Thursday, August 26, 2021

महायुद्धाच्या खाईत


तब्बल २० वर्षांच्या अवधीनंतर अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा करण्यात तालिबानी यशस्वी ठरले. त्यांनी आता राजधानी काबुलवरही कब्जा केला आहे. तालिबान्यांनी अफगाणी अध्यक्षांच्या प्रासादावरही कब्जा केला असून, आता देशातील युद्ध संपले असल्याचीही घोषणा त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेसारख्या महासत्तांची भूमिका, चीनचा दृष्टीकोन, भारत-चीन तणावाचे संबंध, भारत-पाक संबंध, चीन-पाकिस्तान आणि तालिबान्यांची मैत्री हे पाहता आगामी काळातील जागतिक शांततेच्या दृष्टीने अमेरिकेचे प्रयत्न, भारत ही संभाव्य युद्धभूमी झाली, तर जग तिसºया महायुद्धाच्या खाईत ओढले जाईल त्याचीच ही नांदी म्हणावी लागेल.


विशेष म्हणजे अफगाणिस्तानचे अध्यक्षच देश सोडून पळून गेले आहेत. अत्यंत वेगवान पद्धतीने घडलेल्या या साºया घटना विस्मयकारक आहेत. इतक्‍या अल्पावधीत तालिबानी पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा करतील, असे कोणालाही वाटले नव्हते. ९ जुलैला तालिबान्यांनी त्या राज्यातील महत्त्वाचे प्रांत काबीज करण्यास सुरुवात केली आणि जेमतेम सवा महिन्यात ते काबुलपर्यंत पोहोचलेसुद्धा. काबुल विमानतळावर सध्या अफरातफर माजली असून, त्या विमानतळावर अमेरिकन फौजांनी नियंत्रण केले असल्याचे सांगितले गेले आहे. हे नियंत्रण केवळ आपल्या सैनिकांना तेथून सुरक्षित हलवण्यापुरते मर्यादित आहे. याचे नेमके काय परिणाम होतील हे सांगता येत नाही. २० वर्षांपूर्वी ९/११ या अमेरिकेवरील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार करण्याचा विडा उचलला होता. लादेनला पाकिस्तानने थारा दिला होता आणि दहा वर्षांनी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले होते. हे पाहता पाकिस्तान आणि तालिबान्यांचे संबंध किती जवळचे आहेत, हे लक्षात येते. त्यामुळे तालिबान्यांचा असलेला अड्डा पाकिस्तान आणि त्यांना रसद पुरवणारा चीन ही आगामी काळात भारताची डोकेदुखी ठरू शकते. त्यासाठी युद्ध छेडले जाऊ शकते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला युद्धाच्या खाईत लोटणे, हे जगातील कोणत्याही देशाला परवडणारे नाही. कारण एवढी मोठी बाजारपेठ असुरक्षित झाली, तर त्यांच्या अर्थव्यवस्था युद्धाशिवाय डबघाईला येतील. त्यामुळे अमेरिकेने याचा विचार करून तालिबानला संपवले पाहिजे जेणेकरून पाकला जरब बसेल आणि चीनला धडा शिकवता येईल.

अमेरिकन सैन्याला किंवा नाटोच्या फौजांना तेथे राहायचे नाही, हे खूप आधीपासूनच ठरले आहे. ३१ आॅगस्टपर्यंत अफगाणिस्तानातील आपले सारे सैन्य माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. त्याची प्रक्रिया अमेरिकेने खूप आधीपासूनच सुरू केली होती व त्यानुसार त्यांनी आपला तेथील सारा बाडबिस्तरा आवरला आहे. सध्या केवळ तीन हजार अमेरिकन लष्कर अस्तित्वात होते व तेही तेथून माघारीच्या प्रयत्नात आहे, म्हणजेच येत्या दोन दिवसांत तेथील अमेरिकन सैन्य पूर्ण मागे घेतले जाईल आणि अफगाणिस्तानवर तालिबान्यांची एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित होईल. जगाच्या दृष्टीने ही एक अत्यंत घातक घटना आहे.


मुळातच तालिबानी एका विकृत स्वरूपाच्या धोरणाने पछाडलेले लोक आहेत. त्यामुळे जगापुढे पुन्हा दहशतवाद्यांचा नवा धोका उभा राहिला आहे. केवळ अफगाणिस्तानवर ताबा मिळवून तालिबानी स्वस्थ बसणार नाहीत. त्यांना आता मोठे पाठबळ मिळाले आहे. जराशी स्थिरता मिळाल्यानंतर तालिबानी पुन्हा एकदा जगाच्या कोणत्याही भागात दहशत पसरवण्यास सिद्ध होणार आहेत. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ ला हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार ओसामा बिन लादेनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने नोव्हेंबर २००१ला अफगाणिस्तानवर हल्ला करून त्या देशावर कब्जा केला.

पाकिस्तानात लपून बसलेल्या लादेनला शोधून काढून त्याचा खात्मा केला गेला. दरम्यानच्या काळात तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमरचाही मृत्यू झाला; पण तरीही तालिबान्यांनी आपले अस्तित्व कायम टिकवले. त्यांचे अनेक म्होरके या २० वर्षांच्या लढाईत गमावले गेले; पण तालिबान कधीही विखुरली नाही किंवा ती पूर्णपणे गलितगात्र झाली नाही. अफगाणिस्तानवर अमेरिकेचा कब्जा असतानाही आणि तेथे अश्रफ घनी यांचे सरकार सत्तेवर असतानाही त्या देशातील बराच भाग तालिबान्यांनी आपल्या कब्जात ठेवला होता व त्यांचा ज्या भागावर कब्जा होता तेथे सुमारे दीड कोटी नागरिक वास्तव्याला होत. हे अमेरिकेचे आणि मित्र देशांचे अपयशच म्हणावे लागेल. अमेरिकेने केवळ लादेनच्या 'अल-कायदा'वर लक्ष केंद्रित केले होते व 'अल-कायदा'चा पूर्ण खात्मा करायचा हे आमचे पहिले लक्ष्य असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले होते. या काळात तालिबान्यांवर नियंत्रण मिळवण्याचा किंवा त्यांचा नायनाट करायचा निर्धार त्यांनी कधीच व्यक्‍त केला नव्हता. अफगाणिस्तानच्या स्थानिक सरकारला त्यांची सक्षम लष्करी यंत्रणा उभारण्यासाठी प्रामाणिकपणे मदत केली. त्यांना पैसा, शस्त्रे आणि प्रशिक्षण दिले. शिस्तबद्ध आणि धडाकेबाज लष्कर उभारणीसाठी अमेरिका आणि नाटो फौजांनी अफगाणिस्तानला बरीच मदत केली होती; पण हेच प्रशिक्षित मनुष्यबळ तालिबानी गनिमांचा सामना करण्यास साफ अपयशी कसे ठरले? तालिबानी येत आहेत, हे समजल्यानंतर अनेक प्रांतातील लष्करी जवानांनी शस्त्रे फेकून देऊन चक्‍क पळ काढला. आपल्याला पाहून लष्करी जवानच पळ काढीत आहेत, हे पाहून तालिबान्यांचे धाडस वाढले आणि त्यांनी पूर्ण वेगाने आपले इप्सित साध्य केले. जोपर्यंत अमेरिका आणि नाटो देश तेथे वास्तव्याला होते, तोपर्यंत त्यांचे हस्तक म्हणून देशाची सूत्रे त्यांनी हलवली; पण अमेरिकेने तेथून माघार घोषित केल्यानंतर त्यांनी स्वत:च्या हिमतीवर देशाचा कारभार हाकण्याची जी सिद्धता दाखवणे अपेक्षित होते ती अध्यक्ष घनी यांनी अजिबात दाखवली नाही. देशाचे नेतृत्वच नेभळट असेल, तर त्या देशाची लक्षावधी जवानांची प्रशिक्षित फौजही कशी कुचकामी ठरते याचे अफगाणिस्तान हे नवे उदाहरण जगापुढे आले आहे. त्यामुळे आगामी महायुद्धाच्या नांदीत भारताचे असणारे नेतृत्व किती खंबीर आणि दरारा निर्माण करणारे आहे याचा विचार करून आपली एकजूट महत्त्वाची असणार आहे.


अफगाणिस्तानातील या घडामोडींनतर आता भारतालाही बरीच सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यात ३७० कलम रद्द करून भारताने केलेल्या फार महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे पाक, चीन हे देश चिडले आहेत. त्यासाठी ते तालिबान्यांचे अस्त्र सोडण्याची शक्यता आहे, म्हणूनच देशाच्या खंबीर नेतृत्वाची आता जबाबदारी वाढली आहे.

No comments: