सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे ती भारतीय जनता पार्टी. त्यांनी सांगितले होते काय? स्वप्न दाखवले होते काय? प्रत्यक्षात घडते आहे काय? सरकार बदलले पण परिस्थिती काहीच बदलली नाही. ना सामाजीक बदलली ना राजकीय. महागाई आटोक्याबाहेर आहे. भ्रष्टाचार आटोक्याबाहेर आहे. गुन्हेगारीचे प्रमाणही जैसे थे आहे. कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची वेळ काही ठिकाणी आहे. त्यामुळे नेमके बदलले काय? असा सामान्यांचा प्रश्न आहे. आज ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हणून सत्तेवर आलेल्या भाजपामध्ये सध्या प्रचंड खदखद आहे. अनेक आमदार असंतुष्ट आहेत. नुकतीच ही खदखद राजपुरोहीतांच्या तोंडून बाहेर पडली आहे. आता रावसाहेब दानवेंनी त्याची सारवासारव केली असली तरी सामान्य माणसाला काय ते समजले आहे. राजपुरोहीतांची सीडी ही बोगस ठरवणे भाजपला तसे काही अवघड नाही. पण ही खदखद बाहेर पडते आहे याची जाणिव पक्षाला झाली आहे हे निश्चित. आज सत्तेसाठी वाट्टेल ते हे भाजपचे धोरण झाले आहे. म्हणजे पूर्वी युद्धात आणि प्रेमात सर्व क्षम्य असते ते समिकरण भाजपने राजकारणातही आणले आहे. १९९५मध्ये युती सत्तेत होती. त्या नंतरची १५ वर्षे उपासमारीत गेली. त्यामुळे पंधरा वषार्र्चे एकदम ओरपायला सुरवात करण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. हा शॉर्टकट अतियश वाईट आहे. कारभार चांगला करून पुन्हा सत्ता मिळवण्याचे धोरण आखले जात नाही. पुन्हा मंत्रिपद मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे प्रत्येकजण अशा कामाला लागला आहे. आता सत्ता मिळूनही उपासमार चालूच असल्याने अनेक भाजप आमदार खवळले आहेत. आज भाजपमध्ये एकाधिकारशाही सुरू आहे. मग ती केंद्रात नरेंद्र मोदींची असो वा त्यांच्या इशार्यावर काम करणार्या देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात. हे सगळे इंदिरा गांधींच्या धोरणाप्रमाणे काम चालले आहे. याचीच जाणिव झाल्यामुळे अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वी आणिबाणीची भिती व्यक्त केली होती. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींनी आपलीच कॉंग्रेस फोडून काहींना तुरुंगात टाकले होते. मोरारजी भाई देसाईंसारखे काही जुने कॉंग्रेस नेते की जे त्यांच्याच मंत्रिमंडळातही होते त्यांनाही तुरुंगात डांबण्याचे काम इंदिरा गांधींनी केले होते. कारण आपल्याला डोईजड होतील ते बाजूला सारण्याचे त्यांचे धोरण होते. नेमके तेच नरेंद्र मोदी करत आहेत. त्यामुळे हे सारे लोकशाहीला मारक होईल असे वाटते. हे सर्व हुकुमशाहीच्या दिशेने चालले आहे असे दिसते. तसं पाहता भाजपाला आणि पर्यायाने संघ परिवाराला तसेही लोकशाहीचे वावडेच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कधीही निवडणूक होत नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणी निवडून दिले आहे काय ? त्यांना या निवडीसाठी किती मते मिळाली हे कोणी सांगू शकेल? याचे उत्तर देता येत नाही. इंदिरा गांधींच्या काळात अगदी राजीव गांधींच्या हत्येपर्यंत कॉंग्रेसमध्येही हीच परिस्थिती होती. कॉंग्रेसअध्यक्षपदासाठी निवडणूक होतच नव्हती, तर नेमणूक होत होती. या प्रथेला आव्हान दिले होते ते सिताराम केसरी यांनी. परंतु नंतर कॉंग्रेसला उतरण लागली. तोच प्रकार या एकाधिकारशाहीने भाजपला लागण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. संघाचे हुकूमशाहीचे मॉडेल म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत. सरसंघचालकाची जशी निवडूक होत नाही त्याप्रमाणेच भाजप आणि सरकारचे काम या देशात चालवू पाहत आहेत. एक अरुण जेटली सोडले तर कोणत्याही मंत्र्याला निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. सगळे निर्णय हे पंतप्रधान कार्यालयातून होतात. कोणाला काही माहित नसते. मोदी आणि त्यांचे सात सेक्रेटरी सारे निर्णय करतात. असं म्हणतात की नरेंद्र मोदी हे अतिशय संशयी माणूस आहेत. मोदींना प्रतिस्पर्धी खपत नाहीत. इंदिरा गांधींचे हेच धोरण होते. वाटेतले काटे आणि प्रतिस्पर्धी दूर करायचे त्यांचे धोरण होते. त्याच पावलावरून सध्याचे भारताचे राजकारण चालले आहे. मोदींना नेहमी मैदान मोकळे हवे असते. त्यामुळेच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, संजय जोशी हे एकेकाळचे दिग्गज आज अक्षरश: अडगळीत फेकले गेले आहेत. संजय जोशी हे खरे तर मूळचे नागपूरचे. १९८०च्या दशकात संघाचे प्रचारक होते. संघाने त्यांना गुजरातमध्ये पाठवले. गुजरातमध्ये त्यांनी भाजपाचे प्रस्थ वाढवले. केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना संजय जोशी यांचा शब्द वाया जात नसे. ही परिस्थिती दीर्घकाळ होती. पण २००१मध्ये नरेंद्र मोदी आले आणि जोशी यांना भाजपाचे सरचिटणीस म्हणून दिल्लीला पाठवण्यात आले. तिथे त्यांच्या सीडीची भानगड निघाली. ती सीडी बनावट असल्याचे नंतर चौकशीत उजेडात आले; पण त्यामुळे जोशी रस्त्यावर आले होते. २०१२मध्ये नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष बनले तेव्हा त्यांनी संजय जोशी यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची सूत्रे दिली. नरेंद्र मोदी यांना हे आवडले नाही. मुंबईत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. जोशी यांना हटवत असाल तरच मी येतो, अशी धमकी मोदींनी दिली. शेवटी जोशींना बाजूला करण्यात आले. तेव्हापासून जोशींचा वनवास सुरू आहे. संजय जोशींसारखे दुखावलेले अनेक जीव आता पंजे मारू लागले आहेत. भाजपाची अंतर्गत लढाई आता मोठी होताना दिसत आहे. जोशी समर्थकांनी मोदींच्या घरासमोर गेल्या आठवडयात लावलेले पोस्टर याच लढाईचा भाग आहे. त्यामुळे संघ परिवार गोंधळला आहे. मोदी संघालाही आता जुमानत नाहीत. इंदिराजींनी स्वत:च कॉंग्रेस फोडली होती. फार ताणून धरले तर मोदीदेखील भाजपा फोडून स्वत:चा स्वतंत्र भाजपा काढतील, याचा संघाला अंदाज आला आहे. पण बिहार आणि उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी हे वादळ सध्या शांत आहे. पण भाजपची ही फूट अटळ आहे हे निश्चित.
Monday, June 29, 2015
अटळ फूट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment