संत समर्थ रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथातील दशक सातवा(ज्ञानदशक)मध्ये समास तिसरा हा ‘चतुर्दशब्रह्मनिरुपण’ या नावाने ओळखला जातो. या समासातील (ओवी १ ते ५)मध्ये ब्रह्मज्ञानाची ओळख करून दिलेली आहे. इथे श्रीसमर्थ सांगतात की, ज्या ज्ञानामुळे साधकाचे जीवन धन्य होते आणि सर्व संशय फिटून समाधान लाभते, ते परब्रह्मज्ञान आता मी सांगणार आहे. श्रोत्यांनी अत्यंत एकाग्र व सावध होऊन ते ऐकावे.
इथे ते दृष्टांत देतात आणि पूर्वपक्ष समजावतात. एखादी खाण उकरून जशी आधी माती (मृत्तिका) गोळा करावी लागते आणि त्यातून मग रत्न शोधावे लागते, तसेच अंतिम सिद्धांत मांडण्याआधी आधी ‘पूर्वपक्ष’ (म्हणजेच खोट्या किंवा अपुºया कल्पना) स्पष्ट करावा लागतो. जोपर्यंत मिथ्या काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत खºया सत्याची प्रचिती येत नाही. म्हणूनच आधी चौदा प्रकारच्या ब्रह्मकल्पनांचा (पूर्वपक्षाचा) संकेत सांगितला आहे.
त्यानंतर समर्थ चौदा ब्रह्मांची नावे व त्यांची ओळख (ओवी ६ ते २२) करून देतात. समर्थांनी मानवी बुद्धीने आणि कल्पनेने कल्पिलेल्या चौदा प्रकारच्या ब्रह्मकल्पनांची नावे सांगितली आहेत. १. शब्दब्रह्म: ग्रंथांचे केवळ पाठांतर किंवा शाब्दिक माहिती (अनुभवाविना केवळ भ्रम). २. ओमित्येकाक्षर ब्रह्म: ‘ॐ’ या एकाक्षराचा उच्चार किंवा त्याचे कल्पित रूप. ३. खंब्रह्म: आकाश किंवा शून्यरूप ब्रह्म (जे ज्ञानाने नष्ट होते). ४. सर्वब्रह्म: पंचमहाभूतात्मक किंवा दृश्यमान विश्वात सर्वत्र भरलेले ब्रह्म. ५. चैतन्यब्रह्म: जड मायेला व सृष्टीला चेतविणारे चैतन्य. ६. सत्ताब्रह्म: ज्या सत्तेमुळे हे संपूर्ण विश्व चालते ती सत्ता. ७. साक्षिब्रह्म: या सर्व सृष्टीला आणि सत्तेला तटस्थपणे पाहणारे साक्षित्व. ८. सगुणब्रह्म: विविध गुण, रूप आणि आकाराने नटलेले साकार ब्रह्म. ९. निर्गुणब्रह्म: गुणांच्या पलीकडचे निराकार रूप. १०. वाच्यब्रह्म: वाणीने किंवा शब्दांनी ज्याचे वर्णन करता येते ते. ११. अनुभवब्रह्म: आनंदाची वृत्ती किंवा तिचा अनुभव. १२. आनंदब्रह्म: आनंदाचे मूळ स्वरूप. १३. तदाकार ब्रह्म: साधकाची ब्रह्माशी झालेली एकरूपता (अभेद स्थिती). १४. अनिर्वाच्य ब्रह्म: ज्याचे वर्णन शब्दांत करता येत नाही ते वर्णनातीत परब्रह्म.
पुढे समर्थ या चौदा ब्रह्मांचे खंडन व अशाश्वतता (ओवी २३ ते ४३) पटवून देतात. समर्थांनी युक्तिवादाने हे सिद्ध केले आहे की, वर सांगितलेल्या चौदाही संकल्पना या अंतिम सत्य नसून अपुºया, मायिक किंवा मनाच्या वृत्ती आहेत. शब्द, ओंकार व आकाश (खं) ब्रह्म: शब्दब्रह्म हे केवळ शाब्दिक असून अनुभवाविना मायिक आहे. ‘ॐ’ हे एकाक्षर किंवा आकाश (शून्यरूप) हे ज्ञानाने किंवा प्रलयाने बाधित होणारे असल्याने शाश्वत नाही. सर्व, चैतन्य, सत्ता व साक्षिब्रह्म: प्रलयकाळात सर्व दृश्य सृष्टीचा नाश होतो, त्यामुळे सर्वब्रह्म किंवा पंचभूतात्मक विश्व शाश्वत असू शकत नाही. जड मायेला चेतविणारे चैतन्य, सत्ता आणि साक्षित्व हे सर्व सापेक्ष (दुसºयावर अवलंबून) आहेत; जिथे पदार्थच नाही तिथे साक्षित्व कोणाचे असणार? त्यामुळे हे सर्व परब्रह्म नव्हे.
सगुण, निर्गुण व वाच्यब्रह्म याबाबत समर्थ म्हणतात, सगुणाला नाश आहे. निर्गुण हे नाव जरी असले तरी जिथे गुणांचा मागमूसच नाही तिथे निर्गुणत्वाचा गौरव कसा करणार? वाणीने ज्याचे वर्णन करता येते ते (वाच्यब्रह्म) अंतिम सत्य असू शकत नाही. तसेच आनंद, तदाकार व अनिर्वाच्य ब्रह्म याबाबत बोलायचे तर आनंदाचा अनुभव ही मनाचीच एक वृत्ती आहे. ‘अनिर्वाच्य’ म्हणणे हा केवळ शब्दसंकेत आहे, कारण शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी वाणी किंवा वृत्ती पोहोचतच नाही.
पुढे समर्थ निष्कर्ष, निवृत्ती व सहज समाधी (ओवी ४४ ते ५३) याबाबत बोलतात. उन्मनी व निवृत्तीची स्थिती काय असते? तर जिथे मनातील सर्व वृत्तींचा पूर्णपणे लय होतो, त्या निरुपाधिक आणि आनंदी स्थितीला ‘उन्मनी अवस्था’ म्हणतात. सर्व योगी याच निरुपाधिक स्थितीत विश्रांती पावतात. सहज समाधीबाबत समर्थ म्हणतात, परब्रह्माशी एकरूप होणे हीच खरी ‘सहज समाधी’ आहे. यामुळे संसारातील सर्व आधी-व्याधी आणि दु:ख नष्ट होतात. तर स्वानुभाव म्हणजे ब्रह्म हा हातात घेण्यासारखा किंवा दाखवण्यासारखा एखादा भौतिक पदार्थ नाही. तो केवळ सद्गुरूंच्या कृपेने व स्वस्वरूपानुभवाने अनुभवायचा विषय आहे.
साधकाने आपल्या स्वानुभवाने ‘मी देह आहे’ ही खोटी कल्पना मोडून काढली पाहिजे. निर्विकल्पाची उपासना केल्याने कल्पनेचा अंत होतो, साधक पूर्णपणे नि:संग होतो आणि त्याला केवळ ब्रह्माचा साक्षात्कार होतो. या समासाचा मुख्य बोध असा की, हा समास आपल्याला स्थूल कल्पनेकडून (शब्दांपासून व उपाधींपासून) सूक्ष्म ज्ञानाकडे आणि शेवटी अद्वैतानुभवाकडे नेतो. बाह्य नाम-रूपांच्या व कल्पनेच्या चक्रात न अडकता, मनाच्या पलीकडचे आत्मस्वरूप ओळखणे हाच या समासाचा मूळ संदेश आहे.
प्रफुल्ल फडके/ बोध दासबोधाचा
No comments:
Post a Comment