दासबोधातील पाचव्या दशकातील तिसºया समासात शिष्यलक्षण सांगताना समर्थ म्हणतात की, सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ असतो. सद्गुरू सतशिष्याला जे देतो ते देव देऊ शकत नाही. सद्गुरूच्या कृपेने सतशिष्य स्वत: देवपदाला पोहोचतो. सद्गुरूहून देव मोठा आहे असे ज्या शिष्याला वाटते तो खरोखर कमनशिबी असतो. हा समज म्हणजे एक भ्रमच आहे. वैभवाच्या अभिमानातून बाहेर पडणारा तो विकल्प असतो किंवा सामर्थ्य मिळविण्याच्या नादाचा तो परिणाम असतो. शरीराच्या दृष्टीने म्हणजे स्थूलदृष्टीने सद्गुरू माणूस दिसतो व असतो हे काही खोटे नाही. परंतु मनाच्या व आत्म्याच्या दृष्टीने किंवा सुक्ष्मदृष्टीने तो प्रत्यक्ष परमात्मस्वरूपच असतो. जो शिष्य सद्गुरूला नुसत्याच स्थूलदृष्टीने किंवा देहबुद्धीच्या दृष्टीने पाहतो त्याला आपल्या श्रीमंतीचा व सत्तेचा अभिमान वाटणारच. मग तो सद्गुरूला गरीब समजून देवाला फार मोठा मानतो. सद्गुरू भेटून त्याला पाहताना देहबुद्धीचा भ्रमात्मक दृष्टिकोन न सुटणे हेच करंटेपण होय. सद्गुरूचे खरे स्वरूप कायम टिकणारे आहे, अविशानी आहे. देवाचे स्वरूप अशाश्वत आहे, कारण कल्पांताच्या वेळी देव नाश पावतात. त्या समयी हरिहरांचे सामर्थ्यसुद्धा उरत नाही. ब्रह्मादी देव नाहीसे झाले तरी सद्गुरू जसेच्या तसेच टिकतात. म्हणून सर्व देवांहून सद्गुरूचे सामर्थ्य अधिक असते. क्षुद्रबुद्धीच्या मानवाला ही गोष्ट कळत नाही. गुरू आणि देव यांची बरोबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा. त्याच्या मनात खोट्या ब भ्रमात्मक कल्पना घट्ट बसवलेल्या असतात. त्यामुळे खरे तत्त्व काय आहे ते त्याला कळत नाही. वास्तविक माणूस आपल्या कल्पनेने देव तयार करतो, मंत्राने त्याला देवपणा येतो. परंतु ईश्वराला सुद्धा सद्गुरूची कल्पना करता येत नाही. म्हणून सद्गुरू हा देवापेक्षा कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहे. सद्गुरूचे स्वरूप असे कल्पनातीत असल्याने त्याचे वर्णन करण्यामध्ये वेदशास्त्रांत कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहे. सद्गुरूचे स्वरूप असे कल्पनातीत असल्याने त्याचे वर्णन करण्यामध्ये वेदशास्त्रात फारच मतभिन्नता आढळते. आपापसात त्यांची भांडणापर्यंत पाळी येते.
या समासात समर्थ म्हणतात की, देव काय आणि हे सगळे विश्व काय दृश्याचा सारा पसारा मायेच्या कक्षेत येतो. सद्गुरूच्या स्वरूपाला मायेला स्पर्श नाही. सद्गुरूचे स्थान परमश्रेष्ठ असल्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही. सगळे देव मायेतून निर्माण होतात म्हणून त्यांचे सामर्थ्य सद्गुरूपुढे लटके पडते. असो, ज्याच्यावर सद्गुरूची कृपा असते, त्याच्यावर इतर कोणाची सत्ता चालत नाही. त्या कृपेने शिष्याला ब्रह्मज्ञान होते. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्याने तो साºया वैभवाला क:पदार्थ मानतो.
स्वामी म्हणतात की, सद्गुरूकृपेच्या जोरावर सतशिष्याला आत्मसाक्षात्कार होतो, आत्माचे प्रत्यक्ष ज्ञान त्याच्या अंतकरणात जिवंतपणे उसळत राहिल्याने मायेसकट सारे प्रचंड विश्व खरेपणाने त्याला दिसत नाही. आत्मज्ञानाने तो इतका भरून जातो की आत आणि बाहेर जिकडे तिकडे आत्मस्वरूपावाचून इतर काही त्याला दिसतच नाही. त्यामुळे तो सतशिष्य स्वत:च ईश्वरस्वरूप बनून जातो. तात्पर्य, ‘मी ब्रह्म आहे’ या दिव्य अवस्थेला सतशिष्य पोहोचतो.
समर्थ रामदास स्वामींनी शिष्यसमुदायामध्ये सतशिष्य कसे वेगळे पडतात याचे वर्णन पुढे केले आहे. ज्याचे अंत:करण पश्चातापाच्या आगीने पोळते ते निर्मल होते, शुद्ध बनते. पण ते तापलेले अंत:करण सद्गुरूच्या बोधवचनांनी शांत होते. सतशिष्याची अवस्था ही अशी असते. समर्थ म्हणतात की, सद्गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असता सारे ब्रह्माड पालथे पडण्याचा प्रसंग आला तरी सद्गुरूच्या वचनावर असलेला सतशिष्याचा शुद्ध अढळ विश्वास यत्किंचितही मागे पुढे होत नाही. अशा रीतीने जे खरे खुरे सद्गुरूला शरण सतशिष्य मानवतेकडून देवत्वाकडे झपाट्याने वाटचाल करतो. अर्थात त्यामुळे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. तो सर्व दृष्टीने मोठा निर्मल व पवित्र बनून जातो.
समर्थ म्हणतात की, सतशिष्याच्या चित्तामध्ये अशी अढळ श्रद्धा असते, त्यामुळे तो मोक्षाचा हक्कदार होतो. बाकीचे शिष्य नुसते शिष्याचा वेष पांघरणारे लबाड वाईट शिष्य समजावे. त्यानंतर यापुढील सोळा, सतरा ओव्यांमध्ये श्री समर्थांनी नामधारी शिष्याचे वर्णन केले आहे. त्यांच्या मनामधून प्रपंचाचे प्रेम कमी झालेले नसते. किंबहुना प्रापंचिक वासना फलित व्हाव्या यासाठीच ते शिष्य बनतात. असे हे पढतमूर्ख विनोदासाठीच परमार्थ करतात. समर्थ म्हणतात की, जे पढतमूर्ख असतात त्यांना मनातून इंद्रियभोगांमध्ये सुख वाटत असते. केवळ लौकिकासाठी ते परमार्थ करतात. आपण परमार्थी आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी ते सद्गुरूला शरण जातात. वासना तृप्त करण्यासाठी इंद्रियभोगांमध्ये ते यथेच्छ रमतात, त्यांना प्रपंचाचे घट्ट प्रेम असते. त्यामुळे परमार्थामधील सूक्ष्म विचार त्यांना आकलन होत नाही. सारखी बहिर्मुख वृत्ती राहिल्याने त्यांना भगवंताबद्दलचे विचार करता येत नाहीत. पढतमूर्ख माणूस परमार्थाकडे वळतो खरा परंतु त्याचे मन प्रपंचात अडकलेले असते, प्रापंचिक वासनांनी भरून गेलेले असते. त्यामुळे कुटुंबाचे ओझे वाहता वाहता हमालाप्रमाणे त्याची अवस्था होते. त्याचे खरे सुख प्रपंचात गुंतलेले असते, केवळ करमणुकीसाठी तो परमार्थ करतो. भ्रमात राहणारा, मूर्ख व मंद बुद्धीचा तो माणूस वासनेमध्ये अडकलेला असतो. एखाद्या डुकराला सुगंधी लेप लाविला किंवा एखाद्या रेड्याला चंदनाचा लेप चोळला तर त्यांना त्याची किंमत कळत नाही. त्याचप्रमाणे वासनेत गुरफटलेल्या माणसाला ब्रह्मज्ञान सांगितले आणि आत्मानात्माविवेक शिकविला तर त्याची किंमत कळत नाही. उकिरड्यामध्ये म्हणजे अत्यंत दुर्गंधीमध्ये लोळणाºया गाढवाला सुगंधाचा आनंद आकलन होत नाही किंवा अंधारामध्ये जीवन जगणाºया घुबडाला सूर्यप्रकाशात विहार करणाºया हंसाच्या मुक्त जीवनाची कल्पना येऊ शकत नाही. तो सतत इंद्रियभोगाच्या घाणीत उडी घेतो, खाली घसरतो. थोबाड वर करून एखादे कुत्रे ज्याप्रमाणे हाडे चघळण्यात आनंद मानते, त्याचप्रमाणे इंद्रियाधीन माणसाला इंद्रियभोगात आनंद वाटतो. इंद्रियसुखासाठी तो बेचैन असतो. त्या त्याला सोसत नाही त्याचप्रमाणे इंद्रियासक्त माणसाला आत्मज्ञान पचत नाही. गाढवे राखता राखता त्यांच्या संगतीत ज्या कुंभाराचा जन्म जातो त्याला विद्वानांच्या सभेत बसविले तर ते त्याला मानवत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियभोगामध्ये गुंतलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही.
प्रफुल्ल फडके/बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment