भारतीय राज्य घटनेचे संविधानचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. डॉ. आंबेडकरांचे जीवन हे जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला मार्गदर्शक असे आहे. माणूस किती विचार करू शकतो, त्याची अभ्यासाची क्षमता कशी अमर्याद असू शकते आणि संघर्ष आणि अभ्यासातून आपले साध्य गाठता येते हे डॉ. आंबेडकरांच्या चरित्रावरून लक्षात येते. त्यामुळे ज्याला यशस्वी व्हायचे आहे अशा प्रत्येकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला पाहिजे. अफाट बुद्धिमत्ता, आकलनशक्ती आणि चतुराईने त्यावर मत मांडण्याची कल्पकता त्यांच्याकडे होती. कल्पकतेला वास्तवतेचे भान होते. त्यामुळे या देशाची घटना तयार होताना मसूदा समितीवर त्यांची झालेली निवड म्हणजे या देशावर झालेले थोर उपकार आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकार्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी फक्त चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे निवडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले होते. ते केवळ पदव्या मिळवण्यासाठीच नाही तर अर्थशास्त्र, राजकारण, मानववंशशास्त्र, नीतिशास्त्र, व्यापार, समाजशास्त्र या विषयांवर प्रभुत्व मिळवायचे होते. या विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला दि. १५ मे १९१५ रोजी ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पीएच.डी.साठीचा विषय ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ १९१३ ते १९१७ या कालावधित विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध होता. ब्रिटीशांची सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकून, अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचं अभ्यासपूर्ण विवेचन केले होते. त्यांनी जगातील सर्व देशांचे लक्ष या प्रबंधाकडे वेधून घेतले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध लिहिला. हा प्रबंध त्यांनी उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना आदरपूर्वक अर्पण केला. या ग्रंथात ब्रिटिशांवर प्रखर टीका करून आपण खरे राष्ट्रप्रेम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या सार्याच विद्वानांचे लक्ष वेधले होते. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला. त्यानंतरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले. त्यानंतर १९२८ मध्ये बॉंबे प्रेसिडेन्सी कमिटीवर डॉ.आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली. पुणे करार हा बाबासाहेबांच्या कार्यातील फार महत्त्वाचा टप्पा आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यांनी ध्यानी घ्यावे, हे बाबासाहेबांचे विचार होते. हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. ज्या धर्मात आम्हाला किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार केला. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते. मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबाना अस्पृश्यांची हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरुष यांचा वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिक पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडझेप घ्यावयाची होती. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा बौद्ध धम्म हा योग्य पर्याय असल्याचे बाबासाहेबांनी जाणले. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्मांचा सखोल अभ्यास केला. या काळात त्यांचा कल बौद्ध धम्माकडे वळला. डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी असे हे चरित्र आहे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे संपूर्ण देशाचे उद्धारकर्तेच होते याची खात्री पटेल.
Friday, December 11, 2015
महामानवाला अभिवादन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment