महाराष्ट्रात किराणा दुकानांत वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारी २७ जानेवारीच्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेला. त्यावरून सोशल मीडियावरून जोरदार चर्चासत्र, टीकासत्र, मिम्स येत आहेत. विरोधकही टीका करत आहेत, पण खरेतर वाईन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळण्यासाठी प्रयत्न हे गेले अनेक वर्षे होत आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. केवळ वाईन नव्हे, तर बिअर उत्पादनासाठी आपल्या धान्यांची विक्री करावी, असेही सरकारी धोरण होते. त्यामुळे त्यावर टीका करण्यासारखे तसे काहीच नाही. वाईन उत्पादन वाढले, त्याची किराणा मालाचे दुकान किंवा सुपर मार्केटमध्ये विक्री केली, म्हणजे दारूड्यांचा सुळसुळाट होईल असे नाही. शेवटी दारू पिणारा दुकान जवळ की लांब याचा विचार न करता कुठूनही ती मिळवत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे, पण याकडे दारूड्यांना उपलब्धता होणे यापेक्षा शेतकºयांना फायदा होणार की नाही या दृष्टीने बघण्याची गरज आहे.
आता राज्याचे वाईन धोरण प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकºयांना फायदा व्हावा, तसेच वाईन उद्योगाला चालना मिळावी, या हेतूने राबवण्यात येत असल्याचा सरकारचा दावा आहे, तसेच ‘वाईन वॉक इन स्टोअर’ किंवा ‘शेल्फ इन शॉप’ या पद्धतीने विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा छोट्या वाईनरी घटकांना व पर्यायाने शेतकºयांना मिळू शकतो, असेही मंत्रिमंडळ बैठक निर्णयात सांगितले आहे. खरेतर यात गैर काहीच नाही. आता नाशिकच्या सुला किंवा अनेक वायनरी उद्योगांत पर्यटनासाठी म्हणून लोक जात असतात. त्याची शान वाढली, तर वाईट वाटायचे कारण नाही. उसाच्या गुºहाळाप्रमाणे वाईनचे शॉप लावले तर काय बिघडले? ज्याला पाहिजे तो घेईल. नवीन शॉप, काऊंटर झाल्याने व्यसनाधिनता वाढणार नाही, तर आधीच्या व्यसनी लोकांची ती सोय होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यावरून टीका करण्याचे तसे काहीच कारण नाही. महसूल आणि उद्योग यादृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने याकडे सकारात्मकतेने पहायला काहीच हरकत नाही. असे असले तरी सरकारने दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय का घेतला, याला विरोध करणाºयांचे काय म्हणणे आहे, यामुळे शेतकरी वर्गाला खरेच फायदा होईल का, याचाही विचार केला पाहिजे. खरेतर दुकानांतून वाईन विक्रीचा निर्णय करण्याची चर्चा डिसेंबर २०२१ पासून सुरू होती. वाईनचा उपयोग बाजारात अनेक बेकरी उत्पादनांमध्ये केला जातो. बहुतांश वाईन्समध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दैनंदिन किराणाचे साहित्य मिळणाºया दुकानांतही वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात होता.
अनेक ठिकाणी वाईन ही चवीसाठी वापरली जाते. म्हणून वाईनची विक्री किराणा दुकानांत सुरू करण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच दुकानांमध्ये एक लिटर वाईनमागे १० रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत ५ कोटींची भर पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाईन विक्री करण्यासाठी राज्य सरकारकडून सुपर मार्केटसाठी देखील काही नियमावली केली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी असलेल्या या निर्णयाला तसे विरोध करण्याचे किंवा नाक मुरडण्याचे काहीच कारण नाही.
खरेतर राज्यात सध्या फळे, फुले, मध अशा उत्पादनातून वाईनची निर्मिती केली जाते. असे असले तरी द्राक्षांपासून सर्वाधिक वाईन उत्पादन केले जाते. बाकी उत्पादनातून फक्त प्रायोगिक तत्वावर किंवा छोट्या स्वरूपात उत्पादन होते. या प्रकारच्या उत्पादनातून तयार झालेल्या वाईनला बाजारात मागणी नसल्याचे चित्र दिसते. शिवाय, मार्केटिंग आणि विक्रीसाठी पुरेसे पर्यायही दिसत नाहीत. अशा वाईनरीजना सरकारी धोरणातून प्रोत्साहन मिळण्याची आता आशा निर्माण झाली आहे. दुकानांतून वाईन विक्रीमुळे येत्या चार वर्षांत वाईनची विक्री दुप्पट होईल, परिणामी द्राक्ष लागवडीचे क्षेत्रही वाढेल, असे मत आॅल इंडिया वाईन प्रोड्यूसर असोशिएशनचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एक नवे अर्थचक्र प्रवाहित होत असेल, तर कोरोनाच्या बिघडलेल्या घडीत ही सकारात्मक बाब असेल. त्यामुळे त्याचे स्वागत करायला काही हरकत नाही.
दुकानांतून वाईन विकण्याच्या निर्णयाचा द्राक्ष उत्पादक शेतकºयांना फायदा होईल, असे मत नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि एका वायनरीचे मालक शिवाजी आहेर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे निश्चितच यामागे आर्थिक गणित असेल. यामुळे जर आर्थिक उलाढाल वाढली, तर त्यातून शेतकरी आणि रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळू शकते. दुकानांतून वाईन विक्री सुरू झाल्यास विक्रीची क्षमता वाढेल. त्यामुळे वाईन इंडस्ट्रीकडून द्राक्षांची मागणी वाढेल. परिणामी याचा द्राक्ष उत्पादक शेतकºयांना फायदा होईल. सरकारने आजवर वाईन उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले होते. या निर्णयाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वाईन विक्रीसाठीही चालना मिळणार आहे. फक्त थोडा दृष्टिकोन बदलला पाहिजे. वाईन आणि दारू या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असा विचार करून याकडे बघितले पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी वाईनकडे आरोग्यासाठी लाभदायक म्हणून पाहिले जाते. त्याला शास्त्रीय मान्यता देखील मिळाली आहे. त्यामुळे तिकडे वाईनच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आपल्याकडेही तो बदल होतोय. त्याचे स्वागत करा, विनाकारण नाक मुरडण्यात काहीच अर्थ नाही.
31/1/2022
No comments:
Post a Comment