- मागच्या आठवड्यात एबीपी माझा या वाहिनीवर मासिक पाळी आलेल्या स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाकारला जातो यावर चर्चासत्र घेतले गेले. त्यामध्ये अनेक पंडित, विद्वान, विचारवंत, राजकीय नेते, समाजसुधारक या सगळ्यांना बोलण्याची संधी दिली गेली. नेहमीप्रमाणे कोणत्याही निष्कर्षाशिवाय ही चर्चा संपली आणि आपण काहीतरी वेगळे विषय हाताळतो आहोत हे दाखवण्याचा एबीपी माझाने आटापिटा केला. तसा दोन तीन वर्षांपूर्वी हा विषय आयबीएन लोकमतवरून निखिल वागळे यांनी यांनी अगोदर घेतला होता. तेव्हाही या विषयावर कसलाही तोडगा, निष्कर्ष निघाला नाही.
- पण पाळी सुरू असलेल्या महिलेला मंदिरात प्रवेश मिळाला पाहिज यासाठी इतका अट्टाहास कशासाठी केला जातो आहे? पाळी सुरू असतानाच देवाचे दर्शन घेतल्याने आपण सुधारक ठरणार आहोत काय? पाळी सुरू असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश केल्याने देशाची प्रगती होणार आहे काय? कोणत्याही विषयावर एरंडाचे गुर्हाळ चालवण्याची जी प्रथा वाहिन्यांवरून पडली आहे त्यावर बंदी घालावी लागेल.
- ज्याप्रमाणे मंत्रालयात, किंवा व्हीआयपी ठिकाणी प्रवेश करताना ओळखपत्र वगैर प्रोटोकॉल चेक केले जातात. त्याप्रमाणे या देशातील कोणत्या मंदिरात बाई ग तुझी पाळी सुरू आहे काय? म्हणून विचारले जाते? अनावश्यक विषय चर्चेला घेवून एखाद्या विशिष्ठ धर्माला बदनाम करण्याचे धंदे थांबवले पाहिजेत. मासिक पाळी, त्याकाळात घेण्याची काळजी याबाबत शालेय जीवनात मुलींना व्यवस्थित मार्गदर्शन शिक्षण दिले पाहिजे. त्यासाठी मुलगी, आई वडिल, नातेवाईक यांच्यात चर्चा झाली पाहिजे. त्याबाबत वैद्यकीय मार्गदर्शन केले पाहिजे. सुधारणा घडेल ती त्यातून घडेल. पण अशा वायफळ चर्चांमधून एखादी मुलगी असूयेपोटी पाळी सुरू असताना मंदिरात जाईल आणि नमस्कार करेल, पूजा करेल. हे चुकीचे आहे. यात पाप पुण्याच्या कसल्या गप्पा मारल्या जात आहेत? कोणताही देव कसल्याही पापाने विटाळला जाईल इतका तकलादू असेल का? इतका तकलादू असेल तर त्या देवाला लोक नमस्कार कसे करतील? बायकांच्या पाळीवर चर्चा करण्यापेक्षा शेतकर्यांवर आत्महत्या करण्याची जी पाळी आली आहे त्यावर बोला.
- मुलींची किंवा महिलांची पाळी सुरू असणे हा खाजगी आणि नाजूक विषय आहे. तो जाहीरपणे चर्चा करण्याचा विषय नाही. कसल्याही निष्कर्षाविना होणार्या चर्चांचा तर तो नाहीच नाही. एखादी महिला गेलीच हट्टाने पाळी सुरू असताना मंदिरात तर कोण अडवणार आहे तिला? ही एक़ शारिरीक अवस्था आहे. पाळी येणारी स्त्री परिपक्व झालेली आहे. ती आई होवू शकणार आहे, तिच्यातील सृजनशीलता वाढीस लागणार आहे. त्या अपवित्र वाटण्यासारखे काहीच नाही. पण कोणतीही शारिरीक, मानसिक वाढ होत असताना माणसाची अवस्था नाजूक होत असते. अगदी तारूण्यात पदार्पण करताना चेहर्यावर येवू लागलेले पिंपल्स असतील तरी मुलामुलींना तो चेहरा लोकांना दाखवायला आवडत नाही. कारण या वयात आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. पौगंडावस्थेतून तारूण्यास्थेत पदार्पण करत असताना मुले मुली यांच्या शरिरात बदल होत असताना मनात तारूण्यसुलभ भावनांनी लज्जा उत्पन्न होते. अशा वयात तरूणांचा सगळ्या जगावरचाच विश्वास उडालेला असतो. देव वगैर मानण्याच्या पलिकडे हे वय असते. अशी मुले मुली अनेकवेळ सार्वजनिक समारंभातही जाण्याचे टाळत असतात. मग ती मुले मुली देवाला कशाला जातील? त्यामुळे पाळी सुरू असताना महिलांनी मंदिरात प्रवेश केलाच पाहिजे यासाठी अट्टाहास कशाला? त्यातून साध्य काय होणार आहे? आमचे असले पुरोगामित्व सिद्ध करून काय मिळणार आहे? एखाद्या मुलीने आपल्या आई वडिलांच्या मृतदेहाला अग्नि देणे हा पुरोगामीपणा आहे. पण पाळी सुरू असताना देवळात जाण्याने काय सिद्ध होणार आहे? हळदी कुंकु, सार्वजनिक समारंभात विधवांना आमंत्रित करणे हे पुरोगामीपणाचे लक्षण आहे. त्याचे स्वागत करता येईल. कारण नवरा नसलेल्या महिलेला तिच्या आनंदाच्या अधिकारापासून परावृत्त व्हावे लागते. तो अधिकार देणे कौतुकास्पद ठरेल. पण पाळी सुरू असताना मंदिरात गेल्याने कोणते पुरोगामीत्व सिद्ध होणार आहे? या चर्चेत ज्या महिला आकांडतांडव करून बोलत होत्या की मंदिर प्रवेश झालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे वगैरे वगैरे. पण किती महिलांना अशा अवस्थेत मंदिरात जाणे आवश्यक आहे असे वाटते? त्याचा कोणीच उहापोह करत नाही. जिथे मासिक पाळीविषयी मोठ्याने बोललंही जात नाही, केमिस्टकडे सॅनिटरी पॅड्ससुद्धा दबक्या आवाजात मागितले जातात, त्या समाजात स्वत:चे पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी काही मुली आज ‘हॅपी टू ब्लीड’ म्हणत आंदोलन करत आहेत. पॅड्स हाती घेऊन सोशल मीडियात बिनधास्त वावरतायत. त्या मुली देवभोळ्या असणं शक्य नाही. त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे, की नैसर्गिक क्रियेचा बाऊ करू नका. हा बाउ पुरूषप्रधान संस्कृती नाही तर स्वत:ला सुधारक समजणार्या विदुषींकडून होत आहे. आपल्याकडे वयात आल्यावर मुलींना न्हाण आल्यावर किंवा पाळी सुरू आल्यावर मखरात बसवून तीचा सन्मान करण्याची प्रथा पूर्वी होती. २२ जून १८९७ या चित्रपटात १९८० साली सीताबाईला, चाफेकळील न्हाण आलं, असे गाणे होतेे. झी मराठीवर दोन वर्षांपूर्वी गाजगलेल्या उंच माझा झोकामध्ये रमाबाईंना न्हाण आल्यावर समारंभ केल्याचे दाखवले होते. त्यामुळे भारतीय संस्कृतीत, हिंदू संस्कृती पाळी आली म्हणून स्त्री अपवित्र झाल्याचे कधी म्हटले नाही. त्यामुळे फालतू चर्चा करून पुरोगामीपणाचा आव आणण्यासाठी विनाकारण वेळ वाया घालवू नका. देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिले तर बरे होईल.
Sunday, November 29, 2015
मासिक पाळीवरून आकांड तांडव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment