बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज पाटण्यात मुख्यमंत्रीपदाची पुन्हा एकदा शपथ घेवून या पदावर विराजमान होत आहेत. यापूर्वी जेव्हा त्यांनी शपथ घेतली तेव्हा भाजपची त्यांना साथ होती. आता हातातले कमळ सोडून ते शपथ घेणार आहेत. पण या निमित्ताने फक्त भाजप विरोधी नाही तर नरेंद्र मोदी विरोधक एकत्र आलेले आहेत. ज्याप्रमाणे आपले विचार बाजूला ठेवून आणीबाणीच्या काळात सगळे विरोधक इंदिरा गांधींच्या विरोधात एकवटले होते तसेच हे एकवटणे आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे स्वरूप हे नितिशकुमारांचा शपथविधी असे नाही तर मोदी विरोधाचे सर्वपक्षिय शक्तीप्रदर्शन असे आहे. पाटण्यातील गांधी मैदानात नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची चौथ्यांदा शपथ घेतील. या शपथविधीसाठी बिहारची राजधानी पाटण्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस सरकारने वानखेडे स्टेडियमवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते त्याला या शक्ती प्रदर्शनाने उत्तर असणार आहे. बिहारमध्ये यापूर्वी असा सोहळा कधी झालेला नव्हता. यापूर्वी तीनवेळा झालेला शपथविधी हा नितिशकुमरांना साजेसा असा साधेपणानेच झालेला होता. पण याखेपेच्या शपथविधीला लालूप्रसादांची साथ आहे. यापूर्वी नितिशकुमार मुख्यमंत्री झाले होते ते लालू राज हटवण्यासाठी झाले होते. बिहार म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेले भयानक गुन्हेगारांचे राज्य अशी ख्याती होती. या गुन्हेगारी वाढीला लालूप्रसाद यादव जबाबदार आहेत अशी ख्याती झालेली होती. त्यामुळे बिहारमधील हे लालूराज, जंगलराज हटवण्यासाठी म्हणून नितिशकुमारांनी कंबर कसली होती. त्यासाठी भाजपच्या मदतीने त्यांनी लालूंचा राष्ट्रीय जनता दल नेस्तनाबूत केला होता. पण आज केवळ मोदी विरोधासाठी त्याच लालू प्रसाद यादव यांच्या जिवावर नितिशकुमार यांचा हा शपथविधी होत आहे. त्यामुळे लालूंच्या मार्गाने नितिशकुमार जाणार काय असा प्रश्न निर्माण होतो. लालूंना वाचवण्यासाठी या शक्तीचा वापर होणार काय असा प्रश्न निर्माण होतो. लालूंचे मिंधे होण्याचे काम नितिशकुमार किती दिवस करणार? लालूंच्या हातातील बाहुले अशी प्रतिमा आगामी काळात नितिशकुमार यांची होणार काय असा प्रश्न यातून निर्माण होताना दिसत आहे. काय असेल ते असो पण नितीशकुमार यांनी या शपथविधी सोहळ्याला देशभरातील राजकीय नेत्यांना निमंत्रण धाडले आहे. खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना नितीशकुमारांनी आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. यातील बहुतेक सर्व मोदी विरोधक या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यातील चेहरे पाहिल्यावर आणि कोण कोण उपस्थित आहे हे स्पष्ट झाल्यावर देशातील आगामी राजकारणाचे वारे वाहू लागेल. जर या शपथविधी सोहळ्यातून मोदी विरोधाचे वातावरण तापवण्यात नितिशकुमार यशस्वी झाले तर मोदी सरकारला पुढची साडेतीन वर्ष अतिशय डोळ्यात तेल घालून कारभार करावा लागेल. आज त्यांचे बहुमत असल्यामुळे सरकार अस्थिर नाही. पण ही एकजूट अधिवेशन आणि संसदेत दिसून येईल. कामकाज करणे सरकारला अवघड होवून बसणार आहे. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत मतदारांना पुन्हा सामोरे जाताना यापूर्वी दिलेल्या वचनांपैकी कोणतेही काम केलेले नाही, परदेशवारी, वाचाळ पंचवीशी नेते यामुळे मोदींना तोंड देताना नाकी नउ येतील हे निश्चित. नितीशकुमार यांच्या या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. यात नितीश-लालूंना यश येत असल्याचे चित्र आहे. या सोहळ्याला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू कश्मीरमधील नेते फारूख अब्दुला, गुलाब नबी आझाद, भारिपचे प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ वकिल व भाजपचे माजी खासदार राम जेठमलानी, अभय चौटाला, सीताराम येचुरी, डी. राजा, शीला दिक्षीत, भूपेंद्र हुडा, शंकरसिंह वाघेला, हेमंत सोरेन, बाबूलाल मरांडी, अजित जोगी, चौधरी अजित सिंग, प्रफुल्ल पटेल, मलिक्कार्जून खरगे, एच के दुवा, राज बब्बर, एम. करूणानिधींचे चिरंजीव टीएमके स्टॅलिन, शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई, रामदास कदम आदी देशातील विविध राजकीय नेते नितीशकुमारांच्या शपथसोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगाई, सिक्कीमचे मुख्यमंत्री पी के चामलिंग, मणीपूरचे मुख्यमंत्री ई. इबोबी सिंग, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबम तुकी, ओमर अब्दुला आदी आजी-माजी मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.नितीशकुमार यांनी प्रोटोकॉल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण धाडले आहे. मात्र, त्यांनी नियोजित दौर्याचे कारण सांगून ते नाकारले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनाही निमंत्रण दिले आहे. मोदींना शह देण्याची तयारी- देशातील भाजपविरोधी व मोदी विरोधकांना एकत्र आणून धर्मनिरपेक्ष पक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांचा आहे. देशातील सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांची मोठ बांधून भाजपला आव्हान देण्याचा कॉंग्रेसचाही प्रयत्न आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून २०१९ साली होणार्या देशातील सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शह देण्याची तयारी सुरु आहे. याचा फायदा लालूप्रसाद यादव उठवणार पण राष्ट्रवादीचे नेतेे शरद पवार कसा उठवतात हाही प्रश्न आहे.
Thursday, November 19, 2015
मोदी विरोधक एकवटले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment