महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या नगर जिल्ह्यातील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाप्रकरणी पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नगर पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई केली. प्रशांत जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्या अटकेमुळं या निर्घृण हत्याकांडावर लवकरच प्रकाश पडणार आहे. पण यामुळे जाधव कुटुंबियांची हत्या झाली नाही तर महाराष्ट्रातील सदविचारांची हत्या झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु या घटनेमुळे एक लक्षात घेतले पाहिजे की नको त्या गोष्टीचे राजकारण करण्याचा प्रकार केला जात आहे. या प्रकरणाला कारण नसताना जातीयतेचे वळण देवून संपूर्ण महाराष्ट्र दहशतीखाली ठेवला गेला होता. त्यामुळे राजकीय पक्षांनी आणि पोलिसांनी कोणत्याही घटनेकडे कशाप्रकारे पाहिले जात आहे याबाबत संयम राखण्याची गरज आहे.आरोपी प्रशांत जाधव हा मृत संजय जाधव यांचा पुतण्या असून त्यानेच या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर प्रशांतसह अन्य काही संशयितांची नार्को चाचणीही करण्यात आली होती. मात्र, पुढे काहीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळं या प्रकरणाचं गूढ वाढलं होतं. अखेर बुधवारी रात्री पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर प्रशांत जाधवची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून गुरूवारी त्याला न्यायालयापुढं हजर केले गेले आणि पुढील तपास सुरू केला गेला. पण हा तपास लागेपर्यंत आणि मुख्य आरोपी सापडेपर्यंत या प्रकरणाला जातीयतचे, दलित अत्याचाराचे जे वळण दिले गेले होते ते मात्र अत्यंत हिडीस होते हे या निमित्ताने दिसून आले आहे. जवखेडे-खालसा गावात ऑक्टोबर महिन्यात संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि मुलगा सुनील अशा तिघांची हत्या करण्यात आली होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी ही हत्या करण्यात आली होती. हा हत्येचा प्रकार हा अत्यंत निर्घृण आणि क्रूर असा होता. हत्येनंतर तिन्ही व्यक्तींच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यामुळं या घटनेविरोधात महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली होती. दलित कुटुंबातील व्यक्तींची हत्या झाल्यानं हे प्रकरण अधिकच चिघळलं होतं. त्यामुळं नगरसह मुंबई पोलिसांचं पथकही कामाला लागलं होतं. पण दुर्दैवाची गोष्ट ही की या हत्येकडे दलितांची हत्या म्हणून पाहिले गेले. हे चुकीचे होते. अशा प्रकारे कोणाचीही हत्या झाली तरी ती वाईटच आहे. ही हत्या म्हणजे दलितांची नव्हती तर माणसांची हत्या होती. पण राजकीय स्वार्थासाठी विविध संघटनांनी त्याला जातीयतेचे स्वरूप दिले. एका संघटनेने मोर्चा काढला की दुसर्या संघटनेने काढला. पोलिसांवर आणि तपासयंत्रणेवर या प्रकारामुळे कारण नसताना दबाव येत होता. हा प्रकार थांबला पाहिजे.एकूणच उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जाधव कुटुंब हे सामान्य आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे होते. त्यांची हत्या करण्यामागे काहीतरी गूढ कारण असू शकते. पण ते कारण घरगुतीच असू शकते हे समोर येताना दिसत आहे. पण या हत्याकांडाकडे पाहताना आणि त्याची प्रसिद्धी करताना दलितांची हत्या, दलितांवर झालेला अत्याचार अशा प्रकारे केली गेली. समाजभावना भडकवल्या गेल्या. हे अतिशय वाईट आहे. या बातम्या पसरवतानाही एक सूर असा होता की कोणा सवर्णाने, उच्चवर्णीयाने हे हत्याकांड केले असावे अशा प्रकारे त्यावर प्रतिक्रीया येत होत्या. त्याच्या तपासासाठी पोलिसांवर ताशेरे ओढले गेले होते. आता हे हत्याकांड त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तिने केल्याचे समोर आले आहे, यामागे जातीय वाद नसून भाउबंदकी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. पण हे हत्याकांड जातीय हत्याकांड नाही हे मात्र सवार्र्नी लक्षात घेतले पाहिजे. पण यामुळे राजकीय पक्ष आणि काही विकृत लोकांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडताना दिसून आले आहे.या हत्याकांडाकडे माणसांची झालेली हत्या म्हणून पाहणे गरजेचे आहे. माणूस म्हणून या घटनेकडे बघितले गेले पाहिजे. त्याला नाहक जातीयतेचा रंग चढवण्याचा केलेला प्रयत्न या पुरोगामी महाराष्ट्राचे दृष्टिने अत्यंत घातक असा आहे.हत्या करणारे, खुनी, हिंसाचारी यांची एकच जात असते. ती म्हणजे राक्षस, दुष्ट. त्यांच्याकडून कोणतेही कृत्य होते तेव्हा ते कधी सवर्ण असत नाहीत की दलित. त्यांना पाहिजे त्याची ते हत्या करतच असतात. त्यामुळे हत्या करणारे कोणी अत्याचारी सवर्ण आहेत, त्यामुळे त्यांना पकडण्यास पोलिसांकडून विलंब होत आहे असा जो आभास निर्माण केला होता, तो अत्यंत हिडीस आहे. असा प्रकार पुन्हा होता कामा नये.हे प्रकरण घडल्यावर विविध संघटनांनी, माध्यमांनी नगर जिल्ह्यातील दलित विरोधी प्रवृत्तीवर बोट ठेवले. खैरलांजी प्रकरणाशी या घटनेशी तुलना करून दलित समाजाला भडकवण्याचा प्रकार केला. 2006 मध्ये जेव्हा खैरलांजी प्रकरण घडले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दलित समाज पेटून उठला होता. हिंसक बनला होता. पुण्याहून मुंबईकडे धावणारी डेक्कन क्वीन ही ऐतिहासिक रेल्वे या दलित कार्यकर्त्यांनी उल्हासनगरजवळ तेव्हा पेटवून दिली होती. संपूर्ण ट्रेन जळून खाक झाली होती. सुदैवाने प्रवाशांना उतरता आले म्हणून जिवीत हानी झाली नाही. नाहीतर त्यावेळी शेकडो प्रवासी जळून खाक झाले असते. गोध्रा हत्याकांडाप्रमाणे ते हत्याकांड घडले असते. पण शंभर वर्ष जुनी अशी डेक्कन क्वीन जाळून टाकण्याचा जो प्रकार घडला तो महाराष्ट्राला काळीमा फासणारा होता. हे केवळ काही दुष्ट प्रवृत्तींनी या समाजाला भडकवल्यामुळे घडले होते.असाच प्रकार या जवखेड येथील जाधव कुटुंबियांच्या हत्येनंतर करण्याचा प्रकार वाईट प्रवृत्तींनी केला. ठिकठिकाणी मोर्चे निघाले. ठिकठिकाणी घोषणाबाजी झाली. मुंडण करण्यापर्यंत मजल गेली. दलितांवर झालेला अत्याचार म्हणून या घटनेकडे पाहिले गेले. पण हे घरगुती वादातून, भाउबंदकीतून घडलेले असताना नाहक त्याला जातीयतेचा रंग चढवून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न याठिकाणी केला गेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले होते. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पण भाजप सरकार बनवू शकते हे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नव्हते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातून सत्ता गेली होती. अशा परिस्थितीत भाजप सत्तेवर आल्यावर दंगली घडतात हे भासवण्यासाठी केले गेलेले ह षडयंत्र असावे असेच याठिकाणी वाटते.काही दुष्ट प्रवृत्तींनी जातीयतेचा आधार घेवून राजकारण करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या कारणाने हत्याकांड होत असतात. अंधश्रध्देतून होतात. दरोडे टाकण्यावरून होतात. शेतीवाडी आणि कोर्टकचेर्यांमुळे निर्माण झालेल्या भाऊबंदकीतून हत्या होत असतात. पण या हत्या पूर्ववैमनस्यातून किंवा स्वार्थापोटी झालेल्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. ना मारणाराला जात असते ना मरणाराला. मानवत खून खटला हा अंधश्रद्धेतून गुप्तधनाच्या लालसेपायी झाला होता. दोन वर्षांपूर्वी पनवेलजवळ फार्म हाऊसमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या कल्पनेतून अंधश्रद्धेतून हत्याकांड घडले होते. दरोडा टाकण्याच्या मानसिकतेतून पुण्यात जोशी अभ्यंकर खून प्रकरण घडले होते. अभ्यंकरांच्या एकाच कुटुंबातील पाच माणसांची हत्या केली गेली होती. अशा तर्हेची हत्याकांड वेगवेगळ्या कारणांनी घडलेली आहेत. पण त्यावेळी कोणा विशिष्ठ समाजाची हत्या झाली असा आवाज कोणी उठवला नव्हता. पण या प्रकरणानंतर मात्र केवळ राजकीय कारणाने दलित कुटुंबावर अत्याचार झाला हे भासवण्यासाठी त्याला वेगळा रंग दिला गेला. हे अत्यंत चुकीचे झाले आहे. जाधव कुटुंबियांची हत्या झालीच. पण यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांची हत्या झालेली आहे हे लक्षात घ्यावे लागेल.कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी जातीयतेचा वापर करायचा हे काँग्रेसने विकसीत केलेले तंत्र आता संपुष्टात आणले पाहिजे. सूडापोटी एखाद्याला अडचणीत आणण्यासाठी अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची वाईट प्रवृत्ती महाराष्ट्रात रूजते आहे. त्याला पायबंद वेळीच घातला नाही तर महाराष्ट्रात हिंसाचार वाढेल. भाजप सरकारने काँग्रेसने सुरू केलेल्या या वाईट प्रथांना आळा घातला पाहिजे. त्यासाठी कायद्यात तरतूद केली गेली पाहिजे. अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे नोंदवणारांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणासाठी जातीचा वापर करणारांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
Thursday, December 4, 2014
सदविचारांची हत्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment