- राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा आघाडी सरकारवर, काँग्रेसवर राग होता. पण निवडणुकीची प्रक्रीया सुरू झाली आणि विरोधी पक्षांकडून काँग्रेस राष्ट्रवादीवर टिका न होता परस्परांवर टिका होताना दिसते आहे, त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाचवेळी भारतीय जनता पक्षावर टिका करताना दिसत आहेत. त्यामुळे राजकारणापासून दूर असलेल्या सामान्य मतदाराला आश्चर्य वाटत आहे. एका सभ्य सामान्य माणसाने याबाबत शंका विचारल्यामुळे आणि त्याच्या आग्रहाखातर आज त्याच विषयावर लिहीत आहे.
- सत्य असे आहे की आजही शिवसेना, मनसे आणि छोटे छोटे विरोधी पक्ष काँग्रेस आणि आघाडी सरकारविरोधातच ओरडत आहेत. फक्त त्याचा अर्थ सामान्य माणसाने समजून घेतला म्हणजे त्या नव्या रूपात आलेल्या आघाडी सरकारला नाकारणे सोपे जाईल. आज जो निवडणुकीच्या मैदानात उतरलेला भारतीय जनता पक्ष आहे, तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित रूप आहे. भाजपच्या नावाखाली काँग्रेसचेच भ्रष्ट लोक भाजपने उभे केले आहेत. त्यामुळे भाजप म्हणजेच महाराष्ट्रातील निष्क्रिय आघाडी सरकार आहे हे लक्षात घेवून भाजपला साफ नाकारण्याचे काम केले पाहिजे. जे ओरीजनल भाजपचे नेते आहेत ते या दलदलीत फसले आहेत, कमळाच्या देठाखाली आहेत आणि प्रशांत ठाकूर यांच्यासारखे पाकळ्यांना चिकटून बसले आहेत. त्या पाकळ्या आता पाडण्याची वेळ आलेली आहे.
- ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या हातात केंद्राची सत्ता मतदारांनी दिली, त्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राचा विश्वासघात केलेला आहे. ज्यांना नाकारण्यासाठी मतदार सज्ज झाला होता त्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश देवून भ्रष्टाचार्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. ओरीजनल भाजपच्या नेत्यांना हे मान्य नाही. 6 ऑक्टोबरला प्रशांत ठाकूर यांच्या सभेसाठी सूषमा स्वराज यांना आमंत्रित केले होते. पण आजारपणाचे कारण सांगून त्यांनी येणे टाळले. पण पक्षादेश म्हणून त्यांना पुन्हा आज यावे लागते आहे, पण त्यांच्या भाषणात ती धार असणार नाही जी धार काँग्रेस विरोधात, यूपीए सरकारविरोधात, सोनिया गांधींविरोधात भाषण करताना असायची ती धार असणार नाही. सूषमा स्वराज यांना लागणारे हे लांछन असेल की काँग्रेसच्या एका भ्रष्ट, निष्क्रिय माणसासाठी आपल्याला प्रचाराला यावे लागते आहे. महाराष्ट्रातल्या भाजपने केलेली ही पापे भविष्यात देशव्यापी अद्दल घडवणारी ठरेल. सोनिया गांधींना पंतप्रधानपदापासून रोखणार्या सूषमा स्वराज मुंडण करायला निघाल्या होत्या, संन्यास घेणार होत्या, अनवाणी राहणार होत्या, श्वेत वस्त्र परिधान करणार होत्या. त्याच बाणेदार सूषमा स्वराज प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी केवळ पैसा ओतला आहे म्हणून येतात यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झालेली आहे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सूषमा स्वराज या पंतप्रधान झाल्या पाहिजेत असे मत व्यक्त करून त्यांची योग्यता दाखवली होती. त्याच सूषमा स्वराज एका भ्रष्ट, काँग्रेसमधून आलेल्या आणि केवळ पैशाच्या तालावर नाचवणार्या माजी आमदाराच्या प्रचारासाठी येतात यावरून भाजपाचे किती नैतिक अध:पतन झाले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
- अटलबिहारी वाजपेयी नेहमी सिद्धांताच्या गोष्टी करायचे. आता त्यांनी भाजपमधून अंग काढून घेतल्यानंतर पैसा हाच सिद्धांत भाजपने अंगीकारला आहे का? अटलजींबद्दल केवळ भाजपच्याच नाही तर संपूर्ण देशात आपलेपणा होता,विरोधकही त्यांचा आदर करायचे. आज तशा तोडीचा एक तरी नेता भाजपमध्ये आहे काय? तर याचे उत्तर नाही असेच येईल. कारण ज्या काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदार सज्ज झाला होता त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी दिली. काय म्हणून भाजपला मतदारांनी निवडून द्यायचे? त्यामुळे सेना मनसे करीत असलेली भाजपवरची टिका ही काँग्रेसवर केलेलीच टिका आहे. भाजप म्हणजे बुरखा बदललेली काँग्रेस आहे हे लक्षात घेवून त्यांना नाकारायचे आहे.
- प्रशांत ठाकूर यांच्यात भाजपने काय पाहिले हो? कोणते कर्तृत्त्व त्यांच्यात होते? केवळ भरमसाठ पैसा ओतणारा नेता म्हणून त्यांना तिकीट विकले? स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देवून राज्यातील काँग्रेसला वाचवायचे या धोरणाने ज्या प्रशांत ठाकूर यांना काँग्रेसने तिकीट नाकारले, त्यांना भाजप उमेदवारी देते ही भाजपच्या नैतिक अध:पतनाची सुरूवात की राज्यातून भाजप हद्दपार करण्याची वेळ आली म्हणायची? सूषमा स्वराज यांनी याचे उत्तर आज दिले पाहिजे.
- पहिल्यांदाच आमदार झाले तेव्हा नागपूर हिवाळी अधिवेशनाच्यावेळी मुक्कामाला प्रशांत ठाकूर नागपूरला गेले. त्यांना म्हणे त्यावेळी चहा पिऊन कंटाळा आला होता म्हणून पित्तावर उतारा पडण्यासाठी दूध पिण्याचा सल्ला कोणीतरी दिला. त्यांनी आपल्या खोलीमध्ये खानसाम्याकडून दूध मागवले. त्या दुधात साखर नव्हती. त्यामुळे त्यांनी दुधात साखर घालून चमच्याने ढवळली आणि दूध प्यायले. ते दूध प्यायले आणि त्यांचा डोळा आणि कपाळ दुखायला लागले. दुपारी पुन्हा तसेच घडले. संध्याकाळी तसेच घडले. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना पाचारण केले आणि सांगितले की ‘इथले दूध प्यायल्यानंतर माझा डोळा दुखतो, कपाळाचा असा भुवईजवळचा भाग टोचल्यासारखा खुपतो.’ डॉक्टरांनी तपासले पण त्यांना काही नेमके दुखणे समजेना. दुसरे दिवशी पुन्हा तसेच घडले. तेव्हा डॉक्टर तिथे आले आणि म्हणाले, ‘मागवा पुन्हा दूध, आपण चेक करू. नेमका काय प्रॉब्लेम आहे ते.’ काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा दूध मागवले. दुधात साखर घातली. चमच्याने ढवळले आणि ग्लास तोंडाला लावला. लगेच ओरडले,‘ हे पहा डॉक्टर दूध पितानाच जास्त दुखते आहे.’ डॉक्टर हसले आणि म्हणाले, ‘दोष दुधात नाही तर तुमच्यात आहे. ग्लासातला चमचा काढा आणि मग दूध प्या. चमच्यासकट ग्लास तोंडाला लावल्यामुळे तो चमचा वर टोचतो आहे.’ म्हणजे ज्या माणसाला ग्लासातला चमचा हटवता येत नाही म्हणून ओरड करतो तो माणूस टोलनाका कसा हटवू शकणार? पक्ष बदलून, आपली निष्क्रियता झाकता येईल काय? अशा लोकांना भाजपमध्ये घेवून भाजपने नेमके काय साधले आहे?
- आज भारतीय जनता पक्ष हा काँग्रेसचा अजंडा राबवण्यासाठी सत्तेवर येवू पहात असेल तर त्याला इथेच रोखला पाहिजे. ठेकेदार आणि टक्केवारी वाल्यांना आपल्या पक्षात घेवून पैशाच्या मागे लागलेला भारतीय जनता पक्ष आम्हाला नको आहे हे मतदारांनी दाखवून देण्याची हीच वेळ आहे. आपल्याला हवा आहे तो अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांचा भाजप. आयात केलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या 55 नेत्यांना तिकीटे देणारा भ्रष्ट भाजप हा महाराष्ट्र कधीही स्विकारणार नाही.
- आज हाच भाजप महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाला आहे. विदर्भाला स्वतंत्र राज्य करण्याचे, महाराष्ट्राचा लचका तोडण्याचे काम भाजप करणार असेल तर महाराष्ट्राने त्यांना साफ नाकारले पाहिजे. या संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईतील आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले. 106 हुतात्मे झाले तेव्हा हा संयुक्त महाराष्ट्र झाला. त्या हुतात्म्यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन हा भाजप जर पुन्हा महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी आला असेल तर त्यांना गल्ली ते दिल्ली नाकारावे लागेल. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत का कोणता शब्द दिला नाही? कारण त्यांचा याच्याशी काही संबंधच नाही. सीमाप्रश्नावर फक्त शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना हेच पक्ष लढू शकतात. पनवेलचे माजी आमदार दिवंगत दत्तूशेठ पाटील यांना सीमा प्रश्नावरील लढ्यासाठी तुरूंगवास भोगावा लागला आहे. त्या तात्यांना या महाराष्ट्राचे तुकडे करणारे भाजपचे नेते आपल्या मतदारसंघात येतात हे पाहून किती दु:ख होत असेल? प्रकल्पग्रस्तांचे नेते शेकापचे माजी खासदार दिवंगत दि. बा. पाटील यांनीही संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्नावर लढा दिला होता. त्यांना काय वाटत असेल? या पनवेलच्या आदरणीय दैवतांचा अपमान करणार्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांची अनामत रक्कम जप्त करण्याचे काम आपल्याला केले पाहिजे. भाजपचे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगुंटीवार हे सरळसरळ आम्ही विदर्भ वेगळा करणारच असे जाहीरपणे सांगतात. त्याचवेळी हतबलपणे नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही. एकाचवेळी असे दोन तोंडाने बोलणार्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल. आज विदर्भ वेगळा करतील, उद्या मुंबई वेगळी करतील. अशा महाराष्ट्राच्या शत्रूंना हद्दपार केले पाहिजे.
Wednesday, October 8, 2014
काँग्रेस उमेदवार आयात करणारा भाजप म्हणजेच आघाडी सरकार आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment