Monday, September 28, 2020

गोड आवाजाचा गायक

  गोड आवाजाचे व्यक्तिमत्व प्रख्यात तेलुगु, तामिळ, हिंदी गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचं शुक्रवारी निधन झालं. 1980 च्या दशकात हा एक सुरेल गोड  आवाज संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाला. एकीकडे मोहम्मद रफी यांचे नुकतेच झालेले निधन, तत्कालीन आघाडीचे गायक काळाच्या पडद्याआड जात असताना एक नवा सुरेल आवाज चित्रपटसृष्टीत आला आणि चार दशके या आवाजाने रसिकांना मोहवून टाकले.

त्या काळात शब्बीर कुमार, सुदेश भोसले असे अनेक गायक उदयोन्मुख म्हणून होते. अनेक चित्रपटात ते गातही होते. पण मेलडी मेकर्ससारख्या अनेक ऑकेस्ट्रांमधून गायन करून रफीचा आवाज, मुकेशचा आवाज, नकलाकार म्हणून या गायकांची ख्याती होत होती. पण बॉलीवूडला तेंव्हा खर्‍या अर्थाने गरज होती ती नव्या कोर्‍या आवाजाची. ओरीजनल गायकीची. त्याचवेळी बॉलीवूडमध्ये एस पी बालसुब्रमण्यम, सुरेश वाडकर अशा गायकांचा प्रवेश झाला आणि दोघांनीही बॉलीवूडचे भूक भागवण्यास सुरूवात केली.
    एकेकाळी किशोरकुमार, मुकेश, मोह्म्मद रफी हे जितेंद्रच्या गाण्यांना आवाज देत असत. पण 1980 च्या दशकात जितेंद्रचा आवाज बदलून गेला आणि तो अनेक चित्रपटातून दिसू लागला. ए राजू ओ डॅडी असेल किवा हिम्मतवाला मधील इम्तहान हे गाणे असो जितेंद्रशी तो आवाज एकरूप झाला. त्यापाठोपाठ सलमान खान, कमल हसन असे बॉलीवूड गाजवत असताना त्यांचा आवाज बनण्याचे काम बालसुब्रमण्यमनी केले होते.
   गेल्या काही आठवड्यांपासून एस पी बालसुब्रमण्यम यांना चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आधी श्वासोच्छ्वास करायला त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी केल्यानंतर ती पॉझिटीव्ह आली. कालांतराने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. गेले अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. शुक्रवारी मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याचे वृत्त होते. ही बातमी कळताच प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एमजीएम रुग्णालयात जाऊन एसपी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.  कमल हसन आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचे समिकरणच छान जमले होते. 1980 च्या दशकात आलेला आणि आजही चिरतरूण म्हणावा असा चित्रपट एक दुजे के लिये. कमल हसन रती अग्निहोत्रीचे हिंदीतील पदार्पण. एक सुंदर लव्हस्टोरी पडद्यावर आणायची तर सुंदर गाणी पाहिजेत. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांचा योग्य वापर करून अजरामर अशी गाणी या चित्रपटाला दिली आणि एक चिरतरूण आवाज बॉलीवूडला मिळाला.
   आज एसपी बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. संपूर्ण भारताला त्यांची ओळख झाली ती 80-90 च्या दशकात. जेव्हा सलमान खानचा आवाज म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. सलमान खानचे मैने प्यार किया, पत्थर के फूल, हम आपके है कौन, याशिवाय रोजा आदी अनेक हिंदी चित्रपटांसाठी एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायन केलं होतं. पण त्याही आधी एक दुजे के लिये या गाजलेल्या चित्रपटातली त्यांची गाणी विशेष गाजली होती. एसपी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम केलं होतं.
  सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यांमुळे त्यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. तेलुगु, तामीळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशी तब्बल 40 हजार गाणी गाण्याचा गिनीज विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. केवळ संख्या म्हणून नव्हे, तर एका दिवसांत सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासांत तब्बल 21 गाणी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे हिंदीत त्यांनी 16 गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलं आहे.
  एसपी यांना अभिनयाचीही उत्तम जाण होती. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. यात भारताला त्यांची ओळख पटली ती हमसे है मुकाबला या सिनेमातून. यात त्यांनी प्रभूदेवाच्या भावाची भूमिका केली होती.
   एक दुजे के लिये, मैने प्यार किया आणि हम आप के है कोन या चित्रपटात लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी फारच सुंंदर आणि अविस्मरणीय गाणी दिली होती. मैने प्यार किया मधील फोनवरचे गीत असेल, किंवा त्यांच्या गाण्यातीला धत तेरे की... हा उच्चार हा एकदम मस्त वाटतो.  फक्त हिंदी चित्रपटांची नावे असलेले एक दुजे के लिये चित्रपटातील मेर जीवन साथी, प्यार किये जा हे गाणे म्हणजे एक रसिकांना कमाल होती. एकुणच त्यांनी आपल्या सुरेल गाण्याने रसिकांना मोहवून टाकले होते. बॉलीवूडमध्ये रफी, मुकेश यांच्या जाण्यानंतर जो भार फक्त किशोरकुमार यांच्यावर पडला होता आणि त्या काळात निर्माण झालेली फार मोठी पोकळी भरून काढण्याचे काम एस पी बालसुब्रमण्यम यांनी केले होते. त्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहणारे गायक ठरले.
   सुब्रमण्यम यांनी आपल्या गाण्याची आवाजाची एक विशिष्ठ शैली निर्माण केली. त्यांच्या काळात अनेक गायक आले होते. शब्बीर कुमार, सुदेश भोसले, इजाज अहमद, असे कितीतरी आले. पण प्रत्येकाने मोहमंद रफीसारखे गाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते फार काळ टिकू शकले नाहीत. शब्बीरकुमार यांनी तर मोहमंदरफी सारखेच गायचे व्रत घेतले. त्यामुळे त्यांची भ्रष्ट नक्कल करताना शब्बीरकुमारचा आवाज हा अत्यंत कर्कश वाटू लागला. त्याचवेळी रसिकांच्या कानाला गोड गळ्याची गरज होती. ती पोकळी, गरज सुब्रमण्यम यांनी भरून काढली होती. तो आवाज आज थांबला असला, तरी त्यांच्या दोन दशकातील कामगिरीने ते कायम स्मरणात राहतील.

No comments: