Thursday, May 20, 2021

ससा आणि कासवाची गोष्ट

 ससा आणि कासवाची गोष्ट फक्त शाळेत शिकण्यासाठीच नाही, तर तो आयुष्यभराचा बोध असतो हे पुन्हा एकदा कोरोनाने दाखवून दिले आहे. जगाच्या तुलनेत आमची लोकसंख्या सर्वात जास्त असूनही भारतात बाधित फारसे नव्हते, त्यामुळे पहिल्या लाटेत आम्ही तरलो, पण दुसºया लाटेत आता गटांगळ्या खातो आहोत, कारण थोडी सुस्ती आली असावी. जो सुरुवातीला जोरात धावतो तो नंतर अडखळतो. ससा असाच वेगाने पळाला आणि कासवाची वाट पाहत झोपून गेला. अशी अवस्था झाली असावी असे वाटते. कारण गेल्या वर्षी आपण चांगली कामगिरी केली अशी स्वत:ची पाठ थोपटण्यात मोदी व त्यांचे सहकारी गर्क होते. कोरोनाची दुसरी लाट येणार या इशा‍ºयाकडे केंद्राने दुर्लक्ष केले हे वास्तव आहे. ते नाकारून चालणारही नाही. किंबहुना आपण अनलॉक होताना, पुनश्च: हरिओम म्हणत असताना भारतात कोरोनावर मात केलेली असताना गाफील राहिलो, निवडणुका घेत राहिलो. हीच ती सशाची धुंदी होती. या सशाने शर्यत जिंकण्याऐवजी आम्हाला स्मशानाकडे नेले. आज या दुसºया लाटेला नेमके तोंड कसे द्यावे हे सरकारला उमजत नसल्याचे स्वच्छ दिसत आहे. याबद्दल केवळ देशातील विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली असे नव्हे, तर जगातून ती होत आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर केजरीवाल व बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची स्वाक्षरी नाही. या पत्रावर, डाव्या पक्षांच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांची स्वाक्षरी आहे. सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, शरद पवार, अखिलेश यादव, डॉ. फारुक अब्दुल्ला, तेजस्वी यादव यांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. केंद्राने खरं तर अशा परिस्थितीत सल्लामसलत करून विरोधकांना विश्वासात घेण्याची गरज होती, पण एककलमी कार्यक्रम राबवण्याची लागलेली सवय या आंतरराष्ट्रीय संकटाला मारक ठरली हे लक्षात घेतले पाहिजे. सशासारखी धुंदी डोक्यात गेल्यामुळे सर्वसामान्यांची ससेहोलपट झाल्याचे चित्र आज दिसत आहे.


सध्या देशात कोरोनामुळे लसीचाही प्रॉब्लेम झालेला आहे. लस उत्पादकांनी केंद्र व राज्य सरकारांसाठी वेगवेगळे दर जाहीर करण्यावर विरोधी पक्षांचे सरकार असलेली राज्ये प्रथमपासून प्रश्न विचारत आहेत. त्यावर केंद्राने काही उत्तर दिलेले नाही. कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोणते उपाय योजावेत व अंमलात आणावेत याबद्दल आम्ही स्वतंत्रपणे व एकत्रितरीत्या अनेक सूचना केंद्राला केल्या; पण केंद्राने एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्या फेटाळून लावल्या. त्यामुळेच ही भयावह स्थिती निर्माण झाली आहे; असा या पत्राचा सूर आहे.

खरं तर २0२१-२२ च्या अंदाजपत्रकात केंद्राने लसीकरणावर खर्च करण्यासाठी तरतूदच केलेली नाही. जी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद दाखवली आहे ती राज्यांना लसीकरणासाठी कर्ज किंवा अनुदान या स्वरूपाची आहे. ही तरतूद ५0 कोटी नागरिकांना लस देण्यास पुरेशी असल्याचा दावा अर्थखात्याचे सचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी अंदाजपत्रक सादर झाल्यावर एका मुलाखतीत केला होता. तेव्हा लसीच्या डोसची किंमत १५0 रुपये ठरली होती. आता ती वाढली आहे. त्यामुळे ही रक्कम अपुरी पडेल हे निश्चित. स्पुटनिकची लस तर ९५0 रुपयांना आहे. अन्य नव्या पाच कंपन्यांना आॅर्डर देण्याची तयारी असताना त्याची आर्थिक तरतूद कशी असणार आहे हा प्रश्न आहे. त्यामुळे या फक्त घोषणा राहणार का? जनतेला तातडीने लसींचा पुरवठा होणार का? हा प्रश्न अनुत्तरित असाच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, गेल्या वर्षी कोरोनाविरोधात लढण्याचा जो उत्साह केंद्र सरकार आणि अर्थात पंतप्रधान मोदींमध्ये दिसत होता त्या तुलनेत आता ते तोंडच उघडत नाहीत असे दिसते आहे. शुक्रवारी त्यांनी हिंमत हरलेलो नाही असे म्हटले असले, तरी ते सांगण्याची तशी आवश्यकताच नव्हती. कोरोनाचे संकट पुरते गेलेले नसताना निवडणुका घेण्याचा जो प्रकार देशभरात झाला तो घातक ठरला हे नाकारता येणार नाही. आज फक्त पाच राज्यांतल्या निवडणुकांची चर्चा असली तरी महाराष्ट्रात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या गेल्या. त्यामुळे सगळे राजकीय पक्ष, नेते ग्रामीण भागातल्या कानाकोपºयात गर्दी करायला गेले होते. त्या गर्दीतूनच ग्रामीण भागात कोरोना शिरला आहे. हा कासवगतीने घुसलेला कोरोना बाहेर काढायला सश्याची गती कमीच पडणार आहे.


लसींचा तुटवडा आहेच, पण लसींच्या तुटवड्याबरोबरच त्यांच्या किमतीचा गोंधळ आहे. रुग्णांची संख्या व मृत्यू मात्र वाढत आहेत. केंद्र सरकार व मोदी ही स्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असताना, तो हितसंबंधी गटांचा कार्यक्रम असल्याचा प्रत्यारोप भाजप व सरकारमधील काहीजण करत आहेत. भाजप विरोधात होता तेव्हा त्यांचे म्हणणे सत्य असल्याचा त्यांचा दावा असे सगळे तज्ज्ञ लोक कोरोनाची लाट थोपवण्यासाठी लसीकरण प्रभावी झाले पाहिजे म्हणून सल्ला देत आहेत, पण आपल्याकडे लक्ष केंद्रीत झालेले नेते विरोधकांना उत्तरही ते देत नाहीत. इतरांचे ऐकून घेणेही त्यांना मान्य नाही. ही परिस्थिती सुधारली पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन गेले तरच आपण हे युद्ध जिंकणार आहोत. त्यासाठी सशासारखी असलेली डोळ्यावरची धुंदी कमी करण्याची गरज आहे.

No comments: