- ऑक्टोबरमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन दिवसांत खांदेपालट निश्चित मानला जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांऐवजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवले जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. हा प्रकार म्हणजे मृत्यूशय्येवर असलेल्या काँग्रेसला ऑक्सीजन देण्याचा प्रयत्न आहे. परंतु दहा अकरा वर्षांपूर्वी हा केलेला प्रयोग काँग्रेसला याखेपेला तारू शकणार नाही हे निश्चित. 2003 साली विलासराव देशमुख यांना हटवून अचानक वर्षभरासाठी निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सुशीलकुमार शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले होते.
- त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. फक्त एकच साम्य आहे की सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा केंद्रात भाजपचे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार होते. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. आताही भाजपचे रालोआ सरकार केंद्रात आहे. परंतु तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती यात जमिन आसमानाचा फरक आहे.
- सुशीलकुमार शिंदे हे सध्या उपचारासाठी अमेरिकेत आहेत. काँग्रेसची साठ वर्षाच्या सत्तेतील ही फलश्रृती आहे. चांगली आरोग्यसेवा आणि विश्वासार्ह उपचार पद्धती निर्माण करण्यास काँग्रेसला जमले नाही. त्यामुळे सोनिया गांधींपासून सगळ्यां काँग्रेस नेत्यांना उपचारासाठी अमेरिकेत जावे लागते. अशा उपचारासाठी अमेरिकेला गेलेल्या सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेस श्रेष्ठींनी तातडीने मायदेशी परतण्यास सांगितले आहे. त्यामुळे उपचारांच्या बेडवरून आता मुख्यमंत्रीपदाच्या चेअरवर सुशीलकुमार शिंदे यांना आणले जाईल असे दिसते. एका आजारी राज्याची धुरा एका आजारी नेत्याला देण्याचे धारिष्ट्य काँग्रेस करताना दिसत आहे.
- पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर काँग्रेस श्रेष्ठी नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यामुळे नेतृत्व बदलून राज्यातील स्थिती मजबूत करण्याचा श्रेष्ठींचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांचीही नाराजी आहे. गेली साडेतीन वर्ष अशा विरोधातच मुख्यमंत्री काम करत होते त्यामुळे राज्याचे निर्णय त्यांना कसे घेता येणार? त्यात आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांबरोबरचे त्यांचे संबंध हे विळा भोपळ्याचे सख्य आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच पेंडिंग फायलींवरून शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कान उपटले होते. परंतु ती वेळ खांदेपालटाची नव्हती. कारण चव्हाणांइतका कोरा, स्वच्छ चेहरा त्याघडीला काँग्रेसकडे नव्हता. परंतु आता मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधलेले अनेकजण रिंगणात आहेत.
- मुख्यमंत्रिपदासाठी औरंगाबादचे पालकमंत्री, महाराष्ट्राच्या शिक्षणाची ज्यांनी वाट लावली ते माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही नावाची चर्चा आहे. पण बाळासाहेब थोरातांकडे ही सूत्र दिली तर काँग्रेसला दहाच्या ऐवजी पाचच जागांवर समाधान मानावे लागेल. कारण शिक्षण, कृषी, महसूल या सगळ्या खात्यांमध्ये त्यांनी गलिच्छ असा कारभार केलेला आहे. राज्यातील कोट्यवधी बालकांचे शैक्षणिक नुकसान त्यांनी केलेले आहे. त्यामुळे सूज्ञ आणि सुजाण नागरिक, पालकांनी काँग्रेसला नाकारलेच असते.
- आणखी एक बाशिंग बांधलेले नेते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही नावाचा श्रेष्ठींकडून विचार शक्य आहे. परंतु विखे पाटलांनाही महाराष्ट्र स्विकारणार नाही. परिवहन मंत्री असताना त्यांनी केलेल्या एसटी महामंडळाचे नुकसान हे सामान्यांना त्रासदायक ठरले आहे. त्याशिवाय त्यांनी कधी महाराष्ट्राशी फारसा संपर्क ठेवलेला नाही. त्यामुळे विखे पाटलांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. त्यांची परिस्थितीही बाळासाहेब थोरातांसारखीच होईल.
- महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री बदलला नाही तर विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो. अशीच भीती श्रेष्ठींना वाटते. शरद पवार यांनीही दिल्लीत ए. के. अँटनी यांची भेट घेऊन राज्यात नेतृत्व बदलाचा आग्रह धरला होता. यासगळ्या पार्श्वभूमिवर नेतृत्त्वबदल होणार हे निश्चित आहे. पण हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर आड खणण्याचा प्रकार आहे. गेल्या पंधरा वर्षातील काँग्रेसची निष्क्रियता सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री कसे दूर करणार. साचत गेलेल्या निष्क्रियतेचा फटका हा काँग्रेसला बसल्याशिवाय राहणार नाही. ही निष्क्रियता एकट्या पृथ्वीराज चव्हाणांची आहे हे भासवणे म्हणजे काँग्रेस हे स्वत:चे समाधान करून घेत आहे. मुख्यमंत्री कोणीही झाला तरी तो काँग्रेसचा असणार आहे. त्याला स्वत:च्या मर्जीने काम करता येते काय हा खरा प्रश्न आहे. महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा की नाही, कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या फायलीवर सही करायची, कोणते काम करायचे यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोनिया गांधींची परवानगी लागते. त्यांना स्वत:चे असे काही मत नसतेच. त्यामुळे महाराष्ट्राचा काँग्रेसचा मुख्यमंत्री हा बोलका बाहुला केव्हा कळसूत्र बाहुला असतो. त्यामुळे एक बाहुला बदलून दुसरा बाहुला आणल्याने राज्याचे कसे भले होणार? ही निव्वळ फसवणूक आहे.
- 2009 च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे केंद्रिय उर्जा मंत्री होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात शेतकर्यांना मोफत वीज देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र 2012 पर्यंत भारनियमनमुक्त करणार असल्याचे आश्वासनही सुशीलकुमार शिंदे यांनीच दिले होते. आज महाराष्ट्रात मोफत सोडा विकत देण्यासाठीही सरकारकडे वीज नाही. अशा फसव्या आश्वासने देणार्या नेत्याच्या जोरावर का काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत यश मिळणार आहे?
- सध्या विधानसभेत काँग्रेसच्या जवळपास शंभर जागा आहेत. आता ते संख्याबळ 25 पर्यंतही राहणार नाही असे चित्र आहे. सगळ्या आघाड्यांवर हे सरकार फेल झालेले असताना सुशीलकुमार शिंदेना आणून काय उजेड पडणार आहे? मुळात सुशीलकुमार शिंदे हे आता इतके थकले आहेत की ते महाराष्ट्राचा कारभार चालवू शकतील अशी शक्यता नाही. भले दोनच महिने जरी मुख्यमंत्री म्हणून त्यांना रहायचे असले तरी ते काही चमत्कार घडवू शकणार नाहीत. आदर्श प्रकरणात दोन वर्षांपूर्वी त्यांची चौकशी झाली होती तेव्हा त्यांनी आपल्या जबानीत आपल्याला काही आठवत नाही अशी उत्तरे दिली होती. स्मरणशक्ती नसलेला माणूस या राज्याचे नेतृत्त्व कसे काय करू शकणार? निष्क्रियता झाकण्यासाठी केवळ मुलामा चढवावा त्याप्रमाणे सुशीलकुमार शिंदे यांना आणून काहीही साध्य होणार नाही.
- जातीयवाद हा काँग्रेसचा आत्मा आहे. महायुतीकडे सध्या रामदास आठवलेचा रिपाइं पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला दलित व्होट बँक मिळवण्यासाठी आम्ही एका दलित नेत्याला मुख्यमंत्री केले हे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. परंतु यामुळे काहीही फरक पडणार नाही. खरें तर सुशीलकुमार शिंदे हे स्वबळावर आणि ओपनमधून निवडून येतील असे नेते होते. 2003 ला जेेव्हा ते सर्वात प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा ते राज्यातील पहिले दलित मुख्यमंत्री अशी हवा निर्माण केली. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असणार्या सुशीलकुमार शिंदे यांना दलित करून टाकले. हे सगळं राजकारणासाठी केले गेले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली 2004 च्या निवडणुका जिंकल्यावर याच दलित नेत्याला हटवण्यासाठी काँग्रेसने लॉबिंग केले. त्यामुळे जातीयवादावर आधारीत काँग्रेसची ही चाल याखेपेला यशस्वी होणार नाही.
Thursday, June 19, 2014
खांदेपालट स्वार्थासाठी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment