Tuesday, July 13, 2021

बॉलीवूडच्या दिग्गजांसमोर दिमाखात उभा राहणारा सचिन

 



‘सचिन पिळगांवकर’ हे नंतर रुजलेले नाव. अगोदर पडद्यावर आला तो फक्त ‘सचिन’. एक बालकलाकार म्हणून प्रेक्षकांना आवडणारा कलाकार. साधारणपणे बालकलाकार म्हणून काम करणारे अभिनेते तरुण झाल्यावर नायक म्हणून यशस्वी होत नाहीत. अलंकार, राजू श्रेष्ठ किंवा मास्टर राजू अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत, पण हे सगळे अंदाज खोटे ठरवत मराठीतील यशस्वी नायक म्हणून सचिनने नावलौकीक मिळवलाच, पण बॉलीवूडच्या चित्रपटांतील दिग्गज कलाकारांबरोबर सहनायक, सहकलाकार म्हणूनही तितकाच ठामपणे सचिन उभा राहिला. बॉलीवूडमध्ये ‘गीत गाता चल’, ‘बालिका वधू’, ‘नदिया के पार’, ‘आखियोंके झरोकोसे’ असे अनेक हिट चित्रपट त्याने स्वतंत्र नायक म्हणून यशस्वी केले, पण त्या काळात बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद, जितेंद्र, संजीव कुमार यांच्याबरोबर त्याने केलेले चित्रपट तितकेच महत्त्वाचे आहेत.


बालकलाकार म्हणून ‘हा माझा मार्ग एकला’, हिंदीतील ‘ब्रह्मचारी’ अशा चित्रपटांतून जेवढा गोंडस दिसला तितकाच कौतुकास्पद ‘शोले’सारख्या चित्रपटात तो दिसला. कधी ‘गोपाळकृष्ण’ म्हणून पौराणिक चित्रपटातून येणारा, तर कधी ‘रक्षाबंधन’मधून नागकुमार झालेला सचिन. बालकलाकार ते चित्रपटाचा नायक हा यशस्वी प्रवास त्याने केला. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही पडद्यांवर तो यशस्वी झाला. ‘शोले’मध्ये संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया भादुरी असे दिग्गज असल्यावर वाट्याला काय आणि केवढीशी भूमिका येणार? पण तीही तितक्याच ठामपणे करून या कलाकाराने आपले अस्तित्व दाखवून दिले आणि बॉलीवूडला कायम दखल घ्यावी लागली. म्हणूनच त्याचे हिंदी चित्रपटातून सतत दर्शन होत राहिले.

१९७0 आणि १९८0 च्या दशकात धर्मेंद्र, अमिताभ, राजेश खन्ना, जितेंद्र यांचे दिवस होते. त्यात संधी मिळणं म्हणजे कलाकारांचे सोने व्हायचे. या सर्वांबरोबर सचिनने चांगल्या आणि लक्षात राहतील अशा भूमिका केल्या. अमिताभ बच्चन याचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘सत्ते पे सत्ता’. यात सात भावंडांतल्या सगळ्यात छोट्या आणि अमिताभचा लाडका भाऊ अशा सनीची भूमिका सचिनने केली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि सचिनची जोडी चांगली जमली होती. आपल्यासमोर एक सुपरस्टार आहे याचे कसलेही टेन्शन न घेता मराठीतील या कलाकाराने आपली मातब्बरी दाखवून दिली होती. ‘त्रिशूल’मध्येही अमिताभ-सचिन एकत्र आले होते. त्यात तर संजीव कुमार, शशी कपूर आणि अमिताभ अशा तीन नामांकित कलाकारांसमोर सचिन ठामपणे होता. त्यात पूनम धिल्लन त्याची नायिका होती. या दोघांचे ‘गापुची बापूजी गम गम’ हे गाणे तेव्हा चांगलेच गाजले होते.


धर्मेंद्रबरोबर ‘शोले’शिवाय ‘क्रोधी’ आणि ‘दिल का हिरा’ या चित्रपटांतील सचिनच्या भूमिका लक्षात राहणाºया होत्या. ‘दिल का हिरा’मध्ये धर्मेंद्र कस्टम आॅफिसर असतो, हेमामालिनी एअर होस्टेस असते, तर धर्मेंद्रचा धाकटा भाऊ सचिन असतो. हिºयांचे स्मगलिंग करणाºया टोळीत सचिन गुरफटलेला असतो. त्याच्यामुळे कस्टम आॅफिसर असणारा भाऊ धर्मेंद्र आणि वहिनी हेमामालिनी कसे अडचणीत येतात असा धमाल कथानकाचा हा चित्रपट होता. त्यात सचिनची भूमिका महत्त्वपूर्ण होती. धर्मंेद्रचा आणखी एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘क्रोधी’. सुभाष घर्इंच्या या चित्रपटात धर्मेंद्र, हेमामालिनी, मोसमी चटर्जी, झीनत अमान यांच्याशिवाय शशी कपूर, प्राण, प्रेमनाथ अशी दिग्गज मंडळी होती. त्यात सचिन आणि रंजिता ही जोडी लक्षवेधी होती. या दोघांचे ‘चल चमेली बाग में’ हे गाणे खूप गाजले होते. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन संगीतकारांच्या जोड्यांनी याला संगीत दिले होते. बँगराऊंड म्युझिक किंवा पार्श्वसंगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते, तर गाण्यांना संगीत लक्ष्मीकांत प्यारेलालचे होते.

राजेश खन्नाचा उत्तरार्धातील सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘अवतार’. या चित्रपटात राजेश खन्नाचा विश्वासू नोकर ज्याचे नावच सेवक असते ही भूमिका सचिनने केली होती. राजेश खन्ना, शबाना आझमी आणि सचिन यांनी हा चित्रपट गाजवला होता. सचिनच्या या चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. मराठीत नायक म्हणून स्थिरावण्याअगोदर हिंदीत तो दिग्गजांबरोबर स्थिरावला होता.


१९८0 च्या दशकात जितेंद्र-रेखाचे अनेक चित्रपट आले होते. त्यामध्ये गाजलेला चित्रपट ‘जुदाई’. यात जितेंद्रच्या मुलाची भूमिका सचिनने केली होती. ‘जुदाई’नंतर म्हणजे दोघांच्या घटस्फोटानंतर एक मुलगा जितेंद्र बरोबर घेऊन जातो तो म्हणजे सचिन, तर दुसरा मुलगा रेखाकडे राहतो तो अरुण गोविल दाखवला आहे. यात तमन्ना नावाची अभिनेत्री सचिनची जोडीदार होती. यातही मोठ्या मुलाची लक्षात राहील अशी भूमिका सचिनने केली होती. या चित्रपटात अरुणा इराणी या नर्तकीबरोबर नृत्याच्या जुगलबंदीचे दृश्य छान आहे. त्यात सचिन, जितेंद्र यांनी भरपूर नाचून घेतले आहे.

टीव्ही आणि वाहिन्यांचा प्रसार होण्यापूर्वी रुपेरी पडदा ज्या दिग्गज बॉलीवूड कलाकारांनी गाजवला त्यात सचिनने आपले नाव चांगल्यापैकी कमावले होते हे महत्त्वाचे होते. मराठी नायिका हिंदीत गाजतात. यामध्ये नूतन, तनुजा, माधुरी दीक्षित, ऊर्मिला मातोंडकर अशा अनेकांची नावे गाजली, पण मराठी नायक चालत नाहीत असा समज बॉलीवूडचा होता. हे वाक्य सचिनने खोट ठरवले होते. त्याच्या नावावर असंख्य हिट चित्रपट आहेत.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055


2 july

No comments: