Wednesday, April 13, 2022

अकरा लाखांची पैठणी


झी मराठीवर सध्या अकरा लाखांच्या पैठणीची जोरदार चर्चा आहे. गेली अठरा वर्षे आदेश बांदेकर हे भाऊजी बनून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही फिरले. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने जवळजवळ दीड तप ही नित्य मालिका सुरू आहे. आतापर्यंत साडेपाच हजार पैठणी वाटूनही झाल्या आहेत, पण आता ११ लाखांची पैठणी आणि त्याची जोरदार चाललेली जाहिरातबाजी हे न उलगडणारे कोडे आहे. उद्या ११ एप्रिलपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण त्याची ज्याप्रकारे जाहिरात केली ती अत्यंत हिणकस असे वाटते.


एकतर या कार्यक्रमाची जाहिरात सुसंस्कृत पद्धतीने न करता नकारात्मक पद्धतीने केलेली आहे. सुरुवातीला सुचेता बांदेकर या आदेश बांदेकरांच्या नावाने ओरडतात, साडेपाच हजार पैठण्या वाटल्या, एक तरी मला दिली का? आता तुझी बॅगच भरणार नाही. म्हणजे या कार्यक्रमाने इतकी उंची गाठलेली असताना सूत्रसंचालकाची बायको असमाधानी आहे, दोघांत दरी पडली आहे, नाराजीचा सूर आहे, असा संदेश कशासाठी दिला गेला? ज्या साडेपाच हजार महिलांनी ही पैठणी जिंकली त्यांना सुचेता बांदेकरांची तडफड लागली, असे या जाहिरातीतून दिसते.

दुसरी जाहिरात श्री व सौ मोने यांची दाखवली आहे. यात नाव नोंदणी झाल्यानंतर, पैठणीच्या खेळात सहभाग होण्याचे समजल्यावर ती मिसेस मोने नवºयाला ढकलून कोपºयात टाकते, त्याची अवस्था कचºयाच्या जागी टाकल्यासारखी होते. म्हणजे आदेश बांदेकर नावाचा भाऊजी घरात येणार म्हणून महाराष्ट्रातील महिला नवºयाला अशा ढकलून देतात, ही जाहिरात अतिरेकीच वाटते. सकारात्मक सुसंस्कृत जाहिरात या कार्यक्रमात का केली नाही याचे आश्चर्य वाटते.


तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अकरा लाखांच्या पैठणी व्यतिरिक्त रोख रकमेचे बक्षीस दिले असते, तर अधिक संयुक्तिक झाले असते. अगदी सोन्याची जर आणि त्यात हिरे अडकवले असले, तरी इतकी महागडी आणि उंची पैठणी महिला नेसतील का? त्याचा आनंद घेतील का? जरा भारीतली साडी असली, तरी त्या ठेवणीत राहतात. फक्त कार्यक्रमात घालू म्हणून घडी करून, रोल करून ठेवतात आणि नंतर नंतर त्या न वापरल्याने खराब होतात. शेकडो साड्या घडी न मोडल्याने महिलांच्या कपाटात पडून असतात. त्यात ही तर अस्सल सोन्याची जर असलेली साडी. ती बाहेर घालून जाणे तसे अवघडच. अशी पैठणी नेसल्यावर अक्षरश: अवघडल्यासारखीच महिलेची अवस्था होणार यात शंकाच नाही. त्यापेक्षा दहा हजारांची साडी दिली, तरी चालेल पण वरचे १० लाख रोख बक्षीस दिले तर महाराष्ट्रातील महिला त्या १० लाखांतून एखादा उद्योग उभा करतील. त्याचा चांगला विनियोग करतील. सोन्या-चांदीची वस्तू किंवा रोख रक्कम याकडे संपत्ती म्हणून पाहता येईल. त्याचा विनियोग करता येईल. पण पैठणीची नोंद साडी या घटकातच होणार. त्यामुळे या कार्यक्रमात १० लाखांचे रोख बक्षीस किंवा महिलांच्या खात्यावर जमा करण्याची सोय केली असती, तर ते अधिक उठून दिसले असते. या दहा लाखांतून त्या महिलेने काय केले याचा लेखाजोखा पुढील काही दिवसांत घेतला असता, तर एक चांगला उपक्रम उभा राहिला असता. एखादी तडफदार महिला त्यातून छोटासा उद्योग उभा करू शकेल. ग्रामीण भागात आणि छोट्या शहरात दहा लाखांत घरे मिळू शकतात. त्यात गुंतवणूक करून आपला संसार सावरू शकतात. त्याचा वाटेल तसा उपयोग करता येईल. पण पैठणी ही फक्त शोपीस प्रमाणे शोकेसमध्ये ठेवली जाईल. त्यामुळे या ११ लाखांच्या पैठणीचा नेमका हेतू लक्षात येत नाही.

या कार्यक्रमात भाग घेणाºयांमध्ये १० टक्के सेलिब्रेटी आणि व्हीआयपी लोक असले, तरी अठरा वर्षांत ७० टक्केपेक्षा सामान्य, मध्यमवर्गीय महिलाही त्यात दिसून आलेल्या आहेत. अगदी साध्या छोट्या वसाहतीतील, गरीब कुटुंबातील महिलांनीही यात भाग घेतला आहे. त्यांच्यादृष्टीने पैठणी हे अप्रूप आहेच. पण त्यांच्या अपेक्षा फार नसतात. पाच-दहा हजारांचे बक्षीस मिळाले, तरी त्यांना खूप आनंद असतो. ती पैठणी त्या आनंदात मिरवत समारंभात नेसू शकत होत्या. अशाच महिलांसाठी आता ११ लाखांच्या पैठणीचे बक्षीस ठेवणे हे योग्य वाटत नाही. त्यापेक्षा १० लाखांची रक्कम जिंकण्याची संधी आणि त्याबरोबर एक नेहमीची पैठणी दिली असती, तर त्याचा विनियोग या महिला करू शकल्या असत्या. आता ११ लाखांची पैठणी फक्त एकदाच दिली जाणार आहे की, रोज दिली जाणार आहे हे माहिती नाही. पण रोज दिली जाणार असेल, तर रोज दहा लाख सहा दिवस महिलांना वाटले, तर किती तरी महिला लघुउद्योजक, आपला घरगुती व्यवसाय त्यातून उभ्या करू शकतील. महिलांना आत्मनिर्भर करण्याची ही संधी झी मराठीला मिळाली असती. पण ठेवणीतली पैठणी देऊन एक डेड इन्व्हेंस्टमेंट घरोघर पोहोचवण्याचे काम आदेश भाऊजी करणार असे वाटते.


प्रफुल्ल फडके/ मुखशुद्धी

9152448055

No comments: