Sunday, June 27, 2021

चर्चेतून अस्तित्व


राज्यातील आणि देशातील छोट्या पक्षांची एकूणच कामगिरी पाहता भविष्यात फक्त भाजप आणि काँग्रेस हेच दोन पक्ष शिल्लक राहतील, असे वाटू लागले आहे. म्हणजे तिसरी आघाडी करण्याचा भाजप, काँग्रेसला लांब ठेवण्याचा कितीही प्रयत्न कोणी केला, तरी तो यशाचा मार्ग असणार नाही, तर देशात भाजप आणि काँग्रेस यांच्याशिवाय कोणी नेतृत्व करू शकेल, असे वाटत नाही. याचे कारण कोणत्याही भूमिकेशी छोटे प्रादेशिक पक्ष प्रामाणिक राहताना दिसत नाहीत. सत्तेत राहूनही आपल्याच सहकारी मुख्य पक्षावर, सरकारवर टीका करण्याचा अधमपणा हे पक्ष करत असतात. हा प्रकार केंद्रात किंवा राज्यात भाजप आघाडीचे सरकार असो वा काँग्रेस आघाडीचे असो, घटक पक्षांनी आपल्याच सरकारवर टीका करायला कमी केलेले नाही.

डाव्या विचारसरणीचे जे पक्ष आहेत त्याची कोणतीही भूमिका नाही. अगदी शेतकरी संघटनेचे पक्ष असोत अथवा शेकापक्षासारखा जुना पक्ष. इतका काळ काँग्रेसला विरोध करण्यात गेला आता भाजपला विरोध करण्यापलिकडे यांची भूमिका काही नाही. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने कोणाशीही सलगी करण्याचे काम असे छोटे पक्ष करत आहेत. त्यातच त्यांचे अस्तित्व संपताना दिसत आहे, म्हणूनच काँग्रेसची पडझड झाली, तरी ती सावरेल आणि भाजपात गडबड झाली तरी तो आवरेल, कारण या दोघांशिवाय देशाला पर्याय नाही.


काँग्रेस पक्ष सध्या संक्रमणावस्थेतून जात आहे. त्याला कधी नव्हे ते सोनिया विरुद्ध राहुल असे मायलेकांच्या संघर्षाचे स्वरूप यावे, ही गांधी कुटुंबाच्याच नव्हे, तर काँग्रेस पक्षाच्याही दृष्टीने दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. पक्षातीलच काही बडी धेंडे प्रियंका विरुद्ध राहुल असे द्वंद निर्माण करून गुंता अधिक वाढविण्यात आनंद मानत आहेत; पण या संक्रमणावस्थेतून लवकर बाहेर पडण्याची गरज आहे. कारण छोट्या प्रादेशिक पक्षांप्रमाणे हा पक्ष नाही. महाराष्ट्रातून नाना पटोलेंसारखे नेतृत्व पक्षाला चांगली ताकद देऊ शकते, त्याप्रमाणे प्रत्येक राज्यात पक्षाची चांगली बांधणी केली आणि पक्षाला नेतृत्व मिळाले, तर या इमारतीची उत्तम डागडुजी होऊ शकते.

आणखी काही महिन्यांत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि भाजप सेनेला धक्का देऊ शकतात. या काँग्रेसची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. काँग्रेसने कात टाकायला सुरुवात केली आहे. भाई जगतापांनी स्वबळाची भाषा वापरून महाविकास आघाडीशी आपला काही संबंध नाही हे जाहीर केलेच आहे. नेहरू गांधी घराण्याला सोडून हा पक्ष चालवता येतो हा विश्‍वास निर्माण करण्याचे काम सध्या महाराष्ट्रात नाना पटोले आणि भाई जगताप करताना दिसत आहेत. हे महत्त्वाचे आहे. हाच विश्‍वास भाजपने मिळवला आहे. सामान्य माणूस, चहावाला नेता होऊ शकतो हे दाखवून दिले. तोच प्रकार बिगर गांधी नेहरू काँग्रेस चालू शकते हे दाखवून काँग्रेस करू शकते; मात्र ती ताकद छोट्या पक्षांमध्ये नाही.


उद्या शरद पवार यांनी निवृत्ती घेतली, तर राष्ट्रवादी कोण चालवणार, असा प्रश्‍न निर्माण होईल. राजू शेट्टींनंतर शेतकरी संघटना कोण चालवणार? अशा छोट्या पक्षांबाबत शंका असल्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्याशिवाय पर्याय राहणार नाही. हे दोन पक्ष वाढत जातील हे स्पष्ट आहे. हा बदल महाराष्ट्रातून घडणार आहे. नंतर त्याचे पडसाद अन्य राज्यांत उमटतील. अगदी उत्तर प्रदेशातून मायावतींनाही आपले चंबुगबाळे आवरावे लागेल.

सोनियांचे सल्लागार अहमद पटेल यांच्यानंतर काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर धावून येणारा, पॅचअप करणारा नेता तयार झालेला नाही. हे साहजीकच आहे, कारण जोपर्यंत मुख्य नेतृत्व तयार केले जात नाही, घोषित केले जात नाही तोपर्यंत अन्य आघाड्या कशा कामाला लागतील? अशी कामे करणारे काँग्रेसमध्ये नेते नाहीत असे नाही, तरीही असंतुष्टांचे गट काही नवनिर्माण करतील असे दिसते. २१ जूनपर्यंत काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधींनी लांबणीवर टाकली होती. आता या प्रक्रियेला वेग आला आणि काही सूत्र हालली, तर मरणपंथाला लागलेली काँग्रेस हा-हा म्हणता बाळसं धरू शकते. नाना पटोले, भाई जगतापांसारखे महत्त्वाकांक्षी नेते काँग्रेसला स्वबळावर लढता येते हे दाखवून देतील.


आज सोनिया गांधींनी पंचाहत्तरी ओलांडली आहे. त्यांची प्रकृतीही अलीकडे त्यांना साथ देत नाही. त्यांना थकवा चटकन जाणवतो. त्यामुळे सोनियांनी निवृत्ती स्वीकारावी आणि केवळ मार्गदर्शक म्हणून काम करावे व पक्षाध्यक्षपदाची सूत्रे नव्या दमाकडे देण्याची गरज आहे. अर्थात तो नवा दम फक्त गांधी नावाचाच असला पाहिजे, असे नाही. काँग्रेसमधील हे व्यक्तिस्तोम थांबवले तर सोनिया गांधी थकल्या आहेत, काँग्रेस नाही हे दाखवणे शक्य आहे; पण सातत्याने येणाºया अपयशाच्या घटनांमधून काँग्रेस चर्चेत राहत आहे, म्हणून टिकून आहे. भाजप हा चर्चेत राहून टिकलेला पक्ष आहे. प्रादेशिक पक्षांची अशी चर्चा होत नसल्याने काँग्रेस भाजपला धक्का लागण्याचे चिन्ह नाही. कोणत्यावेळी काय चर्चेत आणायचे आणि ते वाक्य कसे काय सगळीकडे फिरवत ठेवायचे हे तंत्र आजही काँग्रेसला माहिती आहे. नेमकी शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पूर्वीच काँग्रेसने स्वबळाची भाषा केली. त्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावे लागले. चर्चा काँग्रेसची झाली. हीच ती शक्ती आहे. केव्हा जागी होईल ते सांगता येत नाही.

बिटवीन द लाइंन/ प्रफुल्ल फडके


9152448055\

No comments: