समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात स्वगुणपरीक्षानाम तिसºया दशकातील पहिल्या समासात जन्मदु:ख निरुपण केलेले आहे. यातील पहिल्या दहा ओव्यांमध्ये श्री समर्थांनी मानवी जन्म या घटनेची तत्त्वज्ञानदृष्ट्या आणि स्वरूपानुभवाच्या पार्श्वभूमीवर लक्षात येणारी लक्षणे सांगितली आहेत. अव्यक्त अस्वस्था ही आपली स्वाभाविक स्थिती आहे, देह धारण करून व्यक्तीमध्ये येणे म्हणजे खाली घसरणे आहे. त्यामुळे अपूर्णपणाच्या सर्व अडचणी सोसाव्या लागतात, दृश्याच्या ताब्यात जावे लागते, आणि समाधान राखणे कठीण जाते.
या समासात समर्थ म्हणतात, जन्म म्हणजे दु:खरूपी वृक्षाचा अंकुर असतो. वासना जन्माचे बीज आहे. जगातील दु:खाचे मूळ कारण तीच आहे. पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचे दृश्य रूप असते. अंकुर हा आरंभ आहे. तो जसजसा वाढतो तसतसे त्यांतील दु:ख प्रकट रूप धारण करते. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्वकाली, सर्व ठिकाणी दु:खाच्या खाºया पाण्याने भरलेले असते. जन्म म्हणजे कधीही न ढळणारा भीतीचा डोंगर आहे. मानवी जीवनात भय खोलवर रुतून बसलेले आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनातील भय काही केल्या हलत नाही, मग नाहीसे होण्याची गोष्ट तर दूरच राहते.
स्वामी म्हणतात, जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. जीवाच्या सर्व कर्मसाठ्यापैकी काही भाग भोगण्यासाठी जीव जन्म घेतो असे वेदांत म्हणतो. कर्म सूक्ष्म अवस्थेत असते. त्याचा भोग होण्यासाठी आश्रय म्हणून देहाची जरुरी लागते. म्हणून सूक्ष्म कर्म देहरूपी आकार घेऊन जन्म पावते. अर्थात जन्म कर्ममय आहे. जन्म म्हणजे पापाची खाण आहे, भगवंतांचे स्मरण ते पुण्य व त्याचे विस्मरण ते पाप होय. भगवंत अदृश्य तर जग दृश्य आहे. दृश्याचा जोर मोठा विलक्षण असतो. जगात जन्माला आल्यावर दृश्याच्या दडपणाखाली जीव भगवंताला विसरूनच जातो. त्याला विसरून केलेले सगळे पापच असते. जन्म म्हणजे काळाचा नित्य नवा जाच आहे. दृश्यामध्ये क्षणाक्षणाला बदल घडवून आणणारी शक्ती ती काळच आहे. काळाचे तोंड नेहमी विनाशाकडे असते. रोज नवीन बदल व नवा नाश पुढे वाढून ठेवतो म्हणून काळ जाच करतो. जन्म म्हणजे कुविद्येचे फळ. कुविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते व वासना असते तोपर्यंत जन्म घेणे चुकत नाही. जन्म म्हणजे लोभाचे कमळ असते. लोभ म्हणजे आसक्ती. लाकूड कोरणारा भुंगा जसा कमळात अडकून पडतो तसा ब्रह्मस्वरूप जीव आसक्तीत गुंतून देहात जन्म घेतो, देहात अडकून पडतो. जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा असतो. जन्म येण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते. त्याचे ज्ञान स्वच्छ असते. जन्म येऊन जगाचे वारे लागले की स्वरूपाची नेणीव निर्माण होते. मी देह आहे या भ्रमाचा पडदा ज्ञानावर पडून जीव भ्रमतो. जन्म म्हणजे जीवाचे बंधन असते. देह धरला की देहाच्या मर्यादा जीवावर लादल्या जातात, जीव आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. बंधनातच तो जगतो व बंधनातच देह ठेवतो. जन्म हे मृत्यूचे कारण असते. जन्म व मृत्यू परस्परावलंबी किंवा सापेक्ष घटना आहेत. एक असेल तर दुसरे असते. म्हणून जन्म आला की, मागोमाग मृत्यूही येतो. जन्म म्हणजे दृश्याच्या गुंतागुंतीत विनाकारण गुरफटणे. सूक्ष्म शरीर दृश्यांत येण्याची धडपड करते म्हणून जन्म येतो. दृश्य अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे आहे. एकदा त्यामध्ये अवतरल्यावर सामान्य माणूस त्यात गुरफटूनच जातो. मग त्यापासून जीवाला फार दु:ख होते. पण हे सगळे ओढवून घेण्याची जरूर होती का? अर्थात नाही.
या समासात स्वामी म्हणतात, जन्म म्हणजे सुखाचा विसर होय. आपल्यापाशीच आपले सुख आहे हे विसरल्याने जीव देहाद्वारे बाहेरून सुख मिळविण्याची धडपड जन्माच्या मुळाशी आहे. जन्म म्हणजे चिंतेचा मळा असतो. चिंता ही भीतीची प्रिय कन्या आहे, जेथे भय तेथे चिंता असतेच. म्हणून मानवी जीवनात अमाप प्रमाणात चिंता पिकते. जन्म म्हणजे वासनेचा मोठा विस्तार असतो. वासना जन्मास कारण होते. पण ती सूक्ष्म असते, देह मिळाल्यावर मग ती भरमसाट वाढते. ती स्वर्गलोकापर्यंतसुद्धा पोचते. जन्म म्हणजे जीवाला स्वरूपापासून खाली ओढणारी किंवा स्वानंदापासून बाहेर काढणारी अवस्था असते. जन्म आला की जीव स्वरूपापासून च्युत झालेला असतो. जन्म म्हणजे कल्पनेचा छाप अथवा शिक्का असतो. कल्पना हेच मुळात दृश्य सृष्टीचे कारण आहे. मी देह आहे ही सूक्ष्म कल्पना जीवाला जन्मास घालते. जीवावर कल्पनेचा छाप असतो. जन्म म्हणजे ममतारूप डाकिणीचे झपाटणे असते. माझेपणाच्या वृतीने एकदा का जीव गुंतून गेला की, तिचा अंमल सुटता सुटत नाही, मेल्यावरही ती सोडीत नाही, जन्म म्हणजे मायेने केलेले कपट असते. दृश्य खरे दिसते, पण खरे नसते. पण मायेच्या लीलेने जीव फसतो आणि सत्यबुद्धीने दृश्याच्या नादी लागतो. ही देहबुद्धी मायेचे कपट असते. जन्म म्हणजे रागाचे वीरपण असते. अगदी कोवळ्या तान्ह्या बाळापासून ते अगदी सुज्ञ वृद्धापर्यंत कोणीही माणूस क्रोधाच्या तावडीतून सुटलेला नसतो. जन्म म्हणजे मोक्षाला आडवे येणारे विघ्नच असते. वास्तविक भगवंताच्या सत्तेनेच जीवाचे सर्व व्यवहार होतात. तो भगवंताचाच आहे. ते सोडून तो वेगळा झाला की द्वैत निर्माण होते आणि जीवास जन्म येतो. जीव मीपणाने वेगळा होतो. जन्म हा अहंतेचा गुण होय. मीपणा कार्यप्रवण होतो तेव्हा अहंकार पुढे येतो. अहंकार म्हणजे दर्शनी मीपणा समजावा. अर्थात, अहंकार जीवाला जन्म घेण्याकडे ढकलतो. जन्म म्हणजेच ईश्वराचे विस्मरण असते. ईश्वराचे स्मरण म्हणजे विद्या, तर त्याचे विस्मरण म्हणजे अविद्या. अविद्येतून वासना उमटते आणि वासनेपोटी जन्म येतो.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment