार्थक करून घ्यावे.


समर्थ म्हणतात की, जन्मास येऊन जर आत्महित साधले नाही तर ते जगणे मृतप्राय समजावे. आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो त्याचे काही तरी फळ पदरात पाडून घ्यावे. असे जर केले नाही तर जन्म आपला वाया जातो आणि आपला देह केवळ भूमिभार होतो. काही तरी आत्महित करून घ्यावे हेच या नरदेहाला अत्यंत योग्य आहे. आपली शक्ती असेल त्याप्रमाणे आपले मन आणि धन आपण भगवंताकडे लावावे.

यापैकी काहीच मनावर घेऊन जो करीत नाही तो जगात जिवंत असून मेल्यासारखे जगतो. जन्म घेऊन त्याने आपल्या आईला उगाच कष्ट दिले. अशा प्रकारची जिवंत असून मेल्याप्रमाणे जगणारी माणसे कशी असतात त्यांचे वर्णन येथे समर्थ करतात. त्यांच्यापाशी स्नान, संध्या, भजन, देवपूजा, मंत्र, जप, ध्यान आणि मानसपूजा यांपैकी काहीच नसते. भक्ती, प्रेम, निष्ठा, नेम, देव, धर्म, पाहुणा यांपैकी काहीच नसते. सद्बुद्धी, सद्गुण, हरिकथाश्रवण, अध्यात्मनिरूपण, यांपैकी काहीच नसते. त्यांच्यापाशी भल्यांची संगती नाही, शुद्ध, चित्तवृत्ती नाही, खोट्या गर्वामुळे, अहंकारामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही. नीती, न्याय, पुण्याचा उपाय, परलोकाची सोय आणि योग्य अयोग्य कृतीबद्दल विचार यापैकी काहीच नसते. विद्या, वैभव, चातुर्याचा विलास, कला व सुंदर सरस्वतीचा वाग्विलास यापैकी काहीच नसते. शांती, क्षमा, दीक्षा, म्हणजे एखादे घेतलेले व्रत, मैत्री, शुभ व अशुभ यांचा विवेक आणि साधना यापैकी काहीच नसते.


पावित्र्य, स्वधर्माचरण, सदाचार, सद्विचार, इहलोक आणि परलोक यांपैकी काहीच नसते. त्याच्यापाशी फक्त मनाला येईल त्याप्रमाणे वागण्याची स्वच्छंदता असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग, धारिष्ट, यापैकी काहीच आढळत नाही.

समर्थ पुढे सांगतात की, विरक्ती, त्याग, समता, उत्तम लक्षणे आणि परमेश्वराबद्दल आदर किंवा प्रेम यापैकी काहीच नसते. त्याला दुस‍ºयाचा गुण पाहून संतोष वाटत नाही, परोपकार केल्याने होणारे सुख नाही, त्याच्या अंतर्यामी हृदयामध्ये भगवंताच्या भक्तीचा लेशदेखील आढळत नाही.


रामदास स्वामी या समासात सांगतात की, अशी अपवित्र माणसे टाळावीत. भक्ती घडविण्यास पुण्य लागते. अशा तºहेची माणसे पाहिली म्हणजे ती जिवंत प्रेतासारखी वाटतात. पवित्र माणसाने त्यांच्याशी बोलू सुद्धा नये. ज्याच्यापाशी हवी तेवढी पुण्यसामग्री असते त्यालाच भगवंताची भक्ती घडते. जे जसे वागतात, कर्म करतात तसेच त्यांना त्याचे फळ मिळते. याठिकाणी मुर्खलक्षणनाम दुसºया दशकातील चौथ्या समासाची ते समाप्ती करतात.

प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा



No comments: