Tuesday, February 8, 2022

आनंदघन लता


भारतरत्न, गानसरस्वती, गानकोकीळा अशा किती तरी उपाध्या मागे असल्या, तरी संगीतकार म्हणून लता मंगेशकर यांची ओळख वेगळीच आहे. आपल्यातील गायक आणि संगीतकार वेगळा असावा, या हेतूने त्यांनी लता मंगेशकर या नावाने संगीत न देता आनंदघन या नावाने संगीत दिले. हे संगीत सवोत्कृष्ट संगीत म्हणून ओळखले जाते, म्हणजे गानसरस्वती लता मंगेशकर यांच्याबद्दल काही बोलावे, लिहावे, सांगावे तेवढे थोडेच आहे. गायिका म्हणून त्या सर्वश्रेष्ठ आहेतच; पण त्यांनी संगीतकार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. आनंदघन या नावाने त्यांनी संगीतकार म्हणून केलेला छोटासा; पण प्रतिभावान प्रवास चिरस्मरणीय ठरला आहे. चालींमधील वैशिष्ट्यपूर्ण माधुर्यामुळे त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी मराठी रसिकांच्या ओठी आजही रुळताना दिसत आहेत.


कोणत्याही गाण्याच्या चालीत माधुर्य आणि प्रामाणिकपणा असला की, ते गाणे हृदयाला भिडते. लता मंगेशकरांनी संगीतकार या नात्याने पाच सिनेमांना संगीत दिले. यातील प्रत्येक गाणे कमालीच्या गोडव्याने भारले आहे. अशी गाणी काळजाच्या कोपºयात जाऊन कायमची विसावतात, त्यावेळी त्या संगीताची, संगीतकाराची महती लक्षात येते.

सर्वात प्रथम १९५० मध्ये आलेल्या दिनकर पाटील यांच्या रामराम पाव्हणं या सिनेमानं लता मंगेशकर यांच्यामधील संगीतकाराचा प्रवास सुरू झाला होता. यावेळी त्यांनी आपल्या नावानेच संगीत दिले होते. विशेष म्हणजे हा तमाशापट असूनही, चालीतील माधुर्य भारावून टाकणारे होते. माझ्या शेतात सोनं पिकतंय हे गाणे त्यांनी नामवंत संगीतकार सी. रामचंद्र, तसेच बहीण मीना मंगेशकर यांच्या साथीने गायले होते. शपथ दुधाची या आईच्या, तू गुपित कुणाला सांगू नको या सिनेमातील आणखी दोन गाण्यांशिवाय कशी जडली सांग तुझ्यावरती माझी प्रीती, तसेच राया गालात खुदकन हसा, ही तमाशातील संगीताच्या चालीने दिलेली गाणी अत्यंत लाजवाब अशी होती.


प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या सिनेमांना लताबार्इंनी दिलेले संगीत हा एक सांगीतिक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. यामध्ये मोहित्यांची मंजुळा (१९६३), मराठा तितुका मेळवावा (१९६४), साधी माणसं (१९६५) आणि तांबडी माती (१९६९) असे लागोपाठ चार सिनेमांतील एकापेक्षा एक सरस गाणी एक संगीतकार म्हणून दीदी किती श्रेष्ठ दर्जाच्या होत्या, हे दाखवून देते. भालजींना आपल्या सिनेमातून रसिकांना काय द्यायचे आहे, हे संगीतकार म्हणून लता मंगेशकर यांना अचूक गवसले होते. इतिहासपट आणि सामाजिक जाणिवा दृढ करणारे हे चार सिनेमे होते.

आपण जर त्यातील प्रत्येक गाणे नीट ऐकले, तर लक्षात येते की, ते आपल्या मराठी मातीशी घट्ट नाते सांगणारे गाणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य ध्येयासाठी जिवाचे रान करणाºया सामान्य मावळ्यांची, त्या काळातील माता-भगिनींची आर्त भावना लता दीदींची ही गाणी व्यक्त तर करतात. याशिवाय सामाजिकपटांमधील छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करणाºया सामान्य माणसांच्या जगण्यातील आनंदही, ही गाणी अशी काही अभिव्यक्त करतात की, ती या मराठी मातीपासून वेगळी करता येत नाहीत. महाराष्ट्र भूमीच्या रांगडेपणाचा, साधेपणाचा अस्सल सुवास, त्यामधून दरवळताना दिसतो आणि म्हणूनच सहा दशके उलटून गेल्यानंतरही ती तुम्हा आम्हाला गुणगुणावीशी वाटतात. लता मंगेशकर अर्थात आनंदघन संगीतकार म्हणून दिग्गज का आहेत, याची ही साक्ष आहे.


खरंतर १९५०च्या आधीपासून लतादीदींचा पार्श्वगायिका म्हणून प्रवास सुरू झाला, तर हाच प्रवास ६० आणि ७०च्या दशकांत प्रतिभेच्या सर्वोच्च उंचीवर पोहोचला होता. याच उंच शिखरावर असताना, त्यांनी आपल्यातील संगीतकारालाही पारखून घेण्याचा प्रयत्न केला. भालजींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या जोडीने त्यांच्यातील संगीतकार असामान्य कामगिरीने फुलला. संगीताचा सुवर्णकाळ म्हणून हा काळ ओळखला जातो. त्याकाळी, तर प्रत्येक गाण्याच्या तयारीसाठी किती तरी बैठका होत असत. सिनेमा आणि गाणी एकजीव झाली पाहिजेत, यासाठी अट्टाहास करत अनेक दिवसांच्या आणि सततच्या प्रयत्नांमधून गाणी तयार होत असत. संगीतकारांबरोरच गायकही अशा मेहनतीसाठी तयार असत. शब्दाचे वजन, त्यातील नाद, स्वर, उच्चार हे बरोबर लागत नाही, तोवर ते गाणे नक्की होतच नसत. विशेष म्हणजे, गायन-वादनात थोडी चूक झाली, तरी नव्याने पुन्हा श्रीगणेशा होत असे. यामुळे आपण जे काही करतो आहोत, ते निर्दोष आणि सरस असलेच पाहिजे, यावर लेखक, दिग्दर्शक, गीतकार, गायक आणि संगीतकाराचा ध्यास असल्यानेच सहा दशके उलटून गेल्यानंतरही त्या काळातील गाणी अजरामर आहेत आणि त्यात लता दीदींच्या आनंदघन यांच्या संगीताचा अनमोल वाटा आहे.

यातील एकेका गाण्यावर बोलायचे, तर एक लेखाची जागा पुरणार नाही. पंच्याहत्तर वर्षांच्या तपश्चर्येवर कोण लिहू शकणार आहे?, आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई तरी पुरेल का याला? पण त्यांनी संगीत दिलेल्या ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’, ‘झाला साखरपुडा’, ‘निळ्या आभाळी’, ‘सोन सकाळी सर्जा...’ ही १९६३ मध्ये आलेल्या मोहित्यांची मंजुळामधील गाणी आणि त्यानंतर वर्षभराने आलेल्या मराठा तितुका मेळवावा या सिनेमातील ‘शूर आम्ही सरदार, नाव सांग सांग गाव सांग, रेशमाच्या रेघांनी, अखेरचा हा तुला दंडवत, मराठी पाऊल पडते पुढे ही गाणी शिवकालीन काळ डोळ्यासमोर आणतात.


ज्या महाराष्ट्राचा उल्लेख गोविंदाग्रज रा. ग. गडकरी यांनी दगडाच्या देशा, कणखर देशाच्या राकटपणाबरोबर मराठी मातीच्या पराक्रमाचीही महती गाताना दिसतात. याशिवाय शिवाजी महाराजांच्या जोडीने स्वराज्यासाठी लढणाºया मावळ्यांच्या जोडीदारांच्या मनाची ओढ, व्यथा अशा काही शब्दांत सांगून जातात की, आपण त्या सिनेमाशी आणि गाण्यांशी आयुष्यभर जोडले जातो. शूर आम्ही सरदार हे घोड्यांच्या टापांबरोबर हृदयनाथांच्या आवाजात पुढे जाणारे गाणे असो की, रेशमाच्या रेघांनी हे आशाबार्इंनी गायलेले विविध भावभावनांची गुंफण करत गायलेले गाणे त्याचे कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतील. गेल्या पन्नास वर्षांत जितके वाद्यवृंद, मराठी आॅर्केस्ट्रा, संगीतमय कार्यक्रम आले. त्यातील प्रत्येकाला या गाण्यांनी वेड लावले, ती गाणी सादर केली इतकेच नव्हे, तर या गाण्यांशिवाय त्यांचे कार्यक्रम अपूर्ण राहिले आहेत. इतकी ही गाणी आपल्याला भारावून टाकतात. विशेष म्हणजे मोजकेच सिनेमा देऊनही आनंदघन यांचे संगीत खूप वरच्या दर्जाचे ठरले. ग्रामीण माणसांची भाषा बोलणाºया साधी माणसे व तांबडी माती या सिनेमातील गाणी कारणीभूत ठरलीत! वाट पाहूनी जीव शिणला, राजाच्या रंग महाली, नको देवराया, ऐरणीच्या देवा तुला, मळ्याच्या मळ्यामंधी ही साधी माणसंमधील गाणी ऐकली, तर जीव शांतसुखांत होतो. त्यामुळेच लता मंगेशकर यांनी संगीतकारांसाठी घेतलेले आनंदघन हे नाव सार्थ ठरते! ऐरणीच्या देवा तुला या अजरामर गाण्यासाठी आनंदघन यांनी हरीप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनाचा अप्रतिम असा उपयोग केला होता.

साधी माणसं या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळालाच, पण राज्य पुरस्काराबरोबर आनंदघन यांना सर्वोत्तम संगीतकार, तसेच लताबार्इंना सर्वोत्तम पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. १९६९ मध्ये आलेल्या तांबडी मातीच्या गाण्यांनी, तर कमाल केली. मागते मन एक काही, अपर्णा तप करीते काननी, माझ्या कपाळीचे कुंकू, जा-जा रानीच्या पाखरा, डौल मोराच्या मानेचा, जिवा शिवाची बैल जोड या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यात आनंदघनाच्या संगीताचा मोलाचा वाटा होता. डौल मोराच्या मानेचा, जीवा शिवाची बैल जोड ही हृदयनाथ यांनी गायलेली गाणी आजही सांगितिक कार्यक्रमांचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाणारे १९६०चे दशक हे मराठी सिनेमाचे साठचे दशक नि:संशय आनंदघन यांच्या गाण्यांनी गाजले; पण पुढे त्यांच्या संगीताचा परिसस्पर्श मराठी सिनेजगताला होऊ शकला नाही. त्यांच्या सूर आणि स्वराप्रमाणेच त्यांच्या संगीताची जादू आजही कायम आहे.


प्रफुल्ल फडके

9152448055

No comments: