Thursday, May 6, 2021

सोयीसाठी कोरोना


देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पुद्दुचेरी आणि केरळ या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल हाती आले आणि करोनाच्या काळात २४ तास का होईना लोकांना महामारीचा विषय सोडून राजकारणावरच्या बातम्या पाहायला, ऐकायला मिळाल्या. वृत्तवाहिन्यांवरून सतत अतिरंजीत, भडक आणि घाबरवून टाकणारी कोरोनाची वृत्तं पाहून सामान्य माणूस कंटाळला होता. मानसिक तणावात होता. डिप्रेशनमध्ये जात होता. त्यामुळे या वाहिन्या आणि वाहिन्यांवर कोरोनावरून टीका करण्यासाठी येणाºया नेत्यांना जर गप्प बसवले, बंद केले, तर आपोआप कोरोना नष्ट होईल, असे जनतेला वाटू लागले आहे. कारण जेव्हा काही अतिरंजीत, खमंग, चटकदार असे दाखवायला नसेल तेव्हा कोरोनाचा सोयीस्कर वापर करायचा, असे तंत्र झाले आहे. रविवारी पाच राज्यांतील निवडणुका, ममतांची मुसंडी, भाजपचा लागलेला निकाल यात सगळे इतके रमून गेले होते, कुठेही कोरोनाची दिवसभरात संख्या किती वाढली, किती मेले, किती बरे झाले याबाबत बोलायलाही तयार नव्हते. नाहीतर सकाळी टिव्ही लावला की, आलाच तो अँकर समोर साडेतीन लाखांचा टप्पा ओलांडला, चार लाखांचा टप्पा ओलांडला असे घाबरवायला सुरुवात करतो, हा विषाणू किती भयानक आहे, तो आपले रूप कसे बदलतो याची भीती घालायला सुरुवात होते. त्यामुळे प्रश्न पडला की, रविवारी एक दिवस कोरोनाने सुट्टी घेतली होती का? का तो व्हायरस म्हणाला, चला जरा आज निवडणुकीचे निकाल बघू, आज कोणाला लागण करायलाच नको. असा विचार तर त्या विषाणूने केला नाही ना अशी परिस्थिती दिसली; पण एकच जाणवले की कोरोनाचा प्रत्येक जण सोयीने वापर करतो आहे.


मागच्या महिन्यात जेव्हा वाझे प्रकरण गाजत होते, तेव्हा कोरोनाविषयी कोणतीही बातमी येत नव्हती. तेव्हा कुठे गेला होता कोरोना? परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकला तेव्हाही दिवसभर परमबीर, अनिल देशमुख यांचीच चर्चा. कुठेही कोरोनाची चर्चा नाही. कारण चघळायला हा मस्त विषय होता, मग कोरोनाला थोडी विश्रांती दिली. कोरोना हा हुकमी एक्का झाला आहे. जेव्हा काही नसते, तेव्हा कोरोनाचा प्रसार वाढला. अरे कोरोनाबरोबर जगायचे आहे, हे एकदा ठरवून टाकले आहे ना आपण? मग रोज का त्याचा इतका अतिरेक करायचा? यापूर्वी आपल्याकडे कितीतरी साथी आलेल्या आहेत. बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू, सार्स, चिकन गुनिया, डेंगूपासून ते पूर्वीचे पोलिओ, देवी, कुष्टरोग असे कितीतरी रोग झाले आहेत. मग बाकीची आकडेवारीही का दिली जात नाही? देशात पोलिओवर मात केली. रविवारी एक लाख बालकांनी पोलिओचा डोस घेतला. याबाबत बातमी कधी दिली गेली नाही. खरं तर अमिताभ बच्चन यांनी केलेल्या सर्वाधिक पोलिओच्या जाहिराती या वाहिन्यांना मिळाल्या होत्या. त्या जाहिरातींवर त्यांचे पाय मजबूत झाले होते; पण पोलिओच्या लसीकरणाबाबत कधी बातमी आली नाही; पण कोरोना हा एक चर्चेला छान विषय आहे. त्याच्या नावावर काहीही खपवता येते. त्याचा सोयीनुसार वापर करता येतो. हुकमी एक्क्याप्रमाणे केव्हाही आपला टीआरपी वाढवण्यासाठी त्याचा वापर करता येतो, हे आता सर्वांना समजून चुकले आहे; पण रविवारी दिवसभर कोरोनाला मिळालेली विश्रांती ही खरोखरच समाधानकारक होती. त्यामुळे जनतेला आता वाटू लागले आहे की, काहीतरी वेगळं सतत घडलं पाहिजे, म्हणजे त्या कोरोनाच्या बातम्यांमधून आपली सुटका होईल. टिव्ही मालिकांचे चित्रीकरण बंद पडल्यामुळे जुने भाग बघावे लागत आहेत. त्यामुळे विरंगुळा म्हणून बातम्या पहाव्यात, तर कोरोनाशिवाय काही नाही. त्यासाठी अधूनमधून असे काही घडले पाहिजे.

वाझे, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांनी अधूनमधून आपल्या कर्तृत्वाने थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. काही दिवस धनंजय मुंडेंनी वेगळेपण दाखवून दिले. संजय राठोड यांनीही आठवडाभर खाद्य दिले; पण या नेत्यांनी आपली कर्तबगारी दाखवली नाही की, सगळे पुन्हा कोरोना कोरोना करत घाबरवून सोडायला लागतात. रविवारचा दिवस जरा खूप दिवसांनी वेगळं काहीतरी घेऊन आला; पण आमच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी काहीतरी केले पाहिजे. आता त्यांना हातावर हात ठेवून बसू नका, काहीतरी कराना म्हणावे लागेल. तरच काहीतरी वेगळे पहायला मिळेल. नाहीतर तीच आकडेवारी. तीच आग लागलेली. तेच नेते मदतनिधी जाहीर करण्यासाठी येतात, असले प्रकार पहावे लागतात. खरं तर सरकारनं आता आपण करत असलेले प्रयत्न या कॅमेरामनला दाखवले पाहिजेत. आज इतक्या लोकांनी शिवभोजन थाळीचा आनंद घेतला. त्या शिवभोजन थाळीवर कॅमेरा मारावा, त्यात काय-काय पदार्थ आहेत, ते कोणाला मिळाले, कुठे मिळते? ती मोफत किंवा अल्प दरातील थाळी खायला सामान्य, गोरगरीबांनी जायचे कुठे हे सगळं दाखवलं पाहिजे. नाहीतर लोकांना वाटेल की सरकार फक्त घोषणा करत आहे, प्रत्यक्षात शिवभोजन थाळी कुठे दिसतच नाही. असे व्हायला नको.


सरकारनं गेल्या काही दिवसांत इतकी मदत केलेली आहे, त्याचे चित्रण दाखवायला काय हरकत आहे? नाशिक, भंडारा, भांडुप, विरार अशी पाठोपाठ अग्निकांड झाली. त्यातील मृतांच्या वारसांना सरकारनं आर्थिक मदत दिली. त्या मदतीचे धनादेश देताना, त्या कुटुंबातील वारसांच्या प्रतिक्रिया, सरकारबद्दलची कृतज्ञता हे का नाही दाखवले जात? त्यामुळे सामान्यांना वाटते की, सरकार फक्त घोषणा करते. लाभार्थींना ते मिळतेच असे नाही. त्यामुळे कोरोनाचा कंटाळा आला असेल, त्याचेच सारखे वृत्तांकन करावे लागत असेल, तर कंटाळलेल्या प्रेक्षकांना हे बाकीचेही दाखवा. एक दिवस ममतांच्या कृपेने रविवारी कोरोनाने सुट्टी घेतली, तसा आनंद सारखा मिळावा असे वाटते.

4 may

No comments: