अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य या नादात कुठे तरी राजकीय पक्षांकडून सभ्यता संपुष्टात येत आहे. आक्रमकता वाढत आहे. वाचाळपणा वाढत आहे, असे दिसत आहे. मागचा आठवडा सगळा यातच गेला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटक नाट्यानंतर राज्यातील आगामी राजकारणाच्या दिशा पुरेशा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे संघटन आणि गृह खाते सांभाळणाºया राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुत्सद्देगिरीमुळे भाजपचा आशीर्वाद रथ रोखला गेला; मात्र त्याच वेळी राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेचा वेध घेण्याची भाजपची खेळी काही प्रमाणात यशस्वी झाली, तर काही प्रमाणात अंगलटही आली. राणेंना भाजपमध्ये प्रवेश मिळाला तो त्यांच्या नेतृत्व गुणांपेक्षा सेनेविरोधातील उपद्रवमुल्यामुळे. त्यामुळेच केंद्रीय मंत्रिपद मिळताच मुंबईहून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व राणेंकडे आले आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे सेनेच्या विरोधात डरकाळ्या फोडण्यास सुरुवात केली; पण महाविकास आघाडी सरकारने त्यांना लगाम घालत भाजपविरोधात महत्त्वाचा संदेश देशभर दिला; पण ही खरं तर भाजपची संस्कृती नाही. भाजपच्या नेत्यांची भाषणे ऐकायला विरोधी विचारांचे लोकही जमत; पण आजकाल जे भाजपचे नेते बोलत असतात, ते पाहता विचारांपासून हा पक्ष कुठे तरी दूर चालला आहे का?
अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, सुषमा स्वराज अशा नेत्यांची सुसंस्कृत सभ्य भाषणे ज्या पक्षाची बलस्थाने होती, त्या पक्षात खालच्या पातळीवर टीका, उणी-दुणी, नळावरची भांडणे असावीत, तसे एकमेकांचे उणे-दुणे काढणे हे प्रकार बघवत नाहीत; पण आज चित्र असे उभे आहे की, हा वाद भाजप विरद्ध सेना न राहता राणे विरुद्ध सेना, असा सुरू झालेला आहे. राणे विरुद्ध सेना या खेळात सेनेने बाजी मारली असली, तरी राणेंचे प्यादे खेळवण्यात भाजपलाही यश आले आहे. आता मुंबई, नाशिकसह राज्यातील सात महत्त्वाच्या महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत राणे विरुद्ध सेना या नाट्याचे अनेक अंक पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत; पण हे काही असले, तरी राजकीय सभ्यता, मर्यादा पाळणेही गरजेचे आहे. जनतेचा आशीर्वाद घेताना तुम्ही किती छान, महान आहात हे सांगा, ते कधी लहान आहेत, वाईट आहेत हे सांगू नका. त्यामुळे कोणतीही टीका टिप्पणी करताना दर्जा आणि जीभ घसरणार नाही याची काळजी ही घेतलीच पाहिजे.
भाजपकडे लोक आदर्शवादी, सिद्धांतावर चालणारा पक्ष म्हणून पाहिले जाते. त्याचे कार्यकर्ते एका विचारातून, झपाटून पद आणि प्रलोभनाला बळी पडत नसतात, तर कार्य करत असतात. ही शिकवण संघाच्या मैदानावरून आलेली असते, ती शिस्त संघाकडून मिळालेली असते. त्यामुळे भाजपमध्ये मूळचे भाजपेयी आणि नवहिंदुत्ववादी भाजपेयी, असे गट पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. जे आयात केलेले अन्य पक्षातले नेते आहेत, त्यांना त्यांची पूर्वीची वस्त्र उतरवायला लावून भाजपची वस्त्रे आणि विचार घेण्याचे तंत्र भाजपने आखले पाहिजे. त्यासाठी भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाने नव्याने आलेल्या नेत्यांना आपल्या आचार विचारांचेप्रशिक्षण दिले, तर ते विचारपासून भरकटणार नाहीत. हा जो या आठवड्यात भाषणबाजी, अटकनाट्य, जामिननाट्य हा प्रकार घडला, त्याने जनतेला बिलकुल समाधान वाटलेले नाही. त्यामुळे ही सभ्यता परत मिळाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुफान टीका विरोधक करत असतात, सोशल मीडियावर होत असते. ते कशाचीही दखल घेत नाहीत, तर आपल्या कामाने ते जनतेवर छाप पाडतात. इतकेच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या झालेल्या संपूर्ण प्रकारावर स्पष्टपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. शिवसैनिकांनी, युवासेनेने प्रतिक्रिया दिली, संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली; पण उद्धव ठाकरे यांनी आपली मर्यादा सांभाळली ही पण कौतुकाची बाब आहे. त्यामुळे जनतेने त्यांचे कौतुक केले. हा संयम, सभ्यता सर्वांना कशाप्रकारे जोपासता येईल, हे पाहिले पाहिजे.
आज जनतेचे किती तरी प्रश्न आहेत. या प्रश्नांना हात कोण घालणार? येत्या काही महिन्यांत महापालिकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबईसारखे जागतिक महानगर, राज्यातील निम्मी लोकसंख्या व्यापणाºया विकसनशील शहरांचे प्रश्न, अनेक शहरांतील पायाभूत सुविधांचा झालेला बोजवारा, जीएसटीचा परतावा थकल्याने महापालिकांची झालेली कोंडी आदी कळीचे मुद्दे मागे पडत आहेत. त्यावर चर्चा झाली पाहिजे. विकासाचे मुद्दे, रोजगाराचे प्रश्न, सामान्य माणसांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. आज महागाईबाबत कोणी बोलत नाही, नव्या प्रकल्पांबाबत चर्चा नाही, रोजगारनिर्मिती, आत्मनिर्भर भारत करण्याच्या घोषणांचे काय झाले, त्यातील तरतुदीचा कोणी किती फायदा घेतला, बँकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला याबाबत चर्चा नाही; पण वैयक्तिक टीका टिप्पणी करून रस्त्यावरचे होणारे राडे जनतेला पहायला मिळत आहेत. अत्यंत हिणकस आरोप-प्रत्यारोपांमध्येच निवडणुका रंगतील, असे वातावरण तयार केले जात असेल, तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, म्हणून राजकारणातील सभ्यता जपली पाहिजे. त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. हे भान सर्वच पक्षांनी जपले पाहिजे.
No comments:
Post a Comment