Wednesday, April 13, 2022

शहासक


पाकिस्तानला भारतापासून स्वातंत्र्य मिळाले, पण तेव्हापासूनच तिथे लोकशाही कधी प्रस्थापित झालीच नाही. धर्माच्या तत्वज्ञानावर चालणारा तो देश म्हणजे कधी शासकाकडून नाही, तर शहासकाकडून चालवला जात आहे. त्यामुळे आज कर्जबाजार झालेला आहे. श्रीलंकेचा चेहरा समोर आला आहे, अजून काही दिवसांनी पाकिस्तानचा येईल इतकेच. पण जवळपास महिनाभरातील तिथल्या राजकारणाचा सोक्षमोक्ष एकदाचा लागला. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहबाज शरीफ यांची निवड झाली. इम्रान खान यांच्या अविश्वास ठरावाद्वारे हकालपट्टीनंतर विरोधकांचे सर्वसंमत उमेदवार या नात्याने शहबाज यांची ही निवड हा केवळ सोपस्कार राहिला होता.


खरेतर शहबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू. पंजाब प्रांताचे ते तीनवेळा मुख्यमंत्रीही राहिले आहेत. आज ते वयाच्या सत्तरीत आहेत. मध्यंतरी ते कर्करोगाने आजारी होते आणि त्यातून सावरले आहेत. काळाचा महिमा कसा असतो पाहा. याच शहबाजना बंधू नवाज यांच्याविरुद्धच्या २००७ सालच्या लष्करी उठावानंतर सौदी अरेबियात आसरा घ्यावा लागला होता. पनामा पेपर्समध्ये नाव आल्याने नवाज शरीफ यांचे पुन्हा पंतप्रधानपद गेले, तेव्हा शहबाज यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप होऊन त्यांना तुरुंगवासही घडला होता. आता हेच महोदय पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर आरूढ होणार आहेत आणि त्यांचे बंधू नवाज शरीफ पुढच्या महिन्यात सन्मानपूर्वक मायदेशी परतणार आहेत. तुरुंगात जाणे, भ्रष्टाचाराचे आरोप होणे, नीतीमत्ता याचा कशाशीही आता संबंध राहिलेला नाही.

अर्थात हे नावाने शरीफ असले, तरी त्यांची बदमाशी भारताने वेळोवेळी अनुभवलेली आहे. त्यामुळे इम्रान गेले आणि शहबाज आले, तरी पाकिस्तानच्या भारतविषयक नीतीमध्ये काही फार मोठा फरक पडेल, असे वाटत नाही. शुभेच्छा देतानाच पंतप्रधान मोदींनी त्यांना सुनावलेले आहे. पाकिस्तानात नेते सत्तेवर येतात, शहासक बनतात ते भारताचा द्वेष करूनच. त्यामुळे तिथे कोणीही सत्तेवर आला, तरी त्याच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करता येत नाही.


पाकिस्तानचे राजकारणच आजपर्यंत घाणेरडे राहिलेले आहे.पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानाला आजवर आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. पाकिस्तानात आतापर्यंत २२ पंतप्रधान होऊन गेले, परंतु कोणाला लष्कराने हटवले, तर कोणाला न्यायालयाने. इम्रान खान यांची मात्र अविश्वास ठरावाद्वारे हकालपट्टी झाली. आपली पदच्युती टाळण्यासाठी इम्रान यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले. अविश्वास ठराव चर्चेला घेण्याऐवजी आपल्या सभापतीमार्फत संसदच काय बरखास्त केली, मुदतपूर्व निवडणुका काय घोषित केल्या, परंतु इम्रान यांनी आपले पद वाचवले असले, तरी ते तात्पुरते होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर मतदान घ्यायला लावल्याने निरुपायाने का होईना इम्रान यांना नामुष्कीने घरची वाट धरावी लागली. आता विरोधकांच्या हाती सत्ता जात असताना त्यांनी संसदेत विरोधकाची भूमिका बजावण्याऐवजी आपल्या सदस्यांना संसदेचे राजीनामे द्यायला लावले आहेत. इम्रान यांनी आपला हा रडीचा डाव अगदी टोकाला नेला आहे. क्रिकेटमध्ये जसा त्यांचा रडीचा डाव असायचा, वेळ काढूपणा करायचा, फलंदाजाला टाँटिंग करून टॉर्चर करण्याचे पाकिस्तानी धोरण असायचे तसाच तो प्रकार त्यांनी राजकारणात आणला होता.

आता शहबाज शरीफ यांच्याकडे पाकिस्तानची सूत्रे आल्याने भारताने आनंदून जायचे काही कारण नाही. काश्मीरसंदर्भातील शहबाज यांची मते तेवढीच कडवी आहेत. हल्ली पंतप्रधानपद दृष्टिक्षेपात येताच त्यांना जरी सर्वधर्मसमभावाचा पुळका आलेला दिसत असला, तरी आजवर भारताविरुद्ध तेही सतत गरळच ओकत आलेले आहेत. पाकिस्तानात कोणतेही नेतृत्व आले, तरी त्याचे कौतुक करता येणे कदापि शक्य नाही. भारताला त्रास देणे, दहशतवाद पोसणे हेच त्यांचे कर्तृत्व असते. त्या कारवायांवरच ते आपले आसन घट्ट करत असतात. शहबाज हेही पाकिस्तानला चीनच्या पदराखालीच नेतील.


सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती रसातळाला पोहोचलेली आहे. त्यामुळे केवळ तेवढ्यासाठी ते आपल्या विदेशनीतीबाबत थोडी सौम्य भूमिका घेऊ शकतात, कारण कोणताही थेट संघर्ष त्यांच्या देशाला या परिस्थितीत परवडणारा नाही. पाकिस्तान महागाईत होरपळतो आहे. इम्रान खान यांच्या हकालपट्टीला विरोधकांनी जी दोन प्रमुख कारणे दिली ती अर्थातच गैरप्रशासन आणि आर्थिक गैरव्यवस्थापन हीच होती. इम्रान यांनी आपण कडवे इस्लामी नेते असल्याचा आव जरी शेवटी शेवटी आणला तरी त्याआड त्यांची आर्थिक बेबंदशाही लपू शकली नाही. आज हा देश-विदेशी चलनसाठा रसातळाला पोहोचलेला दिसत असताना इंधनाचे दर कमी करण्यासारखे सवंग लोकप्रिय निर्णय घेऊन त्यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटाच्या खाईत खोलवर नेले. एकीकडे श्रीलंकेमध्ये कशी दिवाळखोरीची स्थिती आलेली आहे हे दिसत असताना इम्रानही त्याच वाटेने चालले होते. त्यामुळेच त्यांचे समस्त विरोधक एकत्र आले आणि त्यांनी त्यांच्या बुडाखाली सुरुंग लावला. पण तरीही श्रीलंकेच्या पाठोपाठ हा देशही दिवाळखोर होऊन चीनच्या अधिपत्याखाली येणार आहे हे नक्की.

पाकिस्तानमधील राजकारणात तेथील लष्कर, आयएसआय यांची भूमिका महत्त्वाची असते, पण इम्रान खानच्या काळात इम्रान आणि लष्कर यातील बेबनाव समोर आलाच आहे. आता नव्या राजवटीत लष्कराची भूमिका काय राहते, शहबाज आणि बिलावल भुत्तोंमधील सध्याची एकजूट किती अभंग राहते, शहबाज यांचे वय आणि प्रकृती त्यांना किती साथ देते, अशा ब‍ºयाच गोष्टींवर या नव्या राजवटीचे यशापयश अवलंबून असेल. पण या उलथापालथीचा भारत, पाक या दोन देशांत चांगले संबंध प्रस्थापीत होतील, असा विश्वास टाकणे भाबडेपणाचे ठरेल. कारण हा देश लोकशाही मानणारा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा करता येत नाही.

No comments: