मागचा आठवडा हा लातूरला पाण्याच्या वॅगन आल्या, रेल्वेने पाच लाख लिटर पाणी आणले याबाबत कौतुकात गेले. या घटनेचा ज्याचा त्याने फायदा घेतला. पण लातूरला हे पाणी अशा प्रकारे पुरवावे लागले याकडे कोणीही गंभीरपणे पाहिले नाही. काळाच्या ओघात लोक विस्मरण पावतात त्याचे हे बोलके उदाहरण आहे. ज्या लातूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासरावद देशमुख निवडून येत होते तेच हे लातूर. ज्या लातूरचा अभ्यासात लातूर पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात गाजले ते हे लातूर. दोन वेळा मुख्यमंत्रीपद आणि सातत्याने मंत्रीपद असलेल्या विलासराव देशमुख यांच्या मतदारसंघातील जनता जर तहानलेली असेल तर बाकीच्या जनतेचे काय? विलासराव देशमुख, कॉंग्रेस यांनी इतके वर्ष काहीच केले नाही याचे हे प्रतिक आहे. कॉंग्रेसच्या कोणाही जाणकार नेत्याने यावर का प्रतिक्रीया दिली नाही? शरद पवारांनी आपले बारामती अगदी सिंगापूरपेक्षा छान केले आहे. प्रत्येक नेता किमान आपला मतदारसंघ तरी चांगला, विकसीत करतो. पण गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणारे, त्यांचे जोडे उचलण्यात धन्यता मानणारे कॉंग्रेसचे नेते कॉंग्रेस नेत्यांचीच री ओढतात. आज गांधी घराण्याचा पारंरपरागत मतदारसंघ रायबरेली आणि अमेठी हे मागास आहेत. इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल या दिग्गजांनी नेतृत्व करूनही या मतदारसंघांना काहीच मिळाले नाही. तेच कॉंग्रेसचे एकनीष्ठ राहिलेले विलासरावांनी लातूरबाबत केले हे यातून स्पष्ट होते. गेल्या कित्येक वर्षात पावसाचा मोसम सोडला तर या लातूरमध्ये कधीच आठवड्यात दररोज पाणी पुरवठा होत नाही. असे हे देशातील एकमेव महानगर असावे. ज्याला कायद्याने महानगर, महापालिका म्हणून घोषित केले आहे. पण विकासात ते अत्यंत मागास असे शहर आहे. शहर म्हणायलाही लाज वाटावी असे ते गांव आहे. एक गाववजा विस्तारलेली बकाल वस्ती, अशी लातूरची अवस्था आहे. हे कॉंग्रेसच्या नेत्यांचे पाप आहे. अनेक दशकांचे पाप आहे. मोदी सरकारने आज पाणी पुरवले म्हणून वाचले आणि सर्वांचे लक्ष गेले. पण वर्षानुवर्ष इथे जनता तडफडत असते. शहर म्हणायला तिथे कुठला उद्योग नाही की मोठा व्यापार बाजारपेठ नाही. गेल्या काही वर्षात शिक्षणाची एक मोठी बाजारपेठ इथे उभी राहिली आहे. हेच ते लातूर म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे गाव आहे. तेच लातूर म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला असलेले शहर. २६/११ च्या हल्ल्यात मुंबईत हाहाकार माजलेला असताना तासातासाला जोधपुरी बदलून नव्या सुटात येणार्या शिवराज पाटलांचे हे गांव. याच २६/११ च्या हल्ल्यात राम गोपाल वर्माला घेउन त्याचे चित्रिकरण करण्यास परवानगी देणार्या माजी मुख्यमंत्री विलासरावांचा हा मतदारसंघ. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेली ही जागा. हे आता कॉंग्रेसच्या अतिरेकी प्रेमाने माखलेल्या जनतेनेे लक्षात घेतले पाहिजे.अशा या महानगराची अवस्था अकस्मात अशी झालेली नाही. या मराठवाड्याचे दुर्दैव कुणाच्या शापवाणीने आडवे आलेले नाही. कायम दुष्काळाच्या व मागासलेपणाच्या गर्तेत फ़सलेल्या प्रदेशाला मराठवाडा म्हणतात. ज्याने राज्याला चार मुख्यमंत्री दिले, तोच हा मराठवाडा. आयपीएलचा लक्ष्य करायचे, म्हणून लातूरच्या पाणी दुर्भिक्ष्याला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. मग काय त्या कोरड्या गंगेतही हात धुवून घ्यायला प्रत्येकजण धावत सुटला. आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री बोलबचन केजरीवाल तर अशा संधीची प्रतिक्षाच करीत असतात.दिल्लीहून प्रतिदिन दहा लाख लिटर्स पाणी लातूरकरांना द्यायच्या गमजा लगेच हा माणूस करतो. हा केजरीवालचा वेडेपणाच म्हटला पाहिजे. म्हणजे दिल्लीत अजून पुरेसा पाणीसाठा नाही. दिल्लीकराला पुरेसा पाणी पुरवठा केजरीवाल करू शकलेला नाही. असा हा माणूस दिल्लीच्या पाणीटंचाईवर स्वार होऊन सत्तेपर्यंत पोहोचला. यालाच ग्रामीण भाषेत मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणतात. यातून आजचे राजकारणी, पत्रकार वा एकूणच बुद्धीवादी लोक किती रसातळाला गेलेत त्याची प्रचिती येते. म्हणजे, कुठलाही गाजावाजा न करता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजस्थानात चालणारी पाणी एक्सप्रेस मिरज-लातूर अशी फ़िरवली आणि आपले कर्तव्य पार पाडले. त्याचे श्रेय घ्यायला तो सुरेश प्रभूंसारखा सभ्य माणूस पुढे आला नाही. पण श्रेय शिवसेना भाजपच्या प्रभूंना जाते म्हणताच, अनेकांना लातूरकरांचा पुळका आलेला आहे. तुम्ही पाणी देण्याच्या अगोदर हेच लातूरकर कित्येक वर्षे कुठून व कसे पाणी मिळवून जीव जगवत आहेत, त्याची कल्पना तरी असल्या करामती करणार्यांना आहे काय? आज विलासराव देशमुख हयात नसले तरी अशोक चव्हाण आणि कॉंग्रेसच्या लाचार नेत्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. आपण भ्रष्ट मार्गाने पैसा कमावतो, त्यासाठी मुख्यमंत्रीपदही गमावतो पण ज्यांच्या जीवावर निवडून येतो त्या जनतेला असे तहानलेले ठेवतो? इतक्या वर्षात अशी ट्रेन मागवावी आणि थोडी का होईना सोय करावी असे का सुचले नाही? मराठवाड्यात कायम दुष्काळ पडत असताना कायमस्वरूपी योजना का राबवली गेली नाही? मराठवाड्यातून कॉंग्रेसला हद्दपार केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. कॉग्रेस नेत्यांच्या दुर्लक्षामुळे, मानवी मुर्खपणा, बेशिस्त व बेतालपणाने अशी बकाल शहरे उभी केली. पाण्याचे नियोजन केले नाही. त्यातून आधीच गांजलेला मराठवाडा अधिकच केविलवाणा होऊन गेला आहे. त्याला आपल्या पायावर उभा करण्याची गरज आहे. त्यासाठी जाणत्या नेत्यांची गरज आहे.
Saturday, April 16, 2016
टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment