- शिवसेनाभाजप युती आपल्या अटीवर टिकवून ठेवण्यासाठी राजकीय तमाशाचे जे फड रंगले त्यात भाजप नेत्यांचे पितळ उघडे पडले. युती तुटल्यामुळे आपल्या वाट्याला जास्त जागा आल्या आहेत त्यामुळे आपला फायदा होईल असे भाजपला वाटत आहे. युती तुटल्याने भाजपचा कितपत फायदा होईल, हे आज सांगता येत नसले तरी या राजकीय वगनाट्याचा फायदा हा आहे की भाजपअंतर्गत उफाळून आलेला नेतृत्वाचा संघर्ष झाकला गेला आहे.
- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या सुमारास मुख्यमंत्री म्हणून आपला चेहरा पुढे आणण्याची स्पर्धा भाजप नेतृत्वात सुरू झाली होती. कानाफुसीचे संघतंत्र ‘केंद्रात नरेंद्र-राज्यात देवेंद्र’ असा कानमंत्र देऊ लागले होते. यामुळे अस्वस्थ झालेल्या दुसर्या दावेदारांनी आपापला दावा पुढे करायला सुरुवात केली होती. त्यामुळे हे आपसातील संघर्ष आणि स्पर्धा करणारेच एकमेकांना पाडायला कारणीभूत ठरतील. भाजप म्हणजेच काँग्रेस आहे हे वारंवार सांगण्याचे कारण हेच की पूर्वी आपल्याकडे एक समीकरण होते. शरद पवारांसारखे नेते उघडपणे ते बोलून दाखवायचे की काँग्रेसचा पराभव कोणी करू शकत नाही. कोणताही विरोधी पक्ष करू शकत नाही. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते. आज भाजपचे तेच झाले आहे. हे सगळे स्वयंघोषित संभाव्य मुख्यमंत्री एकमेकांना पाडण्यास कारणीभूत होतील.
- देवेंद्र फडणवीस गटाने दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही घोषणा दिल्यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर महाराष्ट्राचे कार्ड समोर केले होते. अनेक वर्ष एकनाथ खडसे म्हणून ओळखले जाणारे खडसे लोकांच्या मनात घर करण्यासाठी स्वत:चा उल्लेख आपल्या कार्यकर्त्यांकडून नाथाभाऊ असे करू लागले. उत्तर महाराष्ट्राने सातत्याने भाजपला साथ दिली असल्याने मुख्यमंत्री त्याच भागातील झाला पाहिजे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना शह देण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी बहुजनांचा चेहरा म्हणून ज्या विनोद तावडे यांना पुढे आणले, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात तावडेंना फारसे स्थान नसल्याने फडणवीस नाथाभाऊ यांच्या संघर्षात आपला टिकाव लागणार नाही, हे हेरून त्यांनी या जोडगोळीला शह देण्यासाठी वेगळीच खेळी केली होती. त्यांनी स्वत:ऐवजी पंकजा मुंडे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले. विनोद तावडे यांची ही खेळी आणि लबाडी म्हणजेच एक विनोद होता. पंकजा मुंडे यांनी स्वत:हून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली नसली तरी भाजपअंतर्गत आणि भाजपबाहेरच्या वर्तुळातदेखील त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’कडे मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीच्या रूपात पाहिले गेले आहे. अनुकंपा तत्वावर नेतृत्त्व सोपवण्याची प्रथा फक्त काँग्रेसमध्ये आहे. इंदिरा गांधींच्या निधनानंतर सगळ्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांना डावलून राजीव गांधींना पंतप्रधान केले गेले. त्यावर संघ परिवाराने आणि तत्कालीन भाजपने कडाडून टिका केली होती. पण तोच भाजप आणि भाजपमधील स्वार्थी आणि मतलबी विनोद तावडेंसारखे कार्यकर्ते आता पंकजा मुंडे पालवे यांना पुढे करून काँग्रेसचीच री ओढत आहेत.
- पंकजा मुंडे यांनी तर दुहेरी आव्हान भाजप नेतृत्वापुढे उभे केले आहे. त्यांच्या ‘संघर्ष यात्रे’ने त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आणले आहेच, शिवाय गोपीनाथ मुंडे यांची पक्षावर होती तशी पकड निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर भाजप नेतृत्वाने गोपीनाथ मुंडेंचे पंख छाटण्याचे, त्यांना अडगळीत टाकण्याचे आणि प्रसंगी त्यांचा अपमान करण्याचे जे प्रयत्न केले; ते पंकजा मुंडेंनी अगदी जवळून पाहिले आहेत. आज पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर गोपीनाथ मुंडेंना स्थान मिळाले असले तरी मृत्यूच्या काही दिवस आधी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना सुखासुखी स्थान मिळाले नव्हते. त्या घडामोडी कन्या म्हणून पंकजांनी जवळून पाहिल्या आहेत. आज जे मुंडेंचे गोडवे गात आहेत तेच विनोद तावडेंसारखे नेते मुंडेंचे खच्चीकरण करण्यासाठी गटबाजी करत होते हे विसरून चालणार नाही.
- जनसमर्थनाच्या बळावर पक्षांतर्गत विरोधकांनी दिलेली आव्हाने आपल्या पित्याने परतवून लावली हे पंकजाने पाहिले आहे. त्यामुळे अशा भाजप नेतृत्वापुढे आपला टिकाव लागायचा असेल तर गोपीनाथ मुंडेंच्या मागे असलेले जनसमर्थन आपल्या मागे टिकून राहिले पाहिजे हे त्यांनी हेरले. त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्याचा घाट होता. महाराष्ट्रापासून आणि मुंडेंच्या अफाट लोकप्रियतेपासून दूर नेण्याचा पक्षश्रेष्ठींचा डाव पंकजांनी उधळून लावला. त्यांनी संघर्ष यात्रा काढली. या यात्रेसाठी त्यांनी पक्षनेतृत्वाकडे परवानगी मागितली नव्हती. पक्षनेतृत्वाला फरपटत त्यात सामील व्हावे लागले होते. महाराष्ट्र भाजपमध्ये पुढे काय घडणार याची ही चुणूक समजली पाहिजे. आज मोठ्या गप्पा मारणार्या आणि नेतृत्त्वावर आपला हक्क सांगणार्या भाजप नेत्यांची लायकी काय आहे हे गोपीनाथ मुंडे गेले तेव्हाच दिसून आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी प्रचंड जनसागर जमला होता. त्या जनसागराला आवर घालणे, आपल्या काबूत ठेवणे हे तावडे, खडसे, फडणवीस यापैकी कोणालाही शक्य झाले नाही. दु:खी अवस्थेत असलेल्या पंकजा मुंडे यांना हातात माईक घेवून गर्दीला आवाहन करावे लागले. यातच या सगळ्या बाशिंग बांधलेल्या नेत्यांची लायकी दिसून आली.
- भाजपमध्ये मुंडेंना जी वागणूक मिळाली त्याबद्दलचा मुंडे समर्थकांचा रोष अद्यापही कमी झालेला नाही. याची झलक संघर्ष यात्रेच्या समारोपप्रसंगी पाहायला मिळाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाषणासाठी उभे राहताच पंकजा मुंडे यांनी समर्थकांना शहा यांच्या भाषणात घोषणाबाजी न करण्याचे आदेशवजा आवाहन केले. ही बाब बहुतेक राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटली असली तरी महत्त्वाची आहे. जो प्रकार अंत्यसंस्कारावेळी घडला तोच प्रकार इथेही घडला.
- पण युती तुटल्यामुळे या चर्चांना विराम मिळाला. चव्हाट्यावर येत असलेला भाजपचा अंतर्गत संघर्ष मागे पडला. शिवसेनेशी जागावाटपावरून झालेल्या तणातणीमुळे तो झाकलाही गेला. शिवसेनेसी संघर्ष चालला होता तेव्हा एकमेकांचे पाय ओढणारे भाजप नेते हातात हात घेत असल्याचे चित्र पुढे आले. युती तुटल्यामुळे भाजपकडे उमेदवार नाहीत इतक्या जागा हाती आल्या. भाजप नेतृत्वात जागा वाटपावरून वाद होण्याचे टळले. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना एकसंघ भाजप असे चित्र निर्माण झाले. असे चित्र निर्माण झाले नसते तर याचा भाजपला फटका बसू शकला असता. पण काहीच दिवसांपूर्वीचे हे चित्र मतदारांनी विसरून चालणार नाही. मनात राहिलेल्या या सूप्त इच्छा केव्हाही उफाळून येवू शकतात. फडणवीस यांना नेता मानले तर विनोद तावडेंसारखे नेते त्यात काटे पसरणार. त्यामुळे भाजप हा पक्ष महाराष्ट्राला काँग्रेसप्रमाणेच अस्थिरतेकडे घेवून जाईल यात शंका नाही. अर्थात, महाराष्ट्र भाजपच्या नेतृत्वाची क्षमता लक्षात घेता त्यांच्या पदरी किती जागा पडतील हे आताच सांगता येत नाही. यामुळे भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी ‘मातोश्री’चे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. इथेच शिवसेनेशी झालेल्या संघर्षाचा आज दिसत असलेला फायदा उद्या मोठ्या तोट्यात परिवर्तित होऊ शकतो. निवडणूक पूर्व सर्वेक्षणात जी आकडेवारी भाजपला दाखवली जात होती त्याच्या निम्मीही संख्या भाजपला मिळणे शक्य नाही. भारतीय जनता पक्षाला 50 जागांपेक्षा जास्त यश मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तर क्रमांक एकचा पक्ष हा शिवसेनाच महाराष्ट्रात राहील असे वातावरण आहे.
- त्यामुळेच निवडणुकीनंतर शिवसेनेशी पुन्हा वाटाघाटी करण्याचा प्रसंग येईल तेव्हा भाजप नेतृत्व एकसंघ असणार नाही. झाकला गेलेला नेतृत्व संघर्ष पुन्हा डोके वर काढील. त्या वेळी पुन्हा प्रत्येक जण आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला ते पद मिळणार नसेल तर आपल्या सहकार्यांपैकी कोणालाही मिळू नये, असेही प्रयत्न होतील. याचा शिवसेनेलाच अधिक फायदा होईल. उद्या भाजप-शिवसेना मिळून सत्ता हस्तगत करण्यासारखी परिस्थिती आली आणि शिवसेनेच्या जागा भाजपपेक्षा कमी आल्या तरी भाजप नेतृत्वाच्या संघर्षामुळे उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री होण्याची अधिक संधी असणार आहे. किमान आधीच्या वाटाघाटीत ज्यांनी अतिउत्साहाने उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला, त्यांचा पत्ता तरी उद्धव ठाकरे कापतील. उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखे किंगमेकरच्या भूमिकेत येतील. अशा वेळी संघ आणि भाजप नेतृत्वाला जे नको तेच घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी संघर्ष करण्यापासून चार हात दूर राहिलेल्या पंकजा मुंडे यांचा भाग्योदय होऊ शकतो. युती तुटली तरी शिवसेनेने मुंडे भगिनींविरुद्ध उमेदवार उभे केले नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे.
- भाजपतील मुख्यमंत्रिपदासाठीच्या संघर्षाचा आणखी एका व्यक्तीला फायदा होण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. या सगळ्या काळात गडकरी यांनी मुत्सद्दीपणे पाळलेले मौन त्यांच्या पथ्यावर पडू शकते. गडकरींनी भाजपत चाललेल्या सत्तासंघर्षाला खतपाणी घातले नसले तरी कानाडोळा नक्कीच केला आहे. महाराष्ट्रातील भाजपची स्थिती लक्षात घेतली तर त्या पक्षाचे स्वबळावर सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत कोणत्याही पंतप्रधानांनी घेतल्या नसतील इतक्या सभा मोदींच्या होणार आहेत. यावरून भाजपकडे मोदी या नावाशिवाय काहीही नाही हे लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष करणार्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या हाती धुपाटणे येण्याचीच शक्यता सर्वात जास्त आहे.
Thursday, October 2, 2014
भाजपअंतर्गत संघर्षच भाजपला सत्तेपासून दूर ठेवेल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment