बिहारच्या विधानसभा निवडणुका आता लवकरच आहेत. आता इथून पुढे कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुका असल्या, तरी त्यामध्ये महाराष्ट्र पॅटर्नचीच चर्चा होणार हे नक्की. कारण निवडणूक पूर्व युती आणि नंतरची आघाडी याला आता तसा काहीच अर्थ असणार नाही. आज जरी नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी २०० पेक्षा जास्त जागा जिंकेल असे म्हटले असले, तरी त्यात काही तत्थ्य असेल असे वाटत नाही. कारण आता संधीचे आणि सोयीचे राजकारण भारतीय लोकशाहीत रूजत आहे.बिहारमधल्या मागील विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल एकत्र होते. भाजप, राष्ट्रीय लोकसमता पक्षाने दोन्ही जनता दल आणि काँग्रेसचा सामना केला होता. लालूप्रसाद यादव यांच्यावर त्या वेळीही गुन्हे दाखल होतेच. ते तुरुंगात जाऊन आले होते. तरीही त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. आता लालूप्रसाद प्रचाराला बाहेर पडू शकत नाहीत. दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले आहे. त्यांच्या घरातच भाऊबंदकीचे नाट्य रंगले आहे. एकीकडे तेजस्वी यादव विरुद्ध तेजप्रकाश असा सामना रंगतो आहे, तर दुसरीकडे लालूप्रसाद यांच्या सुनेने घर सोडले आहे. तिने छळाचा आरोप केला आहे.अशा परिस्थितीत नितीशकुमार यांना बिहारचे रान मोकळे मिळेल का, अशी चर्चा होत असतानाच आता त्यांच्याच पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये हाती घेतलेल्या अभियानामुळे नितीशकुमार यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. प्रशांत किशोर यांनी अद्याप राजकीय पक्षाची स्थापना केली नसली, तरी त्यांच्या अभियानाचा उद्देश नितीशकुमार आणि भाजपला त्रासदायक ठरेल, असे दिसते. नितीशकुमार यांची बिहारमध्ये वीस वर्षे सत्ता आहे. लालूप्रसाद यादव यांच्या काळात झालेली बिहारची अवस्था त्यांनी सुधारली हे खरे असले, तरी त्यांनीच लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर युती केली होती. म्हणजे जे महाराष्ट्रात घडले तेच बिहारमध्येही घडले आहे. नितीशकुमार आणि लालूप्रसाद हे विळा भोपळ्याचे नाते मागच्या निवडणुकीत एकत्र आले होते. त्यामुळेच आज थोड्या फार अडचणींमुळे त्रस्त असलेल्या नितीशकुमार यांनी भाजप बरोबर आघाडी केली, तरी ती निकालानंतर टिकेलच याची खात्री नाही. कारण आज प्रत्येक प्रादेशिक पक्ष भाजप आणि काँग्रेसला राज्याच्या राजकारणात दूर ठेवताना दिसत आहे. शिवसेनेने महाराष्ट्रात जसे निवडणुकीनंतर वेगळे समीकरण मांडले, तसेच ते प्रत्येक राज्यात होणार हे स्पष्ट झालेले आहे.नितीशकुमार बिहारमध्ये असतात, तेव्हा त्यांची प्रतिमा वेगळी असते. भाजपबरोबर असतात तेव्हा आणखी वेगळी असते! देशाचे राजकारण करण्याची वेळ येते, तेव्हा ते वेगळ्याच प्रतिमेत असतात. एकाच वेळी धर्मनिरपेक्ष प्रतिमा टिकवायची आणि त्याच वेळी भाजपच्या सोबतीचा फायदा घ्यायचा, असे राजकारण फार काळ चालत नाही. आज राज्यात शिवसेनेने तेच केले आहे. तोच फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार हे नक्की.बिहारमध्ये नितीशकुमार यांची तशी राजकीय गोची झाली आहे. त्याचे कारण एकीकडे भाजप सोबतीला हवा; परंतु सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या तीन बाबी त्यांना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे संसदेत सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाºया नितीशकुमार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मात्र वेगळी भूमिका घेतली होती. पवनकुमार वर्मा आणि प्रशांत किशोर यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात वारंवार आवाज उठवला. त्यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. अशा स्थितीत नितीशकुमार यांची गोची झाली. त्यांनीच वर्मा आणि प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी केली; परंतु आता तीच बाब त्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत, त्यांच्याकडे पक्षीय संघटन नाही, असे समजून दुर्लक्ष करणे भाजप आणि नितीशकुमार यांना परवडणार नाही. भाजप आणि काँग्रेसने दिल्लीत हीच चूक केली आणि आम आदमी पक्षाचा उदय झाला. महाराष्ट्र, दिल्ली येथील समीकरणे पाहता आगामी विधानसभा निवडणूक नितीशकुमार यांना तितकी सोपी नाही हे नक्की.एक काळ असा होता की, नितीशकुमार हे पंतप्रधान पदासाठी मोदींचे स्पर्धक होते. म्हणजे ते स्वत: तसे समजत होते. अनेक मोदी विरोधकांनी त्यांचे नाव या चर्चेत ठेवले होते. पण त्याच नितीशकुमार यांना आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही राहणे अवघड आहे.महाराष्ट्रात जसा काँग्रेस, राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेना यांच्यातील धुसफुसीचा फायदा घेतला, तसाच बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल घेणार हे नक्की. महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत झाली म्हणताना अचानक संजिवनी मिळाली. सत्तेत सहभागी होण्याची लॉटरी लागली. तसाच प्रकार बिहारमध्ये होण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यांच्या आजाराचे भांडवलही होईल आणि राष्ट्रीय जनता दलाला थोडा लाभ उठवण्याचा प्रयत्नही होईल. बिहारमध्ये नितीशकुमार यांचेकडे एकहाती सत्ता जाणार नाही आणि स्पष्ट कौल मिळणार नाही याचेच प्रयत्न होतील. त्याचवेळी भाजपच्या सहाय्याने नितीशकुमार यांनी सरकार बनवू नये यासाठीही काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल प्रयत्न करतील यात शंका नाही. त्याचवेळी रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी काहीतरी गडबड ऐनवेळी करू शकते. त्यामुळे आता इथून पुढच्या कोणत्याही निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्न चालणार. निवडणुकीपुरती नितीशकुमार यांची भाजपबरोबर युती असेल. भाजपच्या मतांचा फायदा घेत नितीशकुमार आपले संख्याबळ वाढवतील आणि नंतर ते भाजपला लांब ठेवण्याचाच प्रयत्न करतील. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय हा त्याचाच भाग आहे. शिवसेना नंतर बाहेर पडली पण नितीशकुमार सहभागी झाले नाहीत. त्यांना सगळे पर्याय खुले ठेवायचे आहेत हेच यातून दिसते.
Thursday, March 5, 2020
बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment