आरजे मलिष्काच्या ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?’ या विडंबनात्मक गाण्याला गतवर्षी केवळ मुंबईतच नव्हे, तर सर्वत्र उत्स्फूर्त दाद मिळाली होती. आता याच मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. यावेळी मलिष्काने ‘सैराट’ सिनेमातील ‘झिंगाट..’ गाण्याचा आधार घेतला आहे.आरजे मलिष्काच्या ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय?’ या विडंबनात्मक गाण्याला गतवर्षी केवळ मुंबईतच नव्हे, तर सर्वत्र उत्स्फूर्त दाद मिळाली होती. मलिष्काच्या या गाण्याने महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघाले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी जळजळीत शब्दांत आपला संताप व्यक्त करून मलिष्काला येनकेनप्रकारे अडचणीत आणायचाही प्रयत्न केला. आता याच मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. यावेळी मलिष्काने ‘सैराट’ सिनेमातील ‘झिंगाट..’ गाण्याचा आधार घेतला आहे. मलिष्काने सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल करत मुंबई महापालिका आणि सरकारवर निशाणा साधला आहे. या गाण्यानंतर आता शिवसेनेला तोंड द्यायला जागा नाही हेच दिसून येते. गेल्या वर्षी मलिष्काच्या ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ या गाण्याने धुमाकूळ घातला तेव्हा या मलिष्काच्या नावाने शिवसेनेने खडे फोडले. तिच्यावर प्रचंड टीका करून शिवसेनेने आपली निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात मलिष्काचे ‘तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ हे गाणे एवढे व्हायरल झाले आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लागले आणि त्यामुळेच शिवसेनेच्या धमक्या फिक्या पडल्या. मुंबई महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे साचलेल्या पाण्यामुळे मलिष्काच्या आईला डेंग्यू झाला होता. त्यामुळे यावर विडंबन गीत सादर करत तिने मुंबईची परिस्थिती उपहासात्मक गाण्यातून दाखवून दिली. पण त्याचा शिवसेनेला इतका राग आला होता की, त्या मलिष्कावरच खालच्या पातळीवर टीका करण्यापर्यंत शिवसेनेची मजल गेली होती. म्हणजे शिवसेनेला लोकशाही, अभिव्यक्ती हे काही मान्यच नाही, हेच सेनेच्या नेत्यांनी दाखवून दिले होते. तिच्यावर खटला भरण्याची, तिला नोटीस देण्याची घोषणा केली गेली. अर्थात मुंबईकर त्यावेळी मलिष्काच्याच बाजूने उभे राहिले. शिवसेनेने मुंबईतील खड्डे बुजवले असते आणि पावसाळ्यात मुंबई पाण्याखाली गेली नसती तर मुंबईकरांनी शिवसेनेची किंमत ठेवली असती. पण ‘मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय का’ या गाण्याला कडाडून विरोध करून शिवसेनेने आपल्या कामात कसलीही सुधारणा केली नाही. या वर्षी पुन्हा एकदा पाणी तुंबण्याचे प्रकार घडलेच. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या कारभारावर वार करणारे गीत आरजे मलिष्काने तयार करून महापालिकेचा बुरखा फाडला आहे. गेल्या दोन-तीन वर्षातील सर्वात सुपरहिट म्हणता येईल, अशा ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ गाण्याच्या चालीवर मलिष्काने ‘गेली गेली गेली, आमची मुंबई खड्डय़ात गेली’ हे गीत सादर केले आणि शिवसेनेचे चांगलेच नाक ठेचले आहे. मुंबईत काही दिवस सलग पाऊस झाल्यानंतर अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते, तर अनेक दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या सगळ्याला उद्देशून मलिष्काने हे नवे गाणे सादर केले आहे. या गाण्यातून तिने मुंबई महापालिका, सरकारवर टीका केली. या गाण्यातून मलिष्काने ‘गेली मुंबई पाण्याखाली’ आणि ‘खड्डय़ात रस्ते की रस्त्यात खड्डे’असे भाष्य केले आहे. गेल्या वर्षी शिवसेनेने तिला इतके ट्रोल केले होते, धमक्या दिल्या होत्या तरी तिने न घाबरता हे गाणे सादर केले याबद्दल तिचे कौतुकच करावे लागेल. मुंबईकरांना शिवसेनेचा धाक आवडतो. अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. कारण तेव्हा मुंबईत रात्री-अपरात्रीही महिला उजळ माथ्याने न घाबरता बाहेर पडू शकत होत्या. महिलांचा आदर केला जात होता. आज तशी परिस्थिती आहे का हे तपासावे लागेल. त्यामुळे गुंडांना जरब बसवणारा शिवसेनेचा धाक होता. आता धाक नाही, तर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच गेल्या वर्षी जेव्हा मलिष्काने हे विडंबन गीत सादर केले तेव्हा आपल्यात सुधारणा करण्याऐवजी मुंबई महापालिकेने मलिष्काला नोटीस पाठवली होती. या प्रकाराने मुंबईकर संतापले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता. हे करण्यापेक्षा पुढच्या सहा-आठ महिन्यांत शिवसेनेने आपल्या सत्तेचा वापर करत मुंबईची सफाई, खड्डे बुजवणे याकडे लक्ष दिले असते तर आज ‘गेली गेली मुंबई खड्डय़ात गेली’ हे गाणे सादर करायची वेळ आली नसती. ‘सैराट’ सिनेमातील ‘झिंग झिंग झिंगाट..’ गाण्याच्या चालीवर मलिष्काने गायलेले ‘गेली गेली मुंबई खड्डय़ात..’ हे गाणे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तरुणांना ते आवडते आहे, कारण त्यांच्या मनातील भावनाच मलिष्काने व्यक्त केल्या आहेत. कामावर जाताना मुंबईकरांना किती त्रास होतो, मुंबई पावसात किती तुंबते हे फक्त हेलिकॉप्टरमधून कॅमेरे घेऊन फोटो काढणा-या नेत्यांना काय कळणार? हवेत उडून फोटो काढणे सोपे आहे, पण जरा जमिनीवर उतरून किती पाणी साचले आहे हे या नेत्यांनी पाहिले तर बरे झाले असते. शिवसेनेचे नगरसेवक, महापौर सगळेजण पाणी तुंबण्याबाबत बघ्याची भूमिका घेताना दिसत होते. मुंबई एकीकडे पाण्याने भरत होती आणि शिवसेनेचे नेते आता याला जबाबदार कोणाला धरू म्हणून विचार करत होते. फक्त दुस-याच्या माथी खापर फोडून स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न शिवसेना करत होती. पाणी का तुंबले, तर म्हणे एमएमआरडीएमुळे तुंबले. पाणी का तुंबले तर म्हणे राज्य सरकारमुळे तुंबले. पाणी का तुंबले तर मेट्रोच्या कामांमुळे तुंबले. सगळे जर राज्य सरकार, एमएमआरडीए करत आहे तर मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना काय करते? ही कामे काय अचानक आलेली आहेत का? ती कामे करण्यासाठी महापालिकेला बरोबर घेतले आहेच ना? महापालिकेला न विचारता तर यातले काही झालेले नाही ना? तेव्हा यामुळे अशी संकटे येतील हे सांगायला त्यांची तोंडे कशाने बंद झाली होती? हा निव्वळ शिवसेनेचा पळपुटेपणा आहे. पण आम्ही शिवसेनेला घाबरत नाही हेच तरुणाईने दाखवून दिले आहे. शिवसेनेची ताकद एकेकाळी युवाशक्ती होती. आज तीच तरुणाई शिवसेनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. शिवसेनेच्या निष्क्रियतेमुळे तरुणाई आज मलिष्काच्या पाठीशी उभी राहताना दिसते आहे. म्हणूनच तर मलिष्काने नवे झिंगाट गीत आणत मुंबई कशी खड्डय़ात गेली हे दाखवून दिले आहे. सलग दोन वर्ष मुंबईला खड्डय़ात घालवणारी शिवसेना यापासून काही बोध घेणार की पुन्हा कोणाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणार हे पाहावे लागेल. आज शिवसेनेपेक्षा मलिष्कावरच तरुणाईचा भरोसा आहे हे दिसून येते.
Thursday, July 19, 2018
गेली गेली मुंबई खड्ड्यात गेली!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment