20/09/2019
कोणत्या तरी गोष्टीला निमित्त लागते, म्हणजे अमूक एक कारण झाले म्हणून तमूक एक घडले, असे म्हणतात, पण प्रत्यक्षात साचत आलेले असते आणि ते एकदम फुटते. पक्षप्रवेश आणि विविध कारणांनी भाजप आणि सेनेत तणाव वाढत आहे, पण हा तणाव दाखवायचा नाही, असा प्रयत्न दोघांकडूनही होत आहे, पण या प्रयत्नातच नकळत प्रतिक्रिया आणि एकमेकांना टोमणे मारण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाव न घेता टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना ३७० प्रमाणेच आता सरकारनं राम मंदिराचा निर्णयही घ्यावा, असं म्हटलं होतं. त्यावर गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर लोक राम मंदिरविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टावर आपला विश्वास ठेवायला हवा, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. १६ जूनला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी सरकारनं याबाबत अध्यादेश काढावा, अशी मागणी केली होती. हा तसा पोरकटपणाच होता, म्हणजे मोदी सरकार पूर्ण बहुमताने आल्याने आता चिंता करण्याचे कारण नव्हते. प्रतीक्षा फक्त न्यायालयाच्या निर्णयाची होती, पण तोवर शिवसेनेला दम धरता येत नाही, यासारखे आश्चर्य ते कोणते.म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नाशिकमध्ये नेमके त्यावर बोट ठेवले. अर्थात, ते बरेच झाले. मोदी म्हणाले की, नाशिकबरोबर प्रभू श्रीरामाचं नावंही जोडलं गेलेलं आहे. मला तुम्हाला आज अजून एक गोष्ट सांगायची आहे की, गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर, बडबड करणाºया लोकांनी राम मंदिर विषयावरून वाट्टेल ते बरळायला सुरुवात केली आहे. देशातल्या सर्व नागरिकांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखायला हवा. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेळ काढून बाबी ऐकून घेत आहे. मग मला कळत नाही की, हे वाचाळवीर लोक कुठून उगवले आहेत? याप्रकरणी ते खोडा का घालत आहेत? आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असला पाहिजे. आपला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास असला पाहिजे. भारताच्या न्यायप्रक्रियेवर आपला विश्वास असला पाहिजे. यामुळेच आज नाशिकच्या पवित्र भूमीवर, मी या वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, देवासाठी, प्रभू श्रीरामासाठी तरी डोळे बंद करून भारताच्या न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवा. कारण नसताना शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढला आणि आपले अज्ञान दाखवले. मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, राम मंदिरासाठी शिवसेना पहिल्या दिवसापासून आग्रही आहे. न्यायदेवतेला आमची विनंती आहे की, लवकरात लवकर जो काही निर्णय असेल, तो द्यावा, पण त्यापलीकडे जाऊन सरकारकडून आमची अपेक्षा आहे की, जसं आपण ३७० कलम हा मुद्दा कोर्टात वाट न बघता आपल्या अधिकारात तो निर्णय घेतला आणि आपलं काश्मीर जे आपण नेहमी म्हणतो की, आपल्या देशाचा, हिंदुस्थानचा अविभाज्य भूभाग होता, आहे आणि राहील त्याबद्दल धाडसाने केंद्र सरकारने जे पाऊल उचललं, तसंच धाडसी पाऊल राम मंदिराच्या बाबतीतसुद्धा केंद्राने उचलावं, अशी आमची अपेक्षा आणि विनंती आहे. हे बोलायची काही आवश्यकता नव्हती. राम मंदिराच्या मुद्यावरून भाष्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचेच कान टोचले आहेत असे नाही, तर याबाबत भाष्य करणाºया अनेकांचे टोचले आहेत. वास्तविक राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेनेचा वारंवार आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पंतप्रधानांनी राम मंदिरासंबंधी केलेलं वक्तव्य हा निश्चितच सेनेला लगावलेला टोला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांना 'छोटा भाऊ' म्हणून संबोधलं होतं. राम मंदिराच्या प्रश्नावर न्यायालयावर विश्वास ठेवा, हे पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य म्हणजे मोठ्या भावानं धाकट्या भावाला दिलेला सबुरीचा सल्ला आहे. शिवसेना-भाजपची युती अजूनही जाहीर झालेली नसताना पंतप्रधानांनी इतक्या स्पष्टपणे आपल्या सहकारी पक्षावर निशाणा साधणं सूचक आहे. नाशिकमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी स्थिर सरकारला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं. पंतप्रधानांच्या या विधानाचा दुसरा अर्थ भाजपला बहुमतानं निवडून द्या, असाही असू शकतो. गेल्या निवडणुकीत भाजपला १२२ जागा जिंकता आल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना २३ जागा कमी पडल्या होत्या. शिवसेना सोबत आली असली, तरी अनेकदा त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांचीच भूमिका बजावली. नाणारसारखा प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे रखडला. त्यामुळे आपली धोरणं राबवण्यासाठी भाजपला बहुमताची गरज आहे. पंतप्रधान जेव्हा स्थिर सरकारचं आवाहन करतात, त्यावेळी ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी. नुकतंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची पहिली वीट आम्हीच रचू, असं विधान केलं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासंबंधी केलेलं वक्तव्य हे निश्चितपणे उद्धव ठाकरेंना दिलेलं प्रत्युत्तर आहे. मुळात शिवसेना आणि भाजप युतीमध्ये सगळं काही आलबेल नाहीयं. त्यांचं जागावाटप निश्चित झालेलं नाहीयं. त्यावरून कुरबुरी सुरू आहेत आणि असे वाद सुरू असताना एकमेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टोले लगावले जातात. याचाच अनुभव पंतप्रधानांच्या वक्तव्यातून आला. हा परस्परांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. कदाचित युती होणार नाही, याचाही हा संकेत आहे. भाजपचा इरादा हा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा आहे. तो वेळोवेळी व्यक्तही झाला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक भाषा हा दबाव तंत्राचा भाग असू शकतो. त्यामुळेच नारायण राणे यांना इतके दिवस शिवसेनेमुळे भाजपने प्रवेश दिला नव्हता. आता त्यांना न जुमानता राणे भाजपमध्ये येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हे कुरघोडीचे राजकारण युती तोडण्याचे निमित्त ठरेल, असे दिसते.20 Sept 2019
Wednesday, December 18, 2019
निमित्ताची वाट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment