Wednesday, February 25, 2015

पप्पू पुन्हा नापास झाला ...

  •   सत्ता पालटानंतर पहिल्याच होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राहुल गांधींनी अनुपस्थिती दर्शवली आहे. राहुल गांधींना एकांताची गरज असल्याचे सांगून सोनिया गांधींनी त्यांचे समर्थन केले आहे. लोकसभेत कॉंग्रेसचे संख्याबळ अल्प असताना, विरोधाची धार कमकवत असताना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ज्यांनी गतवर्षी निवडणूक लढवली त्या राहुल गांधींनी आत्ताच रजेवर जाणे योग्य होते काय? त्यामुळे पप्पू पुन्हा नापास झाला काय असे म्हणावे लागेल.
  •    लोकसभेच्या आणि  त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवाबद्दल कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना चिंतन करायचे आहे. हे चिंतन करण्यासाठी ते परदेशात जाणार आहेत की हिमालयाच्या सान्निध्यात, याची कल्पना कोणालाच नाही.  पण पक्षाने आपणाला चिंतनासाठी रजा द्यावी, अशी त्यांनी विनंती केली आहे. ही विनंती नामंजूर होणारच नव्हती. पण चिंतनासाठी ही वेळ का निवडली, हा प्रश्न कोणाच्याही मनात येऊ शकतो. ज्यावेळी अध्यादेशाने आणलेली विधेयके मंजूर होण्याची वेळ आहे, तेव्हा विरोध करून, आपली हुषारी दाखवण्याची संधी असताना आमचा पप्पू म्हणजे राहुल गांधी अज्ञातवासात का जात आहेत?
  •       सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले. यात मोदी सरकारचा दुसरा पण अत्यंत महत्त्वाकांक्षी असा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर न राहता व विरोधी पक्षाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारला धारेवर न धरता राहुल गांधी यांना चिंतन करायचे आहे, हे अनाकलनीय आणि न पटणारे आहे. कॉंग्रेसने संपूर्ण हार मानली आहे काय? देशातील कॉंग्रेस पूर्ण संपली आहे काय असा यातून प्रश्‍न निर्माण होतो. सत्तेवर नसेल तर कॉंग्रेस काहीच करू शकत नाही काय असा याचा अर्थ होतो. २००४ पासून राहुल गांधी लोकसभेवर निवडून जात आहेत; पण त्यांनी लोकांच्या लक्षात राहील असे एकही भाषण केलेले नाही. आता सत्तेत नसताना त्यांची अवस्था बुरशी लागलेल्या पावासारखी झाली काय?
  •      लोकपाल विधेयकावर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. पण ही भूमिका लोकपाल विधेयकावरून निर्माण झालेल्या पेचातून कॉंग्रेसची सोडवणूक करणारी होती. त्यानंतर ते लोकसभेत मागच्या बाकावर बसलेले दिसतात. अर्थात पक्षाने संसदेत त्यांच्याकडे कोणतेही काम सोपवलेले नाही. पण बोलण्यास मात्र बंदी केलेली नाही. गेले नऊ महिने संघ परिवाराचा घरवापसी, भाजप नेत्यांची आक्रस्ताळी विधाने व मोदी सरकारकडून निघालेले आठ वादग्रस्त अध्यादेश यावरून देशभर वादळ उठले असताना राहुल गांधी यांनी संसदेत तर नाहीच; पण रस्त्यावरही भाजप सरकारशी दोन हात करण्याची तसदी घेतलेली नाही. विरोधक कमी असताना आणि सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ जास्त असताना प्रखरपणे विरोध करता येवू शकतो हे दाखवण्याची संधी राहुल गांधींनी घालवली त्यामुळे पप्पू पुन्हा नापास झाला म्हणावे लागेल.
  •     कॉंग्रेसला तशी चिंतनाची परंपरा नाही. नेहमीच सत्तेत येत असल्याने या पक्षामध्ये एक प्रकारचा अहंगड आला होता. राहुल गांधी तसे अहंभावी नेते नाहीत; पण राजकारणात राहून संन्यासाकडे झुकलेले ते नेते आहेत. येत्या दोन महिन्यांत कॉंग्रेसमध्ये ऐतिहासिक बदल होण्याची चर्चा असून राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद दिले जाणार आहे. हे अध्यक्षपद त्यांच्याकडे जाऊ नये म्हणून कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा संघर्ष सुरू झाला आहे. त्याची ठिणगी महिनाभरापूर्वी जयंती नटराजन यांनी टाकली होती. त्यांनी थेट राहुल गांधी यांच्या विरोधात टीकास्त्र डागले होते. त्यामुळे कॉंग्रेसमधील एकंदरीत उफाळलेला राजकीय संघर्ष पाहता राहुल गांधी यांना फार गहन चिंतन करावे लागेल. पण हे चिंतन करण्यासाठी त्यांनी आत्ताची वेळ निवडली यामुळे पप्पू पुन्हा नापास झाला असेच म्हणावे लागेल.
  •    कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद पत्करल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्व कौशल्याची चर्चा सुरू झाली. पण त्यांचे एककल्ली वर्तन, जनता व मीडियापासून त्यांचे सततचे दूर राहणे,महत्त्वाच्या राजकीय घटनांवेळी अनुपस्थित राहणे, यूपीए सरकारच्या काळात त्यांचे काही प्रसंगांदरम्यान झालेले बेजबाबदार वर्तन, या वर्तनाची देशभर झालेली टवाळी याचा फटका कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यावरून राहुल गांधी यांच्या कारकीर्दीतच हा पक्ष रसातळाला जाईल व पक्षाला वाचवण्यासाठी प्रियंका गांधी यांना पुढे आणावे लागेल, असे कॉंग्रेसचे निष्ठावान बोलू लागले होते.
  •       दिल्ली निवडणुकीत शून्याचा आकडा गाठल्यानंतर तर राहुल गांधी यांच्यावर यथेच्छ टीका झाली होती. पण त्यांचा व त्यांच्या पक्षाचा लोकांशी तुटलेला संपर्क हा काही कालपरवाचा मुद्दा नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे मिळालेल्या विजयामुळे कॉंग्रेस पक्षाचे वर्तन बेमुर्वतखोरपणाचे झाले होते. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या काळात तर कॉंग्रेसचे वर्तन असंवेदनशील असे होते. देशभर असंतोष पसरला असतानाही राहुल गांधी लोकांपुढे आले नाहीत. विशेषत: निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण तरूणाई रस्त्यावर उतरली असताना त्या तरूणाईला सामोरे जाण्याचे औचित्य राहुल गांधींनी दाखवले नव्हते, यासारखे कॉंग्रेसचे दुर्दैव ते कोणते असेल?
  •   तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना कलंकित खासदारांना निवडणूक लढवण्याबाबतचा अध्यादेश त्यांनी सर्व देशासमोर फाडून फेकला होता. या एकूण घटनाक्रमामुळे कॉंग्रेस पक्षाविषयी लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्या वेळेपासून आजपर्यंत पक्षाचे व या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे वर्तन असे का झाले होते, याचे स्पष्टीकरण एकालाही द्यावेसे वाटले नाही. म्हणूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसविरोधात आलेली असंतोषाची लाट मोदींना कॅश करता आली. कॉंग्रेस पक्षाचा जनाधार हा गरीब-मध्यमवर्गीय-श्रीमंत, दलित-आदिवासी-अल्पसंख्य, शेतकरी असा व्यापक होता. हा जनाधार राहुल गांधी यांना आता पुन्हा मिळवावा लागेल. नाही तर त्यांचे काही आठवड्यांचे चिंतन एक फार्स ठरेल. पण कोणतीही कृती योग्यवेळी केली तर त्याला खरा अर्थ असतो. आज सरकारला धारेवर धरण्याची आणि विरोधक म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची संधी असताना अशाप्रकारे रणछोडदासाच्या भूमिकेत राहुल गांधी अज्ञातवासात जात असतील तर पप्पू पुन्हा नापास झाला असेच म्हणावे लागेल.

No comments: