बोफोर्स म्हटले की, समोर येते ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव. बोफोर्स तोफ म्हटले की, आठवण येते कारगील युद्धात केलेली महत्त्वपूर्ण कामगिरी. त्यामुळे बोफोर्सला भ्रष्टाचाराचा कलंक आहे, तशीच धडधडणारी आगही त्या तोफेतून बाहेर पडताना दिसते. आज सगळेच हाताबाहेर गेल्यानंतर काँग्रेसला अशाच एका धडाडणा-या तोफेची गरज आहे, जी विरोधकांवर डागली जाईल. आजमितीला काँग्रेसकडे राहुल गांधी नावाची बोफोर्स तोफ सज्ज झालेली आहे, जी सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवते आहे.गेले काही दिवस राहुल गांधींनी सातत्याने राफेल विमान हा मुद्दा उचलून धरला आहे. ना पेट्रोल-डिझेल दरवाढ, ना महागाई, ना बेरोजगारी किंवा अन्य कोणत्याही मुद्दय़ावर ते बोलत नाहीत. त्यांनी फक्त राफेल मुद्दय़ावरच आपली बोफोर्स तोफ धडाडत ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार म्हणजे लुटारूंची कंपनी आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राफेल कराराचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या संदर्भातली एक कविताच राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केली आहे. ‘मोदी अंबानी का देखो खेल, एचएएल से छीन लिया राफेल’ अशी या कवितेची सुरुवात आहे. तसेच नंतर जनतेला आवाहन केले आहे की आपण सगळे मिळून लुटारूंची कंपनी थांबवू. फक्त आणि फक्त राफेल या एकाच मुद्दय़ाची बोफोर्स तोफ डागायची आणि देशभर त्याचाच धुडगूस घालून भाजपला जेरीस आणायचे हा एकमेव अजंडा राहुल गांधींनी अध्यक्ष म्हणून राबवलेला दिसून येतो. त्यामुळे भाजपला विरोध करण्यासाठी अन्य कोणताही मुद्दा नसल्याने राफेलवर बोफोर्स डागण्याचा प्रकार चालल्याचे दिसून येते. पण हे बोफोर्स तोफेचे राहुल अस्त्र काँग्रेसवर बुमरँगसारखे उलटू शकते याचे भान आजतरी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आलेले दिसत नाही.राहुल गांधी म्हणतात, फ्रान्ससोबत झालेला राफेल विमानांचा करार म्हणजे ब्लॉकबस्टर सिनेमा आहे. या सिनेमात मैत्री, पटकथेतले नाटकी प्रसंग, रहस्य, विश्वासघात आहे. राफेल करारासंबंधीच्या ब्लॉकबस्टरमध्ये लष्कराच्या सैनिकांचे शौर्य आणि देशभक्ती पणाला लावण्यात आली आहे. मोदी आणि अंबानींचा हा सिनेमा एकदम ब्लॉकबस्टर ठरल्याचीही टीका या ट्विटमध्ये करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आले आहे. म्हणजे एकमेव मोदी आणि अंबानी यांनाच टार्गेट करून पुढचे राजकारण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पण त्याशिवाय सरकारला घेरण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नसणे हे काँग्रेसच्या दृष्टीने दुर्दैव म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा विरोधकांकडे नाही, त्यामुळे ती टीका म्हणजे अप्रत्यक्ष सरकार कार्यक्षम असल्याची पोहोचपावतीच असल्याचे दिसते आहे.जेव्हा योद्धा म्हणून पंतप्रधान किंवा नरेंद्र मोदी समोर असतात तेव्हा कोणते आणि कसे हत्यार हाताळावे, कोणती चाल खेळावी आणि काय मुद्दे असावेत याबाबत काँग्रेस नेहमीच गलीतगात्र झालेली आहे. गेल्या १५ वर्षातील तोच अनुभव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर हल्ला करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी असाच तोफ डागण्याचा प्रकार केला होता. त्याचा तसूमात्र फायदा सोनिया गांधींना झाला नाही. सोनिया गांधी जेवढी टीका करतील ती मोदींच्या फायद्याचीच झाली आणि सलग मुख्यमंत्रीपद त्यांच्या पदरात पडले. त्यांचा पंतप्रधानपदाचा सोनेरी मार्ग या काँग्रेसच्या टीकेतून निर्माण झाला. २००२ पासून होणा-या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने नरेंद्र मोदींवर प्रचंड टीका केली होती. कधी केंद्रात सत्ता नसताना तर कधी केंद्रात सत्ता असतानाही काँग्रेसला नरेंद्र मोदींचे गुजरातमधून उच्चाटन करणे जमले नाही, त्याचे कारणच ते होते. या प्रचारात रक्ताने बरबटलेले हात ते ‘मौत का सौदागर’ अशा कठोर शब्दांत सोनिया गांधींनी भाजपवर, नरेंद्र मोदींवर टीका केलेली होती. पण त्यामुळे गुजरातमधील व्होट बँक खेचून आणणे काँग्रेसला जमले नाही. त्यामुळे राहुल गांधींची ही बोफोर्स तोफ बूमरँगसारखी काँग्रेसवर उलटणार का, अशी शंका आल्याशिवाय राहणार नाही.एकीकडे राहुल गांधी राफेलवरून बोफोर्स बंबार्डिग करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाठराखण करत आहेत. म्हणजे शरद पवारांची ही ढाल आता राहुल गांधींना त्रासदायक ठरते का हे पाहावे लागेल. पण दुसरा कोणताही मुद्दा न उचलता राहुल गांधी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राफेल विमानावरून हंगामा करणे हा अजेंडा घेऊन बाहेर पडले आहेत. हा जुगार त्यांच्या अंगलट येतो की फायदेशीर ठरतो हे भविष्यात समजेल, पण आजतरी या मुद्दय़ातून त्यांच्या पदरी फार काही पडेल असे वाटत नाही.राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांचा फायदा होण्यासाठी फेरबदल केले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चोर, चोरांचे सरदार आहेत, अशीही टीका त्यांनी केली. अर्थात राहुल गांधींची ही मते जनतेने फारशी मनावर घेतलेली दिसत नाहीत. जनतेला फक्त राहुल गांधी बोलायला लागले आहेत एवढेच जाणवते आहे. त्यांच्या भाषणाने, वक्तव्याने कोणी प्रभावित होताना दिसत नाही, तर एखादे लहान मूल बोलायला शिकल्यावर नवनवीन शब्द उच्चारते आणि त्याचे ते बोबडे बोल सगळे कौतुकाने ऐकतात असाच हा प्रकार आहे. या बोफोर्स तोफेचे नेतृत्व काँग्रेसने राहुल गांधींकडे देऊन तोफ धडाडत राहील एवढी काळजी घेतली आहे. मात्र यात काँग्रेसचे अस्तित्व कुठेही दिसत नाही.राफेल करारातील विमानांची किंमत यूपीएच्या काळात होती त्यापेक्षा कैकपटीने वाढली आहे, असाही आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देणारे व्हीडिओ आणि सोशल पोस्ट भाजपनेही पोस्ट केल्या. तसेच राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करताना मर्यादा सोडल्याचा आरोप भाजपने केला. तरीही काँग्रेसने राफेल करारावरून टीका करणे सोडलेले नाही. राफेलवरून फक्त मोदी, अंबानी यांना टार्गेट केले जात आहे, पण अंबानी भारतातच आहेत. ते कोणा क्वात्रोचीप्रमाणे पळून गेलेले नाहीत आणि मोदींनी त्यांना मदत केलेली नाही याची जाणीव जोपर्यंत भारतीयांना आहे तोपर्यंत राहुल गांधींच्या या बोफोर्स हल्ल्याचा मोदींच्या राफेल विमानावर काहीही परिणाम होणार नाही.
Tuesday, October 2, 2018
राहुलची बोफोर्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment