सध्या सर्वच पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले असून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील वारु कसा रोखायचा याचा विचार प्रत्येक पक्ष करताना दिसतो आहे. त्यामुळे वेगवेगळे विचार मांडून विरोधी पक्षांनी मोदींचा घेतलेला धस्का सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. नेमका काय निर्णय घ्यावा हे समजत नसल्यामुळे वेगवेगळे नेते भिन्न मते मांडून संभ्रम निर्माण करत आहेत. एकीकडे काँग्रेस मोदी विरोधी आघाडी करण्याची भाषा करते आहे. तर शरद पवार या आघाडीत जाण्यास उत्सुक असूनही प्रादेशिक पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा मंत्र देत आहेत. त्याचवेळी भाजपचे स्वकीय आणि काँग्रेसमधील फारशी दखलपात्र नसलेले नेते यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखालील अराजकीय मंचात सामिल होण्याची कल्पना करत आहेत. त्यामुळे या विरोधकांच्या भरकटलेपणाचा फायदा मोदी शहा ही जोडगोळी उठवणार हे निश्चित आहे. भाजपाविरुद्ध लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांची तिसरी आघाडी न करावी असे मत पंतप्रधानपदाचे वेध लागलेल्या ममता बॅनर्जींनी व्यक्त केले होते. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र करून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांना लांब ठेवण्याचा पर्यायाने काँग्रेसचे नेतृत्व झुगारण्याचा ममतांचा इशारा काँग्रेसला चांगलाच झोंबलेला दिसतो आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या काँग्रेस अध्यक्ष अखिल चौधरी यांनी ममता बॅनर्जींवर कडाडून टीका करून राहुल गांधींच आघाडीचे नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे ठणकावले. त्याचवेळी राहुल गांधींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालेले नाही हे भासवण्यासाठी ममता बॅनर्जींच्या मताला पुष्टी जोडत शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांनी तिसरी आघाडी करु नये पण आपली ताकद वाढवावी असे सुचवले आहे. शरद पवारांचे हे वक्तव्य फार मजेशीर आहे. एकाचवेळी दोन दगडांवर पाय ठेवून दोघांनाही दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याचवेळी राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नसलेले काही काँग्रेस नेते महाराष्टÑात यशवंत सिन्हा यांच्या अराजकीय मंचावर जाण्याच्या तयारीत आहेत. पक्षात तरूणांना संधी देण्याचे राहुल गांधींचे प्रयत्न सुरू असताना ज्येष्ठ असलेले आणि निष्ठावंत म्हणून गणलेले नेते अडगळीत पडण्यापूर्वीच अराजकीय मंचावर जाताना दिसत आहेत. अर्थात हे सगळे घडत आहे ते विरोधकांनी नरेंद्र मोदींचा मोठा धस्का घेतल्यामुळे घडत आहे. तिसºया आघाडीमुळे समस्या अधिकच वाढतील, असे राष्टÑवादीचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी ममता बॅनर्जींना पटवण्याचा प्रयत्न केला. तसे शरद पवार गेले महिनाभर समविचारी पक्षांशी या संदर्भात चर्चा करीत आहेत. त्यामुळे मोदीविरोधी पक्षांनी आपापल्या राज्यात स्वत:चे गड अधिक बळकट करावेत आणि जिथे भाजपाला पराभूत करणे शक्य आहे, तिथे तेथील स्थितीप्रमाणे जागावाटप करावे, असे पवार यांनी सांगून प्रादेशिक पक्षांच्या मजबुतीकरणातून आपले वर्चस्व जपण्याचा प्रयत्न केला आहे. याचे नेमके कारण म्हणजे मोदी विरोधी आघाडी झालीच तर प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांबरोबर काँग्रेसला जागावाटप करावे लागेल. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला कमीत कमी जागा प्रत्येक राज्यात मिळाल्या तर राष्टÑीय असे स्वरुप असलेल्या काँग्रेसला शंभर जागाही वाट्याला येणार नाहीत. त्यामुळे त्यांचे आत्ता आहे त्यापेक्षा संख्याबळ कमी होईल. याउलट प्रादेशिक पक्षांना प्रत्येक राज्यातील काँग्रेस मतांची टक्केवारी मिळून त्यांचे संख्याबळ वाढेल. यामुळे निवडणुकीनंतर नेतृत्वाचा विषय निघेल तेंव्हा काँग्रेसपेक्षा प्रादेशिक आणि राष्टÑीय पातळीवरील अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या नावाची चर्चा होईल असे शरद पवारांचे धोरण असू शकते. अनुभवी आणि सक्षम असूनही संख्याबळाच्या अभावी काँग्रेस शरद पवारांचे नेतृत्व स्विकारणार नाही अशी भिती किंवा शंका असल्याने शरद पवार हे काँग्रेसच्या जागा वाढवण्यापेक्षा मोदी विरोधकांच्या जागा वाढवण्यावर भर देतील. असा प्रयोग महाराष्ट्रात करण्याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली आहे. लोकसभेतील संख्याबळ काँग्रेसपेक्षा राष्टÑवादीचे जास्त आहे. दोघांचेही एकत्रित संख्याबळ हे एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके असले तरी त्यात काँग्रेसला राष्टÑवादी सरस ठरत आहे. अशीच प्रत्येक ठिकाणी प्रादेशिक पक्षांची कुरघोडी झाली तर त्याचा फायदा काँग्रेसला नेतृत्वापासून लांब ठेवण्यास होईल असे नियोजन असेल. प्रादेशिक पक्षांची ताकद मजबूत करण्यासाठी याचप्रकारे, उत्तर प्रदेशात सपा-बसपा एकत्र आले आहेत. काँग्रेसला त्यांनाच साथ देण्याशिवाय गत्यंतर नाही. बिहारमध्ये राजद व काँग्रेस यांचे सहकार्य असेल. त्यामुळे ममता यांनी ईशान्य भारताच्या सात राज्यांतील २५ जागांबाबत तेथील प्रादेशिक पक्षांशी बोलावे, त्यांना काँग्रेस मदत करेल. त्यामुळे भाजपाचा पराभव करणे शक्य होईल, असे सुचवून शरद पवारांनी आघाडी भक्कम करताना काँग्रेस दुबळी करण्याचे धोरण आखले आहे. अर्थात हे सगळे मोदी यांच्या धसका विरोधकांनी घेतल्यामुळे घडते आहे. ममता बॅनर्जी यांनी तिसºया आघाडीची कल्पना पुरती सोडून दिलेली नाही. त्यांच्यातील महत्वाकांक्षा कायम आहेच. म्हणूनच बॅनर्जी यांना भेटण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव जसे कोलकात्याला गेले, त्याचप्रमाणे द्रमुक, तेलगू देसम, तसेच सपा व बसपाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी त्या चेन्नई, अमरावती व लखनौला जाणार आहेत. परंतु अशा महत्वाकांक्षेमुळे विरोधी मतांचे विभाजन होऊ नये याची भिती विरोधकांना वाटते आहे. म्हणूनच सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही तिसरी वा वेगळी आघाडी करण्याच्या मताचे नाहीत. मोदी विरुद्ध आघाडी असे चित्र २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले, तर आमच्याविरोधात लढण्यासाठी सर्व संधीसाधू पक्ष एकत्र आले, अशी टीका भाजपा करेल. त्यामुळे निवडणूकपूर्व आघाडी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या ताकदीनुसार व अन्य पक्षांच्या मदतीने भाजपाविरोधात लढणेच योग्य ठरेल असे अखिलेश यादवना वाटते. त्याचवेळी भाजपमधील असंतुष्ट यशवंत सिन्हा आणि काही नेते काँग्रेसच्या ज्येष्ठांशी हातमिळवणी करुन वेगळे समिकरण मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे कारण मोदी विरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसेतर नेत्याला गेले तर काँग्रेसचे अस्तित्व देशभरातून संपुष्टात येण्याची भिती त्यांना वाटते. मोदींना हटवण्यासाठी पवारांना नेतृत्व दिले तर काँग्रेसच्या हाती काय लागणार याची चिंताही विरोधकांना आहेच. आगीतून फोफाट्यात जाण्याची त्यांची तयारी नाही.
Sunday, April 1, 2018
विरोधकांनी घेतला मोदींचा धस्का
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment