Thursday, March 31, 2022

मतदारसंघ बदलण्याचे प्रयोग


राज्यातील या सरकारचा सर्वाधिक फायदा कोण करून घेत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी वाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला सर्वाधिक, काँग्रेस दुसºया क्रमांकावर तर शिवसेना अगदी कमी निधी मिळाला असल्याची माहिती विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांनी काडी टाकली, असं मत व्यक्त केलं आणि हसण्यावारी नेले. पण ती काडी खरोखरच लागली हे नक्की, कारण शिवसेनेच्या खासदारांमधून तशा प्रतिक्रिया येताना दिसू लागल्या आहेत.


दोनच दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी ही खंत बोलून दाखवली होती. सरकार चालते ठाकरे यांच्या नावाने; पण त्याचा लाभ पवार सरकार घेते असे स्पष्ट मत व्यक्त करून आपल्या पक्षाला मुख्यमंत्री असूनही झुकते माप मिळत नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते. आता तोच प्रकार मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही केलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दुजाभाव केला जातोय. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप श्रीरंग बारणे यांनी केला आहे. ही असलेली अंतर्गत खदखद नेमके काय सांगते?


मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार यांना सोडावा या चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी हा आरोप केला आहे. मावळमध्ये २०१४ ला शिवसेना येण्याची शक्यता नसताना, शेकापमधून लढलेल्या लक्ष्मणराव जगतापांची पूर्णपणे हवा असताना तब्बल दीड लाखांच्या फरकाने श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघ जिंकून घेतला होता. २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेसने पवार कुटुंबातील उमेदवार दिला होता. ज्या पवार कुटुंबाने पराभव कधी पाहिला नाही, अशा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. असे असतानाही आता हा मतदारसंघ सोडला जाण्याची चर्चा सुरू झाल्याने श्रीरंग बारणे हे अस्वस्थ झालेले आहेत.

पार्थ पवार यांचा वाढदिवस २१ मार्चला पार पडला. पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा, अशी मागणी केली. यावर रोहित पवार यांना विचारण्यात आले असता, त्यांनी म्हटलं, पार्थ पवार यांनी जर स्वत: मावळ मतदारसंघाची मागणी केली तर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यापासून ते त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला सर्वात आधी मी असेन असे स्पष्ट केले. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली.


पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाल्यावर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दुजाभाव केला जातोय. निधी वाटपातही दुजाभाव होतोय. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की, ती करायला लावली हे शोधले पाहिजे. ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असे गंभीर आरोप बारणे यांनी केलेत. शिवसेनेतील ही अस्वस्थता चांगली नाही.

युती किंवा आघाडी असताना, असे प्रसंग नेहमीच येतात. जागा वाटपात असा गोंधळ होत राहतो. नाराजी, बंडखोरी होत राहते. यापूर्वी शिवसेना-भाजप युती असताना भाजपच्या ताब्यात कायम असणारा गुहागर मतदारसंघ मिळावा यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांनी आग्रह धरला. श्रीधर नातू, विनय नातू असे सतत या मतदारसंघातून उमेदवार निवडून येत असताना, तो आपल्याला मिळावा हा आग्रह धरला आणि भाजपने शिवसेनेसाठी हा मतदारसंघ सोडला. त्यामुळे झाले काय? विनय नातू यांनी श्रीधरसेना काढली. बंडखोरी केली. रामदास कदम आणि विनय नातू दोघेही पराभूत झाले. कोकणात राष्ट्रवादीची ताकद नसतानाही तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार म्हणून भास्कर जाधव निवडून आले. आता तोच प्रकार मावळ मतदारसंघाबाबत होईल याची दक्षता घेतली पाहिजे. शिवसेनेने हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडला आणि बारणेंनी बंडखोरी केली, तर भाजपला आयते रान मोकळे होईल हे नक्की. त्यामुळे या अंतर्गत खदखदीची दखल घेतली पाहिजे.


युती आणि आघाडी असल्यावर आपल्या पक्षाची वाढ करण्यावर मर्यादा येतात याची जाणीव आता सर्वच पक्षांना झालेली आहे. २०१४च्या निवडणुकीत युती आणि आघाडी फुटल्यामुळे राज्यात विधानसभा चौरंगी लढतींनी झाल्या. यात १२३ आमदार भाजपने स्वबळावर निवडून आणले होते. युती असताना त्यांच्या वाट्याला तेवढ्या जागा लढवण्यासाठीही शिवसेनेकडून कधी येत नव्हत्या; पण युती तुटल्याने त्यांचे संख्याबळ वाढले. नाही तर भाजप शंभरी कधीच पार करू शकले नसते. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतून शिवसेनेने कुठल्याही निवडणुका लढवणे म्हणजे, आपल्या पक्षाला मुरड घालण्याचा प्रकार करावा लागेल. तीन पक्षांनी मुंबई महापालिका लढवायची ठरवले, तर वाट्याला शंभर जागाही येणार नाहीत. लोकसभेला ४८ मतदारसंघ तिघात वाटून घ्यायचे ठरले, तर जैसे थे मतदारसंघ ठेवून उर्वरित मतदारसंघांची वाटणी करणे आवश्यक आहे. जिथे ज्यांचा खासदार आहे ते मतदारसंघ बदलण्याचे प्रयोग घातक ठरू शकतील.

No comments: