Thursday, April 8, 2021

केंद्र कुठे आहे?

गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने हालचाली वेगवान केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कॅमेºयापुढे येऊन लॉकडाऊनची घोषणा करत होते, जनता कर्फ्यूचे आवाहन करत होते, थाळ्या बडवायला सांगत होते, मेणबत्या लावायला सांगत होते, पण आता दुसरी लाट आल्यानंतर मात्र केंद्र सरकार उदासिन दिसते आहे. किंबहुना केंद्रातील नेते, अभिनेते, मंत्री सगळे पाच राज्यांतील निवडणुकांतच गुंतल्याचे दिसत आहे. ही चिंतेची बाब आहे. एकीकडे हे कोरोनाविरोधातील युद्ध आहे असे म्हणायचे आणि केंद्रातील पलटणच या युद्धात कुठे दिसत नाही आणि सगळी जबाबदारी राज्यांवर टाकल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने अंग काढून घेतले आहे का, केंद्र कुठे आहे, असा प्रश्न पडतो आहे.


म्हणजे देशात नव्याने आलेल्या कोरोना लाटेने पुन्हा कहर केला असून, आता रोज नव्याने आढळून येणाºया रुग्णांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. पहिल्या लाटेपेक्षाही गंभीर स्थिती यावेळी उद्‌भवल्याचे चित्र आहे. या स्थितीचे गांभीर्य केंद्र सरकारला आहे की नाही, असा प्रश्न पडतो आहे. पंतप्रधान, गृहमंत्र्यांपासून सरकारचे सारे कर्तेधर्ते निवडणूक प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. देशाचे आरोग्य मंत्री नेमके काय करतात याचेही कोडे नीट उलगडत नाही.

केंद्र सरकारच्या पातळीवर नव्याने उद्‌भवलेल्या स्थितीवर इतकी सामसूम बघितल्यानंतर त्यांनी नव्याने निर्माण झालेल्या कोरोना लाटेची सारी जबाबदारी बहुधा राज्य सरकारांवरच सोपवून ते निर्धास्त झाले आहेत असे दिसते. रविवारी पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला, एवढाच उल्लेख असलेल्या बातम्या प्रसारमाध्यमांवर झळकल्या. प्रत्यक्ष उपाययोजनांच्या संबंधात या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला याचा ओझरता उल्लेख कोणत्याही बातमीत वाचायला मिळाला नाही. त्याचे तपशील पुढे आले नाहीत. पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसांपासून जनतेपासून लांब जाण्याचे धोरण का आखले आहे हे न कळणारे आहे.


त्यामुळे अशी शंका येते की, या संकटकाळावरील उपाययोजनांच्या संबंधात कोणताही निर्णय झाला नाही. ज्या राज्यांमध्ये कोरोना पुन्हा नव्याने उद्‌भवला आहे त्या राज्यांची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत कमकुवत झाली असल्याने त्यांना या नव्या लाटेचा परिणामकारक मुकाबला करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे जे नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्यातील सुमारे ८४ टक्‍के रुग्ण आठ राज्यांत केंद्रित झाले आहेत. त्यांना उपाययोजना करण्यासाठी ज्या काही आर्थिक तरतुदी लागणार आहेत त्याविषयी राज्यांशी केंद्राच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा अधिकाºयाने कसलीही चर्चा केलेली नाही. राज्य आणि केंद्र यांच्यात संवाद नसणे हे अराजकतेचे दर्शन आहे. केंद्राने राज्याचे पालकत्व घेतले पाहिजे. राज्याने केंद्राचा सन्मान केला पाहिजे, पण केंद्रातील सरकार वेगळ्या पक्षाचे आणि राज्यातील सरकार वेगळ्या आघाडीचे त्यामुळे परस्परांशी शत्रुत्वाची भावना असणे हे देशाच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. त्यामुळे अहंकाराच्या प्रवृत्तीने संवाद टाळला जातो. टीकेचे बाण सोडले जातात. यात सामान्य माणसांचे नुकसान होत असते. जनतेला वेठीस धरले जाते. हे प्रकार थांबले पाहिजेत. राज्याने केंद्राला त्यांची जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. केंद्राने राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करून मदतीचा हात पुढे केला पाहिजे, तरच हे संकट दूर होईल. हे फक्त महाराष्ट्रावरचे किंवा काही राज्यांवरचे संकट नाही, तर संपूर्ण देशावरचे संकट आहे. त्यासाठी केंद्राने आता पुढाकार घेतला पाहिजे. अंग काढून घेण्याचा जो प्रकार आहे तो थांबला पाहिजे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेऊन नेमके काय केले हे लोकांना कळायला हवे. केवळ पंतप्रधान कोरोनाच्या नव्या लाटेबाबत सजग आहेत हे दाखवण्यासाठीच उच्चस्तरीय बैठकीचा देखावा केला गेला, असे जे आज चित्र उभे राहिले आहे ते चुकीचे आहे. इतक्‍या अडचणीच्या काळात केंद्र सरकारने अशी जबाबदारी झटकून वागणे कोणत्याच अर्थाने योग्य ठरत नाही. ही बेफिकिरी कोरोना आणखी फैलावण्यास कारणीभूत ठरणार आहे. देशातील कोरोना केवळ मोदी सरकारमुळे आटोक्‍यात आला असे ढोल मधल्या काळात पिटण्यात आले, पण यात मोदी सरकारने नेमके काय योगदान दिले याचा तपशील मात्र जाहीर झाला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी जो अचानक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्याचा मोठा फटका साºया देशाला बसला. त्याविषयी सर्वच पातळ्यांवरून ओरड सुरू झाल्यानंतर देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले, पण त्याची नुसती घोषणा करून सरकार शांत बसले. कारण हे पैसे किती प्रमाणात खर्च झाले. त्यात अंदाजपत्रकीय तरतुदींचा भाग किती होता, बँकांवर टाकण्यात आलेली जबाबदारी किती होती, त्यातील किती तरतुदींची पूर्तता झाली याची कोणतीच माहिती सरकारतर्फे दिली गेली नाही. हे २० लाख कोटी कुणाला दिले, राज्याला त्यातील किती मिळाले हे समोर आले पाहिजे. वाझे प्रकरणात इत्यंभूत माहिती पुरवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला २० लाख कोटींपैकी कधी, केव्हा, कुठे आणि किती पैसे मिळाले आणि त्याचे काय केले, हा तपशील दिला तर बरे होईल.

इथे शंकेला वाव आहे

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे शरद पवार कोणत्याही कारणास्तव कुठलीही कृती करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीचे संशोधन हे करावेच लागेल. गेल्या चार दिवसांपूर्वी ते आजारी पडले आणि त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलला दाखल व्हावे लागले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तरीही रुग्णालयात फावल्या वेळात वर्तमानपत्र वाचून राज्यातील, देशातील घडामोडींचा आढावा घेतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. म्हणूनच त्यांची आणि अमित शहांची झालेली भेट आणि त्यानंतर झालेली ही शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय आहे? हा योगायोग आहे का?, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. त्याचप्रमाणे पवार आणि अमित शहा यांची भेट म्हणजे नव्या समीकरणाची नांदी आहे का?, अशा शंकेला इथे वाव निर्माण केलेला आहे.


तसा विचार केला, तर शरद पवार हे कारण नसताना कोणाला भेटणार नाहीत, हे सत्य आहे. मग जर ही भेट झाली असेल, तर त्यात नेमकी कशावर चर्चा झाली आणि त्यात काय ठरले? याबाबत चर्चेची गुर्हाळे सुरू होणारच. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावरील पूजा चव्हाण संदर्भातील आरोप आणि नंतर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सचिन वाझे यांनी ठेवलेली स्कॉर्पिओ, त्यातील जिलेटीनच्या कांड्या, धमकीचे पत्र, स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनची हत्या. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सरकारविरोधात आयतेच कोलीत हातात मिळाले. या संधीचा पुरेपूर फायदा विरोधक म्हणून भाजपने उचलला. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाली. राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. अनिल देशमुख यांनी यात काही चुका झाल्याचे सांगत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बदलले. सरकारविरोधातील या वातावरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शंभर कोटी रुपयांच्या टार्गेटचा लेटरबॉम्ब फोडला. साहजिकच आधीच गर्तेत अडकलेल्या महाविकास आघाडी सरकारला घाम फुटला. देशमुख यांच्या राजीनाम्याचा विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित असल्याचे पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर दुसºयाच दिवशी त्यांनी देशमुख यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. संबधित प्रकरणाची समितीमार्फत चौकशी होईल, असे सांगत एका अर्थाने गृहमंत्र्यांना अभय दिला. शरद पवारांचे असे गूढ वागणे नेहमीच सर्वांना धक्का देणारे असते.

आधी धनंजय मुंडे आणि नंतर आर्थिक आरोपांमध्ये गुंतलेले अनिल देशमुख यांचाही राजीनामा घ्यावा, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी पक्षीय बैठकांमध्ये धरला होता. त्याची कुणकुण राष्ट्रवादीला होतीच; पण सिल्व्हासाचे खासदार मोहन डेलकर यांच्या मुंबईत झालेल्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या काही बड्या नेत्यांची नावे गुंतल्याची माहिती मुंबई पोलिसांकडे होती. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या नेत्यांचा जोर कमी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर प्रयत्न केल्याची एक शक्यता पवार-शहा भेटीबाबत राजकीय सूत्र व्यक्त करत आहेत. अर्थात पवार-शहा भेट झाली की नाही, हेच खरे मानले जात नाही. राष्ट्रवादीने ती भेट नाकारली तर भाजपने त्याबाबत नरो वा कुंजरोवा अशी भूमिका घेतली. त्यामुळे शरद पवार आणि शहा भेटले का? भेटले असतील तर का भेटले? त्यात प्रफुल्ल पटेल यांची मध्यस्ती का होती?, असे अनेक प्रश्न निर्माण केले गेले.


अमित शहा यांनी या भेटीचे वृत्त नाकारले नाही, तसेच त्यांचा गुजरात दौरा त्यांनी आयत्यावेळी एक दिवस आधी केला, असे अनेक संदर्भ भेट झाल्याचे वर्तवत आहेत. कोणा नेत्याने कोणा नेत्याची कोठे आणि कशी भेट घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत मामला असला, तरी देशाच्या राजकारणातील दोन मोठे नेते तिसºयाच ठिकाणी भेटतात आणि त्याची बातमी होते, ही राजकीय भेट नक्कीच भविष्यातील घटनांची नांदी ठरू शकत असल्याने त्याची चर्चा तर होणारच. गेल्या काही दिवसांत केंद्रातील विरोधी पक्षांचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे अशी चर्चा आहे. तशा विरोधी पक्षांच्या बैठकाही दरम्यानच्या काळात झाल्या; पण वाझे प्रकरणात शिवसेनेकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत आग्रही राहू नये म्हणून दबाव तंत्र निर्माण करण्याचा हा काही प्रकार आहे का? पवार-शहा भेटीनंतरच शिवसेना नेते संजय राऊत यूपीए आघाडीतील नेतृत्वाचा विषय घेऊन शरद पवारांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे हे नेमके काय गौडबंगाल आहे हे समजणे आवश्यक आहे.

जेव्हा कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुका होतात, त्यातील निकालानंतर भाजप आपण गमावलेले एखादे राज्य उलथापालथ करून मिळवतो हा आजवरचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर भाजपने आॅपरेशन लोटस करून कर्नाटकात उलथापालथ केली. गेल्यावर्षी मध्य प्रदेशात अशीच उलथापालथ केली. आता नंबर महाराष्ट्राचा आहे का? २ मेला पाच राज्यातील निकाल आल्यानंतर महाराष्ट्रात काही गडबड करण्याची ही नांदी आहे काय?, अशा शंकांना यामुळे वाव निर्माण झालेला आहे.

मुठभरांची शिक्षा सर्वांना नको

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, अमरावती, अकोला-बुलडाणा यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे. रविवारी कदाचित ते अनेकांशी चर्चा करून याबाबत निर्णयही घेतील; पण ही परिस्थितीत वारंवार येणे हे काही चांगले नाही. लॉकडाऊनमुळे लोक देशोधडीला लागतील; पण तरीही नागरिक जागृतपणे वागत नाहीत. सध्या मुंबई लोकलमध्ये यूपी बिहारचे भय्ये लोक इतक्या बेजबाबदारपणे वागताना दिसतात की, त्यांना इथून खरोखरच हाकलले पाहिजे असे वाटू लागते. सतत तंबाखू, गुटखा, पान खाऊन लोकलमधून पचापचा थुंकत असतात. त्यांना कोणी विरोध केला, तर ते अंगावर येतात अशी परिस्थिती आहे. इतकी दादागिरी आज मराठी माणसाला लोकल प्रवासात सहन करावी लागते आहे. नुसती सतत कॅसेट वाजत असते की, हे आहे मध्य रेल्वेचे थुंकण्यास मनाई आहे अभियान; पण हे परप्रांतीय मुद्दाम दरवाजात उभे राहून थुंकत असतात, तोंडावर मास्क नसतो आणि अतिशय गलिच्छ वागत असतात. याविरोधात दाद मागायची रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारकडून कसलीही सोय नाही. मग हा रोगाचा प्रसार थांबेल कसा? कारण नसताना लहान मुले, महिला लोकलमधून प्रवास करत असतात. १२ ते ४ ही वेळ दिलेली असतानाही हे प्रवासी सकाळपासून स्टेशनवर गर्दी करतात आणि संपूर्ण मुंबईला वेठीस धरतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकार हालचाल का करत नाही? या लोकांमुळे सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणसांना त्रास होत आहे. सरकार नुसते नियम, निर्बंध घालत आहे; पण त्याचे पालन न करणाºयांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत त्या निर्बंधांना काहीही अर्थ नाही. ठिकठिकाणी बुथ ठेवा आणि नियमांचे पालन न करणाºयांविरोधात तक्रार करण्याची सोय करण्याची गरज आहे. मंदिरे, व्यायामशाळा बंद ठेवल्या आहेत त्यापेक्षा जर तंबाखुची दुकाने, गुटखा, पान, जर्दा याची दुकाने बंद केली, तर लोकांना पचापचा थुंकायची संधी मिळणार नाही. सर्वात प्रथम तंबाखुवर बंदी घातली पाहिजे. त्याचप्रमाणे पक्षीमित्र म्हणून जे संपूर्ण शहरात घाण करतात त्या कबुतरखान्यांवर बंदी घातली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे कबुतरांचे थवे उडतात आणि घाण पसरवतात. त्यामुळे रोगराई पसरते, तसेच काही भूमित्र म्हणजे कुत्र्यांना बिस्कीटे घालणारे गलिच्छ लोक स्टेशन आणि सर्वत्र फिरत असतात. ती कुत्री खा-खा बिस्किटे खातात आणि सगळीकडे सांडगे घालत फिरतात. त्यातून रोगराई पसरते. या प्रकारांना आळा घातला तर रोगराईला आळा बसेल.


आज सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्येही रुग्णशय्या कमी पडताहेत. आॅक्सीजनचा तुटवडा भासत आहे. औषधे कमी पडत आहेत. लसीकरणाने अजून पाहिजे तसा वेग घेतलेला नाही. असे असतानाही आम्ही बेशिस्त वागून स्वत:वरील आणि प्रशासनावरील ताण वाढवत आहोत, ही लाजिरवाणी बाब होय. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाने अमेरिका, इटलीत घातला तसा गोंधळ घातला नव्हता, त्याचेही कारण होते. केंद्र सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांनी प्रारंभापासूनच जी काळजी घेतली, सतर्कता बाळगली, उपाय केलेत त्यामुळे आपल्याकडे कोरोनाने एका विशिष्ट प्रमाणाबाहेर हातपाय पसरले नव्हते. ज्याप्रमाणे सरकारांनी प्रयत्न केलेत, त्याप्रमाणेच आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणेने, यंत्रणेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी आणि अन्य कर्मचाºयांनीही कोरोनाला एका मर्यादेत रोखले, परंतु गेल्या महिनाभरात स्थिती पुन्हा बिघडली आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. काही लोकांचा बेजबाबदारपणा. या बेजबाबदार लोकांना वठणीवर आणायची हीच ती वेळ आहे. राज ठाकरेंसारखे नेते मी मास्क वापरणार नाही म्हणत असतील, तर त्यांचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार. हे चुकीचे आहे. कायदा आणि नियम सर्वांसाठी सारखाच असतो; पण ज्यांचे फॅन, फॉलोअर्स खूप आहेत. त्यांनी कायदे मोडण्याची शिकवण देणे हे चुकीचे आहे.

आज टाळेबंदी पूर्णपणे उठली आहे. त्यामुळे कसेही वागण्याची आपल्याला मोकळीक मिळाली आहे, या भ्रमात नागरिक सर्व व्यवहार बिनधास्तपणे करू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी घेताना दिसत नाहीत. कोरोनाग्रस्तांचा आकडा जसजसा वाढत आहे, तसतसे मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. ही जास्त चिंतेची बाब आहे. एकाच घरातील चौघा-चौघांचे मृत्यू होत आहेत. आपल्या आसपास अशा घटना घडत असतानाही आपण बेफिकीर वृत्तीने वागत आहोत, हे आत्यंतिक दुर्दैवी होय. त्यामुळे आज जर लॉकडाऊन जाहीर झाला आणि आपल्या हातातले सर्वस्व गेले, तर आपण जबाबदार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. मुठभरांच्या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे, हे नक्की. त्यासाठी सरकारने नियमभंग करणाºयांविरोधात तक्रार करण्याची सोय केली पाहिजे. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीचा प्रकार होणार नाही.


कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाºया परिचारिका, अन्य कर्मचारी यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त नागरिकांची, समाजाची सेवा केली, त्यांचे परिश्रम वाया जातात की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. जिवावर उदार होत त्यांनी सेवा दिली. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पीपीई किट घालून उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करून त्यांनी जी सेवा दिली आणि आताही उन्हाची तीव्रता वाढत असताना ही मंडळी सेवा देत आहेत, तिला सलाम ठोकला पाहिजे! इतरांप्रमाणे डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी घाबरून घरी बसले तर काय होईल, याची कल्पनाही न केलेली बरी! जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाची लस टोचण्यास प्रारंभ झाला आहे. भारतातही आता लसीकरणाने वेग घेतला आहे; पण १३० कोटी लोकांना लस द्यायला भरपूर वेळ लागणार आहे. त्याला काही इलाज नाही. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात १३० कोटी लोकांना ही लस वेळेत टोचली जाणे तसे अवघडच आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस टोचली जात नाही, तोपर्यंत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

चव्हाटा

मुक्काम पोस्ट मान्याचीवाडी गावातील पारावर गावकरी बसले होते. मान्याच्यावाडीतील ग्रामस्थ म्हणजे अतरंगी लोक होते. त्यांची किर्ती पार लांबवर पसरली होती. त्यांच्या कथा आणि किस्से अनेकदा पुन्हा पुन्हा ऐकल्या जात होत्या. कारण गावातील प्रत्येक माणूस म्हणजे इरसाल असाच होता. पारावरती माणसं जमली म्हणजे नक्की काहीतरी भानगड आहे, असे म्हणून लोक जमत आणि कानोसा घेत.


कसलीही दवंडी न पिटता आबुराव, बाबुराव, रामराव पारावर आले की, आपोआप मागच्या आळीतून छबुराव येत, पल्याडनं रामराव येत. जगन्या, छगन्या असे सगळे आलटून-पालटून येत आणि पारावर हजेरी लावत; पण ही एकदा सुरू झालेली बैठक तासन्तास चाले. सुरू करून देणारा निघून जायचा आणि ती सभा तशीच चालू राहायची दिवसभर. चक्री उपोषण असते, तसे कोणीतरी खो देणार आणि पहिला गेला की, दुसरा आपली मतं मांडणार. अशा चव्हाट्यावर आज विषय रंगला होता लॉकडाऊनचा.

‘पर कायबी म्हना, सरकार आपल्यासाटी लय करतंय.’ आबुरावनं तंबाखु मळत बोलायला सुरुवात केली तसे बाबुराव म्हणाले, ‘अय... लय सरकारची बाजू लावून धरू नको, समदा इस्कोट केलाय तुझ्या सरकारनं’ या दोघांत हा संवाद सुरू असतानाच छबुरावनं नाक खुपसलं अन् म्हणाला, ‘आरं शिंदळीच्या, तुजंमाजं काय करतोस? सरकार समद्यांचं असतं.’


तसा बाबुराव म्हणाला, ‘व्हय, पर हे सरकार काय आपलं नाई.’

आता बाबुराव पेटला म्हणल्यावर गावातली समदी त्याला चढवायला सरसावलीच. तसा मान्याच्यावाडीचा शिरस्ताच होता हा. एखाद्यानं साप सोडायचा आणि सगळ्यांनी निसती पळापळ करायची. आज मैदानात बाबुराव सापडला म्हणल्यावर समदी जमा झालीच.


आता छबुरावनं तोंड उघडलं, ‘पर तुझा सरकारवर येवडा राग कशापायी?’

बाबुराव तावातावानं म्हणाला, ‘सरकारचं डोकं ठिकाणावर हाय का? देवळं बंद, शाळा बंद, व्यायामशाळा बंद आणि दारूची दुकानं तर सत्ताड उगडी. काय म्हणायचं या सरकारला?’


तसं बराचवेळ गप्प असलेले रामराव उठले अन् म्हणाले, ‘अरं तुला जर येवडं कळतं, तर सरकारला नक्कीच जास्त समजत असंल ना? आपले सीएम अर्धे डॉक्टर झाले आहेत. त्यांना समदं समजतं. आपण त्यो कोरोना हु नाय म्हणून काय करतो? सांग ना काय करतो आपण?’

आता बाबुराव गडबडला. काय उत्तर द्यावे ते त्याला समजेना. तसे रामराव पुन्हा म्हणाले, ‘आता का? बोलती बंद झाली का? काय करतो आपण ते सांग अगुदर.’


बाबुराव म्हनाला, ‘हेच की, ते...आपलं हात धुतो.. अंतर ठेवतो... ते काय फुसफुस करून औषद फवारतो...’

तसा छबुराव म्हणाला, ‘ फुसफुस काय म्हणतोस? शॅनिटायजर म्हणायचं.. काय? शॅनिटायजर... समजलं?’


त्याची री ओढत आबुराव म्हनाला, ‘हा... शनिटायजर अन् तोंडावर शॅनिटरी नॅपकीन गुंडाळायचं.’

आता रामराव खळखळून हसला अन् म्हणाला, ‘ ए सुक्काळीच्या... त्याला शॅनिटरी नॅपकीन नाय म्हणायचं, मास्क म्हणायचं. शॅनिटरी नॅपकीनची जागा वेगळी असते... ख्यॅख्य्यय्यख्या...’


रामरावच्या हसण्यात सगळेच सामील झाले, तसा बाबुराव चिडला अन् म्हणाला, ‘तुमी ना इषयाला बगल देताय.... मंदिर बंद अन् दारूची दुकानं चालू का ठिवली? हा माजा सवाल होता.’

आता समजावणीच्या सुरात रामराव म्हनाले, ‘आरं दारूची दुकानं, बार चालू ठेवली हे फार मोटं काम सरकारनं केलं हाय. आता आपण हातावर ते शॅनीटायजर मारतो... मारतो का नाय? त्यात काय असतं? सांग ना काय असतं? ’


‘काय असतं?’ सगळे तोंडाचा चंबू करून विचारू लागले. तसे रामराव आपल्या बुद्धिमत्तेवर प्रचंड खूश झाले अन् सांगू लागले, ‘आरं... त्या शॅनिटायजर मदी ना आल्कोल असते आल्कोल... म्हजी जे दारूत असते ना तसंच अगदी. आता आपण हातावर शॅनिटायजर मारला, तर हातावरचा जंतू मरेल. पण पोटात गेला असंल, तर काय करणार? प्या लेको दारू आन लावा पळवून तो कोरोनाचा जंतू. त्यासाटी दारूची दुकानं सुरू हायत. आता मला सांग देवळातलं तीर्थ पिऊन काय होणार तुज्या? त्यापेक्षा बाहेरून शॅनिटायजर आणि आतून दारू घ्या आणि आंतरबाह्य स्वच्छ, निर्जंतुक व्हा, असं सरकारला सुचवायचं आहे.’

रामरावचं बोलणं झाल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ‘लई बेस.. लई बेस बोलला बगा तुमी रामराव. आवं आपल्या गावात जिवडं पेशंट सापडलं, त्यात जास्ती बायकांची संख्या आहे. का विचारा, विचाराना का?’ छबुराव उत्साहात बोलत होता. तसे सगळ्यांनी एकसुरात विचारले, ‘का?’


तसा जोरात सात मजली हसत छबुराव म्हणाला, ‘कारन, आपल्या गावात बायका दारूच पित न्हाईत. मग आतून स्वच्छ हुनार कशा?’ यावर सगळे जण खो-खो हासले. ते हासणं अगदी गावभर पसरलं.

बराचवेळ पारावर या सगळ्या गप्पा ऐकत बसलेल्या गण्यानं मग तपकिरीची चिमुट काढली आणि नाकात सरकावली. पाच-सहा जोरात शिंका दिल्या, तसे सगळे त्याच्यापासून लांब झाले. येक जण म्हणाला, ‘आरं गन्या, तुला काय अक्कल-बिक्कल काय हाय का नाय? आरं शिंकायला खोकायला बंदी हाय. तोंडावर, नाकावर रूमाल तरी धरायचास ना?’


तसा शांतपणे गण्या म्हणाला, ‘आरं म्या भी कोरोनाशी लढा देतोय. नाकात तपकीर कोंबून इतक्या शिंका देतो की, तो आत जंतू घुसला असेल, तर तपकिरीने पार निघून गेला पाहिजे. आता तोंडावर रूमाल ठेवून तो रूमालात न्हाई घुसायचा? आरं असलं काही जंतू राहू नाहीत, म्हणून तर आपल्या पूर्वजांनी तपकिरीचा शोध लावलाय.’

आता सगळ्यांनीच कपाळावर हात मारला आणि गर्दी पांगायला लागली; पण जाता-जाता पेदाड दत्तू म्हणाला, ‘पन काय बी म्हणा, या शॅनिटायजरनं लईच फायदा झाला.’


आता त्यो आणि कंचा? सगळ्यांनी विचारलं तसं दत्तू म्हणाला, ‘पिऊन घरी गेलो, तरी बायकोला वास येत न्हाई. आला तरी शॅनिटायजर शॅनिटायजर म्हणलं की शांत बसते. द्या टाळी.’

अन् चव्हाट्यावरची सभा टाळी देऊन विसर्जित झाली.

एकतर्फी निर्णय


शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी लॉकडाऊनचा इशारा देतानाच दोन दिवसांत अनेकांशी मी चर्चा करेन आणि त्याबाबतचा निर्णय घेईन असे सांगितले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, संपादक, यांच्यासह हॉटेल बार रेस्टॉरंट चालकांच्या संघटनांचे प्रतिनिधी, चित्रपट निर्माते आणि कलाकारांचे प्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक यांच्याशी चर्चा केली आणि ते निर्णयापर्यंत आले; पण यामध्ये कुठेही त्यांनी सर्वसामान्यांचा विचार केलेला दिसत नाही. सर्वसामान्यांचे प्रतिनिधी असणाºयांशी त्यांनी चर्चा केली नाही. जे थेट जनतेशी संपर्कात आहेत त्यांच्याशी चर्चा केली नाही, त्यामुळे सगळा निर्णय हा एकतर्फी असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याशी चर्चा केली ते बहुतेक लोक गाडीतून फिरणारे, एसीमध्ये बसणारे आणि उच्चभ्रू असे होते. त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होण्याची सुतराम शक्यता नव्हती. जे लोक अजून सहा-आठ महिने घरी बसले तरी काही फरक पडणार नाही, अशांशी त्यांनी चर्चा केली. पण चर्चेत ज्यांना आमंत्रित केले आहे त्या सर्वांशी त्यांनी चर्चा केली असती, तर ती चर्चा सर्वसमावेशक झाली असती. चर्चेत ज्यांना आमंत्रित केले होते त्यातील निवडक लोकांनाच बोलायची संधी होती. जे मुख्यमंत्र्यांच्या हितासाठी, सोयीसाठी बोलतील अशाच लोकांना बोलायची संधी दिली गेली; पण जे ग्राऊंडरूटवर काम करत आहेत, जनतेत मिसळत आहेत त्यांच्याशी चर्चा करणे या बैठकीत टाळले गेले. त्यामुळे संपूर्ण चर्चा ही एकतर्फी झाली, निर्णय हा एकतर्फी होणार यात शंकाच नव्हती, त्यामुळे सामान्यांचे हित कुठेच पाहिले गेले नाही, असे स्पष्टपणे बोलावे लागेल.


खरं तर या लॉकडाऊनचा सामान्यांवर काय परिणाम होईल याचा विचार सरकारने करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने ज्याप्रकारे या मान्यवरांशी चर्चा केली त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कामगार वर्ग, रिक्षा टॅक्सीचालक संघटनांचे प्रतिनिधी, हॉटेल कर्मचारी वेटर सेवा देणारे असंघटीत घटकांचे प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेता संघाचे प्रतिनिधी, फेरीवाले, हातावर पोट असणाºया लोकांची मते विचारात घेतली असती, तर खूप बरे झाले असते. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी, विविध प्रवासी संघटना, होमगार्ड, रस्त्यावर फिरणारे पोलीस, ट्रॅफिक पोलीस यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते. लॉकडाऊन केला किंवा कोणताही कटू निर्णय घेतला, तर या वर्गाला काय फटका बसणार आहे. त्यांचा काय फायदा होणार आहे याचा विचार करण्याची गरज होती; पण ज्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे ही चर्चा, त्यानंतर होणारा निर्णय हा एकतर्फी असणार आहे हे नक्की.

ज्यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि ज्या प्रशासकीय अधिकारी, संयोजकांनी निवड करून ठराविक लोकांनाच चर्चेत सहभागी करून घेतले, त्यापैकी किती जण लोकलने प्रवास करतात? किती जण बसने प्रवास करतात? लॉकडाऊन केल्याने किती जणांवर परिणाम होणार आहे हे तपासले पाहिजे. जे लोकलने प्रवास करणारे आहेत, जे बसने प्रवास करणारे आहेत ते सर्वसामान्य कोणत्याही कटू निर्णयाने भरडले जाणार आहेत. त्यामुळे सरकारची पावले ही चुकीच्या दिशेने चाललेली दिसून आली. जे सर्वसामान्यांसाठी लिहितात, बोलतात, सर्वसामान्यांबरोबर राहतात त्यांची मते विचारात घेण्याचे प्रशासकीय अधिकाºयांनी का टाळले? ठराविक लोकांनाच बोलण्याची संधी का दिली हे न कळणारे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सरकारला सहकार्य करू, लॉकडाऊन लावला तरी चालेल अशीच मते नोंदवली. त्यांना मते नोंदवायला काय जाते? त्यांची पोटं भरलेली आहेत. निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे दुसºयाच्या चपलेने विंचू मारण्याचा प्रकार आहे. हे प्रतिष्ठित म्हणून मिरवायला मोकळे; पण सामान्यांचा विचार करणारे कोणीच मुद्दे का मांडले नाहीत?


आज मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला पाहिजे की, लॉकडाऊन झाला तरी टंचाई कोणत्याही गोष्टीची असणार नाही. लोकांनी विनाकारण गर्दी करू नका. लॉकडाऊनची भीती घातल्यामुळे गेल्या चार दिवसांत साठेबाजीला उत आला आहे. लोक कारण नसताना वस्तू संचय आणि खरेदीसाठी गर्दी करत आहेत. अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहेत, घरपोच सेवा मिळणार आहेत हे का बिंबवले गेले नाही? वर्क फ्रॉम होमचा आग्रह का केला गेला नाही? या एकूणच प्रकारात भीती दाखवणे, धमकावणे आणि जबाबदारी दुसºयावर म्हणजे सामान्य माणसांवर सोपवण्याचा प्रकार झाला हा योग्य नाही. ज्यांची हातावर पोटं आहेत, जे रोजंदारीवर कमवत आहेत, जे कमी पगारात काम करत आहेत त्यांचा विचार सरकार करणार आहे की नाही?

आज मूठभर लोक नियमांची अंमलबजावणी करत नाहीत, निर्बंध पाळत नाहीत त्याची शिक्षा सर्वांना कशासाठी? त्यांच्यावर कारवाईची यंत्रणा सक्षम करा आपोआप सगळे सुतासारखे सरळ येतील. मास्क घालणार नाही आणि कधीच मास्क घालत नाही, अशा नेत्यांना दंड ठोठावण्याचे काम सरकारने केले असते, तर सगळे सुतासारखे सरळ झाले असते. लोकल आणि सार्वजनिक ठिकाणी काही यूपी-बिहारी लोक मास्क न घालता हिंडत असतात. त्यांच्याबद्दल तक्रार करण्याची सोय नाही. मास्क घाल आपण सांगितले, तर ते अंगावर धावून येतात. त्यामुळे अशा लोकांविरोधात तक्रार करण्याची, त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची, त्यांना शिक्षा करण्याची यंत्रणा सरकार का उभी करत नाही? मास्क घातला नाही, म्हणून ५०० रुपये दंड; पण तो वसूल कोण करणार? त्याची तक्रार कुठे करणार? त्यासाठी ठिकठिकाणी बुथ, स्वयंसेवक, महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी का नेमले जात नाहीत? त्यामुळे सरकारचे एकूणच नियोजन चुकले आहे आणि मुठभरांच्या मतांवर घेतला जाणारा एकतर्फी निर्णय सरकार घेत आहे, असे दुर्दैवाने नोंदवावे लागेल.


सामान्य स्त्रियांची काय अवस्था?


दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर वनविभागातील अधिका‍ºयांमधील अंतर्गत धुसफूस आणि वरिष्ठ अधिका‍ºयांबद्दल कनिष्ठ अधिका‍ºयांना मिळणा‍ºया वर्तणुकीचे चित्र समोर आले आहे. खरं तर ज्या ठिकाणी रात्रपाळीसाठी किंवा वेळी-अवेळी काम कराव्या लागणाºया पदांवर महिला अधिकारी नेमल्या गेल्या आहेत तिथे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात गेल्या तरी महिलांना अजून सुरक्षितता मिळालेली नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तावातावाने भाषण करणारे वक्ते आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, विमान चालवतात, चंद्रावर जातात वगैरे वगैरे पोपटपंची केली जाते, पण त्याचवेळी दीपाली चव्हाणसारख्या अनेक महिला असुरक्षित जीवन जगत आहेत याकडे फारसे कोणी बोलत नाही. आपल्याकडे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षिका, अंगणवाडी सेविका, परिचारिका यांना अशा संकटांना सातत्याने तोंड देण्याची वेळ येत असते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेकडे सरकारने लक्ष दिले नाही तर दीपाली चव्हाणसारख्या घटना सतत घडत राहतील. त्या आत्महत्यांना नेमके कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

गेल्या काही वर्षांत वनविभागात महिला अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या वाढली आहे. त्यांना रात्री दूर जंगलात गस्त घालावी लागते. त्यामुळे ड्युटीबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न समोर येऊ लागले आहेत. देशभरातील सरकारी आणि खासगी कार्यालयात होणारी छळवणूक थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधीच विशाखा मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्या व्यतिरिक्त दिल्लीतल्या निर्भया घटनेनंतर २०१३ मध्ये याविषयी कायदादेखील करण्यात आला आहे. कार्यालयातील लैंगिक छळ रोखण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणेही बंधनकारक आहे, मात्र एखाद्या अधिका‍ºयाने किंवा सहका‍ºयाने कामावरून मानसिक त्रास दिला तर तक्रार कुठे करावी यासाठी भरीव व्यवस्था नसल्याचे वनविभागातील सध्याच्या प्रकरणावरून दिसून येते.


सरकारी खात्यातील महिला कर्मचा‍ºयांवर होणा‍ºया अन्यायाची दाद घेणारी विशाखा समिती अस्तित्वात आहे. महिला कर्मचा‍ºयांच्या तक्रारीचा निपटारा ही समिती करीत असते. वनविभागातील महिलांच्या तक्रारीची दखल घेणा‍ºया या विशाखा समितीची जबाबदारीही याच दीपाली चव्हाण यांच्याकडे होती. त्यांनाच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. दीपाली या राज्य लोकसेवा आयोगातून वनसेवेची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. मेळघाटातील अतिदुर्गम भागात जंगल रक्षणासाठी स्वत:ला रात्रंदिवस वाहून घेणा‍ºया अधिकारी म्हणून त्या ओळखल्या जात. रेल्वेने पळून जाणा‍ºया डिंक चोरणा‍ºयांचा दुचाकीवरून पाठलाग करणा‍ºया दीपाली लेडी सिंघम नावाने ओळखल्या जात होत्या. शिवकुमारसारख्या भ्रष्ट अधिका‍ºयाच्या मनमानीला न जुमानता त्याच्या सरंजामदारी वृत्तीचा सामना करण्याची हिंमत त्यांनी दाखवली, मात्र हे सारे असह्य झाल्यानंतरच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल त्यांना उचलावे लागले. एका महिलेचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याची ही घटना वनखात्याला आणि प्रशासकीय व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. दीपाली यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर तरी शासकीय सेवेतील महिला अधिका‍ºयांच्या सुरक्षिततेसाठी सरकार काही पावले उचलणार का, हे पाहायला हवे.

परंतु एवढी कणखर लेडी सिंघम असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या करू शकतात यावरही विश्वास ठेवणे अशक्य आहे. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केली की, त्यांची हत्या झाली याचाही तपास होण्याची गरज आहे. यामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे. दिशासारखा कायदा आपण करत आहोत याची घोषणा केली, नजीकच्या अधिवेशनात तो पारित केला जाईल एवढंच जाहीर झालं, पण त्याची अंमलबजावणी आणि त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर करण्याचे धोरण काही सरकारला राबवता आलेले नाही. महिलांना ताकद देणारी यंत्रणा आपण निर्माण करू शकलेलो नाही. त्यामुळे शक्ती कायदा अजूनही अशक्तच असल्याचे दिसते. या घटनेने महाराष्ट्राची मान खाली घालायची वेळ आलेली आहे. महिला अधिकारीच जर अशा बळी पडत असतील, तर सामान्य स्त्रियांचे काय होईल हा प्रश्न यातून निर्माण होतो.


पूजा चव्हाण प्रकरणानंतर अनेक महिला संघटना, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले होते, पण दीपाली चव्हाण प्रकरणानंतर फारसे कोणी पुढे का आले नाही? दोन दिवस बातमी झाली आणि नंतर सगळे विसरून गेले. या प्रकरणात कोणा राजकीय व्यक्तीचा, मंत्र्याचा सहभाग नसल्याने कांगावा करता येणार नाही, प्रसिद्धी मिळणार नाही. यामुळे राजकीय पक्ष गप्प बसले. धनंजय मुंडे प्रकरणातही अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. भाजप नेत्या चित्रा वाघ, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आदी महिलांसाठी काम करणाºया नेत्या आवाज उठवत होत्या. याच नेत्या दीपाली चव्हाणसारख्या महिला अधिकाºयाच्या आत्महत्येनंतर गप्प बसल्या आहेत याचे आश्चर्य वाटते. शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोºहे या महिलांच्या प्रश्नांवर वर्षानुवर्ष काम करत आहेत. कोठेही कुणावरही अन्याय झाला तर पहिल्यांदा नीलमताई तिथे जाऊन भेट देणार आणि पोलिसांना कारवाई करायला भाग पाडतात. अशा धडाडीच्या नेत्या आता सरकारमध्ये गेल्यापासून गप्प गप्प दिसत आहेत. हे आश्चर्यच नाही का? ज्या कामाने या सर्व महिला नेत्यांना ओळख दिलेली आहे त्या महिला फक्त ठराविक बाबतीतच कशा काय पुढाकार घेतात हे अनाकलनीय आहे. त्यामुळे एखाद्या महिलेवर अन्याय झाला तर तो अन्याय करणारा प्रसिद्ध व्यक्ती असेल तरच त्या अन्यायाला वजन प्राप्त होते आणि तरच महिला नेत्या धावून जातात असे दिसून येते आहे. सामान्यांसाठी कोणी रस्त्यावर उतरणार नाही हे यातून दिसून येते.

ट्रॅजेडी क्वीनची कहाणी


हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मीनाकुमारी. ३१ मार्च हा तिचा मृत्यू दिन. चित्रपटात जसे तिच्या शोकांतिकांना सामोरे जावे लागले तसे तिचे पूर्ण जीवनच शोकांतिका होती. अगदी जन्मापासून ते मरणापर्यंत आकंठ दु:खच तिच्या वाट्याला आले. मीना कुमारी हिने वयाच्या सातव्या वर्षापासून सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली होती. कमाल अमरोही तिच्या कामाने प्रभावित झाले.

बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म १ आॅगस्ट १९३२ मध्ये झाला. जरी मीना कुमारी यांनी बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले असले, तरी खाजगी जीवनातही ती नेहमीच दु:खी राहिली होती. ३१ मार्च १९७२ मध्ये मीना कुमारी यांचे निधन झाले, पण आपल्या कारकिर्दीत तिने सिनेमांमध्ये ज्या भूमिका निभावल्या त्यांनी मीना कुमारीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.


मीना कुमारी यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी कमाल अमरोही त्यांच्या कामाने प्रभावित झाले. कमाल यांना मीना कुमारी यांनी आपल्या सिनेमात काम करावे अशी इच्छा होती, मात्र त्यांच्या आखडू स्वभावामुळे मीना कुमारी यांनी काम करण्यास नकार दिला असे म्हणतात, पण वडिलांच्या दबावामुळे मीना कुमारी यांना कमाल यांच्या सिनेमात काम करावे लागले. हा सिनेमा तर पुढे बनला नाही, मात्र कमाल अमरोही मीना कुमारी यांच्या प्रेमात पडले. मीना कुमारी यांनीही त्यांचे प्रेम स्वीकारले. कमाल यांचे आधीच लग्न झाले होते. त्यामुळे मीना कुमारी त्यांच्याशी लग्न करू शकत नव्हत्या, मात्र जेव्हा दोघेही आकंठ प्रेमात बुडाले होते तेव्हा त्यांनी लग्न केले. मीना यांचे वडील या लग्नाच्या विरोधात होते, मात्र कमाल यांच्या मित्राने मीना यांना काही कारणांनी लग्नासाठी तयार केले. १४ फेब्रुवारी १९५२ मध्ये दोघांनी लग्न केले.

कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या लग्नाची गोष्टही वेगळीच आहे. दोन तासांमध्ये त्यांचे लग्न झाले होते. ज्या क्लिनिकमध्ये मीना यांची फिजिओथेरपी सुरू होती तेथे वडील अली बख्श रोज आठ वाजता मीना यांना बहीण मधुसह सोडून जात आणि १० वाजता घ्यायला येत. १४ फेब्रुवारी १९५२ रोजी याच दोन तासांत मीना यांच्या लग्नाचा प्लान ठरला होता. कमाल अमरोही यांचे मॅनेजर मित्र, काजी आणि काजीची दोन मुले तयार होती. जसे मीना यांचे वडील क्लिनिकबाहेर पडले तसेच काजीने लगेचच कमाल आणि मीना यांचे लग्न लावण्यास सुरुवात केली.


कमाल आणि मीना यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून परवानगी नव्हती. अखेर याला कंटाळून कमाल यांनी मीना यांना पत्र लिहिले की, हे लग्न एक अपघात होता. यावर उत्तर म्हणून मीना कुमारी यांनी लिहिले, तुम्ही मला कधीच समजू शकला नाहीत आणि यापुढेही समजू शकणार नाही. त्यापेक्षा मला घटस्फोट द्यावा. यानंतर मीना यांनी या पत्रासाठी कमाल यांची माफी मागितली. याप्रकारे मीना यांची सासरच्या घरी एण्ट्री झाली, मात्र मीना यांचे सौंदर्य पाहून कमाल त्यांच्यावर जळत असत. मीना कुमारी आणि कमाल यांच्यातील खटके वाढतच गेले. अमरोही यांनी मीना कुमारीना सिनेमात काम करण्यास मनाई केली होती, मात्र मीना यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे कौटुंबिक आयुष्यातही शोकांतिकाच झालेली होती.

काही माणसं जन्माला येतात ती अशीच येतात. मीनाकुमारींचा जन्म झाला तेव्हा बापाला ती पोसणं जड झालं होतं. म्हणून जन्म झाल्या झाल्या त्या बालिका अर्भकाला वडिलांनी उचलले अनाथाश्रमाच्या पायरीवर नेऊन ठेवले होते, पण आश्रम बंदच होता. आश्रमाचे दार उघडले नाही. खूप वेळाने त्या बालिकेचे काय झाले म्हणून तिचे वडील पहायला आले, तर ती तशीच तडफडत होती. अंगाला मुंग्या आणि किडे खात होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलीला सोडले हे पाहून वडिलांना वाईट वाटले. त्या चावणाºया मुंग्यांपासून वडिलांनी तिला सोडवले आणि स्वच्छ करून पुन्हा घरी आणले, मात्र तेव्हापासून आपल्या मुलीला कधी अंतर द्यायचे नाही हे त्यांनी ठरवले होते, पण जन्म घेऊन एकप्रकारचे पाप केल्यासारखेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे केवळ चित्रपटातच त्या ट्रॅजेडी क्वीन नव्हत्या, तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांना दु:खाच्या राशीवरून जावे लागले होते. अखेरच्या काळात दारूच्या व्यसनाने त्यांना कवटाळले होते. त्यांच्या मृत्यूनंतर अभिनेत्री नर्गीसने एक लेख लिहिला होता, त्याचे शीर्षक होते, मीना मौत मुबारक हो. यातच सगळे आले. दु:खातून ती सुटली असेच नर्गीसला सुचवायचे होते. पडद्यावर आपल्या दर्शनाने रसिकांना सुखद आनंद देणारा हा चेहरा प्रत्यक्षात किती दु:खी होता हे यातून स्पष्ट होते.


मीना कुमारींचे खरे नाव ‘महजबीन बानो’ हे होते. केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही, तर त्या गायिका व कवयित्री होत्या. यासाठी त्यांनी ‘नाझ’ हे टोपणनाव धारण केले होते. ‘ट्रॅजेडी क्वीन’बरोबरच त्यांना कधी कधी ‘भारतीय चित्रपटांची सिंड्रेला’ असेही संबोधण्यात येत होते. १९३९ ते १९७२ या कालावधीत रुपेरी पडदा व्यापून टाकणारी ती अभिनेत्री होती. १९५० आणि १९६० चे दशक त्यांनी गाजवले. सत्तरच्या दशकात त्या चरित्र भूमिका करू लागल्या.

१९३९ च्या लेदरफेसपासून ते १९७२ च्या गोमती के किनारेपर्यंतचा त्यांचा रुपेरी प्रवास होता. यात रंगीत चित्रपट कमीच होते. कारण कृष्ण धवलच्या काळात त्यांचे पदार्पण झाले होते. साहब बिबी और गुलाम, मैं चूप रहुंगी, आरती, दिल एक मंदिर, शारदा, सहारा, चिराग कहाँ रोशनी कहाँ, दिल अपना और प्रीत पराई, आझाद, दो भिगा जमीन, बैजू बावरा, परिणीता हे त्यांचे विशेष गाजलेले आणि त्यांना पुरस्कार मिळालेले चित्रपट होते. त्या आजही तितक्याच सुंदर वाटतात, पण आयुष्यात मात्र दु:खी राहणारी ही एक गुणी अभिनेत्री बॉलिवूडच्या इतिहासात होऊन गेली.


स्टायलीश अभिनेत्याचा सन्मान

स्टायलीश अभिनेता रजनीकांतला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला. खरं तर त्याने गाजवलेली कारकीर्द पाहता हा त्याचा उचित सन्मान आहे, पण कारण नसताना त्यावर राजकारण करून काही राजकीय पक्षांनी तामिळनाडूतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार दिल्याची टीका सुरू केली. खरं तर रजनीकांतने आपण या निवडणुकीत सक्रीय नाही असे अगोदरच जाहीर केलेले असल्याामुळे या टीकेला काहीच अर्थ नाही, पण काहीही घडले की त्यात मोदी आणि सरकारवर टीका केलीच पाहिजे असे काही प्रवृत्तींचे मत असते. एखाद्या चांगल्या कामाचे कौतुक करण्याचे मोठे मन आपल्यात का नाही, असा प्रश्न पडतो.


खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात एका मराठी माणसाने करमणुकीच्या क्षेत्रात, चित्रपट निर्माण करण्याची बहुमोल अशी कामगिरी केली, त्यामुळेच कदाचित रसिकत्वाचा गौरव झाल्याचा आनंद चित्रपट बघितला की नेहमी द्विगुणित होत असतो. ‘राजा हरिश्चंद्र’ असो की ‘आलमआरा’ ते आजच्या काळातील ‘रोबोट’ आणि ‘मख्खी’पर्यंतचा प्रवास जरी अनुभवला तरी ही काय जादू आहे, याची प्रचिती प्रत्येक रसिकाला आलेली असते. चित्रपटसृष्टीने भारतात फार मोठा उद्योग आणि आर्थिक विकास केलेला आहे. त्याचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार रजनीकांतला जाहीर झाला हे योग्यच आहे. मराठी माणूस दादासाहेब फाळके यांच्यामुळेच आपण हा आनंद घेऊ शकत आहोत, हे अभिमानाने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते. दादासाहेबांच्या नावाने दिला जाणारा या क्षेत्रातील सर्वोच्च असा प्रतिष्ठेचा पुरस्कार लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला.

चित्रपट बघणं हे खरोखरच एक वेगळं थ्रिल असतं. ते कालानुरूप बदलत गेलं. त्या काळी चित्रपट बघणं त्या पिढीला जसं आनंददायी वाटायचं तसंच आजदेखील वाटतं. तेव्हाचे चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोन आणि आता बघण्याचा दृष्टिकोनदेखील बदलला आहे. जसजसा चित्रपट निर्माण करण्याचा काळ बहरत गेला, तसतशी आपल्या सभोवतालची कल्पक, प्रतिभावान माणसं गवसत गेली. ज्या मराठी माणसाच्या नावाने हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो तो आपल्या मराठी माणसाला मिळण्यासाठी मात्र कितीतरी काळ जाऊ द्यावा लागला. १९६९ साली देविका राणी यांना हा सन्मान मिळाला आणि त्यानंतर १९८३ मध्ये तो मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांना मिळाला. त्यानंतरची मराठी नावे व्ही. शांताराम, लता मंगेशकर, भालजी पेंढारकर, आशा भोसले ही आहेत. या वर्षीचा म्हणजे ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना दिला जाणार असल्याची घोषणा माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. रजनीकांतदेखील मराठी माणूस. त्यांचं मूळ नाव शिवाजी गायकवाड. बंगळुरू येथे त्यांचा जन्म झाला, मात्र या कलाकाराने केवळ हिंदीच नव्हे, तर तमीळ, तेलगू, कन्नड या भाषांतील चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आणि रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला! एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनदेखील सामाजिक क्षेत्रातील रजनीकांत यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.


रजनीकांत यांचा चित्रपट बघणे म्हणजे अक्षरश: थरारक, मजेशीर आणि अद्भूत अनुभव असतो. त्यांचा चित्रपट बघण्यासाठी मग आधीच्या पिढ्यादेखील उतावीळ असतात, यातच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीचं यश सामावलं आहे. सिगारेट भिरकावून ओठांत घेणे, गॉगल लावण्याची, हसण्याची स्टाइल अफलातून आहे. यामुळेच हा अभिनेता सर्वांचा लाडका आहे. त्याच्या या स्टायलीश आणि सुपरमॅन टाइप सर्वशक्तिमान व्यक्तिमत्त्वामुळे त्याच्यावर विनोदही भरपूर असतात. सोशल मीडियात तर रजनीकांतवर अतिशयोक्ती असे असंख्य विनोद सातत्याने फिरत असतात. ही त्याच्या लोकप्रियतेची पावती असते. कारण रजनीकांतच्या बाबतीत अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळणेही अशक्य नव्हतेच. तो आत्ता मिळाला हे विशेष.

रजनीकांतच्या स्टाइल उचलण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण तो कुणाला जमला नाही. त्यामुळेच त्यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिवस त्यांचे चाहते विश्व शैली दिवस म्हणून साजरा करीत असतात. तब्बल पाच दशके सिनेजगतावर राज्य करणा‍ºया या अभिनेत्याच्या कलागुणांचा ख‍ºया अर्थाने या पुरस्कारामुळे गौरव झाल्याचे रसिकांना वाटत आहे. तसे बघितले तर रजनीकांत यांना २००० मध्ये पद्मभूषण, २०१६ मध्ये पद्मविभूषण तसेच अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी जवळपास १९० चित्रपटांतून अभिनय केला आहे. दक्षिण भारतात, विशेषत: या कलाकाराला परमेश्वर म्हणून पुजले जाते इतकी त्यांची लोकप्रियता आहे. चाहत्यांनी रजनीकांत यांचे मंदिरदेखील उभारले आहे. त्यामुळे रजनीकांतच्या मुकुटात आणखी एक मानाचा महत्त्वाचा तुरा या पुरस्काराने खोवला गेला आहे.


दक्षिणेतील प्रेक्षकांचे आपल्या कलाकारावरील प्रेम हे अभूतपूर्व असते. तिथे पडद्यावरील नायकाला देव मानले जाते. मग ते एन. टी. रामाराव असोत, जे. जयललिता असोत, राजकुमार असो की रजनीकांत. मोहनलाल, मामुटी अशा अनेकांनी हा सन्मान मिळवला आहे, पण यात सर्वाधिक लोकप्रियता गेल्या काही दशकांत रजनीकांतने सातत्याने मिळवली आहे. कोणत्याही अभिनेत्याच्या चित्रपट शुभारंभ शोसाठी प्रेक्षक गर्दी करीत नाहीत, एवढी गर्दी रजनीकांत यांच्या पहिल्या शोसाठी होत असते. थलायवा अर्थात नेता किंवा बॉस म्हणून परिचित असलेल्या या अभिनेत्याच्या सामर्थ्यामुळे चित्रपटसृष्टीला एका अद्भूत कलाकाराची देणगीच जणू मिळाली. त्या कर्तृत्वाचा उचित गौरव झाला, असे म्हणावे लागेल. 

विच्छा माझी पुरी करा


एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले. कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल किंवा स्थानिक पातळीवरील असते, तितकेच तिला ग्लोबल अपील करणे सहज शक्य असते, कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन: पुन्हा कराविशी वाटणाºया ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने सिद्ध केली आहे! आणि हेच या नाटकाचं सर्वात मोठं बलस्थान आहे! पन्नास वर्षांपूर्वी या नाटकाने तमाशा आणि नाटक यांतील भिंत पाडून टाकत नाटकाचा प्रेक्षक तमाशा या कलाप्रकाराकडे वळवला. त्यामुळेच नंतर ‘गाढवाचं लग्न’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, अशी ही साताºयाची तºहासारखे काही नाट्यप्रयोग रंगभूमीवर गाजू लागले. म्हणून ‘विच्छा माझी पुरी करा’ हे रंगभूमीवर बदल घडवणारा मैलाचा दगड आहे.

तमाशातील अश्लिलता वाढत गेली होती. त्यातील पांचट विनोद यामुळे सभ्य समजल्या जाणाºया नाट्यगृहात याचे प्रयोगही होणे बंद झाले होते. तमाशाला वाईट दिवस आले होते. तमाशा हा फक्त जत्रेतल्या फडात चालणारा प्रकार अशी अवस्था होती. त्या काळात खरे तर काळू बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, विठाभाऊ नारायणगांवकर यांचे दर्जेदार तमाशे होत असत, पण नंतर तमाशा या शब्दावरच आक्षेप आला आणि त्याला लोकनाट्य म्हणून संबोधले जाऊ लागले, पण ही एक लोककला आहे. त्याचा एक फॉर्म आहे. तो टिकला पाहिजे. यादृष्टीने वसंत सबनीसांनी ‘विच्छा माझी पुरी करा’चे लिखाण केले. त्याची निर्मिती झाली आणि त्यात महाराष्ट्राला एक अजरामर कलाकार मिळाला तो म्हणजे दादा कोंडके. वसंत सबनीस, दादा कोंडके, उषा चव्हाण यांनी हे नाटक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून मोठे केले. शहरी प्रेक्षकही या नाट्यप्रयोगाला म्हणजे तमाशाला येऊ लागला. विशेषत: महिलावर्ग हा प्रयोग पाहू लागला हे विशेष.


तमाशा म्हणजे गण, गवळण, बतावणी आणि मग वग. वगामध्ये मुख्य कथानक, पण गण गवळण बतावणी ही प्रत्येक खेपेला वेगळी असते. त्यासाठी बतावणीतील कलाकारांचा अभ्यास, निरीक्षण फार महत्त्वाचे असते. ती ताकद दादा कोंडके यांच्यात होती. दादा कोंडके विच्छाचा जिथे प्रयोग लावला आहे तिथल्या बाजारपेठेत, त्या गावात संध्याकाळच्या सुमारास जाऊन फेरफटका मारून येत आणि सामाजिक, राजकीय परिस्थितीची कुजबूज ऐकत. त्यावर हमखास कोटी करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे दादा कोंडकेंची बतावणी ऐकायला, पहायला प्रेक्षक पुन: पुन्हा या नाटकाला येत असत. सर्वाधिक रिपीट आॅडियन्स मिळालेले हे वगनाट्य होते.

सुरुवातीच्या काही प्रयोगांत स्वत: वसंत सबनीस या नाटकात काम करत होते. या नाटकाचे अनेक संच झाले. अनेकांनी या नाटकात काम करून लोकप्रियता मिळवली. दादांनी चित्रपटसृष्टीकडे लक्ष केंद्रित केल्यावर या नाटकाचे प्रयोग राम नगरकर करू लागले. यात त्यांच्या जोडीला नर्तकी म्हणून रजनी चव्हाण होती. उषा चव्हाणची धाकटी बहीण रजनी चव्हाणला दादांच्या काही चित्रपटांतून संधी मिळाली होती. दादांनी उंचीवर नेऊन ठेवलेले हे नाटक तेवढ्याच ताकदीने राम नगरकरही करत असत. त्यानंतर १९९० च्या दशकात विजय कदमने या नाटकाचे प्रयोग सुरू केले होते, पण कायम एव्हरग्रीन असलेल्या या वगनाट्यावर दादांचा शिक्का मात्र कायम राहिलेला आहे.


दादा कोंडकेंची विच्छा पाहण्यासाठी एकदा आशा भोसले आल्या होत्या. आशा भोसले यांना हा प्रयोग इतका आवडला आणि त्यातील दादांचे काम पाहून त्या प्रचंड खूश झाल्या. त्या आनंदात त्यांनी दादा कोंडकेंना एक घड्याळ भेट दिले होते. ते घड्याळ दादांनी अखेरपर्यंत हातात घातले होते.

गेल्या काही वर्षांपूर्वी या नाटकाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम प्रभाकर पणशीकरांनीही केले होते. वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा हे नाटक नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेतर्फे पुन्हा रंगभूमीवर आणण्यात आले होते. छपरी पलंगाचा या मूळ वगावर हे नाट्य आधारित आहे! प्रख्यात मराठी चित्रपट अभिनेते दिवंगत दादा कोंडके आणि राम नगरकर या द्वयीनी हे नाटक एकेकाळी महाराष्ट्रभर गाजवलं होतं. ते आव्हान सांभाळणं सोपं नव्हतं, पण दिगंबर नाईक आणि संजय मोहिते यांनी या नाटकाची धुरा सांभाळली. फय्याजनी या नाटकासाठी पार्श्वगायन केलेलं होतं. यातील पाडाला पिकलाय आंबा हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे! अत्यंत लवचिक फॉर्म असलेल्या या लोकनाट्यात त्या त्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील घटनांवर विनोदी पण मार्मिक टीकाटिप्पणी केली जाते. आत्तापर्यंत या नाटकाचे सय्यां बने कोतवाल या नावाने भोजपुरी हिंदीमध्ये आणि टेम्प्ट मी नॉट या नावाने इंग्रजीमध्ये यशस्वी प्रयोग झालेले आहेत! हे या नाटकाचे फार मोठे यश होते.


दादा कोंडके आणि शिवसेना हे नाते सर्वांना माहिती होते. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांसमोर त्यांनी विच्छाचा प्रयोग केला तेव्हा शिवसेनेवर केलेली एक कोटीही फार महत्त्वाची होती. त्यामुळे हा प्रयोग पाहताना शिवसेनाप्रमुखही खळखळून हसले होते. राजा, प्रधानाच्या प्रसंगात कशी काय हालहवाल विचारल्यावर आता शिवसेना आहे असे सांगून त्यांनी जोरदार टाळ्या घेतल्या होत्या. पण या नाटकाने तमाशा लोककलेला जीवदान दिले, प्रतिष्ठा दिली आणि सभ्यता जपली तर चांगला प्रेक्षक इकडे येतो हे दाखवून दिले हाते. म्हणून विच्छा माझी पुरी करा हे एक दर्जेदार लोकनाट्य म्हणून गौरवले गेले.


महाराष्ट्राला शाप

देशभरातील सर्वाधिक बाधा झालेल्या पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासाठी निश्चितच शोभनीय नाही. हा महाराष्ट्राला शाप आहे की हे कोणाचे पाप आहे, याचा तपास करावा लागेल. देशभरातील कोरोना आटोक्यात आला आणि आता केवळ महाराष्ट्र तेवढा उरला असून, देशातील दहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत असल्याचा गंभीर इशारा केंद्राने दिला आहे. या दहा जिल्ह्यांपैकी ८ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत, ही चिंतेची बाब आहे. राज्यातील कोरोनासंदर्भातील या स्थितीला केवळ राज्य शासन जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. महाराष्ट्रातील कोरोना प्रबंधनाच्या अपयशाची निम्मी जबाबदारी शासनाची असेल तर निम्मी जबाबदारी राज्यातील नागरिकांचीदेखील आहे. वारंवार निर्बंध लागू करण्यात आले, पण त्याची अंमलबजावणी होताना कुठेही दिसत नाही आणि नागरिकदेखील नियम पाळताना दिसत नाहीत.


सध्या देशभरातील पाच राज्यांत निवडणुका होत आहेत. त्याठिकाणी सभा, संमेलने, बैठका सर्व काही सुरळीत सुरू आहे. फक्त महाराष्ट्रातच उद्रेकाची स्थिती कशी, असा सवाल नागरिक करीत आहेत. यावरून नागरिकांचा थेट रोष राज्य शासनावर आहे आणि शासन आपली जबाबदारी झटकण्यासाठी निर्बंध लागू करून मोकळे होते आणि जबाबदारी नागरिकांवर ढकलते, असे अनेकांचे म्हणणे आहे. आज शासकीय सुविधा अपुºया आहेत. खाजगी हॉस्पिटल्स अवाजवी आकारणी करून रुग्णांच्या गरजेचा गैरफायदा घेत नातेवाईकांचे आर्थिक शोषण करीत आहे. या स्थितीत लोकांनी जावे तरी कुठे, हा प्रश्न नागरिकांपुढे आहे.

गतवर्षीच्या पहिल्या टाळेबंदीच्या काळात बाधितांचा दर आणि मृत्युदर दोन्ही अधिक होते. त्यानंतर सप्टेंबरपासून दोन्ही दरांमध्ये बरीच घट आली होती. या काळात शासकीय यंत्रणांनादेखील सतर्कतेचा इशारा केंद्राने दिलेला होता. दुस‍ºया लाटेचे सुतोवाचदेखील करण्यात आले होते. तेव्हापासून शासकीय आरोग्य यंत्रणांनी तयारी करून हॉस्पिटलमधील खाटा, व्हेंटिलेटर्स, आॅक्सिजन, औषधे, इंजेक्शन आदी संदर्भात सक्षमपणे जुळवाजुळव करून ठेवली असती, तर आजची स्थिती जाणवली नसती. तहान लागल्यावर आड खोदायची वेळ आज महाराष्ट्रात आलेली आहे. कोणतीही आपदा आल्यानंतर त्यापासून धडा घेण्याचे काम अधिकारी व यंत्रणा करीत नाहीत. धोक्याचा इशारा मिळाल्यानंतर त्यावर गांभीर्याने विचारमंथन करून उपाययोजना केल्यास त्याचा निश्चित सुखद परिणाम सर्वांना अनुभवास येतो. कोरोना ही एक संधी म्हणून शासकीय व खाजगी स्तरावर स्वीकारण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक शासकीय हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र यंत्रणा आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र विभाग आरक्षित असावा, असा कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. कोरोना हा पुन्हा पुन्हा येणारा रोग आहे. एकदा झाल्यावर कोरोना पुन्हा येणार नाही असे समजून उपचारांची सोय अनेक ठिकाणी बंद करण्यात आली होती. अनेक कोविड सेंटर बंद करण्यात आली होती. हे चुकीचे नियोजन होते.


जगभरातील विकसित देशांमध्ये भारतापेक्षा अधिक सक्षम व्यवस्था असतानादेखील त्यांना तोेंडघशी पडावे लागले. अशी स्थिती असताना अतिशय अनागोंदी आणि अपुरी व्यवस्था असलेल्या भारतीय आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी कठोर पावले उचलून नियोजन करावे लागेल, असे दिसते. मुळात नागरिक निर्बंधांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याची ओरड प्रशासकीय स्तरावर करण्यात येत आहे, पण मागील वर्षभरात बहुतांश क्षेत्रे बंद असल्यामुळे अनेकांच्या नोक‍ºया गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले, सामान्यांना त्याचा फटका बसला, आता सप्टेंबरनंतर थोडी स्थिती नियंत्रणात आल्यानंतर लोक पुन्हा जगरहाटी सुरू होईल या आशेवर घराबाहेर पडले तर सर्वत्र अंध:कारमय स्थिती असताना लोक हिमतीने पुढे येऊन नव्याने उभारणीच्या कामाला लागले होते, तर पुन्हा शासनाने निर्बंधाची घोषणा केली आहे. टाळेबंदीची भीती दाखवली जात आहे. हा महाराष्ट्राच्या विकासाला शाप लागलेला आहे. रोजगाराचे देशातील प्रमुख केंद्र असलेला महाराष्ट्र आज बेरोजगार आणि गुन्हेगारीचे स्थान बनताना दिसते आहे. त्यामुळे आता टाळेबंदी आणि राज्यातील संस्था बंद ठेवणे हे परवडणारे नाही याचा विचार केला पाहिजे.

घरात खायला अन्न नाही, अनेकांच्या घरची स्थिती दयनीय बनली आहे, नियमित उत्पन्नाचे स्रोत बंद आहेत, आॅटोरिक्षा, व्यावसायिक यांनी बँकांचे कर्ज घेऊन नियमित उत्पन्नासाठी आॅटो किंवा वाहन खरेदी केली आहे. त्यांचे हप्ते भरणे कठिण झाले आहे, बँकांचे फोन कॉल्स, नोटीसेस, कर्जावरील वाढते व्याज, थकबाकीची भीती आदींतून मार्ग काढताना नाकीनऊ येत असताना पुन्हा टाळेबंदी आली तर नागरिक आत्महत्या करतील, गुन्हेगारीत वाढ होईल. शोषणाची प्रवृत्ती वाढीस लागेल. हा महाराष्ट्राला शाप असेल.


आज लग्नसमारंभ, मंदिरे, धार्मिक स्थळे आदी बंद केल्यामुळे या क्षेत्रावर उपजीविका असणा‍ºया मोठ्या वर्गावर उपासमारीचे संकट घोंघावत आहे. पहिल्या टाळेबंदीच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी किराणा, धान्य, आवश्यक वस्तूंच्या किट वितरीत केल्या, पण आता तीदेखील सोय उरली नाही. किट वाटपाची खरी गरज आता आहे, त्यावेळी लोक घरातच होते. आज घरातून पाय बाहेर काढताना खिशाकडे पहावे लागते. महागाई वाढते आहे आणि उत्पन्न बंद होत आहे. अशा अवस्थेत कडाक्याच्या उन्हात अंगाला घाम आणि त्याहीपेक्षा डोळ्यांत पाणी, अशी अवस्था सामान्यांची झालेली आहे. या शापित परिस्थितीतून महाराष्ट्राला बाहेर काढले पाहिजे. 

काळाचे भान हरपले, रात्रीस खेळ चाले...


‘रात्रीस खेळ चाले-३’ या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिसºया पर्वाचे ९ भाग झाले आहेत. त्यात रंजकताही भरपूर आहे. या पर्वाला पहिल्या दोन पर्वांपेक्षा अधिक पसंती मिळेल यात शंकाच नाही, पण या मालिकेत कथानकात आणि काळाच्या चक्रात बराच ढिसाळपणा दिसतो. त्यामुळे काळाचे भान हरपले रात्रीस खेळ चाले असे या मालिकेचे वर्णन करावे लागेल.

बहुतेक प्रेक्षकांनी या मालिकेची तीनही पर्व पाहिलेली आहेत. किंबहुना पहिले पाहिले त्यांनी दुसरे आवर्जून पाहिले आणि दुसºयाच्या लोकप्रियतेमुळे तिसरे पाहिले जात आहे, पण कथानकात रंजकता असली तरी काळाचे भान सुटले आहे हे वारंवार जाणवते.


पहिला भाग आणि दुसरा भाग यात २५ वर्षांचे अंतर होते. पहिला भाग आणि तिसरा भाग यात वीस वर्षांचे आणि दुसरा भाग आणि तिसरा भाग यात साधारण ४० वर्षांचे अंतर असले पाहिजे. दुसरा भाग हा काळाचे चक्र फिरवून अगोदरचे कथानक दाखवले होते. पहिल्या पर्वात दत्ताला गणेश आणि एक मुलगी पूर्वा असते. यातील गणेश मोठा साधारण २२ वर्षांचा, तर पूर्वा २० वर्षांची दाखवली आहे. सुषमा पण २० वर्षांची दाखवली आहे. दुसºया पर्वात गणेश आणि पूर्वा यांचा काही उल्लेखच नाही, मात्र सुषमा १० वर्षांची दाखवली आहे, तर अभिरामही १२ वर्षांचा दाखवला आहे. पहिल्या भागानंतरचा किमान १५ वर्षांचा आणि दुसºया भागानंतर किमान २५ वर्षांचा काळ लोटलेला आहे, पण काही पात्रं मोठी झाली आहेत, तर काही आहेत तेवढीच दिसतात. ही काळाची जादू न पटण्यासारखी आहे.

म्हणजे अभिराम आहे तसाच तरुण दिसतो. पहिल्या लग्नानंतर देविकाशी घटस्फोट होतो, कावेरीशी लग्न करतो, अमेरिका ते बंगळुरू असा प्रवास करतो आणि पंधरा वर्षांनी साधारण घरी येतो, पण आहे तेवढाच दिसतो. तीच गत पांडूची. त्यात पहिल्या, दुसºया आणि तिसºया भागात कसलीही वाढ नाही. आहे त्याच वयाचा पांडू राहतो. त्यामुळे लेखक, दिग्दर्शकाला विचारावेसे वाटते की, खुळ्यांची वाढ होत नाही का? इंदू पार काळी ठिक्कर पडली आहे, सुरकुत्या पडल्या आहेत, डोळ्यांच्या खाचा झालेल्या आहेत, अगदी नव्वदीच्या घरात आहेत, पण बाकीच्यांचे वय कसे वाढले नाही हा संदर्भ या मालिकेत गमतीशीर वाटता, पण मालिकेतील कथानक मात्र जबरदस्त रंजक घेतलेले आहे.


गमतीचा भाग म्हणजे पोस्टमनचा खून अण्णांनी केलेला आहे. तो मेलेला आहे हे दत्ता आणि सरिता फिरायला जाताना त्याचे प्रेत सापडते आणि पहिल्यांदा इंदूला कळवतात. तरीही अभिरामाला पत्र लिहायला तो समोर पोस्टमन येतो आणि त्याच्याकडून ती लिहून घेते. मग इंदू भ्रमिष्ट झालेली आहे की ती जिवंतच नाही, फक्त घुटमळते आहे तिथे? पांडू या खुळ्याला अण्णा, शेवंता यांचे अस्तित्व पहिल्या भागापासून जाणवते आहे. तसेच इंदूला जाणवत असेल तर इंदू वेडी झाली आहे का, असा प्रश्न पडतो.

सुशल्यामध्ये २० वर्षांत प्रचंड बदल झालेला आहे. तिने लोकांना लुबाडून बक्कळ पैसा कमावला आहे, बंगला बांधला आहे, गावात तिने अण्णांसारखा वट निर्माण केला आहे. हे सगळं होण्यासाठी किमान १५ वर्ष तरी लागलेली असतील. कारण गावात पूर्वीची माणसे नाहीत तर पुढची पिढी आहे. याचे कारण रघुकाकाचा रघुनाथ महाराज झाला आणि छायाची छाया माँ झालेली आहे. हा बदल होण्यास वीस वर्षं तरी लागली असतील. कारण रघुला सगळा गाव ओळखत असतो आणि छायालाही अण्णांची विधवा पोरगी म्हणून गाव ओळखत असतं. तरीही ती ओळख पुसून हे नवे महाराज आश्रम तयार करून राहात आहेत, हे होण्यासाठी २० वर्षं लोटली असावीत. गावातील ए टू झेड काम करणाºया दलालापासून सगळे लोक नवे आहेत. म्हणजे काळ खूपच पुढे लोटलेला असताना अभिरामचे वय कसे वाढले नाही? पांडूत काहीच बदल कसा घडला नाही? हे अनाकलनीय आहे.


दत्ताला लागलेले दारूचे व्यसन, चोºया करण्याची लागलेली सवय, सरितावर ओढवलेली दारिद्र्याची अवस्था हे ओघाने पुढील भागात समजेल, पण तिची मुलगी पूर्वा, मुलगा गणेश यांचे काय झाले हे अनुत्तरित आहे, पण सध्या जे कथानक दाखवले जात आहे त्यात पुरेशी रंजकता आहे हे नाकारता येणार नाही. कावेरीत शिरलेला शेवंताचा आत्मा पांडूला कळतो. आरशात कावेरीचे प्रतिबिंब शेवंताचे दिसते आणि पांडू शेवंता आली म्हणतो तेव्हा सगळेजण हादरतात. कावेरीला झपाटल्यानंतर स्वप्नात स्वत:चे प्रेत दिसणे, अभिराम आपल्याच प्रेतासमोर रडतो आहे, इंदू आपले दिवस घालत आहे, असले प्रकार दिसणे हे मालिकेतील नाट्यमयता वाढवणारे असले, तरी काही बाबतीत काळाचे पूर्ण भान हरपल्याचे दिसते हे नक्की.

आगामी काळात ही काळाची विसंगती काढून टाकली आणि सर्व अपूर्ण, अनुलेखीत गोष्टींचा उलगडा केला, तर ही मालिका यशस्वी ठरेल, दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरेल, माधवला वेड लागले आणि तो भरकटला आहे, पण अभिरामच्याच वयाचा असलेला आणि थोडा लहान असलेला माधवचा मुलगा आर्चितचे काय झाले हे पण समोर येणे आवश्यक आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना आपला ट्रॅक सापडला आहे, भूमिका समजली आहे. त्यामुळे त्यांचा अभिनय नैसर्गिक आहे हे मान्य करावे लागेल. फक्त निसर्गाने त्यांना आपले नेमके वय काय हे सांगितले नाही, कारण ही काळाचे भान हरपलेली मालिका आहे.